नवीन लेखन...

भारतीय संस्कृती परंपरा आणि वारसा

व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेला डॉ. अनुराधा कुलकर्णी  यांचा लेख


भारतीय संस्कृतीलातीत सनातन विश्वधर्मावर आधारलेली आहे. वैदिक वाङ्मयात ऋत नावाची एक संकल्पना आहे. ही ऋत संकल्पनाच या विश्वधर्माची मूळ बैठक होय. आपण गणपती अथर्वशीर्षात ऋतं वच्मि सत्यं वच्मि म्हणतो, हेच ते ऋत होय. ऋत म्हणजे अंतिम सत्याचा मार्ग, विश्वाचा शाश्वत नियम. सृष्टीच्या आधी निर्माण झालेले तत्त्व म्हणजे ऋत. यामुळेच सृष्टिचक्रात सुसंबद्धता आली. सर्वात्मकता आली. ग्रहताऱ्यांचे सुसूत्र परिभ्रमण, ऋतुचक्रातील नियमित परिवर्तन या सर्व घटनांमागे ऋततत्त्व आहे. पण हे ईशऋत होय. त्याचे अनुसरण करून आपण जे नीतिनियम पाळतो, ते मानवऋत होय. मानवाच्या जीवनसाफल्याला आवश्यक असणारा धर्म म्हणजेच ऋत होय. आपण आरतीनंतर मंत्रपुष्पांजली म्हणतो. त्यातील प्रथम चरण आहे, ओम् यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् याचा अर्थ, देवांनी त्यागरूप यज्ञाच्या द्वारे त्या यज्ञस्वरूपाचे पूजन केले, त्यागभावनेचा गौरव त्यागमय कर्मांनी केला. त्या देवता म्हणजे वरुण, अग्नी, वायू इ. होत. त्यांच्यामुळेच आपले जीवन फुलते. देवांनी घालून दिलेला हा यज्ञाचा आदर्श जगाचा उद्धार करणारा ठरतो. अशा या यज्ञधर्माचे माणसांनीही अनुसरण केले तर पृथ्वीवर स्वर्ग अवतरेल. त्यागरूप यज्ञ म्हणजेच आपण मिळविलेल्या धनात, ज्ञानात सर्वांचा वाटा गृहीत धरून दानधर्म करणे, स्वतः सह सर्वांच्या उत्कर्षासाठी कार्यरत रहाणे. इतका पावन विचार आपल्या भारतीय संस्कृतीत आहे.

संस्कृती या शब्दाचाच आपण प्रथम मागोवा घेऊ. सम् (शुद्ध) + कृ (करणे) = संस्कृती. जी शुद्ध करते ती संस्कृती. प्रकृती म्हणजे निसर्ग. विकृती म्हणजे निसर्गात होणारा विकार आणि संस्कृती म्हणजे निसर्गात विकार वा बिघाड होऊ नये या उद्देशाने प्रकृतीवर केलेला संस्कार संस्कृतीत बदल व संस्कार हे दोन्ही अभिप्रेत आहे. संस्कृती आधिभौतिक व आध्यात्मिक या दोन्ही स्वरूपात असते. उदा. नैसर्गिक अवस्थेतील शेतजमीन म्हणजे प्रकृती. या जमिनीवरचे तण वगैरे काढून, ती नांगरून आपण तिला धान्य पेरण्यास सुयोग्य करतो. ही झाली आधिभौतिक संस्कृती आणि आध्यात्मिक स्तरावरील संस्कृती म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे नैसर्गिक षड्विकार टाळून प्रेम, मैत्री, सेवाभाव, औदार्य, अध्ययनशीलता, नीटनेटकेपणा हे गुण जोपासणे. आपले निसर्गदत्त शरीर योग्य सवयींनी उत्तम राखणे. म्हणजे शरीर आणि मनाची निरामयता ही आध्यात्मिक संस्कृती आहे. धर्म, तत्त्वज्ञान, कला, साहित्य, नीतिनियम, शिष्टाचार या सर्वांचा अंतर्भाव आध्यात्मिक संस्कृतीत होतो.

