नवीन लेखन...

लेखक वसंत वसंत लिमये

लेखक वसंत वसंत लिमये यांचा जन्म ३० नोव्हेंबरला झाला.

नावापासूनच त्याच्या बद्दल कुतूहल निर्माण व्हायला सुरुवात होते. वसंत वसंत लिमये. अमरावतीत जन्मलेल्या या मुलाच्या बारशाला वडील हजर होते. ‘नाव’ सुचत नव्हतं. वडील म्हणाले, “कार्ट्याला माझंच नाव ठेवा” आणि हे अनोखं नाव वसंताला मिळालं. मॅथेमॅटिक्सचे क्लासेस घेणारे वडील. रशियनसारख्या परकीय भाषेवर प्रभुत्व मिळवलेले. कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने झालेल्या आंदोलनातून तुरुंगवास भोगलेले. असे अनोख्या वळणाचे ‘वडील’ असल्याने चिरंजीवांच्या एकाच गोष्टीत ‘न’ गुंतण्याच्या, नवनव्या आव्हानांचा स्वीकार करण्याच्या कृतीला त्यांनी कधी आडकाठी केली नाही. त्यामुळे वसंतराव लिमयेंच्या चिरंजीवांनी, ‘वसंता’नं नाना वाटा मुक्तपणे चोखाळल्या.

आयआयटी मुंबईमधून मेकॅनिकल इंजिनिअरींगमध्ये ‘बीटेक’ झाला. हरिश्चंद्रगडाच्या कोकण कड्यावर पहिलीच चढाई करणारा, हिमालयीन मोहिमेत सूत्रधार ‘गिर्यारोहक’ बनला. सहा वर्षं फोटोग्राफीत रमला. त्यात त्यानं टिपलेल्या ढगांच्या मुद्रांना, मोहन वाघ आणि गौतम राजाध्यक्ष यांच्याकडून ‘तो क्षण, ती जागा आणि मी’ अश्या दोन प्रदर्शनात शाबासकी मिळवली. व्हिसा नसताना, थेट चंद्रलेखाच्या ‘गगनभेदी’च्या दौऱ्यातून इंग्लंडमध्ये शिरला आणि स्कॉटलंडला जाऊन टीचर्स डिप्लोमा इन आऊट डोअर एज्युकेशन करून आला. परतल्यावर ‘अॅडव्हेंचर टुरिझम बिझिनेस’ मध्ये शिरला. त्यातूनच पुढे कॉर्पोरेट जगतासाठी ‘आऊटडोअर मॅनेजमेंट प्रोग्राम्स’ची संकल्पना राबवत ‘हायप्लेसेस’ ही कंपनी उभारून कोटीत व्यवहार सांभाळण्यात, माणसं घडवण्यात यशस्वी झाला. ‘आयआयटी’च्या दिवसांत उन्मेषचं अभिनयाचं प्रथम पारितोषिक पटकावत अभिनेताही झाला. डॉ. आनंद नाडकर्णींच्या प्रोत्साहनानं स्तंभलेखन करता-करता ‘धुंद-स्वच्छंद’ हे ललित लेखनाचं पुस्तक वीस वर्षांपूर्वीच लिहून टाकून, अगदी अलीकडेच वसंतानं गेल्या काही दशकांतल्या आंतरराष्ट्रीय घडामोडीचं आणि भारतीय राजकारणाचं तपशीलवार दर्शन घडवणारी ‘लॉक ग्रिफीन’ ही चारशेपासष्ट पानी कादंबरी लिहून, त्या कादंबरीसाठी पारितोषिक पटकावत यशस्वी लेखकाची भूमिका पार पाडलीय.

कॉर्पोरेट कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण देणारं ‘गरुडमाची’ नामक एक केंद्र पुणे-कोलाड रस्त्यावर ताम्हिणी घाटामध्ये डोंगर भागात पंचावन्न एकर क्षेत्रात अत्याधुनिक सुविधांनी युक्त तंबूंच्या रूपाने ‘वसंत वसंत’ने उभं केलं आहे. तसेच पुण्यात कोथरूड भागात बलवंतपुरम परिसरात, किनारा हॉटेलकडून डोंगरवाटांकडे जाणाऱ्या रस्त्यावर ‘ईप्सित’ नामक पेशवेकालीन वाडा उभारून आपलं इतिहासप्रेम आणि कलात्मक दृष्टी शाबूत ठेवलीय.

