नवीन लेखन...

अष्टपैलू : खंडू रांगणेकर

( पूर्वप्रसिद्धी : “शब्दसंवाद” दिवाळी अंक – २०२३ ) 

क्रिकेटच्या मैदानावर साधारणपणे फलंदाजी, गोलंदाजी, यष्टिरक्षण / क्षेत्ररक्षण यांपैकी कोणत्याही दोन गोष्टी उत्तम प्रकारे करणाऱ्या खेळाडूला अष्टपैलू म्हटले जाते. पण २७ जून, १९१७ ला मुंबईत जन्मलेल्या ‘खंडेराव मोरेश्वर रांगणेकर’ या भारदस्त नावाच्या मराठमोळ्या गड्याने केवळ क्रिकेटच्या मैदानावरच नव्हे तर बॅडमिंटन, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, प्रशासन, समाजकारण अश्या विविध क्षेत्रातही चमक दाखवून खऱ्या अर्थाने अष्टपैलू जीवन व्यतीत केले.

खंडेरावांच्या जन्मानंतरची कहाणी पण रंजक आहे. त्यांच्या आईला आधी पाच मुले झाली होती पण सगळी लहानपणीच मृत्यू पावली. अश्या वेळी आईने जेजूरीच्या खंडोबाला नवस बोलला आणि तिला सहावा मुलगा झाला. वयाच्या चौथ्या वर्ष्यापर्यंत निरोगी असलेला हा मुलगा अचानक गॅस्ट्रोएन्टेरिटिस आजाराने गंभीर झाला. त्याकाळी उपलब्ध असलेल्या मर्यादित औषधोपचारांनी कोणताच उपयोग होत नाही हे पाहून ती माऊली पुन्हा खंडोबाला शरण गेली. ७०० फूट उंच मंदिराच्या ९५० विशाल दगडी पायऱ्या चढून गेल्यावर तो छोटा मुलगा बेशुद्ध पडला आणि आईचा धीर खचला. पण १० मिनिटात चमत्कार झाला आणि त्या मुलाला शुद्ध आली. एवढेच नाही तर थोड्याच वेळात त्या गडाच्या पायऱ्या धावत वेगात उतरून तो पटापट खाली पण गेला. हाच वेग त्या मुलाने पुढे आयुष्यात पकडला आणि “खंडू रांगणेकर” या नावाने भारताचे क्रीडाविश्व गाजवले.

रांगणेकर यांचे शालेय शिक्षण मुंबईच्या बेहरामजी जीजीभॉय आणि सेंट झेवियर्स शाळांतून झाले आणि एल्फिन्स्टन महाविद्यालयातून त्यांनी चांगल्या गुणांनी बी.ए. ची पदवी प्राप्त केली. याच काळात ते क्रिकेटमध्ये लक्षणीय अष्टपैलू खेळाडू म्हणून चमकू लागले. मधल्या फळीतील धडाकेबाज डावखुरा फलंदाज, उजव्या हाताचा चांगला मध्यमगती गोलंदाज आणि कव्हर क्षेत्रातील दोन्ही हातांचा वापर समान कौशल्याने करणारा चपळ क्षेत्ररक्षक म्हणून त्यांचा नावलौकीक सगळीकडे पसरू लागला.

रांगणेकरांनी १९३९-४०च्या ‘बॉम्बे पेंटॅग्युलर’ (पंचरंगी स्पर्धा) मध्ये पदार्पण केले, पण बलाढ्य ‘हिंदूं’च्या संघाकडून त्यांना पहिल्या ३ सामन्यात फलंदाजीची संधीच मिळाली नाही. त्याच मोसमात त्यांनी   महाराष्ट्राकडून ‘पश्चिम भारता’विरुद्ध पुणे येथे रणजी करंडकात पदार्पण केले. पदार्पणातच शतक ठोकताना सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन ९८ मिनिटांत १०२ धावांची खेळी केली. तर चौथ्या डावात गोलंदाजी करताना त्यांनी २८ धावांत २ बळी घेतले. रणजी करंडक स्पर्धेतील त्या एकमेव सामन्यानंतर रांगणेकर पुढील मोसमात मुंबईला स्थलांतरित झाले आणि त्यांनी मुंबई येथे आपल्या जुन्या संघाविरुद्ध २०२ धावांची खेळी केली, त्यामुळे महाराष्ट्राच्या ६७५ धावांचा पाठलाग करताना मुंबईने ६५० धावा केल्या.

