नवीन लेखन...

‘बिछड़े सभी बारी बारी’

आपल्याला कळायला लागल्यापासून अनेक माणसं आपल्या संपर्कात येतात. काही काळापुरते त्यांच्याशी आपण जोडले जातो. नंतर काळाच्या ओघात ते दृष्टीआड होतात.
माझ्या बालपणापासून दहावी पर्यंत अशीच वेगवेगळी माणसं भेटली. काही वर्षांच्या सहवासानंतर आठवणींच्या ‘साठवणीत’ जमा झाली. त्या त्या वेळी त्यांनी दिलेली साथ मोलाची होती हे मी कधीही विसरू शकत नाही.
माझ्या आईला भेटायला गोदूताई नावाच्या विधवा आजी खजिना विहीरीपासून चालत चालत येत असत. साधारणपणे त्या
दुपारी तीनच्या दरम्यान यायच्या. मग दोघींच्या मनसोक्त गप्पा होत असत. त्या एकट्याच रहायच्या. त्यांची लग्न झालेली मुलगी बाहेरगावी होती. दुपारी चारनंतर चहा केला जायचा. संध्याकाळी गोदूताईंना घरी जाण्याचे, मंदिरात जाण्याचे वेध लागायचे. मग आईच्या सोबतीने त्या घरी किंवा मंदिरात जात असत. गोदूताई सत्तरी पार केलेल्या होत्या. आयुष्यभर कष्ट करुन त्या कमरेत वाकलेल्या होत्या. पांढरी नऊवारी साडी, मोठ्या सुपारीच्या आकाराचा रेशमी केसांचा अंबाडा, कपाळावर काळ्या रंगाची टिकली, पायात निळ्या रंगाची स्लीपर अशा त्या दिसायच्या.
काही वर्षांनंतर माझ्या आईला त्यांनी विनंती केली की, मला आळंदीला नेऊन सोड. एके दिवशी दोघी बसने आळंदीला गेल्या. तेथील एका मठात गोदूताईंना सोडून आई परतली. त्या रात्री गोदूताईच्या वियोगाने आईला जेवण देखील गेले नाही.
काही महिन्यांनंतर त्या मठातील एक व्यक्ती आमचा पत्ता शोधत घरी आली व गोदूताई गेल्याचे सांगितले. आईला फार वाईट वाटलं. काही दिवसांनी गोदूताईची मुलगी, जी आपल्या आईला कधीही भेटायला आली नव्हती ती माझ्या आईला भेटायला आली आणि तिने विचारले की, माझ्या आईनं तुमच्याकडे काही दागिने, चीजवस्तू ठेवायला दिली होती का? आईने तिला नम्रपणे नाही असे सांगितले. गोदूताई फक्त गप्पा मारायला येत असे, बाकी तिच्याशी आमचे व्यवहार असे काहीही नव्हते असे सांगितल्यावर ती निघून गेली. आत्ता देखील एखादी कमरेत वाकलेली आजी दिसली की, मला गोदूताई आठवते.
आईला अधूनमधून भेटायला येणाऱ्या बोकील आजी होत्या. आजी फार बडबड्या स्वभावाच्या होत्या. त्या रहायच्या लिमये वाडीतील शंकराच्या मंदिराच्या पलीकडील वाड्यात. त्यांचे पती सरकारी नोकरीत होते. त्यांना चार मुली, एक मुलगा. मुलगा मुंबईला होता. तीन मुलींची लग्नं झाली होती. त्यांना काही किराणा माल आणायचा असेल तर त्या आईकडे यायच्या. गप्पा झाल्यावर थोड्या वेळाने त्या मला विनंती करायच्या, ‘अरे सुरेश, मला एवढ्या चार गोष्टी आणून देतोस का दुकानातून?’ मी लगेच तयार व्हायचो. पैसे आणि पिशवी घेऊन शिवाजी मंदिराजवळील मुथा आॅईल डेपोतून त्यांचे सामान आणून देत असे. माझ्या या सेवेबद्दल ‘तुला चांगली बायको मिळेल’ असा तोंडभरून आशीर्वाद त्या न चुकता द्यायच्या.
