नवीन लेखन...

बुलढाण्यातली मराठी बोली

नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आणि विदर्भाची राजधानी. नागपूरची मराठी हिंदीमिश्रित आहे. नागपूरहून यवतमाळला आलं की या मराठीचं स्वरूप बदलतं. बुलढाण्यातली मराठी मात्र या दोन्हीपेक्षा आणखीनच वेगळी आहे. बुलढाण्यातल्या बोलीतही हिंदी शब्दांचा सर्रास वापर केला जातो. प्रमाण मराठीपेक्षा इथली बोली फार वेगळी आहे.

इथे ‘आतापर्यंत’ला अदलोक असा शब्द आहे. ‘अदलोक काय करत होती वो बाई तू?’ म्हणजे ‘तू आतापर्यंत काय करत होतीस गं बाई?’ आणि ‘तदलोक’ म्हणजे ‘तोपर्यंत.’ ‘मरे तदलोक सुदरणार नाही वो हे बाई’ म्हणजे ‘ही बाई मरेपर्यंत सुधारणार नाही.’ मराठीत जो ‘बंदा रुपया’ असा शब्द वापरला जातो, तो बंदा इथे ‘बंद’ म्हणजे सगळं, अख्खं या अर्थी वापरला जातो. ‘बंदंच खाऊन घेतलं का वो माय बाई तुनं?’ म्हणजे ‘सगळंच खाऊन टाकलंस का गं बाई तू?’

‘इतली काऊन तळावली?’ म्हणजे ‘जास्त माजली काय?’ यातलं ‘काऊन’ म्हणजे ‘काय म्हणून’ असतं. इथं ‘ळ’चा ‘ड’ आणि ‘ड’चा उच्चार ‘ळ’ करतात. म्हणजे बघा. फळा – फडा आणि फडा -फळा. फड्यावर खडूने लिहिलं जातं आणि ‘फळ्याने घर झाळलं जातं.’ फडा म्हणजे केरसुणी किंवा झाडणी. बोलताना म्हणणार ‘आण तो फळा, इतलं लोटून टाकतो.’

स्त्रिया बोलताना खातो, करतो, जातो, येतो अशी पुरुषी रूपं वापरतात. ‘ते जाऊ राह्यली’ म्हणजे ‘ती जात आहे’, ‘ते खाऊ राह्यली’ म्हणजे ‘ती खात आहे.’ इथे सुनेला वायरी म्हणतात आणि घरात सुनांचं स्थान अत्यंत दुय्यम – तिय्यम दर्जाचं असतं. घरातल्या वायरीनं सर्वात शेवटी जेवायचं असा रिवाज आहे.

इथल्या शिव्याही मोठ्या मजेदार आहेत. हेंबाडी किंवा हेंबामाय म्हणजे बावळट किंवा गबाळी. झांबली किंवा झांबलट म्हणजे हळूबाई, किंवा मंद गतीने काम करणारी फुटकी म्हणजे आंधळी. मॅट म्हणजे मॅड. तितुरध-या म्हणजे धांदरट. हेल्याचं मस्तक म्हणजे मंदबुद्धी. ‘यल्लावली’ म्हणजे ‘लाडात आली.’ ‘हिडगू नको’ म्हणजे ‘नाटकं नको करू’, ‘बांड्या पंचायती’ म्हणजे ‘रिकाम्या चौकशा’. ‘रिकामे कामं’ म्हणजे नस्ते उद्योग. आठी म्हणजे इथे आणि तठी म्हणजे तिथे. इतलं म्हणजे इतकं आणि तितलं म्हणजे तितकं.

‘तितल्यात काईच व्हत नाही वं भाऊ’ म्हणजे ‘तितक्यात किंवा तेवढ्यात काहीच होत नाही.’ ‘ते माझी बाई हे.’ म्हणजे ‘ती माझी मुलगी आहे.’

परेशानी, दिमाग, अंदर, वापस, आलू, दवाई, बुढा, बुढी असे अनेक हिंदी शब्द या बोलीत प्रचलित आहेत. काली-पीली म्हणजे काळ्या-पिवळ्या रंगाची टॅक्सी.

रोडगे, मुंगाड्या, करोडा (उडदाचे वडे), सरकुंडे (शेवया), साबुदाण्याची उसळ (खिचडी), चिवईचं बेसन, वरणगोटे, डाळभाजी (पालेभाजी – डाळ) आलुबोंडे (बटाटावडे), बोंडं (लाल भोपळ्याची गोड भाजी), शेवळ्या (शेवया), चौलाई फल्ली (चवळीच्या शेंगा), कवळं (लाल भोपळा) अशी खाद्यपदार्थांची नावे आहेत.