आपल्या जीवनविकासाचा सूक्ष्म विचार भारतीय संस्कृतीत आहे. त्यासाठी आपल्या प्राचीन समाजधुरिणांनी वैयक्तिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, राजकीय इ. सर्व क्षेत्रात नियमप्रणाली आखून दिलेली आहे. त्यालाच मानवधर्मशास्त्र किंवा स्मृती असे म्हणतात. हजारो वर्षांपासून हे स्मृतिग्रंथ लिहिले गेले आहेत. हे जवळ जवळ पन्नास ग्रंथ आहेत. त्यातील वीस ग्रंथ प्रधान मानतात. मानवी जीवनाचा आचार, व्यवहार आणि प्रायश्चित्त यांचे निश्चित नियम त्यांच्यात सांगितले आहेत. हे ग्रंथ इतके प्राचीन असूनही त्यात कितीतरी प्रागतिक विचार आढळतात. उदा. परकीय आक्रमणाने पीडित झालेल्या स्त्रिया या दूषित नसतात, असे अत्रिस्मृतीत सांगितले आहे. कष्टाशिवाय धन मिळत नाही, धनाविना कर्म घडत नाही, कर्महीन माणसाकडून सद्धर्माचे रक्षण होत नाही, धर्महीनाला सुख मिळत नाही, असे दक्षस्मृती म्हणते. एखाद्या प्रसंगी लहान मुलाच्याही तोंडून निघालेले सुभाषित ग्राह्य धरावे, असे मनुस्मृतीत म्हटले आहे.

भारतीय संस्कृतीत सर्वसाधारण मानवी आयुष्याचे शंभर वर्षांचे आयुष्य कल्पून त्याची चार आश्रमात विभागणी केली आहे. ब्रह्मचर्याश्रम हा अध्ययनासाठी, गृहस्थाश्रम हा यज्ञ, प्रजोत्पत्ती व स्वाध्याय यांच्या साह्याने देव, पितर व ऋषी यांचे ऋण फेडण्यासाठी, वानप्रस्थाश्रम हा चिंतन-मनन व अध्यापनासाठी व संन्यासाश्रम हा सर्वसंगपरित्यागासाठी. अशी मानवी आयुष्याची सुयोग्य आखणी आपल्या संस्कृतीत आहे. त्याचप्रमाणे माणसांमध्ये अध्ययन अध्यापन, शासन-संरक्षण, वाणिज्य – व्यवस्थापन, सेवाकर्म-कलाकुसर सेवाकर्म या चार मुख्य प्रवृत्ती असतात. त्याप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे चार वर्ण जे भारतीय संस्कृतीत आहेत, ते खरे तर जगातील कुठल्याही मानवी समाजाचे असू शकतात. कारण वरील मानवी प्रवृत्ती सर्वत्रच आढळतात. खरा सुसंस्कृत माणूस या वर्णाश्रमधर्माला गैरवळण लागू देणार नाही. आपल्या संस्कृतीचे सुयोग्य पालन केले असता वरील वर्ण हे जन्माधिष्ठित न राहता कर्माधिष्ठित राहतील.

आपले सर्व सणसमारंभही आपल्या संस्कृतीने मोठ्या साक्षेपाने नियोजलेले आहेत. उदा. दिवाळी सर्व सणांमधला मोठा सण होय. त्यावेळी नवे कपडे, दागिने खरेदी केले जातात, घराला रंगरंगोटी करून सजविले जाते, खाण्यापिण्याची रेलचेल असते, आप्तस्वकीयांच्या भेटीगाठी होतात, फटाक्यांची आतषबाजी असते. श्रीमंत असो की गरीब, लहान असो की मोठा प्रत्येकजण आपापल्या परीने या सणाचा आनंद घेतो. त्यासाठी खर्च आलाच. पण आपल्या संस्कृतीने दिवाळीचा काळ अतिशय सुयोग्य निवडला आहे. आपला देश शेतीप्रधान आहे. दिवाळीपर्यंत शेतीची सर्व कामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांच्या हातात पैसा आलेला असतो.

म्हणजेच धनधान्याची विपुलता जेव्हा सर्वत्र असते, त्याचवेळी दिवाळी सण येतो. तसेच उन्हाळा सुरू होण्याच्या समयी शिशिर ऋतूतली सर्व पानगळ स्वच्छ होण्यासाठी त्याचबरोबर मनही मोकळे होण्यासाठी होळी सण येतो. यावेळी दूषित पालापाचोळा जाळला जातो. रंगपंचमीला प्रतिष्ठेचे ओझे जरा बाजूला ठेवले जाते. चैत्राची तुकतुकीत नवपल्लवी पाहून उल्हासित झालेले आपण गुढीपाडवा साजरा करीत नववर्षाचे स्वागत करतो. श्रावण महिन्यातील हिरव्यागार निसर्गात जेव्हा ऊनपावसाचा खेळ रंगतो, तेव्हा आपणही उल्हासित मनाने कृष्णजन्म साजरा करतो, त्याच्या दहीहंडीच्या बाललीलांचे अनुसरण उत्साहाने करतो. नारळी पौर्णिमेला उधाणलेल्या समुद्राचे पूजन करतो, त्याच दिवशी बहीण-भावांच्या प्रेमाचे रक्षाबंधन होते. संक्रांत सणही वातावरणाला अनुकूल असाच आहे. त्यावेळच्या शीतलतेत उष्मादायक पदार्थ ऊर्जा देतात म्हणून तीळगुळाचे महत्त्व. पण नुसतेच तेवढे नाही, आपल्या संस्कृतीत तिळातील स्नेहलता आणि गुळातील मधुरता याच्या संगमातून मैत्र वाढण्यासाठी तीळगुळाचे सर्वांना वाटप केले जाते. कुठलीही कटुता न बाळगता गोड बोलण्याचे आवाहन केले जाते. तसेच दसऱ्याला हृदयाच्या आकाराची आपट्याची पाने वाटून सौहार्द सांभाळले जाते. ईदच्या सणात “ईद मुबारक” म्हणून एकमेकांना भेटले जाते, दिवाळीप्रमाणे आपल्या भारतात नाताळही उत्साहाने साजरा केला जातो. पारशी पतेती डे लाही मान दिला जातो. असा हा भारतीय संस्कृतीतला सर्वधर्मसमभाव विलोभनीय आहे.

