नवीन लेखन...

लेखक अरुण साधू

अरुण मार्तंडराव साधू यांचा जन्म १७ जून १९४१ रोजी अमरावती जिल्ह्यातील परतवाडा या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण परतवाडा -अचलपूर येथे तर माध्यमिक शिक्षण अमरावती येथे झाले. विदर्भ महाविद्यालय , अमरावतीमधून त्यांनी बी. एस. सी . केले. पुणे विद्यापीठातून एम. एस. सी . चे शिक्षण अर्धवट सोडून पूर्णवेळ पत्रकारिता केली . १९६२ पर्यंत ते पतवाडा आणि अमरावती यथे रहात होते. अरुण साधू हे १९६२ पासून १९६७ पर्यंत पुण्यात रहात होते त्यांनतर १९६७ पासून मुंबईमध्ये राहू लागले. पुढे मुंबईत आल्यावर त्यांनी अनेक मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रांसाठी वार्ताहर , विशेष प्रतिनिधी म्हणून काम केले . तसेच एका मोठ्या इंग्रजी वृत्तपत्राचे ते संपादक म्हणून होते. त्यांनी १९८९ पर्यंत सक्रिय पत्रकारिता केली. पुढे मात्र ते क्रियाशील पत्रकारिता सोडून स्तंभलेखनाकडे वळले .

अरुण साधू यांनी पत्रकारिता केलीच परंतु त्यांनी स्तंभलेखक ते कथाकार , कादंबरीकार , विज्ञानलेखक , इतिहास लेखक म्हणून भरपूर लेखन केले. १९९५ पासून २००१ पर्यंत ते पुणे विद्यापीठमध्ये वृत्तपत्रविद्या आणि संपादन विभाग येथे प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. १९८५ मध्ये त्यांनी इंटरनॅशनल रायटर्स वर्कशॉप , आयोवा सिटी अमेरिका येथे भारताचे प्रतिनिधीत्व केले.

अरुण साधू पत्रकार म्हणून सुविख्यात होते त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या कथा – कादंबऱ्यामधून महानगरातील सर्वच स्तरावरील वास्तव शब्दचित्रण अत्यंत प्रभावीपणे केले. बातमीदारी करताना एका बाजूला त्यांची राजकीय आणि कामगार क्षेत्रातील मंडळींबरोबर ऊठबस होती , तर दुसरीकडे त्यांची भेदक दृष्टी खादीच्या कपड्यांच्या आत दडलेल्या ‘ माणसाच्या ‘ मनाचा एक्स-रे काढत होती . त्यांनी १९७२ साली लिहिलेले ‘ मुंबई दिनांक ‘ आणि १९७७ साली लिहिलेले ‘ सिंहासन ‘ ह्या दोन्ही कादंबऱ्यामधून महानगरमधील वास्तव जीवन आणि महाराष्ट्रामधील विशिष्ट जातीच्या राजकारणाचा जो अत्यंत मर्मज्ञ वेध घेतला आहे त्यामुळे आजतागायत ह्या दोन कादंबऱ्यांची पकड मराठी माणसावर कायमची बसली आहे आणि त्यांच्या ह्या दोन्ही कादंबऱ्यांवर आधारित निघालेल्या ‘ सिंहासन ‘ ह्या चित्रपटामुळे दृश्य माध्यमातून अनेकांपर्यंत अगदी देशाबाहेर हे वास्तव गेले आहे. ह्या दोन्हीही कादंबऱ्यांची भाषांतरे देशी-विदेशी भाषेत झालेली आहेत.

अरुण साधू यांनी सत्तांध , बहिष्कृत , शापित , स्फोट , विप्लवा , त्रिशंकू , शोधयात्रा , तडजोड , झिपऱ्या , मुखवटा या सामाजिक आणि वैज्ञानिक कादंबऱ्यांमधून महाराष्ट्राच्या सर्वच स्तरावरील जीवनाचा शोध घेतात त्यांनी कुठेही वास्तवाला धक्का लावला नाही उलट नवनवीन अविष्करांचा शोध घेतला.

