नवीन लेखन...

बीज भाषण : मराठी कथात्म!

श्री अटल बिहारी वाजपेयी शासकीय कला एवं वाणिज्य महाविद्याल, इंदूर द्वारे दिनांक 28 जानेवारी 2023 ला आयोजित-मराठी कथात्म साहित्य-या विषयावर आयोजित चर्चासत्रात मी दिलेले बीजभाषण.

नमस्कार, मी विश्वनाथ शिरढोणकर.आजच्या या वेबिनारचे आयोजक श्री अटलबिहारी वाजपेयी शासकीय कला आणि वाणिज्य महाविद्यालय इंदूर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ.अनूप कुमार व्यास, आजच्या कार्यक्रमाचे मुख्य वक्ते प्राध्यापक डॉ. श्रीकांत तारे, मराठी विभागाचे प्राध्यापक श्री ज्ञानेश्वर तिखे, प्राध्यापक श्री बाळू तिखे आणि प्राध्यापक श्री योगेश शेळके व हा वेबिनार बघत असणारे सर्व माननीय, या सर्वांचे मी अभिवादन करतो, आणि मला संधी दिल्याबदहल आयोजकांचे मी अगोदरच आभार देखील व्यक्त करतो.

—आजचा आपला विषय कथा असा आहे. साहित्यामध्ये कथेचा फार विस्तृत असा क्षेत्र आहे. जगातील प्रत्येक भाषेत कथा लिहिण्याची परंपरा आणि वाचण्याची आवड आहे. कथेमुळे साहित्य हे समृद्ध आणि सम्पन्न झालेले आहे. रामायण,महाभारत कालखंडापासून आपल्या भारतात कथा ऐकल्या आणि वाचल्या जात आहे. कालखंडाच्या दृष्टीने करमणूक कालखंडातील स्फुट गोष्टी, नंतर मनोरंजन कालखंड , या नंतर यशवंत-रत्नाकर कालखंड, आणि नंतर नवकथेची चाहूल लागली व मग स्त्रियांच्या कथांचे लेखन प्रचुर मात्रेत होऊ लागले. या नंतरच आधुनिक कथांचा कालखंड येतो.

—-विशेष करून मराठीत १८०० साला नंतर इंग्रजी आणि अरबी भाषांच्या अनेक पुस्तकांचे मराठीत भाषांतर झाले. यात पंचतंत्र, हितोपदेश,अकबर बिरबलाच्या गोष्टी, कालिदासच्या गोष्टी, तेनालीराम, मुल्ला नसरुद्दीन,गुलबकावली, हातिमताई, चंद्रकांता,अशी अनेक पुस्तकं आहेत. फार मोठ्या प्रमाणात भाषांतर झाल्यामुळे आणि वाचकांची आवड बघता मराठीत देखील बऱ्याच प्रमाणात मराठी साहित्यिक यांच्याद्वारे कथांचे सृजन होऊ लागले.
—————-
—प्रसिद्ध कथाकार !!
——————
—- गेल्या १५०-२०० वर्षातील प्रसिद्ध आणि नामवंत कथाकारांची यादी फार मोठी आहे आणि सर्व नावे घेतली तर वेळ संपेल. म्हणून मी काही कथाकारांचे नावं येथे घेत आहे, जसे वि.स. खांडेकर, आनंदीबाई शिर्के,व.पु. काळे,द.ता.भोसले,पदमश्री मालती जोशी, रंगनाथ पाठारे, द.मा. मिरासदार,स्नेहलता दसनूरकर, श.ना.नवरे, विजया राज्याध्यक्ष,माधुरी शानबाग.आनंद यादव,आशा बगे, कमल देसाई, गौरी देशपांडे, पु.ल.देशपांडे,भास्कर चंदनशिव, मेघना पेठे,रणजित देसाई, रा. र. बोराडे, शिवाजी सावंत, सुनीता देशपांडे, बाबुराव बागुल, जी.ए. कुलकर्णी, भारत सासणे,राजन खान, इंद्रायणी सावकार, राजा राजवाडे, वि.आ.बुआ, रमेश मंत्री, यदुनाथ थत्ते, डॉ. श्रीपाल सबनीस, विलास। सातपुते,आणि संजय सोनवणी.

