नवीन लेखन...

अतर्क्य

राधिकाला या नवीन जागेत येऊन आता तीन  महिने झाले होते. राधिकाचा नवरा राजीव बँकेत नोकरीला होता. बँकेचे कर्ज थकवणाऱ्या एका कर्जदाराचे हे घर बँकेने ताब्यात घेऊन लिलाव केला होता त्यातून ते राजीवला मिळाले होते. पनवेल शहरात अगदी मोक्याच्या जागी  ते दुमजली घर होते. घराभोवती छान कंपाऊंड होते. सुरवातीलाच छोटासा व्हरांडा मग खालच्या मजल्यावर दर्शनी रूम आणि किचन, एक छोटीशी रूम, संडास, बाथरूम मागे जाण्यासाठी दरवाजा. हौल मधून वर जाण्यासाठी जिना वरती एक बेडरूम आणि छोटी टेरेस. घराच्या चारी बाजूला थोडी जागा होती.तिथे काही मोजकीच झाडे होती. जागेवर राधिका खुश होती. घरकाम करण्यासाठी रखमा नावाची बाई तिला मिळाली होती. राधिकाने उत्साहाने आपले  घर नीट सजवले होते. सर्व काही सुरळीत चालू होते अशातच एके दिवशी सकाळी राधिकाला एक वेगळाच प्रकार बघायला मिळाला.

एका सकाळी राधिकाला राखामाची घाबरलेल्या आवाजातली हाक ऐकू आली. राधिका बाहेर जाऊन पाहते तर रखमा घाबरून उभी होती. “काय झालं रखमा ? एवढी घाबरली का आहेस ? राधिकाने विचारले. त्यावर राधिकेने एका दिशेला बोट दाखवले. राधिका पहाटे तो काय  घराच्या आवारात चिखलात भरलेल्या पावलांच्या खुणा आढळल्या. कोणी तरी  चिखलाचे पाय घेऊन व्हरांड्यातून घराच्या आवारात चालले होते. ते पाहुन राधिका पण घाबरली. ते दिवस पावसाचे पण नव्हते मग एवढे चिखलाचे पाय घेऊन कोण चालल असेल. तिने राजीवला बोलावून तो प्रकार दाखवला. त्यावर राजीव म्हणाला. “राधिका कोणी तरी मुद्दाम  केलंय हे तू नको लक्ष देऊ. या जागेवर अनेकांचा डोळा होता. त्यांच्या पैकी असेल कोणाच तरी काम.” ते ऐकल्यावर राधिकाने रखमाच्या मदतीने सर्व साफ केले. त्यानंतर दोन दिवस गेले. एका सकाळी राधिकाला घराच्या  व्हरांड्यात लिंबू टाकलेले आढळले. लिंबाला पिना टोचून पिंजर लावली होती.  राधिका मनातून खूप घाबरली पण तिने ही गोष्ट राजीव पासून दडवुन ठेवली.

या घटनेनंतर बरोबर दोन दिवसांनी राजीवला बढती मिळाल्याची बातमी समजली पण त्याला  एक वर्षा साठी गुजरात राज्यातील बँकेच्या सुरत ब्रांच मधे काम करावे लागणार होते. राजीवचे आईवडील कोकणात राहत होते तर राधिकाचे आईवडील नागपूरला राहत होते. राधिकाचे वडील नामवंत डॉक्टर होते.  हे कोणी आपली कामे सोडून पनवेलला येऊ शकत नव्हते. त्यामुळे आता वर्षभर राधिकाला छोट्या  राहुलसह त्या घरात एकट्याने रहाणे भाग होते.

“राजीव मला वाटत  हे घरच आपल्याला लाभल नाहीये.”  अस म्हणुन राधिका रडायला लागली तेव्हा  राजीव तिची समजुत काढत म्हणाला “अग मला बढती मिळाली आहे आणि रडतेस काय अशी ?  एक वर्षाचीच तर गोष्ट आहे. रोज फोन करत जाऊ आपण. मी येत जाईनच  ना सुटी घेऊन. सुरत थोडंच एवढ लांब आहे. मला  वाटत तू  आपली कामवाली रखमाला विचारून बघ ती येईल तुझ्या सोबतीला.”