निळे डोळे, झीरो कटिंग, जीनशर्टवर कायम जाकीट अडकवलेलं, ओठावर सिगारेट आणि बेसमधला आवाज असलेला वसंत ‘हाय प्लेसेस मॅनेजमेंट प्रा. लि.’ या कंपनीचा सीईओ झालाय. भारत, इंग्लंड, श्रीलंका, ओमान अशा देशोदेशींच्या अधिकाऱ्यांच्या हजारभर प्रोग्राम्सचा मार्गदर्शक ठरलाय. पण हाच ‘सीईओ’ वसंता पानाच्या कट्टयावर, रुपालीच्या ठेल्यावर मनमुक्त गप्पा मारणारा ‘बाळ्या’च आहे आणि देशोदेशींच्या मैफली ऐकण्याचा आनंद घेणं जराही कमी झालेलं नाही. ‘आयआयटी’मध्ये शिकताना साथीला असलेले आणि आता गोव्याचे मुख्यमंत्री असलेले मनोहर पर्रीकर हे वसंतासाठी प्रोटोकॉल बाजूला ठेवून पुण्याला येतात, तर ‘वसंता’ यांच्या नंदू पोळासारख्या मित्रासाठी उत्तरात्रीही गप्पांची मैफल रंगवायला केव्हाही तयार असे. लेकीच्या – रेवतीच्या लग्नात हा धोतर आणि मृणाल नऊवारी नेसून सुटाबुटातल्या कॉर्पोरेट मंडळींचं स्वागत करण्याची हौस सांभाळतो. त्याच्या या चौफेर उद्योगात त्याला सर्वांत मनापासून साथ असते बायकोची – म्हणजे मृणालची. वसंता ‘कलावंत’ म्हणून तिचा आदर करतो. तिला गरुडमाची उभारताना सौंदर्यसृष्टी सांभाळण्याचं मुक्त स्वातंत्र्य देतो आणि स्वतःला ‘घिसाडी’ म्हणवून घेतो – तिच्या कल्पनेनुसार काम घडवणारा.

‘वसंत’ ‘वसंत’चं ऐतिहासिक गोष्टींबद्दल प्रेम आणि मृणालनं लहानपणी अनुभवलेली वाडासंस्कृती यातून त्यांनी पुण्यात पेशवेकालीन वाडा उभा केलाय. करायचं ते नेमकं आणि उत्तम, हा दोघांचा ‘ध्यास’ आणि कलात्मक नजर यामुळे साकारलं गेलेलं ‘ईप्सित’ हे घर कम वाडा पाहाल तर दादच द्याल.

भवानी पेठेतल्या टिंबर मार्केटमध्ये जाऊन तीन वर्षं मृणाल आणि वसंता लाकडं गोळा करत होते. अडीचशे वर्षांपूर्वीचे वाडे पुण्यात पाडले जात असताना, विकायला काढलेल्या लाकडांवर दोघांचं लक्ष होतं. म. श्री. माटेंच्या मराठा आर्किटेक्चर थिसिसचा अभ्यास केला. पेशवेपूर्व मराठेशाहीतल्या अठरापगड वस्तू जमवल्या आणि पेशवे शाही वाडा उभा केला.
‘ईप्सित’चा दरवाजाच एक टनाचा आहे. त्याच्यासाठी काँक्रीट बिम घ्यावा लागला. गणपती चौकातला केसरबाग वाडा, बिवलकर वाडा इथल्या वस्तू, कोकणातल्या स्वयंपाक्यानं सुचवलेले ‘आसरा’ गावच्या वीरेश्वर देवस्थानचे ‘सुरुदार’ खांब, सभामंडपाच्या कमानी, टिळक महाराष्ट्र विद्यापीठच्या भुताचा वाडा समजल्या जाणाऱ्या वास्तूतले पाच खांब, कन्याशाळेजवळच्या (शनिवार पेठ) साठे वाड्यातले अगदी दुर्मिळ आठ खांब, सहा कमानी, राजमाचीवरचे कुल्पी गोळे, सिंहगड पायथ्याला मिळालेली खरी तलवार, उचलायला पाच माणसं लागतील असा वाईत सापडलेला न्हाणीचा दगड आणि कुठले कुठले लामणदिवे जमा करत हा वाडा दोघांनी उभारलाय. अठरापगड वस्तूंतून वाडा उभारताना मृणालनं वास्तुशैलीचा काळजीपूर्वक अभ्यास करून, परस्परांशी मेळ बसेल अशी वास्तुरचना केलेली आहे. विशिष्ट कोनाडे, झुंबर, कौलांतून घराच्या मुख्य चौकात उतरणारा सूर्यप्रकाश – अशा साऱ्यांचा नेमका वापर करून इतिहासाची आठवण ठेवता-ठेवता मूळ सौंदर्य जपलेलं आहे.

