नवीन लेखन...

बढती का नाम दाढी…

पूर्वी लहान मुलास भीती दाखवण्यासाठी त्याची आई म्हणायची, ‘तू जर माझं ऐकलं नाहीस तर, तुला ‘दाढीवाल्या बुवा’ला देऊन टाकेन.’ ते मूल लगेच चूप बसायचं. कारण त्याच्या मनात दाढीवाल्या बुवाबद्दल एक अनामिक भीती असायची. म्हणजेच दाढीमुळे माणसाच्या व्यक्तिमत्त्वात खुपच फरक पडतो.

लहानपणापासूनच आपल्या मनावर काही गोष्टी बिंबल्या जातात. जसे दरोडेखोर हे दाढीवालेच असतात. ऋषिमुनींना भरपूर दाढी मिशा असतात. पूर्वी सर्वांगाला भस्म फासलेले नाथपंथी गोसावी हातात चिमटा घेऊन फिरायचे, ते पाहून फार भीती वाटायची. मुलांना ते पळवून नेतात, असा एक समज त्याकाळी मनात ठसलेला होता.

शाळेत क्रमिक पुस्तकातील लेखकांच्या रेखाचित्रांना शिसपेन्सिलीने दाढी मिशा काढण्यात फार आनंद मिळायचा. झांशीच्या राणीला मिशा काढण्यात धन्यता वाटायची. वहीची शेवटची पानं अशाच दाढीमिशांच्या रेघोट्यांनी भरलेली असायची.

सुट्टीत गावी गेल्यावर मुसलमानांच्या कुटुंबातील वयस्कर दाढीवाल्या महंमद, हशीमला पाहून इतिहासातील औरंगजेब, शहाजहान आठवायचे. कुंभारवाड्यातील तरुण ज्योतीरामने दाढी मिशा वाढविलेल्या होत्या. अस्वलाला घेऊन येणारा दरवेशी हा दाढीवालाच असायचा. सायकलवरून गावोगावी फिरून केसांवर फुगे देणारे, सायकलवरील कॅरियरला लावलेल्या लाकडी बाॅक्समधून गारीगार विकणारे दाढीवालेच असायचे.

शाळेत गणित शिकविणारे ग. म. गोखले उर्फ तात्या यांनी निवृत्त झाल्यावर दाढी मिशा वाढवल्या होत्या. पांढऱ्या शुभ्र दाढीमिशात ते योगी पुरुषच वाटायचे. काॅलेजमध्ये गेल्यावर मात्र कोणीही दाढीवाले दिसले नाहीत.

दाढी शोभणारी माणसं कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहतात, त्यांपैकी मला आवडलेली एकमेव व्यक्ती म्हणजे अब्राहम लिंकन! लिंकन यांनी आधी दाढी ठेवली नव्हती. त्यांना एका छोट्या मुलीने पत्र लिहिले की, ‘तुम्ही दाढी ठेवा, तुम्हाला ती शोभून दिसेल.’ अब्राहम लिंकन यांनी दाढी ठेवली व एका प्रवासात त्या छोट्या मुलीची त्यांनी प्रत्यक्ष भेट घेतली. तिला कडेवर घेऊन तिचे कौतुक केले.

चित्रकलेच्या क्षेत्रात कोल्हापूरच्या महाराजांच्या दरबारी असलेले आबालाल रहमान हे दाढी ठेवलेले चित्रकार होते. त्यांनी काढलेली निसर्ग चित्रे अप्रतिम आहेत. शाहू महाराज गेल्यानंतर त्यांनी आपली चित्रे पंचगंगा नदीला अर्पण केली.

कोल्हापूरचेच चित्रकार, शिल्पकार, चित्रपट निर्माते-दिग्दर्शक बाबूराव पेंटर हे देखील एक दाढी शोभणारं ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होतं.

सुप्रसिद्ध चित्रकार एस. एम. पंडित हे त्यांच्या दाढी मिशांमुळे एखाद्या ऋषिमुनींसारखे दिसायचे. त्यांनी काढलेल्या पौराणिक चित्रांतून त्यांची ‘तपस्या’ जाणवते.

हिंदी चित्रपटसृष्टीतील शोमन राजकपूरला रोज दाढी करायचा कंटाळा येत असे. दाढीविषयी त्याला स्त्रियांचा हेवा वाटायचा, देवाने त्यांची त्या त्रासातून सुटका केलेली आहे म्हणून.

‘रजनीगंधा’ चित्रपटातील विद्या सिन्हाचा ‘पुराना प्रेमी’ दाखविलेला दिनेश ठाकूर हा दाढीवालाच आहे. तोच पुन्हा ‘अनुभव’ चित्रपटात तनुजाचा ‘पुराना प्रेमी’ दाखवला आहे.

कवीचं चित्र काढताना चित्रकार त्याला दाढीवालाच दाखवतो. पत्रकार देखील खांद्यावर शबनम बॅग व दाढीवालेच दाखवले जातात.

श्रावण महिन्यात कटींग दाढी करायचीच नाही, हा नियम पाळणारा माझा मित्र, विजय तावरे महिन्याभरात बुवा दिसू लागायचा. कारण त्याच्या दाढी मिशांची वाढ झपाट्याने व्हायची.

पूर्वीच्या हिंदी चित्रपटांमध्ये नायक वेषांतर करुन नायिकेला भेटायला जातो असा प्रसंग हमखास असायचा. त्यावेळी त्याने लावलेल्या खोट्या दाढी मिशीतील, मिशी तिच्या वडिलांसमोर गळून पडायची व त्याचं ‘पितळ’ उघडं पडायचं किंवा नायक नायिकेसमोर दाढी मिशा लावून एखादी कव्वाली पेश करायचा. त्या कव्वालीतून नायिकेला खलनायकापासून सावध करण्याचे इशारे द्यायचा.

कालांतराने मोठी दाढी जाऊन फॅशनेबल ‘बुल्गालिन’ दाढी आली. या दाढीमुळे अनेकांच्या व्यक्तिमत्त्वात फरक पडू लागला. हिंदी चित्रपटात, मालिकेमध्ये व नाटकांतून असे बुल्गालिन कलाकार दिसू लागले.

सुप्रसिद्ध पार्श्र्वगायक किशोर कुमार हा सर्वोत्तम विनोदी अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, संगीतकार होता. ‘चलती का नाम गाडी’ हा त्याचा चित्रपट कोणीही विसरु शकत नाही. त्यानं स्वतः काही चित्रपटांची निर्मिती केली. त्यातील एकाचे नाव होतं..’बढती का नाम दाढी’ यामध्ये सर्व जबाबदाऱ्या त्यानंच पार पाडलेल्या होत्या. चित्रपट काही विशेष चालला नाही. मात्र त्या चित्रपटाच्या नावात त्रिकालाबाधित ‘सत्य’ दडलेलं आहे…

काहीही न करता वाढणारी जगात एकच गोष्ट आहे, ती म्हणजे बढती का नाम ‘दाढी’!

© – सुरेश नावडकर

मोबाईल ९७३००३४२८४

२९-४-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..