नवीन लेखन...

भाऊचा धक्का…. आठवणीतला !

एकेकाळी कोकणी आणि गोंयकार प्रवाशांनी गजबजणाऱ्या मुंबईतील भाऊच्या धक्क्याला यंदा दीडशे वर्षं पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भाऊच्या धक्क्याच्या इतिहासाची ही सफर…. कोकणच्या जलवाहतुकीसाठी दीडशे वर्षं वापरात असलेला ‘भाऊचा धक्का !’ भाऊ रसेल म्हणजेच लक्ष्मण अजिंक्यचं जिवंत स्मारक ! सुरेंद्र बा जळगांवकर यांनी लिहिलेली ही सोशल मिडियातली पोस्ट शेअर केलेय.


बंदरापलीकडील रेवसहून अखेरची बोट सातवाजता भाऊच्या धक्क्याला लागली आणि दिवसभर गजबजलेला तो कोकणी माणसाचा सखा भाऊचा धक्का सुस्तावला.

गेली दीडशे वर्षं अव्याहतपणे मुंबईत कोकण्यांची आणि गोवेकरांची सेवा करणाऱ्या या धक्क्याच्या प्रत्येक चिऱ्याला मग वाचा फुटली.

कारण अलिबागहून आलेल्या एका नवश्रीमंत फार्महाऊसवाल्याने “ये कौन भाऊ है जी ? टर्मिनस को जिसका नाम दिया है वो ?” असे कुत्सित उद्गार काढले. गेली दीड शतकं या धक्क्यावर गरीब कोकणवासी मुंबईत मिसळून जाण्यासाठी उतरत असत. त्यांना हा प्रश्न कधी पडला नाही. उलटअभिमान असा की, ‘भाऊ’ हे घरगुती बिरुद जलवाहतुकीच्या टर्मिनसला दिलं आहे आणि ते अनेक बेस्ट बसेसवर मराठीत झळकत आहे ! कारण याचा जन्मदाता भाऊ अजिंक्य हा पक्का मुंबईकर ! पाठारे प्रभू या मुंबईच्या आद्य रहिवाशांपैकी एक बांधकाम कंत्राटदार. स्वधन मुंबईच्या हितासाठी खर्चिणारा.

ब्रिटिश राजवटीत कुलाब्याच्या गन फॅक्टरीत हा भाऊ कारकून होता. कॅप्टन रसेल हा तोफखाना विभागातील नामांकित अधिकारी. त्याच्या विभागात एकदा एका मराठी माणसाने चोरी केली. त्याला लष्करी शिस्तीनुसार फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आली. एका गरीब मराठी तरुणाला सर्वांसमक्ष फटके मिळून त्याची बदनामी होणार, त्यामुळे लक्ष्मण अजिंक्य अस्वस्थ झाला.

त्याने रसेलसाहेबाकडे कामगाराच्या वतीने क्षमायाचना केली. स्वत: देशाभिमानी असलेल्या कॅ. रसेलला, स्वदेशाचा विचार करून एका कामगाराचे फटके वाचविणाऱ्या हेडक्लार्क अजिंक्य या क्षुल्लक कामगाराविषयी आदर निर्माण झाला. कॅ. रसेलने लक्ष्मणला मिठी मारून “यू आर माय ब्रदर !” असे उद्गार काढून त्याची पाठ थोपटली. या उद्गारांमुळे लक्ष्मण अजिंक्यला ‘भाऊ’ हे नाव पडलं ते कायमचं !

कॅ. रसेलने या भाऊला व्यापारीक्षेत्रात शिरण्यास उद्युक्त केले. मुंबईत असलेली डबकी आणि सांडपाणी तलाव, मुंबईच्याच कचऱ्याने बुजविण्याचं काम त्या काळी सुरू झालं होतं. भाऊला हे कंत्राट मिळालं. कॅ. रसेलसंबंधी कृतज्ञता म्हणून त्याने आपल्या कंपनीचं नाव ‘भाऊ रसेल आणि कंपनी’ असं दिलं. मुंबईच्या पूर्वकिनाऱ्यावर भरणी घालून कारनॅक बंदर आणि क्लेअर बंदर उभारणीचं कामही ही कंपनी करत होती. तेव्हा आपल्या मराठी माणसांचा जलप्रवास सुखकर व्हावा, यासाठी एक धक्का असावा, असा विचार भाऊ अजिंक्यच्या मनात बळावला. ईस्ट इंडिया कंपनी आणि पोर्ट ट्रस्ट यांची अनुमती मिळवून त्याने तो स्वखर्चाने अमलात आणला.

कोकणच्या जलवाहतुकीसाठी पुढे दीडशे वर्षं वापरात असलेला ‘भाऊचा धक्का !’ भाऊ रसेल म्हणजेच लक्ष्मण अजिंक्यचं जिवंत स्मारक !

