नवीन लेखन...

ब्लॅक आउट

हवामान सकाळपासून खराब होणार आहे असा व्हेदर फोरकास्ट आदल्या दिवशीच मिळाला होता त्यामानाने संध्याकाळी साडे सहाला डिनर होईपर्यंत सहन करण्याइतपत जहाज हेलकावत होते. पण रात्री दहा नंतर वाऱ्याचा वेग वाढला होता. सुं सुं करत वाहणाऱ्या वाऱ्यासोबत लाटांनी सुद्धा आक्राळ विक्राळ रूप धारण केले होते. जहाज येणाऱ्या लाटेवर स्वार होऊन दुसरी लाट यायच्या आत दोन्हीही लाटांच्या मध्ये धाडकन खाली आदळत होते आणि पुन्हा एकदा उसळी मारल्या सारखं वर येत होतं. अकरा वाजता थर्ड मेट ला ब्रिजवर फोन करून विचारलं तर तो म्हणाला व्हेदर इम्प्रूव्ह होण्याऐवजी अजून खराब होण्याची लक्षणं दिसतायत. मुसळधार पाऊस पडतोय आणि समोर काहीच दिसत नाहीये. अमावस्या असल्याने गडद अंधार आणि त्यात कोसळणारा पाऊस. बारा वाजता थर्ड इंजिनियर डोळे चोळत चोळत वॉच साठी आला, पाच मिनिटात त्याला वॉच हॅन्डओव्हर करताना दोन्हीही जेनरेटरचे फ्युएल फिल्टर चोक झाले होते त्याच्याएवजी स्टॅन्ड बाय फिल्टर लाईन मध्ये घेतले आणि चोक झालेल्या फिल्टरना साफ करून स्टॅन्ड बाय मध्ये ठेवले असं सांगितलं.

वॉच संपल्यावर केबिन मध्ये बेडवर अंग टाकल्या टाकल्या झोप लागली होती. दुपारी कसबस जेवल्यावर केबिन मधल्या सगळ्या वस्तू ड्रॉवर आणि वॉर्डरोब मध्ये भरून ठेवल्या होत्या. खुर्चीला टेबल सोबत फ्लेगजिबल रबर वायर ने अडकवून ठेवलेली. फक्त केबिन मधला फोनच तेवढा बाहेर होता. टेबलवर आणि फोन खाली विल्क्रो टेप चिटकवल्याने, फोन जागचा हालत नव्हता. बेडवरुन खाली आदळल्यावर शेवटी उठायलाच लागले. लाईट लावून घड्याळात बघितले तर रात्रीचे पावणे दोन झाले होते, उभं राहता येत नव्हतं एवढं जहाज हेलकावत होते. तहान लागली म्हणून ड्रॉवर मधून पाण्याची बाटली काढून तोंडाला लावणार तोच केबिन मधला ऑल इंजिनियर्स कॉल अलार्म वाजला. थर्ड इंजिनियरने एवढ्या रात्री इंजिनियर्स अलार्म वाजवला म्हणजे प्रॉब्लेम सुद्धा तसाच असावा म्हणून बॉयलर सूट घालायला घेतला. तेवढ्यात केबिन मधली लाईट बंद झाली. जनरेटर बंद झाल्याने ब्लॅक आऊट झाला होता.

आता काही सेकंदात इमर्जन्सी जनरेटर ऑटोमॅटिक स्टार्ट होऊन लाईट सुरु होईल असा विचार करता करता स्टेअर केस वरून खाली इंजिन रूम कडे निघालो. बॅटरी वर चालणाऱ्या इमर्जन्सी लाईटच्या उजेडात खाली सेकंड इंजिनियर आणि पाठीमागून चीफ इंजिनियर आणि मध्ये मी असे तिघेही लगबगीने चाललो होतो. जुनियर इंजिनियर अगोदरच इंजिन कंट्रोल रूम मध्ये पोचला होता. अर्ध्या मिनिटाचा आत इमर्जन्सी जनरेटर सुरु व्हायला पाहिजे होता पण ब्लॅक आऊट होऊन तीन मिनिटं उलटून गेली तरी सुरु झाला नव्हता. इमर्जन्सी जनरेटर सुरु झाला नाही तर स्टार्ट फेल चा अलार्म वाजतो पण तो सुद्धा वाजला नाही. इलेक्ट्रिक ऑफिसर दोन मिनिटांनी कंट्रोल रूम मध्ये आला, चीफ इंजिनियरने त्याला इमर्जन्सी जनरेटर का सुरु झाला नाही याबद्दल विचारले. त्यावर थंडपणे त्याने, बघावे लागेल, असं दोन शब्दांत उत्तर दिले. थर्ड इंजिनियर सांगू लागला, नंबर वन जनरेटर चा फ्युएल लो प्रेशरचा अलार्म आला म्हणून तो स्टॅन्ड बाय फिल्टर चेंज करायला खाली गेला तेवढ्यात दुसरा एक अलार्म वाजला. कंट्रोल रूम मध्ये येईपर्यंत नंबर तीन जनरेटर बंद झाला. बंद असलेला तिसरा जनरेटर ऑटोमॅटिकली सुरु होण्यासाठी सिग्नल गेला, सुरु होण्याचा आवाज सुद्धा आला पण पूर्ण आर पी एम येऊन चालू होण्यापूर्वी बंद झाला. इंजिनियर कॉल चे बटण दाबले तेवढ्यात चालू असलेला नंबर एक जनरेटर सुद्धा बंद झाला. जनरेटरच्या गडबडीत मेन इंजिन स्लो डाऊन आणि शट डाऊन ऍक्टिव्हेट होऊन बंद पडले.
सगळे इंजिनियर कंट्रोल रूम मध्ये, जहाज जोर जोरात हेलकावत होते आणि मेन इंजिन सह जनरेटर बंद झाल्याने ब्लॅक आऊट. इंजिन रूम मध्ये बॅटरी वर चालणाऱ्या छोट्या इमर्जन्सी ट्यूब लाईट तेवढ्या चालू होत्या. इंजिन रुम मधली नेहमीची घरघर आणि आवाज बंद झाल्याने भयाण शांतता पसरली होती.