हा वाडा वसंतसमवेत त्याच्या रनिंग कॉमेंट्रीसह पाहायला हवा. वाडा दाखवता-दाखवता तो इतिहासात शिरतो. उदा. – हे दोन खांब जिजाऊ मातेच्या स्पर्शाने पुनीत झाले असावेत. १५६९ मध्ये वास्तुशांत झालेल्या वाड्यातले हे खांब, हंडे देशमुखांनी मला लग्नाची भेट म्हणून दिले, असं वसंता सांगतो.

‘वाडा’ हा जसा त्याचा वीक पॉइंट, तसं हिमालयाची दुर्गम शिखरं आणि सह्याद्रीच्या कडेकपारी सर करणं याचं त्याला एका टप्प्यावर वेडच होतं. “कुठलंही नवं पाऊल उचलताना प्राथमिक भीती दूर सारावी लागते, याचा धडा गिर्यारोहणानं दिला,” असं वसंत आवर्जून सांगतो. प्लॅनिंग, डिझायनिंग, ऑर्गनायझिंग याचं महत्त्व कळलं. एखादी नवी गोष्ट साध्य करण्यासाठी लोकांच्या डोळ्यांसमोर त्याचं स्वप्न उभं करावं लागतं. लोकांना त्यात सहभागी करून घ्यावं लागतं, हे सारं माऊंटेनियरींग मधूनच शिकल्याचं वसंत आवर्जून सांगतो. पराभव पचवता येणं आणि यशही सांभाळता येणं हे व्यक्तिगत शहाणपण गिर्यारोहणामुळे मला आलं, असं वसंता आवर्जून नोंदवतो.

वसंतानं १९७१ च्या डिसेंबर महिन्यात पेब-माथेरान ही पहिली हाईक केली. “घाट चढताना उन्हानं, तंगडतोड करताना ब्रह्मांड आठवलं आणि आयुष्यात पुन्हा हाईक वगैरे करण्याचा मूर्खपणा करायचा नाही – अक्षरशः मनाशी खूणगाठ बांधली. पण दोनच आठवड्यांनी कॉलेजच्या हायकिंग क्लबने आयोजित केलेल्या राजमाची ट्रेकची नोटीस लागली आणि न राहवून मी नाव नोंदवून मोकळा झालो. इथे माझा गिर्यारोहणाचा प्रवास सुरु झाला,” असं वसंत सांगतो.

तो १९७३ मध्ये आयआयटीत दाखल झाला. तिथे माऊंटेनीयरिंग क्लब सुरु झाला आणि आयआयटीतला पाच दिवसांचा आठवडा वसंता आणि कंपनीच्या पथ्यावर पडला. त्याने १९७६ मध्ये माऊंटेनीयरिंगचा बेसिक कोर्स पूर्ण केला आणि पुढे गडभ्रमंतीच्या भन्नाट मोहिमा आखणं सुरूच राह्यलं.

शबरी रिव्हर व्हॅली एक्सिपिडिशन ही एक धाडसी मोहीम त्यांनी आखली. ओरिसात उगम पावून आंध्र प्रदेशापर्यंत येणाऱ्या शबरी नदीच्या काठानं तब्बल ३५० मैलांची पदभ्रमण मोहीम स्टडीटूरच्या माध्यमातून त्यानं आखली होती, ती ३० दिवसांत पूर्ण केली. माउंटेनीयरिंगचा अडचणीचा डोंगर ७८ मध्ये पार करत, नीलकंठ-पार्वती या नावानं ओळखल्या जाणाऱ्या शिखरांच्या मधोमध असलेले अनामिक शिखर ८० मध्ये सर करून त्याचं नाव ‘एकदंत’ ठेवलं. पुढे हिमवर्षावाला तोंड दिलं. त्रिधार जिंकलं. गिर्यारोहणाचा माध्यम म्हणून वापर कसा करावा, हे एका कोर्सदरम्यान शिकवलं गेलं. स्कीइंग, कयाकिंग, केव्हिंग, स्कूबाडायव्हिंग मोहीम आखणं – अशा गोष्टींबद्दलचं इत्थंभूत शिक्षण वसंताने घेतलं. कांचनगंगाची मोहीम आखली. संजय बोरोले या मित्राला मुकावं लागलं. या मोहिमांनी महाराष्ट्रातील जनतेपर्यंत गिर्यारोहण पोहोचवलं. बराच काळ कुठली मोहीम नसेल, तर वसंत अस्वस्थ होतो. त्यातूनच फोटोग्राफी, हायप्लेसेसची उभारणी यात तो गढून जातो.

पर्वतराजींची विविध ऋतूंतील मनोहारी रूपं त्याला सतत साद घालत. त्यातूनच स्वाभाविकपणे ‘हायप्लेसेस ट्रेनिंग सेंटर’ त्यानं आणि मृणालनं सह्याद्रीच्या काळ्याकभिन्न कड्यांच्या पार्श्वभूमीवर कुंडलिका नदीच्या परिसरात पन्नास एकर जंगलातल्या या सेंटरमध्ये अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचे अधिकारी रूमच्या दारातच ढग भेटण्याचा आनंद घेत व्यवस्थापन शास्त्राचे धडे घेत असतात.