मराठीबाबत त्यांनी व्यक्त केलेली तळमळ अस्मितेपुरती मर्यादित नसून तिला विचार, निरीक्षण आणि संशोधनाची बैठक आहे. मराठीच्या प्रसाराविषयी अनेक वर्षे ते प्रयत्नशील होते. भाषेचे संरक्षण करायचे, तर तिला उद्योग आणि सत्ता यांचे पाठबळ हवे. साहित्याचा ठेवा तुलनेने कमी असूनही गुजराती भाषा भारतात , बाहेर टिकते आणि वाढते, त्याच वेळी हजार वर्षांची श्रीमंत साहित्य परंपरा लाभलेल्या मराठीला मात्र अस्तित्वाची लढाई करावी लागत आहे . कारण तिच्या पाठीशी आर्थिक श्रीमंती नाही आणि सत्ताधारींना आपल्याच संस्कृतीचा अभिमान नाही. ही अरुण साधू यांची परखड मते नेहमीच विचार करायला लावतात. त्यांच्या ओघवत्या लिखाणामुळं मराठी वाचकांना रशिया, चीन , क्युबातील साम्यवादी क्रांतीची ओळख झाली. विशेषत: तरुणांमध्ये साम्यवादी राजकारणाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. पत्रकारितेतून आल्यामुळं त्यांच्या लिखाणात एक सहजता होती. त्यामुळंच कठीण विषयही ते सहज समजावून सांगत.

अरुण साधू यांनी डॉ. जयसिग पवार यांच्या छत्रपती राजर्षी महाराज या ग्रंथाचा त्यांनी इंग्रजीमध्ये अनुवाद केला आहे तर डॉ. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘ डॉ. आंबेडकर ‘ या चित्रपटाच्या संहिता लेखनातही अरुण साधू सहभागी होते. त्याचप्रमाणे यशवंतराव चव्हाण यांच्यावरील जो चित्रपट निर्माण झाला त्या लेखनामध्ये त्यांचा समावेश होता. अरुण साधू यांनी ‘ आणि ड्रॅगन जागा झाला , फिडेल-चे -क्रांती , तिसरी क्रांती , ड्रॅगन जागा झाल्यानंतर , ग्लानिर्भवती भारत ह्या कादंबऱ्या लिहिल्या त्याचप्रमाणे देशी-विदेशी इतिहासावरही ग्रंथलेखन केले. अरुण साधू यांनी एक माणूस उडतो त्याची गोष्ट , कथा युगभानाची , बिनपावसाचा दिवस , बेचका आणि आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या इमारती , मंत्रजागर आणि मुक्ती हे कथासंग्रह लिहिले. त्याचप्रमाणे त्यांची ‘ अ सुटेबल बॉय ‘ वर शुभमंगल ‘ ही भाषांतरीत कादंबरी आहे. त्यांनी विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कार्यावर ‘ The Pioneer ‘ लिहिले असून ‘ पडघम ‘ नावाचे नाटकही लिहिले आहे. अरुण साधू यांनी अक्षांश-रेखांश, तिसरी क्रांती, सभापर्व, सहकारधुरीण असे ललित लेखनही केले आहे . त्याचप्रमाणे त्यांनी ‘ प्रारंभ, बसस्टॉप आणि इतर ३ एकांकिका ‘ लिहिल्या .

अरुण साधू यांनी ८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. अरुण साधू हे नावाप्रमाणेच साधे होते. लेखक असल्याचा बडेजाव त्यांनी कधी मिरवला नाही. ते केवळ पुस्तकांतच रमले नाहीत. अनेक पुरोगामी चळवळीत त्यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग होता.

अरुण साधू यांना अनेक पुरस्कार मिळाले त्यामध्ये २०१५ साली कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार , जानेवारी २०१७ मध्ये अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार ह्यांचा समावेश आहे.

पत्रकारिता आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे आणि जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास अत्यंत सोप्या शब्दांत मराठी वाचकांपर्यंत पोहोचविणारे ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांचे २५ सप्टेंबर २०१७ रोजी मुंबईमध्ये ७६ व्या वर्षी निधन झाले आणि त्यांच्या अंतिम इच्छेप्रमाणे त्यांचे देहदान करण्यात आले.

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 353 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..