नवीन लेखन...

बॅक टू सी

मुंबई एअरपोर्ट वर सिंगापूरला जाणाऱ्या एअर बस A380 या सिंगापूर एअरलाईन्स च्या डबल डेकर विमानाची अनाऊन्समेंट झाली. अनाऊंन्समेंट झाल्यावर शेकडो लोकं लढाईला निघाल्याचा आवेशात बोर्डिंग गेट कडे लगबगीने सरसावू लागली. सुमारे आठशे जणांना घेऊन जाणारे सर्वात मोठ्या विमानात बोर्डिंग गेट ओपन झाल्यावर सगळ्यांना विमानात घुसायची घाई झालेली असते. परंतु एअर लाईन्स चे कर्मचारी कोणतीही गडबड किंवा गोंधळ होऊ न देता सीट नंबर प्रमाणे प्रवाशांना ग्रुप मध्ये बोलावून सोडत होते. यावेळेस पहिल्यांदाच एखाद्या जहाजावर जॉईन करायला जाताना मी एकटाच प्रवास करत होतो. सिंगापूरहून जकार्ता साठी सिंगापूर एअर लाईन्सचेच कनेक्शन फ्लाईट होते सिंगापूर मध्ये अडीच तीन तासानंतर कनेक्शन फ्लाईट असल्याने सगळी लोकं गेल्यावर आणि बोर्डिंग गेट समोर लाईन मध्ये चार पाच लोकं असताना मी उठलो आणि पासपोर्ट आणि बोर्डिंग पास घेऊन गेट कडे निघालो. बोर्डिंग पास स्कॅन झाल्यावर माझ्या मागे आणखीन दोघे जण आले आणि एअर लाईन्स च्या कर्मचाऱ्याने ‘ ऑल पॅसेंजर बोर्डेड ‘ असा मेसेज वॉकी टॉकी वर देतानाचे शब्द कानावर पडले. सगळ्यात शेवटी बोर्डिंग गेट ओलांडल्यावर सुद्धा सीट वर बसेपर्यंत आणखीन दहा मिनिटं विमानात इतर प्रवाशांच्या हॅन्ड बॅग ठेवण्यात आणि उठ बस करण्यात गेली. सीटवर बसल्यावर काही सेकंदातच सेफ्टी अनाऊन्समेंट सुरु झाली. परंतु त्या अनाउन्समेंटमुळे डोक्यातील विचारचक्र काही केल्या थांबत नव्हते. जहाजावर पुन्हा जायचंय म्हणून प्रिया नाराज होती, सानिश चा जन्म होऊन महिना पण झाला नव्हता अजून काही महिन्यांनी जावे अशी तिची ईच्छा होती पण रिपोर्टींग केल्यावर लगेचच पाठवणार नाहीत नुसतं जायचंय एवढेच ऑफिस मध्ये कळवून बघतो असं सांगितल्यावर तिने परवानगी दिली.

सुमारे अडीच वर्षानंतर ऑफिसमध्ये जॉइनिंग करण्याकरिता जुलै 2017 मध्ये रिपोर्ट केल्यानंतर प्रत्यक्ष जहाजावर पुन्हा जॉईन करण्यासाठी मध्ये जवळपास दीड महिना गेला. बॉस ने अडीच वर्षानंतर जॉईन करायला जाऊनसुद्धा प्रमोशन देऊन अनपेक्षित धक्का दिला होता प्रमोशन मिळून तीन पट्ट्या मिळण्यापेक्षाही पाच ते सहा महिन्यांऐवजी तीन महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळणार याचाच जास्त आनंद झाला.

आजपर्यंत तू फक्त भारतीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसोबतच काम केले आहेस. इंडोनेशियातील कर्मचारी आणि जुनियर अधिकाऱ्यांसोबत काम करायला तुला अडचण तर नाही ना येणार? बॉस ने विचारलेल्या या प्रश्नावर मान डोलावून येस सर बोलून होकार दिला.

माझ्या वयापेक्षा जास्त वर्ष पाण्यात तरंगणाऱ्या महाकाय जहाजावर मला सेकंड इंजिनियर म्हणून पाठवण्यात येणार होतं. ऑपरेशन मधून मॅनेजमेंट लेव्हल मध्ये जाण्याची ही पहिलीच वेळ होती. पगारासह जवाबदारी पण वाढणार होती. बॉस ने सांगितले तुला मेडिकल साठी जावे लागेल ती करून घे तोपर्यंत तुझा व्हिजा आणि इतर
फॉर्मॅलिटी पूर्ण करून घेऊ. इथली मेडिकल पास झाल्यानंतर तुला इंडोनेशिया मध्ये दुसरी मेडिकल करावी लागेल असं सांगून मला घरी जायला सांगितले.

मला पाठवण्यात येणाऱ्या जहाजावर फक्त पाच भारतीय अधिकारी आणि पन्नास ते पंचावन्न इंडोनेशियन अधिकारी व कर्मचारी असल्याची माहिती मिळाली.