रखमाला सोबतीला बोलवायचा राजीवचा प्रस्ताव तिला आवडला. तिने रखमाला थोडे पैसे वाढवून देऊन आपल्या कडे राहायला यायला सांगितले. रखमा तशी एकटीच होती त्यामुळे ती आनंदाने त्यासाठी तयार झाली. राधिकाला तिची मदत होत होती आणि तिचा आधार पण होत होता. हळू हळू रखमा राधिकाचा विश्वास संपादन करीत होती……..

रात्रीची वेळ होती. राधिका आणि रहित घरात टी व्ही बघत होते. रखमा बाहेर भांडी घासत होती. अशातच अचानक रखमाची किंकाळी ऐकू आली. राधिका लगेच बाहेर गेली पहाटे तर काय  रखमा थर थर कापत उभी होती. “काय झालं रखमा ?” राधिकाने विचारले. त्यावर रखमा एका झाडाकडे  बोट दाखून सांगत होती “वैनीसाहेब तिथे एक काळी आकृती उभी आहे”. राधिकाने त्या दिशेला पाहिले पण तिला तिथे काय दिसले नाही, “काही नाही रखमा घाबरू नको. कोणी नाहीये तिथे.  भास झाला असेल तुला. पाहिजे तर भांडी घरातच घासत जा.” राधिका तिची समजूत काढीत म्हणाली.

त्यानंतर रखमाला ती काळी आकृती घरात पण दिसू लागली होती. राधिकाला घरातल्या वस्तूंची जागा बदलल्या जाताहेत असे जाणवत होते.  दोन तीन दिवसांनी आवारात लिंब पण पडत होती. रात्रीच्या वेळी काही आवाज येत होते. त्या घराला शेजार नव्हता त्यामुळे राधिका पण थोडी घाबरलेली होती.कोणी आपल्या वाईटावर नसेल ना तिला काही समजेना. रखमा त्या घरात जुन्या काळापासून काम करीत होती. त्यामुळे राधिकाने तिच्याकडून या घरा बद्दल माहिती काढण्यास सुरवात केली.

“रखमा तू बरेच दिवसापासून या घरात कामाला येत होतीस मग खर सांग तुला पूर्वी असे काही अनुभव तुला आले होते का ?” राधिकाने विचारले. त्यावर रखमा थोडी गप्प झाली. त्यानंतर राधिकाने खोदुन खोदुन विचारल्यावर रखमा म्हणाली. “वैनीसाहेब या घरात दुष्ट शक्तींचा वास आहे. हा अनुभव गेले अनेक दिवसापासून  या घरात येत होता. तुमच्या आधी रहाणारे पण यामुळे त्रासून गेले होते. मी तुम्हाला मुद्दामच नाही बोलले, नाहीतर सांगा एवढ्या मोक्यावर असणाऱ्या घराचा कोणी लिलाव होवू  दिला असता का ?”

“काय दुष्ट शक्तीचा वास आहे इथे ? राजीवने नीट चौकशी केलेली दिसत नाहीये. आता तर त्याचीच बदली झाली. तो आला की बोलल  पाहिजे त्याच्याशी” राधिका म्हणाली.

“घाबरू नका वैनीसाहेब सावकाश बोला साहेबांशी. तुमचा विश्वास असेल तर माझ्या ओळखीचा एक माणूस आहे. तो थोडी मंत्र विद्या जाणतो. त्याला बोलावू आपण काही तरी मार्ग काढील तो” रखमा म्हणाली.

“चालेल पण थोडी थांब. मी आधी राजीवशी बोलेन कारण  त्याचा विश्वास नाहीये असल्या  गोष्टींवर त्याला नाही आवडणार अस कोणाला बोलावलेला” राधिका म्हणाली.

त्याचं बोलण चालू असतानाच रोहित तिथे आला  त्याच्या हातात एक काळी बाहुली होती ती दाखवत म्हणाला   “मम्मी हे बघ माझ्या बेडवर काय होते ते”

ती काळी बाहुली बघुन राधिका आणि रखमा दोघी घाबरल्या. राधिकाने ती बाहुली रोहितच्या हातातून खेचुन घेतली त्या बाहुलीला पाहुन रखमा म्हणाली “वैनीसाहेब  हा चांगला संकेत नाहीये लेकराची काळजी घ्यायला पाहिजे. द्या ती बाहुली माझ्याकडे. मी बाहेर टाकून देते. तुम्ही देवाजवळ दिवा लावा” असे बोलून रखमाने ती बाहुली घेतली आणि ती बाहेर टाकायला गेली. राधिका देवाजवळ दिवा लाऊन रोहितला घेऊन झोपायला गेली. त्या रात्रीच रोहितला सडकून ताप भरला.या गावात राधिकाला कोणी डॉक्टर माहित नव्हते त्यामुळे  रखमाच्या ओळखीच्या डॉक्टर कडून तिने औषध आणले होते. मात्र चार दिवस होऊन गेले तरी रोहित बरा झाला नव्हता. गोळी घेतल्यावर तेवढ्यापुरता ताप उतरे पण परत थंडी वाजून ताप यायचा. राधिका अगदी त्रासून गेली.