१९४४-४५ मध्ये ‘मुस्लिमां’विरुद्ध खेळताना त्यांनी गुल मोहम्मदचा कव्हरपॉईंटवर घेतलेला कॅच थक्क करणारा होता ज्याची चर्चा देशभर झाली. त्या काळात क्वचितच एखाद्या भारतीय क्षेत्ररक्षकाला कॅचच्या माध्यमातून ओळख मिळात असे जी त्यांना मिळाली. हा चेंडू आजही औरंगाबादच्या रांगणेकर कुटुंबियांच्या घरात जपून ठेवला आहे. पुढे त्यांनी मुंबई येथे भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंडविरुद्ध ‘उर्वरित भारत’ संघासाठी आपले कर्तृत्व सिद्ध केले. फलंदाजीत १०६ धावा करतानाच, मध्यमगती गोलंदाजीने १३ धावात २ बळी घेतले आणि या कामगिरीमुळेच १९४७-४८ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्यांची निवड झाली.

मात्र सर्वांच्याच खूप अपेक्षा असणाऱ्या रांगणेकर यांच्यासाठी हा दौरा एका दु:स्वप्नासारखा ठरला.   आतापर्यंत जबरदस्त फॉर्मात असलेला हा फलंदाज जगातील काही सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांविरुद्ध उसळत्या खेळपट्टीवर अपयशी ठरला. त्यांनी दौऱ्यात नऊ सामन्यांत १०.८१च्या सरासरीने अर्धशतकाशिवाय १७३ धावा केल्या. खराब फॉर्म असूनही त्याची गाबा (ब्रिस्बेन) येथील पहिल्या कसोटीसाठी निवड झाली. त्यात त्यांना फक्त १ आणि शून्य धावा करता आल्या. सिडनीवरील दुसऱ्या कसोटीला मुकल्यानंतर त्यांना मेलबर्नच्या कसोटीसाठी परत बोलावण्यात आले, जिथे त्यांनी ६ आणि १८ धावाच केल्या. ऍडलेड येथे झालेल्या चौथ्या कसोटीतही त्यांच्या नावावर ८ आणि ० धावाच लागल्या. ऑस्ट्रेलियाने ही मालिका ३-० अशी जिंकली आणि रांगणेकरांची कसोटी कारकीर्द अवघ्या ३ कसोटीत संपुष्टात आली. मात्र त्यांच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाने अनेक ऑस्ट्रेलियन प्रभावित झाले. असे सांगितले जाते की एकदा क्रिकेटचा बादशहा डोनाल्ड ब्रॅडमन यांनी विजय मर्चंट यांच्याजवळ बोलताना म्हटले की – ‘मी मैदानावर आल्यावर खंडू फिल्डिंगला कुठे उभा आहे हे प्रथम पाहतो.’

यानंतर घरगुती मोसमात त्यांना परत फॉर्म सापडला. १९४८-४९ च्या दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिजविरुद्ध ते ‘क्रिकेट क्लब ऑफ इंडिया’कडून खेळले. परंतु ३१ धावा आणि ११२ धावांत ५ बळी बाद करूनही त्यांची कसोटीसाठी निवड झाली नाही. त्यानंतर अनेक वर्षे ते विविध संघांकडून देशांतर्गत क्रिकेट खेळत आणि गाजवत राहिले पण पुन्हा त्यांचा राष्ट्रीय संघासाठी विचार झाला नाही. १९५८-५९ मध्ये इंदूर येथे विदर्भाविरुद्ध त्यांनी शेवटचा रणजी सामना खेळला. त्यांनी पहिल्या डावात ११३ धावा केल्या आणि दुसऱ्या डावात नाबाद रहात मध्य प्रदेशला विजय मिळवून दिला. अश्या प्रकारे पहिल्या आणि शेवटच्या रणजी करंडक सामन्यात शतके झळकावणाऱ्या दुर्मिळ क्रिकेटपटूंच्या यादीत त्यांचा समावेश झाला. सर्व प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये रांगणेकरनी ८५ सामन्यांत ४१.८३ च्या सरासरीने १५ शतकांसह ४,६०२ धावा केल्या. वयाच्या ४२ व्या वर्षापर्यंत खेळलेल्या रणजी करंडकात त्यांनी ४२ सामन्यांमध्ये ४९ च्या सरासरीने ८ शतकांसह २,५४८ धावा केल्या. त्यांचा काळ पाहता हे आकडे अतिशय प्रभावी होते.