— पदमश्री मालती जोशी यांनी माझ्या काव्य-कथासंग्रह,’ कविता सांगे कथा ‘ याची प्रस्तवाना लिहिलेली आहे, तर राजन खान यांनी विहान नावाचा माझा काव्यसंग्रह २०१५ साली प्रसिद्ध केलेला आहे. भारत सासणे यांनी माझी कादंबरी ‘मी होतो मी नव्हतो’ व एका कथा संग्रहासाठी प्रस्तावना लिहिलेली आहेत.डॉ. श्रीपाल सबनीस यांनी माझ्या ‘ फेसबुक च्या सावलीत ‘ या काव्यसंग्रहासाठी प्रस्तावना लिहिली असून एका अन्य काव्यसंग्रहासाठी परीक्षण देखील लिहिले आहेत.श्री संजय सोनवणी यांनी माझ्या ‘ हजार तोंडाचा रावण ‘ या कथासंग्रहासाठी प्रस्तावना लिहिली आहेत.दुसरे म्हणजे १९६८ ते १९७० च्या वर्षात मी इंद्रायणी सावकार,राजा राजवाडे,वि.आ. बुआ,आणि रमेश मंत्री यांच्या काही कथांचे/नाटकांचे हिंदीत भाषांतर केलेले आहेत व ते तेव्हा प्रकाशित/प्रसारित देखील झालेले आहेत.
———–
—मी कथा विषयी बोलणार आहे, पण हे मी माझ्या कथांचे संदर्भ घेऊन बोलणार आहे.कथा म्हणजे काय? काल्पनिकते मध्ये वास्तविकता किंवा वास्तविकते मध्ये काल्पनिकतेचे मिसळ करून व्यक्त होणे.सर्वस्वी वास्तविक किंवा सर्वस्वी काल्पनिक असे काहीच नसते. पण विचार आणि चिंतन ही लेखकाची शिदोरी आहे. यातून जी जन्म घेते ती कविता किंवा कथा. म्हणजे व्यक्त होणे. पण हे व्यक्त होणे कसे असावे जेणे करून ते वाचकांना प्रभावित करेल आणि परिणामकारक असेल याचे विश्लेषण म्हणजे कथा कशी असावी किंवा लेखनाचे गुण-दोष.

—कथा घेतली तर यात अनेक गोष्टींबद्धल विचार व्हायला हवा. म्हणजे कथेचे शीर्षक, सुसंगत भाषा, परिपक्व मांडणी, विषय, पात्र, संवाद, शैली, व्याकरण, कथा बीज व विस्तार, तपशील, सृजनशीलता आणि लेखकाचा अनुभव.

—– एका गोष्टीचा मला येथे आवर्जून उल्लेख करायचा आहे. महाराष्ट्रासकट बृहन्महाराष्ट्रात गेल्या ५० वर्षांमध्ये सर्जनाची लाट आलेली आहे.ही आनंदाची बाब आहे. नवनवे कथाकार समोर येत आहे. यात आर्थिक प्रगती आणि सोशलमिडीयामुळे तर वाढ झालेली आहेच, पण तंत्रज्ञानाच्या वापरामुळे समाजाचे चित्र बदलेले आहे. आता ज्याला आपण चित्रपटाच्या आणि नाटकाच्या भाषेत प्रॉपर्टी म्हणतो ती देखील साहित्यात बदलेली आढळते. म्हणजे आता कथांमध्ये आधुनिक वस्तूंचा समावेश असतो.इंटरनेट, लॅपटॉप, मोबाईल, वाहन, विमान, टीव्ही, डायनिंग टेबल इत्यादी. अगदी प्रेम प्रकट करण्यासाठी देखील अशा वस्तूंचा समावेश झालेला आहे. नवनवीन वस्तूंचा कथांमध्ये प्रवेश झाला पण माणुसकी कुठे तरी वेशीवर टांगली गेली. समाजात आज सहिष्णुता कमी झालेली आहे. म्हणून हे दृश्य बदलण्यासाठी आता साहित्यिकांवरच मोठी जवाबदारी आलेली आहे हे मात्र नव-साहित्यिकांनी जरूर लक्षात ठेवावे.