मुळात आयआयटीयन अभियंता असलेल्या वसंतानं पैसे मिळवण्यासाठी १९८४-८५ मध्ये सौदी अरेबियात शेवटचा इंजिनीयरिंग जॉब केला. मग, दोन महिने इंग्लंडसह युरोपात भटकला. लंडनभेटीत स्कॉटलंडचे (आऊटडोअर एज्युकेशनवाले) मित्र भेटले. त्यातून त्याचा आऊटडोअर अॅडव्हेंचर टुरिझम बिझिनेस सुरु झाला. गरुडमाचीवर भारत पेट्रोलियमसाठी पहिला मॅनेजमेंट प्रोग्राम केला. आता वर्षाला विविध कंपन्यांसाठी ६००-६५० प्रोग्रॅम होतात. या प्रोग्राम्सपासून ते साहसी पर्यटनापर्यंत वेगवेगळ्या छटांचा अनुभव ‘हायप्लेसेस’ने प्रशिक्षणार्थींना देऊ केलेला आहे. या सर्व वाटचालीत मूळ लखनौची असलेल्या, आजोळामुळे पुण्यात आलेल्या कथ्थक, गाणं, पडघममध्ये रमलेल्या, आर्किटेक्ट जगाची जाण असलेल्या ‘मृणाल’चा सिंहाचा वाटा आहे…

आता हायप्लेसेसलाही पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत. वसंताही वयानं निवृत्तीच्या उंबरठ्यावर म्हणजे अठ्ठावन्न वयाचा झालाय. भटकेगिरी खूप झालीय. हायप्लेसेसला दिशा सापडलीय. लेकीचं लग्न झालंय. लेखनाची वाट खुणावतेय.

‘लॉक ग्रिफिन’नं आत्मविश्वास वाढवलाय. या कादंबरीसाठीही वसंतानं अपार कष्ट उपसलेत. ‘तपशील’ या गोष्टीवर मराठीत दुर्मिळ वाटेल अशी हुकमत मिळवलीय. केवळ स्थळांचे, घटनांचे ऑथेंटिक तपशील देऊन वसंत थांबत नाही; तर जगातल्या असंख्य जागांचे, गल्लीबोळांचे, समुद्रकिनाऱ्यांचे, खाण्या-पिण्याच्या सवयींचे, वाहतुकीच्या साधनांचे, माणसांचे अफलातून तपशील त्यानं या पहिल्या कादंबरीसाठी गोळा केले. त्यासाठी जगभर (न्यूयॉर्क ते मस्कत) तो भटकला.
आता दुसरी कादंबरी आकाराला येतेय. तरुण पोरांच्या दृष्टीकोनातून वसंता ती मांडणार आहे. कृष्ण-महाभारताचे संदर्भ आहेत. आजचं राजकारण आहे. इंटरनेटचं युग आहे. भोवतीचा किळसवाणा भ्रष्टाचार उखडण्याचं आव्हान असलेल्या पोरांचा प्रवास आहे. एकीकडे तांत्रिक क्रांती घडत असताना दिशाहीन संभ्रमावस्थेत तरुण आहे, तरीही पोरांच्या धडपडीत त्याला आशेचा किरण दिसतोय.

नंदुरबारजवळ पाहिलेल्या आदिवासी मुलांच्या शाळेच्या स्थितीमुळे विचार वेग घेतायत. सोलापुरातील भटक्या-विमुक्त मुलांची शाळा आणि गायकवाडांचा बीव्हीजी ग्रुप यांची सांगड घालून देऊन परस्परगरजा भागवण्याचा सामाजिक भान असलेला प्रकल्प वसंत वसंतनं हाती घेतलाय.

ठाण्याच्या मो. ह. विद्यालयात असताना त्याला उनाडक्या करण्यातच रस होता. शाळेत नंबर एकतिसावा आला. वडील फक्त म्हणाले, “तिनावर एक एकतीस! यातला ‘तीन’ नंबर काढून टाकलात तर बरं!” त्रागा न करता एका ओळीत सांगितलेलं सूत्र चिरंजीव वसंताच्या मनात रुजलं आणि मग कुठलाही छंद चौफेर भटकत जोपासताना नंबर वनचीच गुणवत्ता दाखवण्याचा ध्यास ‘वसंत वसंत’ने घेतला.

— सुधीर गाडगीळ.

(सुधीर गाडगीळ यांच्या ‘बिंब प्रतिबिंब’ या पुस्तकातून)

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..