क्रिकेट मध्ये नाव गाजवत असतानाच ते अतिशय उच्च दर्जाचे बॅडमिंटनही खेळले. १९३९ ते १९४५ दरम्यान ते भारतातील सर्वोत्कृष्ट बॅडमिंटनपटूंपैकी एक होते. त्यांनी १९४५ मध्ये भारतीय राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये दुहेरीचे विजेतेपद जिंकले. तसेच १९४० मध्ये ‘वेस्टर्न इंडिया’ पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरी दोन्ही स्पर्धा जिंकल्या, तर १९४२ आणि १९४४ मध्ये पुरुष दुहेरी स्पर्धा जिंकली. कधी एकेरी स्पर्धा जिंकता आली नसली तरी अनेकदा त्यांनी दुहेरीचे विजेतेपद पटकावले.

दोन्ही खेळातल्या निवृत्तीनंतर रांगणेकर यांनी अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यांनी १९६२-६३ ते १९६९-७० या काळात ‘बीसीसीआय’चे उपाध्यक्षपद आणि १९६२-६३ मध्ये ‘बॉम्बे क्रिकेट असोसिएशन’चे अध्यक्षपद भूषवले. त्यांनी मुंबईत ‘इंडियन कस्टम्स’साठी काही वर्षे नोकरी केली. तसेच कापड दुकानाचा व्यवसायही काही काळ करून बघितला. पुढे ठाण्यात स्थायिक झाल्यानंतर १९६० च्या दशकात त्यांनी तेथील समाजकारण आणि राजकारणात सहभाग घेतला. यामुळे त्यांना काही वर्षे ठाणे  नगरपालिकेच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला. ते ठाण्याचे नगराध्यक्ष झाल्यावर आचार्य अत्रे यांनी त्यांचा जंगी सत्कार घडवून आणला, ज्यात अत्रे ह्या साहित्यसम्राटाने रांगणेकर या क्रिकेटच्या सम्राटाला मानाचा मुजरा दिला. पुढील काळात ठाण्यानेही रांगणेकर यांच्या स्मृति अनेक वास्तूंना त्यांचे नाव देत मोठ्या आदराने आणि प्रेमाने जोपासल्या आहेत. ज्यात ठाणे (पश्चिम) येथील एक बॅडमिंटन हॉल, सुधाकर प्रधान मार्गावरील सभागृह आणि दगडी शाळेच्या बाजूला असलेला चौक, यांचा समावेश आहे.

अश्या ह्या अतिशय कर्तृत्ववान, बहुआयामी जीवन जगलेल्या खंडू रांगणेकर यांचे ११ ऑक्टोबर १९८४ रोजी घशाच्या कर्करोगाने ठाण्यात निधन झाले. सध्याच्या युगात स्मृतीच्या पटलाआड गेलेल्या या महान अष्टपैलू मराठी व्यक्तिमत्वाला मानाचा मुजरा.

– गुरुप्रसाद दि पणदूरकर (माहीम, मुंबई)               

Avatar
About गुरुप्रसाद दिनकर पणदूरकर 36 Articles
माजी बँकर, मुक्त लेखक. विविध संकेतस्थळे, दिवाळी अंकांतून क्रिकेटविषयक, बँकिंगसंबंधी व व्यक्तिचित्रणात्मक लेखन. विशिष्ट संकल्पनांवर आधारित शब्दकोडी रचण्याचा छंद. या शब्दकोड्यांना अनेक दिवाळी अंक, हिंदुस्थान पोस्ट साप्ताहिक यांमधून प्रसिद्धी. मराठी साहित्य, खेळ (क्रिकेट), भारतीय इतिहास यांमध्ये विशेष रुची.
Contact: Twitter

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..