—शिक्षण वाढल्यामुळे आता ग्रामीण साहित्य देखील प्रचुर मात्रेत समोर आलेले आहे. जाती धर्मांच्या पलीकडे तरुण देखील आपल्या समस्या, आपल्या भावना कथेच्या रूपाने व्यक्त करत आहे.मग ती शेतकऱ्यांची समस्या असो, कामगारांची असो, किंवा व्यवस्थेबद्दल असंतोष असो. निर्भिक पणे या समस्या समोर आणत आहे आणि व्यवस्थेला याची जाणीव करून देत आहे. पण अनेक कारणांमुळे समाज प्रगल्भ होताना दिसून येत नाही. यासाठी लेखन प्रबोधनकारक असायला हवे. म्हणून विषय हा महत्वाचा.

—–विषय कसा महत्वाचा असतो यासाठी मी येथे ‘ माझी कादंबरी ‘ शुद्ध भारतीय ‘ चा उल्लेख करू इच्छितो. ही कादंबरी देखील प्रकाशित आहेव याची प्रस्तावना पुण्याच्या महाकवी कालिदास प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री विलास सातपुते यांनी लिहिली आहे.आजचा कळीचा आणि उत्तेजित करणारा मुद्धा म्हणजे ‘ लव्ह जिहाद.’ जो उठतो तो समर्थानात किंवा विरोधात उभा राहतो. अगोदर हे ठरवायला हवे कि हा वैयक्तिक मुद्दा आहे, की कौटुंबिक मुद्दा आहे, का सामाजिक मुद्दा आहे, का धार्मिक मुद्दा आहे,का राष्ट्रीय मुद्दा आहे, का आर्थिक मुद्दा आहे, हे ठरविल्या नंतरच या बाबतीत व्यक्त व्हायला हवे.

—-एक मुद्दा सोडविताना अनेक नवीन मुद्दे निर्माण व्हायला नको याची काळजी लेखकाने घ्यायला हवी. यात स्त्री शिक्षण महत्वाचे आणि स्त्रियांची आर्थिक आत्मनिर्भरता महत्वाची याचा कोणी कुठे ही उल्लेख करत नाही. एकूण स्त्री स्वातंत्र्य नसेल तर राष्ट्र आणि समाज अपूर्ण राहणार. माझ्या या कथेत नायिका तलाक झाल्या नंतर स्वतः:च्या पायावर कशी उभी राहते हे मी दाखविले आहे. घडलेल्या घटनांचे आणि त्यामुळे निर्मित समस्यांचे कारण शोधण्यासाठी साहित्यिकांनी थोडा फार विचार जरूर करावा, कारण चिंतक आणि विचारवंत असणे ही लेखनाची गरज आहे. पण स्वतःला यात जास्त गुंतवू नये असे मला वाटते.त्याला घटनांमुळे निर्मित समस्यांवर आपल्या परीने उपाय सांगायला हवे. कारण माझ्या मते हुबेहूब चित्र रंगविणारा लेखक हा चित्रकार नाही आणि, घटनांचे नुसते वर्णन करणारा लेखक पत्रकार देखील नसतो. लेखक हा आल-इन-वन नसतो.तसा प्रयत्न देखील करू नये.