त्यांचे पती गेल्यानंतर त्या घराबाहेर पडेनाशा झाल्या. धाकट्या मुलीचं लग्नाचं वय उलटून गेल्यामुळे काळजीने त्यांची प्रकृती फारच खालावली. काही वर्षांनी त्या वारल्या. आता मुलगी एकटी राहू लागली. आजही लिमये वाडीतून जाताना शंकराच्या मंदिराच्या पुढे त्याच वाड्याच्या जागेवर झालेली मोठी बिल्डींग पाहून बोकील आजींची आठवण येते.
आमच्या जोशीवाड्याच्या पाठीमागे काही छोट्या खोल्या होत्या. तिथे चार कुटुंब रहायची. त्यातील एक कुटुंब होतं आढावांचं. आढावांना दोन मुलं एक मुलगी. मुलीचं नाव अनुसया. अनुसयाचं लहान वयातच आई-वडिलांनी लग्न लावून दिलं. नवरा रोजगार करायचा व ही चार घरची धुणीभांडी करायची. तिला एकापाठोपाठ तीन मुलं झाली. जणूकाही अनुसयेच्या पोटी ‘त्रिमूर्ती’ दत्तानेच जन्म घेतला असावा.
ती धुणीभांडी करायला जाताना मुलांना आमच्या घरात ठेवून जात असे. तिन्ही मुलं आई येईपर्यंत शांत बसलेली असत. मोठा शाळेत जाणारा मुलगा अभ्यास करीत बसे. आई कधी गावी गेली असेल तर अनुसया पोळ्या करुन देत असे. काही वर्षांनी ती जनता वसाहतीमध्ये रहायला गेली आणि आमचा संपर्क कमी झाला. आता इतक्या वर्षांनंतर ती म्हातारी झाली असेल, मुलांची लग्नं होऊन तीन सुनाही आलेल्या असतील. कुठेही असली तरी ती सुखी रहावी एवढंच मला मनापासून वाटतं…
आमच्या घरासमोरच अनंतराव सूर्यवंशी यांचं केशकर्तनालय होतं. ते रहायला लक्ष्मीरोडवरील गोखले हाॅल जवळच्या एका बैठ्या वाड्यात होते. त्यांना चार मुली व एक मुलगा होता. त्यांची पत्नी फुलाबाई ही आईकडे कधीतरी येत असे. तिच्या मोठ्या मुलीच्या लग्नासाठी तिला पाण्याचा स्टीलचा पिंप घ्यायचा होता. आमच्या शेजारी करडेमामांचे भांड्यांचे दुकान होते. आईचा त्यांच्याशी भांडी घेण्यामुळे परिचय होता. फुलाबाईंने आईला मध्यस्थी करायला लावून स्टीलचा पिंप करडेंकडून उधारीवर घेतला. करडेंनी आईला ही जबाबदारी घेऊ नका असे परोपरीने सांगितले. मात्र आईने फुलाबाईवर विश्र्वास ठेवून पिंप घेऊन दिला.
करडेंची शंका खरी ठरली. फुलाबाईकडून पैसे न आल्याने त्यांनी आईला पैसे मागितले. आईने मला फुलाबाईच्या घरी वसूलीसाठी पाठवले. मी त्यांच्या घरी जाऊन एका स्टुलावर बसून रहात असे. असे बरेच दिवस केल्यानंतर ते पैसे एकदाचे मिळाले. नंतर आईने कानाला खडा लावला, की पुन्हा कुणाचीही हमी घ्यायची नाही. आता इतक्या वर्षांनंतर फुलाबाई आणि आई दोघीही या जगात नाहीत मात्र त्यानिमित्ताने वसूलीचा एक धडा मी शिकलो, हे ही नसे थोडके..
— सुरेश नावडकर. 
मोबाईल: ९७३००३४२८४
२८-८-२०.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

1 Comment on ‘बिछड़े सभी बारी बारी’

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..