खुंबा (कोपर), टोंगळा (गुडघा), दिमाग (डोकं), क्रिम- किरमं (जंत, कृमी), जाडदुम (खूपच मस्त), पयप (पाइप), सराटा (उलथनं), कोपर (परात), बोंबली (बेंबी), बाड (बाळ), गोडी (गोळी), उस्ती (उशी), उस्ताला (उशाला), भलकाईच (भलतेच), उंद्री (काळी), डोमडी (काळी-सावळी), निपक (स्वच्छताप्रिय), चबरी (चाभरट), शिंगल बशी (बशी), डोकसं (डोकं), गिधाडं (घाणेरडं), झांपर (ब्लाउज), संबार (कोथिंबीर), शिशी(बाटली), पि‌वशी (पिशवी),ड्राम (ड्रम), बाल्टी (बादली), किटकुला (किडा), पावशी (‌विळी), गंज (पातेलं), काड्या (सरपण), सडेल फटक (सडलेलं), वईस फटक (शिळं, वाईट वासाचं), चंग पानी (पातळ फुळुक), गंदं फटक (घाणेरडं) असे बाहेरच्यांना चमत्कारिक वाटणारे शब्द इथल्या बोलीत आढळतात.

इथल्या लोकगीतात – दिल्ली शहरामंदी रुपयाला वांगे चार, घ्या ना घ्या ना रमाबाई संबार हिरवागार – अशी एक ओवी सापडली. बाबासाहेब आंबेडकर दिल्लीत राहत असताना त्यांच्या पत्नी रमाबाईंना तिथल्या महागाईचं वाटणारं आश्चर्य या लोकगीतातून व्यक्त होताना दिसतं. यात संबार म्हणजे कोथिंबीर.

उडदाची दाय म्हणजे (उडदाच्या डाळीचं ‌वरण) आणि ज्वारीची भाकरी खाताना एक गाणं म्हटलं जातं – ओ माझी माय, उडदाची दाय, खाशीन तं खाय नाई तं उपाशी -हाय.

लहान लेकरं खेळवताना एक मजेदार गाणं आहे – ‘अशी माय भिलाई गोंडीण, गेली माय तयाच्या नालीनं, आणिल्या मासोया धरून, खाल्ल्या बाई मटक मारून’ इथे ‘ळ’ च्या जागी ‘य’ वापरलेला आहे.

‘अबे काऊन बे तितुरध-या, काय करून राह्यला?’
‘किती पोड्या दाबल्या?’(पोड्या म्हणजे पोळ्या)
‘काऊन हिडगु ऱ्हायली वं?’(कशाला नखरे करते गं?’
‘भुकेनं कोय-कोय झालं’ (फार भूक लागली)
‘काय खाऊन घर बांधीन? ’ (कसं काय घर बांधू शकेल.)
‘करूनच राह्यली ना’(करतेच आहे ना.)
‘राई-राईचे परकार केले.’ (विविध खाद्यपदार्थ बनवले.)
‘तठी काय करू राह्यला?’ (तिथे काय करतो आहेस?)
‘येल पाडू नको.’(लघळ बोलू नको, लाडात येऊ नको.)
‘पाचात पडली’ (पतिव्रता झाली.)
अशिलाची बाई (चारित्र्यवान स्त्री),
झाकडपट्ट्या (वेळेवर काम न उरकणारा),
पीठ चूर (कणिक मळ)
बोंबल्या गांडीचा (रडतोंड्या),
‘बंदंच पाणी उभरलं’ (सगळंच पाणी आेतलं),
‘फुगून फागून आली’ (पोटभर जेऊन आली),
‘ सट दाबलं’ (पोटभर खाल्लं),
येलपाडी (नखरेल स्त्री)
येले पडले (कष्ट पडले)
टोले घेणे ( व्यर्थ कष्ट करणे, अनावश्यक कष्ट करणे), मुत्रा फटक चहा (बेचव चहा),
पोटाला तंती लागली (पोटाला तडस लागली),
‘मळकी लागली’ (मळमळ होत आहे),
‘ऊन लागलं’ (लघवीची जळजळ होणे),
अंगार होते (आग होते आहे),
बजार केला (बाजार केला),
‘चाल निंग भाईर’ (चल हो बाहेर),
घरघुशी (बळेच घरात घुसलेली), इत्यादी.

एवढ्यात बुलढाण्याच्या बोलीचा तडका समजायला हरकत नाही. शेवटी एकच मजेदार म्हण पाहूया. साध्या मराठीत ज्याला ‘तेलही गेले, तूपही गेले आणि हाती धुपाटणे आले’ असं म्हणतात त्या म्हणीसाठी बुलढाण्यात मोठी इरसाल म्हण वापरतात. ती म्हणजे ‘बयं गेली अन् बयची वाकय गेली.’ म्हणजे बाईही गेली अन् तिच्याबरोबर तिची वाकळ म्हणजे गोधडीही गेली. त्यापेक्षा बयं सांभाळलेली बरी म्हणजे वाकय आयतीच मिळते.

— अमृता खंडेराव
( आम्ही साहित्यिक )

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 370 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..