५० वर्षांपूर्वी मी हिंदीचे प्रसिद्ध लेखक अमृतलाल नांगर यांची कादंबरी – अब मैं नाच्यो बहुत गोपाल – ही वाचली होती. अस्पृश्यतेच्या विरुद्ध लिहिलेली ही कादंबरी, यात त्यांनी निदान दिलेले आहे. भूतकाळ पेक्षा वर्तमान केव्हा ही महत्वपूर्ण हे लक्षात असायला हवे. वर्तमान चांगले असेल तर भविष्य उज्ज्वल असेल. आणि महत्वाचे म्हणजे संघर्षा पासून माणसाला मुक्ती नाही, हे देखील आपण लक्षात ठेवायला हवे.

— कथे साठी संवाद महत्वाचे आणि संवादासाठी दोन पात्र असणे गरजेचे. कमी पात्र असतील तर कथा उत्तम लिहिता येते. संवाद नसतील आणि नुसते घटनांचे किंवा भावनांचे वर्णन असेल तर ती निवेदन शैली अर्धवट वाटते. माझ्या दोन कथांचे वर्णन मी इथे करू इच्छितो. पहिली कथा आहे – हजार तोंडाचा रावण – ही कथा हिंदी मराठी अनेक मासिकांमध्ये अगदी दिवाळी अंकांमध्ये आणि कथासंग्रहात देखील प्रकाशित आहे. यात फक्त दोन पात्रांचा म्हणजे भ्रष्टाचार आणि लोकशाहीचा संवाद आहे. हजार तोंडाच्या भ्रष्टाचार रुपी रावणाच्या समोर व्यवस्था रुपी लोकशाही किती लाचार आणि लुळीपांगळी ठरते हे मी फक्त संवादाच्या माध्यमाने दाखविले आहे. दिल्लीच्या जंतरमंतरवर अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्या आंदोलना नंतर ही कथा उपजली. आज १२ वर्षांनी व्यवस्थेचे काय हाल आहे हे आपण सर्व जाणतो. वेगळ्याने सांगण्याची गरज नाही. शेवटी साहित्य हे समाजचे दर्पण असते पण या आरशात किती आदरणीय आणि किती मान्यवर स्वतःला बघू इच्छितात? हा प्रश्न महत्वाचा.

—दुसरी कथा ‘ गलगले परत आले ही आहे. ‘ केदार शिंदे याचा ‘ गलगले निघाले ‘ या नावाचा एक चित्रपट होता. या चित्रपटात नायक स्वतः:शीच बोलत असतो. आपण सर्व देखील स्वतः:शी बोलत असतो. पण तो चित्रपट असल्याने त्यात सर्व मसाला होता. काल्पनिकता भरलेली होती.सुंदर नायिका होती, गाणी होती. नायक नायिकेचे प्रेम होते. माफिया गँग होती. कोट्याधीश पात्र होते. म्हणजे सगळेच आकर्षक होते आणि गरीब असे कोणीच नव्हते.

—-तेव्हा पासून माझ्या मनात सतत एक विचार आला होता की गोरगरिबांचे काय ? मग यावरच एक कथा निर्मिती झाली. ती म्हणजे ‘ गलगले परत आले. ‘ ही कथा मराठीत दिवाळी अंकात प्रकाशित असून माझ्या कथासंग्रहात देखील आहे. माझा नायक गरीब असल्याने, सर्वसंपन्न नसून विप्पन अवस्थेत जगत आहे आणि त्याची बायको दिसायला सुंदर नसून कमी शिकलेली देखील आहे. जगण्यासाठीचा त्याचा संघर्ष फार कठीण असतो. वडिलांनी नायकाचे लग्न आपल्या मर्जीने लावून दिले असते म्हणून त्याला त्याची बायको नावडती होती.नायकाची परिस्थिती देखील फार हलाखीची असून तो बायको पोरांना कापड तर सोडा मुलासाठी शाळेची फी देखील भरू शकला नव्हता. मुंबईत वडिलांकडून मिळालेल्या, जुनाटश्या ढासळू पाहणाऱ्या चाळीतील एका खोलीत त्याचा संसार होता. रोज त्याला ४० मैल लांब लोकलने प्रवास करून एका कारखान्यात कामाला जावे लागत होते आणि अशातच त्याच्या कारखान्याला मालकांनी टाळेबंदी जाहीर केली होती. असा हा आयुष्याचा त्रासदायक आणि पदोपदी मनाला संताप देणारा संघर्ष. आतला गलगले आणि बाहेरचा गलगले, निवेदन शैली नसून फक्त या दोघांच्या संवाद रूपात मी दाखविला आहे. आणि शेवटी बाहेरचा गलगले आतल्या गलगलेला बजावतोय की तुम्ही माझ्या आयुष्यात येत नका जाऊ. अशी ही कथा.