रस्ता वाहतुकीसाठी एसटीचा जन्म झाला नव्हता, त्या काळी अर्ध्या अधिक मुंबईकरांचं मूळ कोकणात होतं.

बेशिस्तीच्या खासगी बस वाहतुकीपेक्षाही त्या काळी कोकणातून मुंबईकडे प्रवास जलमार्गानेच व्हायचा. १८६२ साली भाऊ रसेलने हा धक्का बांधण्यापूर्वी उतारूंचे बोटीतून जमिनीवर पाय टेकेपर्यंत खूप हाल व्हायचे. रात्रभर प्रवास करून आलेली बोट समुद्रात लांब कोठे तरी नांगर टाकायची. मग मोठ्या हिंदकळणाऱ्या होड्यांमधून प्रवासी खच्चून भरून, चिखलाने भरलेल्या मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर पाऊल ठेवायचे. गोदीत कंत्राटदारी करणारा भाऊ हे दृश्य पाहून रोज हळहळत असे. ब्रिटिश सरकार हे हाल निवारण्यासाठी काही करणार नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांच्याच पैशांवर गडगंज झालेल्या कंत्राटदार भाऊ अजिंक्यने धक्का स्वत:च उभारण्याचं ठरवलं आणि अल्पावधीतच कोकणी माणसांच्या हक्काचा धक्का तयार झाला.

कालांतराने कोकण आणि गोव्याकडे जाणारी जलवाहतूक बंद पडली तरी १९७० पर्यंत भाऊचा धक्का दिवसभर प्रवाशांनी गजबजलेला असे. सकाळी साडेसहा वाजता रेवस-धरमतरकडे जाणारी छोटी बोट सुटली की, आठ वाजता दाभोळ बंदरापर्यंतची मोठी बोट सुटत असे. लागोपाठ रत्नागिरी, विजयदुर्ग, गोवा या लाइनीवरील अगडबंब बोट सुटत असे. याबोटी निघून गेल्या तरी आदल्या दिवशी कोकण-गोव्याकडे गेलेल्या बोटी परतण्याची वेळ झाल्यामुळे दुपापर्यंत भाऊच्या धक्क्य़ाला उसंत नसेच.

या काळात भाऊच्या धक्क्याचा अवतार रेल्वेच्या कुठल्याही टर्मिनसवर न दिसणारा असा बेंगरुळ. बोट धक्क्याला टेकण्याच्या सुमारास, लाल डगलेवाल्या हमालांचा जथ्था एक गलेलठ्ठ जाडीचा दोरखंड घेऊन तो डेकवर फेकण्यासाठी सज्ज दिसे. मुख्य डेकवर तोंडात चिरूट धरलेला शुभ्र वस्त्रातील गोवेकर कॅप्टन “आऽऽरी माऽऽर, आऽरीऽमाऽऽर” अशी अनाकलनीय ऑर्डर देऊन बोट धक्क्याला समांतर आणीत असे. बोटीवरून खेचून घेतलेला जाड दोरखंड धक्क्यावरील दगडी मनोऱ्याला (कॅपस्टन) बांधला की, हमालांचा जथ्था बोट खेचून धक्क्याला अंगलट करीत असत. सशक्त, चपळ हमाल बोट आणि धक्का यांना जोडणारा सेतू लागण्याच्या अगोदरच कठड्यावरून हनुमानउडी मारून आत घुसून प्रवाशांचा कब्जा घेऊ पाहत.

कोकणी प्रवासी वैतागलेल्या गबाळ्या अवतारात, लाल मातीने रापलेल्या कपड्यात, एकदा भूमीवर केव्हा पाऊल ठेवतो, यासाठी आतुर असे. वांत्या करून थकलेले चेहरे, ढीगभर वळकट्या आणि आंब्या-फणसांची पोती उचलण्याची करामत करताना तो केविलवाणा होई. तरीही आपल्या गावच्या मातीची ऊब घेतलेला कोकणी माणूस नव्या उत्साहाने गजबजलेल्या मुंबईत धनार्जनासाठी मिसळून जात असे.

एके काळी दिवसभर गजबजलेला भाऊचा धक्का आता वयस्कर माणसासारखा सुस्त झाला आहे. आधुनिक कोकण रेल्वे त्याला वाकुल्या दाखवीत असली तरी स्थितप्रज्ञ ज्येष्ठाच्या नात्याने तो निनादत असतो,
“मीच खरा कोकणी माणसाचा जिवाचा सखा !”

(सफर महाराष्ट्राची)

साभार – सुरेंद्र बा जळगांवकर

छायाचित्र : Natty Singh,Mumbai night photography,ameiya clicks

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..