हिंदू सण हे ऋतुमान लक्षात घेऊन साजरे होत असल्याने हिंदूंची कालगणना सौरवर्ष व चांद्रवर्ष यांचा सुंदर मेळ घालते. या दोन्ही वर्षांमधला अकरा दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी दर तीन वर्षांनी अधिक महिना येतो. ही योजना केली गेली नसती तर दिवाळी संक्रांतीसारखे योग्य ऋतूतच योग्य असणारे सण ऐन उन्हाळ्यातही आले असते ! पण तसे कधीच होत नाही.

आपल्या संस्कृतीचे मानदंड असलेले वेद, उपनिषदे, षड्दर्शने, पुराणे हे अक्षरवाङ्मय विश्वविख्यात आहे. जगातील सर्व विचारवंत त्यातील अभिजाततेचे स्वागत करतात. भगवद्गीता तर जगातील सर्व भाषांमध्ये भाषांतरित झालेला अद्वितीय ग्रंथ आहे. गीतेचे वैशिष्ट्य हे की, तिच्यावर कोणी कितीही भाष्ये लिहिली तरी तिचे पूर्ण अध्ययन झाले असे होतच नाही. दरवेळी तिच्याकडे नवीन दृष्टिकोनाने पाहिले जाते. उपनिषदेही सर्व वैश्विक साहित्यात अद्वितीय आहेत. या आपल्या अनमोल सांस्कृतिक धनाला जपणे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे.

आपल्या भारतीय संस्कृतीचे “आपलेपण” हे फक्त भारतापुरते मर्यादित नसून आपण “हे विश्वचि माझे घर” मानतो. पण विश्वाला माझे घर म्हणून इतर देशांची भूमी बळकवायला आपण जात नाही, तर घरातील लोकांबद्दल जशी आत्मीयता असते, तशीच आत्मीयता सर्व विश्वजनांसाठी हवी, हा विचार आपल्या संस्कृतीत असल्याने आपण सर्वेऽत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः । असे म्हणून सर्वकल्याणाची मंगल कामना करतो. भारतभूमीतल्या हिंदुधर्माची कोणत्याही एका व्यक्तीने स्थापना केली नाही. यात कोणत्याही एकाच धर्माचे निरपवाद प्रामाण्य नाही, वेदशास्त्रप्रमाण्याप्रमाणे अवैदिक शास्त्रेही येथे गुण्यागोविंदाने नांदतात. आस्तिकाप्रमाणे येथे नास्तिकही प्रतिष्ठेने राहतो. सगुण ईश्वराप्रमाणे निर्गुणतेचीही पूजा केली जाते. सहिष्णुता हा महत्त्वाचा विशेष आपल्या संस्कृतीत आहे. आतापर्यंत हिंदुस्थानावर अनेक नृशंस आक्रमणे झालीत, पण आपल्या लवचिकतेमुळे आपली संस्कृती टिकून आहे. ती जीर्ण, कालबाह्य गोष्टींचा लीलया त्याग करून नवे, योग्य विचार चटकन आत्मसात करते. या सारासार विवेकाने भारतीय संस्कृती अजरामरच राहील.

मात्र आपण भारतीयांनी या आपल्या संस्कृतीचा जाज्ज्वल्य अभिमान धरणे आवश्यक आहे.

(विद्यावाचस्पति, संत साहित्याच्या गाढ्या अभ्यासक. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, संत वाङ्मय यावर लेखन आणि प्रवचने. मराठी संतांच्या विरहिणी आणि गौळणी हा अभ्यासाचा विषय.)

-डॉ. अनुराधा कुलकर्णी

(व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी  २०२० च्या अंका मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..