—आता आपण घटनांकडे वळू या. जन्म आणि मृत्यू या देखील घटनाच आहे. आणि जन्मा पासून ते मृत्यू पर्यंत आपल्या आयुष्याच्या वाटचालीत पावलोपावली घडणाऱ्या घटना आपणा सर्वांना प्रभावित करतात. पण लेखक त्यावर तीव्रेतेने व्यक्त होतो. प्रत्येकाच्या आयुष्यात घटना आयुष्याचा एक अविर्भाज्य हिस्सा असतो.आणि अनेक वेळा आपण त्या घटनांचे कारक देखील नसतो आणि घटक ही नसतो. पण त्या घटना आपल्याला प्रभावित करतात, विचलित करतात आणि विचार करायला देखील भाग पाडतात.

—सुमारे ३० वर्षांपूर्वी ऑफिसच्या कामानिमित्त मला दिल्लीला जावे लागले. डिसेंबरचा महिना. दिल्लीची हाडं गोठवणारी भीषण सर्दी. सकाळचे सहा वाजत होते. स्टेशनच्या बाहेर आलो. ऑटो साठी स्टॅन्ड कडे जात होतो. पण एक दृश्य समोर आले. म्हणजे स्टेशन केम्पस मध्येच रस्त्याच्या मधोमध थंडीपासून वाचण्यासाठी लाकडं जाळण्यात आली असावी. सकाळ झाल्याने सर्व जळून चुकली होती, नुसती राख उरली होती. राखेचा एक मोठा गोल घेरा होता. एकीकडे एक वयस्कर बाई त्या राखेच्या ढिगाऱ्यात गाढ झोपलेली होती आणि तिच्या आजूबाजूला सर्व भटकी कुत्री झोपलेली होती. हे दृश्य बघून मी फार विचलित झालो.भारताच्या राजधानीतील हे दृश्य मला पुढे होऊ देत नव्हते. थोडा वेळ थांबलो.ऑटो वाल्याला विचारले तो म्हणाला,’ ये तो पगली है साब. रोज यहीं सोती है.’ हे दृश्य आज ३० वर्षानंतर देखील मला स्वस्थ बसू देत नाही. काही करणे मला शक्य नव्हते. शेवटी लेखका जवळ लिहिण्याची एक पळवाट असते, ती मी विनम्रतेने मान्य करतो.आणि चिंतन सुरु झाले. त्या अनोळखी स्त्री बद्धल विचार करू लागलो आणि काहीच माहीत नसताना तिच्या या परिस्थतीच्या वेगवेगळ्या कारणांचे अंदाज बांधू लागलो. त्यातून उपजली ती माझी ‘ दे टाळी ‘ ही कथा.

—-एका एकट्या आजीची कथा.ही आजी आपल्या सोबतीसाठी, एक गाय. एक कुत्रा, एक पोपट, एक माकड, आणि एक मांजर पाळते. आणि यांच्या मदतीने आपले अवघड असे आयुष्य जगत आहे. समाजातील असहिष्णुता वर्तमानात आपल्याला जागोजागी दिसून येते.आजीला कोणा माणसाचा जगण्यासाठी आधार नसावा.याचाच अर्थ असहिष्णुता कैक पटीने वाढलेली आहे. कदाचित मानवी मूल्य ढासळण्याची ही सुरवात म्हणावी.