रखमाच्या मताप्रमाणे त्या बाहुली मुळे रोहितला ताप आला असावा. या घरातील दुष्ट शक्तींनी आपली चुणूक दाखवायला सुरवात केली असावी. रखमाला ती काळी आकृती परत एकदा दिसली होती. रखमाने तिला शंकराच्या मंदिरातला अंगारा पण आणून दिला होता.तिच्या मते यामुळे रोहितला काही बाहेरची बाधा झाली असेल तर ती दूर होणार होती. मंत्र विद्या जाणणारा आपला माणूस रोहितला बर करील अस पण ती राधिकाला सांगत होती. पण राधिका त्यासाठी अजून तयार नव्हती. “राजीव आल्यावर बघू” अस उत्तर देवून तिने तो विषय टाळला होता.  राधिका मांत्रिकाला बोलवायला तयार होत नाही  याचा रखमाला थोडा राग आला होता.

आता रोहितला आजारी पडुन आठ दिवस होत आले होते. आज काही तरी कारण सांगून रखमा तिच्या घरी गेली होती आणि दोन दिवस यायला जमणार नाही असा तिने निरोप दिला होता. त्यामुळे दोन रात्री राधिकाला एकट्याने काढायला लागणार होत्या. दोन दिवसात राजीव पण येणार होता.

 आता रात्रीचे नउ वाजत आले होते.  त्यातच लाईट गेले होते. रखमा नसल्याने राधिकाला एकटीला कंटाळवाणे झाले होते. रखमाला दिसणारी ती काळी आकृती आपणाला नाही ना दिसणार या विचाराने ती घाबरली होती. रोहित आता पण थोडासा गुंगीत दिसत  होता. ती रोहितच्या उशाशी  बसली होती. एवढ्यात तिला डोअरबेल वाजली. आता या वेळी कोण आले असावे. मनातून ती थोडी घाबरली. तिने हातात मेणबत्ती घेऊन दरवाजा उघडला. बाहेर तिचे वडील उभे होते. वडिलांना बघून तिला आश्चर्य वाटल. “अरे बाबा, एकदम सरप्राईज दिलत.आणि एकटेच आलात आई नाही आली ?”

“हो मी एकटाच आलोय तो पण डॉक्टर म्हणून. आधी पिल्लाला तपासायच  मग गप्पा.” बाबा म्हणाले.

“बाबा तुम्हाला कस कळल रोहितला बर नाहीये ते.  तुम्ही काळजी कराल म्हणुन मुद्दाम कळवलं नव्हत.  आज अगदी देवासारखे धावून आलात तुम्ही. रोहितचा ताप उतरत नाहीये. मला खूप काळजी वाटते. त्यातून गेले दोन दिवस मी एकटीच आहे.  आज  मला तुमचीच खूप आठवण येत होती.” राधिका म्हणाली.

“अग आजोबा आहे मी त्याचा आणि तू माझी आठवण काढत होतीस न मग मी येणारच. तुझी हाक मला बरोबर ऐकू आली.” बाबा हसत म्हणाले. रोहिगुंगीत तच्या रूम मधे येताच बाबांनी  रोहितला तपासायला सुरवात केली. राधिकाला आश्चर्य वाटल कारण ते त्यांची डॉक्टरी बैग घेऊन कधी येत नसत.रोहित गुंगीत होता. त्याच्या अंगात ताप होताच. त्यांनी रोहितला देण्यात येणारी औषधे बघितली आणि राधिकाला विचारले अग कोण डॉक्टर आहे हा ?  अशा औषधांनी  रोहित थोडाच बरा होणार ? आणि ह्या पुड्या कसल्या ?