इमर्जन्सी जनरेटर का सुरु झाला नाही त्याचे कारण शोधून सगळ्यात पहिले त्याला सुरु करून मगच इंजिन रूम मधले मेन जनरेटर सुरु करता येणार होते. मेन जनरेटर सुरु झाल्यानंतर मग मेन इंजिन सुरु करावे लागणार होते.

सेकंड इंजिनियर इलेक्ट्रिक ऑफिसरला म्हणाला, चला आपण इमर्जन्सी जनरेटर रूम मध्ये जाऊन काय झालेय ते बघू या. त्यावर इलेक्ट्रिक ऑफिसर म्हणाला, या पावसात आणि जहाज एवढे हेलकावत असताना इमर्जन्सी जनरेटर रूम पर्यंत पोचणार कसे आपण. चीफ इंजिनियर म्हणाला दोघे जण सेफ्टी हार्नेस घाला आणि दोर अडकवून पोहचा कसेतरी.

सेकंड इंजिनियर आणि इलेक्ट्रिक ऑफिसर च्या सोबत मी पण टॉर्च घेऊन गेलो. मेन डेकवर बाहेर पडण्या पूर्वी पटापट त्यांनी सेफ्टी हार्नेस घातले आणि लांब दोरी बांधून अंधारात ते इमर्जन्सी जनरेटर रूमच्या दिशेने निघाले. जोरदार पाऊस कोसळत होता, विजा चमकत होत्या आणि पाठोपाठ गडगडाट ऐकू येत होता. वीज चमकल्यावर त्या क्षणभर उजेडात समुद्राचे रौद्र रूप दिसत होते. उंचच उंच लाटा मेन डेकवर पाणी उडवत होत्या. जहाजाला इकडून तिकडे जोराने हलवत होत्या, असं वाटतं होतं की आता येणारी लाट मेन डेकवरच पाणी घेऊन येणार. आठ ते दहा मिटर उंच लाटा उसळत होत्या.

दोघे जण रेन कोट न घालताच भिजत भिजत जनरेटर रूम पर्यन्त पोचले. तीन चार मिनिटात इमर्जन्सी जनरेटर घोंग घोंग करत चालू झाला. जहाजावरील लाईट सुरु होऊन लख्ख प्रकाश पडला. दोघेही इमर्जन्सी जनरेटर रूम मधून पुन्हा मेन डेकवरून मागे आले. इंजिन कंट्रोल रूम मध्ये इलेक्ट्रिक ऑफिसरने सांगितले की इमर्जन्सी जनरेटरचा स्टार्ट स्विच ऑटोमॅटिक स्टार्ट ऐवजी मॅन्युअल स्टार्ट मध्ये होता त्यामुळे सुरु झाला नाही.

फ्युएल फिल्टर्स साफ करून पुन्हा मेन जनरेटर सुरु करता करता पहाटेचे तीन वाजले होते त्यानंतर मेन इंजिन सुरु करायला आणखीन एक तास गेला. दुपारी बारा नंतर हवामान सुधारले आणि जहाजाचे हेलकावणे थांबले.

रात्री जहाज हेलकावत असल्याने फ्युएल टॅन्क मधील तळाशी गेलेला कचरा घुसळला गेला आणि परिणामी फिल्टर्स चोक होऊन जनरेटर बंद पडले. परंतु इमर्जन्सी जनरेटर ऑटोमॅटिक मोड ऐवजी मॅनुअल मोड मध्ये असल्याबद्दल चीफ इंजिनियरने सेकंड, थर्ड आणि फोर्थ अशा आम्हा तिघांनाही चांगलेच सुनावले. तुम्ही सगळे इंजिन रूम मध्ये असाच राउंड घेता का आणि न बघताच चेकलिस्ट भरून त्यावर सह्या करता का म्हणून धारेवर धरले.

चीफ इंजिनियर रागावून बोलत होता, आपण खुल्या समुद्रात जमिनीपासून लांब आहोत आजूबाजूला दुसरं कोणतेही जहाज नाहीये म्हणून ठीक आहे. परंतु अशा खराब हवामानात आजूबाजूला इतर जहाजे असती किंवा किनाऱ्याजवळ असतो तर मेन इंजिन बंद असल्याने आपले जहाज दोन तासात नक्कीच दुसऱ्या जहाजाला धडकले किंवा तळाशी जाऊन रुतले असते. जहाजांचे बरेचसे अपघात हे ब्लॅक आऊट मुळे झालेले आहेत. सोसाट्याचा वारा आणि लाटांच्या मारा भल्या मोठ्या जहाजाला लोटून घेऊन जातं.

ब्लॅक आऊट म्हणजे जहाजाची संपूर्ण इलेक्ट्रिक पॉवर सिस्टीमचे फेल्युअर असतं. इलेकट्रीसिटी बनवणारे जनरेटरच बंद झाले की सगळ्या यंत्रणा बंद पडतात. म्हणूनच जहाजाच्या जनरेटरना जहाजाचे हृदय मानले जाते.

© प्रथम रामदास म्हात्रे.

मरीन इंजिनियर,

B. E. (Mech), DIM.

कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 184 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..