—संवाद, पात्र, आणि घटनांना कथेचे रूप दिलेले आपण बघितले. आता आपण स्वानुभावावर आधारित एक कथा घेऊ या. ही कथा फक्त निवेदन शैलीतील असून यात संवाद नाही. आपल्याकडे प्रत्येक बाबतीत राजकारण होते.देशाने राममंदिर साठी चळवळ बघितली पण देशात आज देखील अनेक मंदिर आपण उपेक्षित बघतो. स्थानिक तिकडे ढुंकून देखील बघत नाही. त्यांची दुरावस्था बघून देखील काही सामाजिक/धार्मिक चळवळ नसते. कारण धर्माचा देखील व्यवसाय झालेला आहे. देशात अशीच दुरावस्था जागो जागी असलेल्या पुतळ्यांची देखील झालेली आहे. आपण म्हणतो घरा घरात छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घ्यावा पण माझे घर सोडून. याचा अर्थ काय घ्यावा? नवनवे मंदिर आणि पुतळ्यांची निर्मिती देशात सुरु आहे, पण माणसुकीचे मंदिर किंवा पुतळे कुठे ही दिसून येत नाही. समाजात स्वस्थ मानसिकता निर्मित करण्याचे महते कार्य साहित्यिकांनी समाजसुधारक बनून करण्याची आज गरज आहे.

—अशीच एक पुतळ्याची माझी कथा आहे-पुतळा. ही कथा देखील अनेक जागी प्रकाशित असून हिंदी मराठीतील कथासंग्रहात देखील आहे. माझ्या ऑफिस मध्ये येण्याजाण्याच्या मार्गवर शिवाजी महारारांजांचा भव्य असा पुतळा होता. पहिल्या दिवसापासून कोण जाणे का पण मला या पुतळ्याचे भारी आकर्षण. पण त्याची अवस्था बघून मला वाईट वाटायचे आणि मग माझे चिंतन सुरु व्हायचे. पुतळ्यावर पक्ष्यांनी केलेली घाण अनेक दिवसांपासून कोणी स्वच्छ करत नसे. पुतळ्या खालती बसून जुगार खेळणारे व मारामारी आणि लूटमार करणारे ते गुंड पोरं, दारू पीत बसणारे ते दारुडे, पुतळ्याच्या अवती भवती प्रदक्षिणा घालत राजकारण्यांचे मोर्चा,आंदोलन, यांना आवर घालणारी व्यवस्था दिसत नसे. पण फक्त एक दिवस त्या पुतळ्याचे भाग्य उजळावे म्हणजे जन्म दिनी मोठमोठाल्या राजकारण्यांनी पुतळ्यावर पुष्प वर्षाव करावा आणि वर्तमान पत्रात स्वतः:चे मोठमोठाले फोटो द्यावे.असा हा विसंगती पूर्ण आपला समाज आणि दुट्टपी राजकारणी. यावर माझी ही कथा म्हणजे स्वानुभावामुळे निर्मित झालेली कथा. शेवटी अनुभव प्रत्येकासाठी शिदोरी असते. लेखकाने संवेदनशील असायला हवे. इथे पुतळा या कथेत कोणता नायक, किंवा नायिका नाही. नुसते संवेदनशील मनाच्या घडणाऱ्या घटनांवर प्रतिक्रिया आहे.

—हिंदी चित्रपटांमध्ये अगोदर खलनायक हा शेवटी नायकाच्या चांगुलपणा मुळे परास्त दाखविला जात असे, पुढे पुढे खलनायकाला महिमामंडित करण्याचे काम सुरु झाले आणि त्याला ‘ गॉड फादर ‘ दाखविण्यात येत असे. इतक्यातच भागले नाही तर पुढे नायक आणि खलनायकाचे मिश्रित चरित्र रंगवायला सुरवात झाली, अश्याने खलनायकाला आपल्या कृतीच्या पश्चातापाची वेळ येऊ दिली जात नसे हा बदल समाजात विष पेरण्या शिवाय काहीच करू शकत नाही, कारण हे क्षणिक आकर्षण ठरते. पण याचा पुढील पिढी वर वाईट परिणाम होतो. अर्थात लेखकाने देखील आपल्या लिखाणाच्या दूरगामी परिणामांचा विचार करावा.