“ बाबा या शहरात आम्ही नवीन त्यामुळे आमची घरकामाची बाई रखमा हिन सांगितलेल्या डॉक्टरच औषध आणल मी . त्या पुड्या इथल्या शंकराच्या मंदिरातील अंगार्रयाच्या आहेत. रखामान आणल्या त्या तिची श्रद्धा आहे.  या घरात गेले काही दिवस विचित्र अनुभव येताहेत. वाईट शक्ती आहेत या घरात याचा अनुभव येतोय. राजीवची बदली, रोहितचा ताप अजून काय काय होईल माहित नाही”. राधिकाने थोडक्यात बाबांना आता पर्यंत आलेले सर्व अनुभव सांगितले.

त्यावर बाबा जोरात हसले आणि म्हणाले “राधिका मला नवल वाटत अग एका डॉक्टरची मुलगी तू आणि चार संकट आली काही गोष्टी मनाविरुद्ध घडल्या तर अंधश्रद्धेच्या आहारी जावस. राधिका दुष्ट शक्तींच अस्तित्व मी नाकारीत नाही पण बरेचदा कमकुवत मनाची माणस याची शिकार होतात. मला एक सांग ती काळी आकृती रखमालाच का दिसते ? तुला का नाही दिसत ? लिंब सापडण, बाहुली सापडण हे  घाबरवण्यासाठी करण कोणालाही शक्य आहे आणि माझं तर म्हणण आहे की तुझ्या रखमाचच काम असाव ते. मला तिचाच संशय येतोय. राजीवच म्हणण  बरोबर आहे ह्या जागेवर अनेकांचा डोळा असू शकतो. त्यातून तुम्हाला स्वस्तात मिळाली यामुळे जेलसी पण वाटू शकते. तेव्हा भावनेच्या आहारी जाण्यापेक्षा डोळसपणे शोध घे. तुझ्या नवऱ्याची बदली मुलाच आजारपण ह्या नॉर्मल घटना आहेत त्याचा संबध उगाच वाईट शक्तीशी जोडू नको सावध हो”

“पण बाबा रखमा तर खूप जुनी आहे या घरात. खूप मदत केलीय तिन मला. राजीवची बदली झाल्यानंतर मला सोबत करतेय ती. तीच म्हणाली की वाईट शक्ती आहेत या घरात अगदी पूर्वी पासून. या पूर्वी अनेकांना अनुभव आलेत” राधिका म्हणाली.

“म्हणजे परत ऐकीव गोष्टी. कसा विश्वास ठेवायचा.  मी म्हणतो ती रखमाच आहे ह्याच्या मागे. तुझा विश्वास संपादन करून तुझ्या मनात भीतीच बीज पेरणारी. नशीब त्या मांत्रिका कडे तू गेली नाहीस.”

“पण बाबा तुम्हाला रखमाचा का संशय येतोय ? यात तीचा काय स्वार्थ हे सर्व करण्यात ?”

“ तिचा कोणता स्वार्थ ते शोधायचं काम तुमच आहे. मी सांगतो ते ऐक. रखमान तुला जो देवाचा अंगारा दिलाय ना तो अंगारा नाहीये ती अफूची पावडर आहे. त्यामुळे रोहित गुंगीत आहे अजून. तिचा डॉक्टर पण तसाच असावा. आता मी औषध दिलय रोहितला उद्या सकाळ पर्यंत ठण ठणीत होतो की नाही बघ.”

“ काय सांगता अफूची पावडर ? आणि माझ्या बाळाला नीट औषध दिल गेल नव्हत ? खरच बाबा चुकले मी. थोडी भावनेच्या आहारी गेले. रखमा सांगत होती त्यावर विश्वास ठेवत गेले. तुम्ही माझे डोळे उघडलेत. राजीव आला की आम्ही नक्की शोधु सगळा प्रकार. रखमा विरुद्ध पुरावाच आहे या तिने आणलेल्या अंगार्याच्या पुड्यातून.” राधीकाचे डोळे भरून आले होते.

“जाऊंदे उशिरा का होईना तू शहाणी झालीस. आता डोळस पणे सर्व शोध घे. तुला उत्तर नक्की सापडेल. बेटा, मी अस नाही म्हणत की माणसाच्या बुद्धीच्या पलीकडे काही नसेल पण आपण दोन चार संकट आली की गांगरून जातो आणि मग तर्क निष्ठ विचार न करता अंधश्रद्धेच्या आहारी जातो.  मंत्र तंत्र करणाऱ्यांच त्यामुळेच फावत.” बाबा म्हणाले.

