मी आणि व्ही.पी. सिंग आम्ही दोघेही संभ्रमावस्थेत असण्याचा तो १९८८-८९ चा मंतरलेला काळ होता. पंतप्रधान बनण्याच्या कल्पनेने ते आणि कॉन्ट्रॅक्टर बनण्याच्या आशेने मी ,असे आम्ही दोघेही पछाडलेले होतो. निर्माता, दिग्दर्शक आणि नायक बनण्याच्या कल्पनेने महेश कोठारे ( डँम इट ) ‘झपाटलेला’ होता जवळपास तसेच.
तशातच अरुण गवळीला छोटा शकिलची पक्की टीप मिळावी तशी मला एका खबरीकडून खात्रीलायक बातमी कळली की ” पटणी कॉम्प्युटर्स ” ला ‘Annual Maintenance Contract’ साठी एका सुशिक्षित ( हे आहेच का परत ?) कॉन्ट्रॅक्टरची गरज आहे आणि त्यासाठी सिप्झ , अंधेरीस्थित त्यांच्या ऑफिसमध्ये नाडकर्णीसाहेबांना भेटावे लागेल.
मी दुसऱ्याच दिवशी सकाळी बुटांना क्रिम पॉलिश व चकाचक दाढी करुन आणि ठेवणीतले कपडे घालून ( जणूकाही मला ‘ बघायचाच ‘ कार्यक्रम असल्यागत ) पटणीच्या ऑफीसमध्ये दाखल झालो. नाडकर्णीसाहेबांकडून बोलावणे येण्याची वाट बघत Reception ला ( माशा मारत ) बसलो असतानाच समोरचा नक्षीदार दरवाजा ढकलून माझी बालमोहनची वर्गमैत्रिण लीना सराफ Lobby मधे आली. मला तिथे आरामात बसलेला बघून तिला तीव्र धक्काच बसला.
” तू इथे काय इंटरव्ह्यूसाठी आला आहेस का ? “… तिने अविश्वासाने विचारले.
पटणीला इतके वाईट दिवस आल्याचे आपल्याला कोणी सांगितलेही नसावे याची खंत तिच्या प्रश्नातून जाणवत होती. तिने ( भलामोठा ) आवंढा गिळल्याचे मला स्पष्ट दिसले. ( आता या प्रसंगाला ३०/३२ वर्षे झाली. पण अजूनही मी समोर आलो की ती नकळत शहारुन आवंढा गिळते.)
‘ छे छे ! काहीतरीच काय ! ‘….
मी लाजून अंग झटकून म्हणालो. ( जणू ‘बघण्याच्या’ कार्यक्रमाआधी मुलीच्या वडीलांनी मला “घ्यायची का थोडीथोडी ?” अशी विचारणा केली होती.)
” अग मला नाडकर्णीसाहेबांकडे थोडे काम आहे “…. मी तिला बसलेल्या धक्क्याची तीव्रता थोडी कमी केली.
” असं होय ” ….तिने सोडलेला सुस्कारा ‘ तुंगा इंटरनॅशनल ‘ पर्यंत ऐकू गेला असावा.
“मी बोलते नाडकर्णीसाहेबांशी”…. असं म्हणून गायब होत ती दुसऱ्या मिनिटाला ( तिसऱ्याच ) दरवाजातून परत आली आणि म्हणाली “तुला साहेबांनी बोलावले आहे, चल…”
अल्पभूधारक शेतकऱ्यांनी शरद जोशींच्या मागे जावे तसा मी गपगुमान तिच्या मागून गेलो. एका कॅबिनकडे अंगुलीनिर्देश करत ती म्हणाली “आत जा बिनधास्त !”…… मी धडधडत्या अंतःकरणाने दरवाजा ढकलला. समोरच्या शाखा प्रमुखासारख्या दिसणाऱ्या डौलदार खुर्चीवर नाडकर्णीसाहेब तथा रमेशचंद्र गंगाराम उपाख्य बापू नाडकर्णी सुहास्य मुद्रेने बसलेले होते. माझ्या तोंडाचा वासलेला “आ” बऱ्याच कष्टाने बंद झाला.
शायर मिदहतुल अख़्तर म्हणतो…
आँख मलते हुए देखा तो उजूबा निकले,
ख़्वाब में भी नही सोचा था कि तुम ऐसे हो ।
“या..या..या… सामंत ना ? कोठून आलात ?”…. बापू विचारतात.
या प्रश्नाला ‘ निर्मिती कन्स्ट्रक्शन मधून. Maintenance Contract साठी आलो आहे ‘… असे तद्दन व्यावसायिक उत्तर द्यायला माझा जन्म काही ( सुदैवाने ) दक्षिण मुंबईत झालेला नव्हता.
“शिवाजीपार्कहून”….. मी हमखास डाव जिंकणारा हुकुमाचा एक्का फेकतो.
” काय सांगताय काय ? अरे वा !
आपल्याला बोलणं सुरु करायला इतकी माहिती पुरेशी आहे ” …बापू आनंदाने उद्गारले.
( सहज आठवले म्हणून……. सी.आय.डी. सिनेमाच्या ‘Assistant Director’ पदाची मुलाखत द्यायला राज खोसला गुरुदत्तसमोर बसले होते. “तुला हिंदी सिनेमाबद्दल काय माहीत आहे ?” .. गुरुने पोरसवदा राजला विचारले. ‘कुंदनलाल सैगल’ .. राजने दोन शब्दात उत्तर दिले.
“उत्तम ! सुरुवात करायला इतकी माहिती पुरेशी आहे. उद्यापासून कामावर ये” ..गुरु पुटपुटला.)
“तुम्ही क्रिकेट खेळता की नाही ?” …बापूंचा आर्मर आला. बापरे ! हे म्हणजे दोन शॉट्सच्या दरम्यान दिलीपकुमारने एखाद्या स्पॉटबॉयला “अभिनयाची आवड आहे का रे तुला ?”…असे विचारण्यासारखेच होते.
“खेळलो नाही फारसा , पण क्रिकेट पाहिलं, पहातो खूप” ….स्पॉटबॉय वदला.
आणि मग आम्हा दोघांमधला औपचारिकपणा देवगडच्या पिकलेल्या हापूस आंब्यासारखा नकळत गळून पडला.
नुकताच संपलेला ( आणि माईक गॅटिंगने भारताच्या हातातुन हिसकावून अँलन बॉर्डरला सुपूर्त केलेला ) १९८७ चा वर्ल्डकप , आताच्या खेळाडूंमध्ये आलेली कमालीची व्यावसायिकता , क्रिकेटमध्ये शिरलेला पैसा आणि त्यापाठोपाठ आलेलं गलिच्छ राजकारण , वर्ल्डकपचा मुंबईत झालेला सामना , MCA ने बापूंवर टाकलेली त्या सामन्याची जबाबदारी आणि त्या सामन्यातून बापूंनी MCA चा ९०,००० रुपयांचा करुन दिलेला फायदा, या आणि इतर विषयांवर बापू परखडपणे बोलत असतात आणि मी कल्याणस्वामींनी समर्थ रामदासांच्या तोंडून दासबोध ऐकावा तसे ऐकत असतो.
इतक्यात ‘टीब्रेक’ होतो.
संदीप सामंत.
०७/०३/२०२०.
उत्तरार्ध (वाचावासा वाटल्यास)
Leave a Reply