—मी माझ्या कथांमध्ये कोणालाही खलनायक दाखविलेले नाही. वाईट गोष्टींचा प्रचार केला नाही. परिस्थिती मुळे उध्दभवणाऱ्या चुका दाखविल्या पण प्रतिशोध दाखविला नाही की ईर्ष्या दाखवली नाही.माझ्या ‘ कँडल मार्च ‘ या कथे मध्ये काही पुरोगामी स्त्रियांची किटी पार्टी दाखवत असताना त्यांच्या दृष्टीने कँडल मार्चचा उपयोग फक्त प्रदर्शनासाठी असतो असा त्यांचा गैरसमज दाखवला.आणि त्यांच्या सर्व चुकांना दाखवीत त्यांच्या घरातील एक घर काम करणारी दाखवून तिच्या संवादात त्यांची विचारसरणी बदलण्याचा प्रयत्न केला. याच प्रमाणे माझी कथा मृत्यूचे सुख ही एका वैश्याची कथा तिच्या मरणानंतर सुरु होते आणि तिच्या आत्मा कडून तिच्या परिस्थितीचे वर्णन दाखविले आहे.

–शेवटी माझ्या मते लेखनात काही संदेश नसेल, काही शिकवण नसेल, काही प्रबोधन नसेल तर असले साहित्य प्रभावित करत नसून निरर्थक ठरते. त्यात स्थायित्व नसते आणि कालाच्या ओघात विस्मरणात जाते. मी पण एक साहित्यिक आहे आणि माझे लेखन कितपत योग्य आणि प्रभावी आहे हे ठरविण्याचा अधिकार सर्वस्वी माझ्या वाचकांना आणि परीक्षणकर्त्यांना आहे. आणि म्हणून मला कोणतेही उपदेश करण्याचा हक्क नाही. मी फक्त आपले विचार व्यक्त केले.८० पेक्षा जास्त माझ्या कथा आहेत, हिंदी-मराठीत सात कथा संग्रह आहेत,आणि प्रत्येक कथेवर इथे बोलणे शक्य नाही म्हणून मी माझ्या वाणीला इथेच विराम देतो. मला शांत चित्ताने ऐकून घेतल्या बद्धल आपल्या सर्वांचे आभार. धन्यवाद.

****

Avatar
About विश्वनाथ शिरढोणकर 7 Articles
मी एक सेवानिवृत्त असून साहित्यिक आहे. माझी हिंदी मराठीत 25 पुस्तके प्रकाशित असून, kUKU FM वर कादंबरी - मी होतो मी नव्हतो - 65भागात(अवधी-6-30 तास) आणि AAVAAJ.COM वर 16 कथा ऑडियो स्वरुपात उपलब्ध आहे. कादंबरी महाराष्ट्र शासन च्या ग्रंथमान्य यादीत सामील असून अनेक विद्यापिठात माझी कथा, कविता पाठ्यक्रमात सामील आहे.100 पेक्षा जास्त कथा,250 पेक्षा जास्त कविता आणि 150 पेक्षा जास्त लेख प्रकाशित. अनेक दिवाळी अंकात नियमित प्रकाशन. अनेक पुरस्कार/सम्मान प्राप्त.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (चंद्रपूर) सकट अनेक शहरात साहित्यिक कार्यक्रमात सहभाग.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दोन माजी अध्यक्ष, डॉ. श्रीपाल सबनीस आणि श्री भारत सासणे यांच्या प्रस्तावना माझ्या पुस्तकांसाठी लाभल्या आहेत. मी बृहन्महाराष्ट्रांतील एक आघाडीचा साहित्यिक आहे.

1 Comment on बीज भाषण : मराठी कथात्म!

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..