यापूर्वीच्या सगळ्या जहाजांवर सगळेच भारतीय असल्याने भारतीय कुक आणि भारतीय जेवण मिळाले. इव्हन ब्राझील सारख्या देशात जहाजावर नऊ महिने असताना तिथे पापड, मसाले आणि डाळी ह्या महिन्या दोन महिन्यात जहाजावर जॉईन करणाऱ्या दोन तीन क्रू मेंबर्स करवी पोचवले जायचे कारण तिकडे युरोप, गल्फ, यू एस ए किंवा सिंगापूर प्रमाणे भारतीय मसाले व खाद्यपदार्थांचे सप्लायर्स नव्हते. पंचावन्न लोकांमध्ये आम्हा पाच भारतीयांना आपल्या पद्धतीचे जेवण कसं मिळत असेल याची चिंता लागून राहिली. जहाजावर कोणी ओळखीचे नव्हते त्यामुळे विचारायची सोय नव्हती. पण कंपनीतल्या एकाकडून माहिती मिळाली की इंडोनेशियातील जहाजावर काम केलेले एक महाराष्ट्रीयन फिटर आहेत. मी त्यांचा नंबर मिळवला आणि त्यांना कॉल केला तर त्यांनी सांगितले की पाच भारतीयांसाठी एक सेपरेट कुक असतो डाळ, चपाती आणि इतर सगळे भारतीय पदार्थ तो बनवून देतो फक्त तो इंडोनेशियन आहे एव्हढच.

मेडिकल केल्यानंतर चार दिवसांनी ऑफिसमधून बॉस चा फोन आला त्याने विचारले मेडिकल चे काय झाले? मी म्हटले मला माहिती नाही. तुला सांगितले होते इथली मेडिकल पास झाल्यावरच तिकडे इंडोनेशिया मध्ये पाठवण्यात येईल असं सांगितले होते ना तुला? मेडिकल झाल्यावर रिपोर्ट्स ची चौकशी का नाही केलीस?? मी म्हटलं सॉरी सर, विचारून घेतो लॅब मध्ये आताच. बॉस म्हणाला काही नको कॉल करू आता कोणाला , तुझ्या मेडिकल मध्ये प्रॉब्लेम आहे उद्या सकाळी डॉक्टर कडे जाऊन ये तो सांगेल तुला.

स्ट्रेस टेस्ट, सोनोग्राफी, ब्लड टेस्ट, इसीजी सगळं काढून झाले होते आता कशात प्रॉब्लेम झालाय ते समजेपर्यंत उद्याची वाट बघायला लागणार होती आणि तोपर्यंत गॅसवर.

दुसऱ्या दिवशी कंपनी डॉक्टरच्या लॅब मध्ये गेल्यावर रक्तातील कोलेस्टेरॉल चे प्रमाण वाढल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी गोळ्या लिहून दिल्या, दिवसातून अर्धा पाऊण तास चालायला सांगितले आणि आठ दिवसानी पुन्हा रक्त तपासायला बोलावले.

मला चरबी चढली असल्यामुळे मेडिकल फेल झाल्याचे कळल्याने पुढील आठ दिवस घासफूस खाऊन, अर्धा ते पाऊण तास चालून गोळ्या खायच्या आणि चरबी उतरवून घायची वेळ आली होती. आठ दिवसानी ब्लड रिपोर्ट नॉर्मल झाले. मधल्या काही दिवसात इंडोनेशिया बद्दल गुगल सर्च केला, सुमारे आठ हजार पेक्षा जास्त लहान मोठे बेटं असलेला मुस्लिम देश वगैरे वगैरे ओझरती माहिती मिळाली. विजा, इंडोनेशिया मध्ये मेडिकल आणि इतर सगळं अरेंज झाल्यावर ऑफिस मध्ये बोलावले. बॉस म्हणाला तिकडे आपला कॅप्टन, चीफ इंजिनियर आणि इलेक्ट्रिकल ऑफिसर आणि एक ट्रेनी इलेक्ट्रिकल ऑफिसर असे चार जण आहेत. रविवारी रात्री जकार्ता साठी सिंगापुरहुन कनेक्टिंग फ्लाईट आहे मंगळवारी जहाजावर जाण्यापूर्वी एक दिवसाचा फॅमिलायजरेशन कोर्स आहे बुधवारी तुझी मेडिकल होईल, टेम्पररी पास वर तुला शुक्रवारच्या बोट ने जहाजावर पाठवतील. तू ज्याला रिलीव्ह करशील तो सोमवारी जहाजावरुन उतरेल. व्यवस्थित हँडिंग ओव्हर आणि टेक ओव्हर करून घ्या.

सगळ्या सूचना देऊन झाल्यावर बॉस म्हणाला एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेव, कॅप्टन आणि चीफ इंजिनियर आपले असले तरी आपण त्यांच्या देशात त्यांच्या लोकांसोबत जहाज ऑपरेट करतोय, यापूर्वी काही भारतीय अधिकाऱ्यांचे तिथे जुळले नाही. कोणाशी वाद किंवा भांडण न करता मॅनेज करावे लागेल त्यामुळे सांभाळून काम कर. टेक केअर आणि ऑल दी बेस्ट बोलून बॉसने मला अकाउंट्स डिपार्टमेंट कडे जायला सांगितले.

विमानाने मुंबई एअरपोर्ट वरून टेक ऑफ केले आणि अडीच वर्षापेक्षा मोठ्या गॅप नंतर पुन्हा एकदा बॅक टू सी करण्यासाठी पुढील तीन साडे तीन महिने घर आणि कुटुंब सोडून निघाल्याने डोळे पाण्याने भरून गेले होते.

© प्रथम रामदास म्हात्रे

मरीन इंजिनियर

B. E.(mech ) DIM.

कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 184 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..