“बर बाबा मी तुम्हाला गडबडीत विचारयच विसरले की तुमच जेवण नसेल ना झालं ? केवढा लांबचा प्रवास करून आला तुम्ही. मी पटकन वाढते तुम्हाला. बर, आईला कळवळत का पोचल्याच ?  ती तिकडे काळजी करत असेल. नाही तर मी फोन करते.आता” राधिका म्हणाली

“हे बघ मी कळवलय तिला. तू नको गडबड करू. आणि मला खरच भूक नाहीये. माझ खाण झालाय तसं. तू एक काम कर. तू पण दमली आहेस तेव्हा तुझ्या रूम मधे जाऊन झोप आरामात.  मी आलोय ना आता. मी थांबतो  रोहित जवळ .” बाबा म्हणाले.

“बाबा, मी छान कोफी बनवते. बर वाटेल. मी घेऊन येते.” राधिका म्हणाली.

“बर तुझी इच्छा”  बाबा म्हणाले.

बाबांना कोफी देऊन राधिका झोपायला आली. रखामावर आपण उगाचच अति  विश्वास ठेवला याच तिला वाईट वाटत होत. पण बाबांनी येऊन मोलाच काम केल होत. आता तिच्या मनातील भीती नाहीशी झाली होती. बाबांच्या औषधान रोहितचा ताप नक्की उतरेल याची तिला खात्री होती,याच समाधानात ती झोपी गेली. गेल्या किती तरी दिवसांनी तिला शांत झोप लागली होती.

सकाळी तिला जाग आली ती रोहितच्या हाक मारण्यामुळे. तिने घड्याळ पाहिलं आठ वाजत आले होते. अरे अशी कशी झोप लागली आपल्याला अस मनाशी म्हणत ती रोहितच्या रूम मधे गेली, रोहित उठून बसला होता. तिने त्याच्या अंगाला हात लाऊन पाहिला ताप गेला होता.

“मम्मी तू कुठे गेली होतीस ? माझ्याजवळ नव्हती झोपलीस काल ?” रोहीत म्हणाला .

“ अरे पण आजोबा होते ना तुझ्या जवळ. आता कुठे गेले ते ?” त्याला जवळ घेत राधिका म्हणाली.

“म्हणजे आजोबा आलेत ? माझ्या जवळ झोपले ?  मला कस नाही कळल “ रोहितने विचारले.

“अरे हो, तू गुंगीत होतस.काल रात्रीच आले, त्यांनीच औषध दिल तुला. आणि बघ चमत्कार  तू त्यांच्याच औषधांनी बरा झालायस’. राधिका म्हणाली. तेवढ्यात तीच लक्ष टीपोय वरच्या कोफिच्या कपा कडे गेल.  कॉफीने भरलेला  कप तसाच होता. म्हणजे काल  बाबा कोफी प्यालेच नाही ? आणि आता सकाळी सकाळी कुठे गेले ते पण न सांगता ?

 त्याच वेळी तिचा मोबाईल वाजला. तिच्या भावाचा नागपूरहून फोन आला होता. फोन वरच बोलण ऐकताच तिच्या हातातील मोबाईल खाली गळून पडला कारण बातमीच तशी होती. राधीकाचे बाबा काल  रात्रीच एका  दुर्घटनेत मरण पावले होते………..

(कथेतील पात्रे प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत)

— विलास गोरे

Avatar
About विलास गोरे 18 Articles
मी आय डी बी आय बँकेत एन पी ए विभागात (कर्ज वसुली) व्यवस्थापक पदावर काम करतो, मला ३५ वर्षाहून अधिक काळ बँकेच्या विविध विभागात काम करण्याचा अनुभव आहे, मी कॉमर्स पदवीधर असून कायद्याचा अभ्यास पण पूर्ण केला आहे (B, COM , L L B). मी शेअर मार्केट मध्ये नियमित गुंतवणूक करतो व शेअर मार्केट व इतर investment चा मला २५ वर्षाहून अधिक अनुभव आहे. मला हिंदी चित्रपट संगीत, मराठी साहित्य, किल्ल्यांवर भटकंती तसेच इतर पर्यटन याची आवड आहे.मी काही कथा , लेख,व्यक्तिचित्रण लिहू इच्छितो.
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..