नवीन लेखन...

अर्थ प्रेमाचा

“तू तुझी तब्येत आधी सांभाळ” !
“तू माझ्या आधी जायचं नाही” ! (निजधामाला)
“तू माझ्या आयुष्यातून गेलीस तर माझं कसं होईल अगं ?”
या सूचना आणि प्रश्न माझा एक साठी पार केलेला मित्र, आपल्या पत्नीला देत आणि विचारत असतो. पहिले छूट यामागे आपल्या जोडीदाराबद्दलची काळजीच जाणवते, परंतु याकडे थोडं बारकाईने पाहिल्यावर, यामागची जाणवणारी एकटेपणाची भीती दिसायला लागते. यामध्ये, आपली जोडीदार किंवा आपली बायको हयात नसल्यावर आपलं कसं होईल? हा मनाला हादरवून टाकणारा विचार असतो, आणि एकटेपणाच्या जाणिवेतून उमटणारी, आणि आज जोडीदार हयात असतानाही हवालदिल करून सोडणारी भीती असते.
अर्थात आपल्यातील अनेक पुरुषांना ही भीती जाणवत असते. आपल्या कुणा मित्रावर, नात्यातल्या कुणावर त्याची पत्नी निवर्तल्यानंतर ओढवलेली एकुटवाणी परिस्थिती ऐकलेली किंवा पाहिलेली असते, आणि त्यामुळेही ही भीती छळत असते. मी आमच्या पिढीतील, म्हणजे पासष्टीच्या जवळ पोहोचलेल्या अनेक पुरुषांना जवळून पाहिलय, जाणलय. आयुष्यभर अगदी प्रत्येक गोष्टीत आपल्या जोडीदारावर हे अवलंबून राहिलेले असतात. अगदी लहान सहान, क्षुल्लक गोष्टींपासून ते संसारातील अगदी मोठ्या निर्णयांपर्यंत, असच सुरू असतं. अर्थात एकमेकांचा सल्ला घेणं, चर्चा करणं आणि निर्णयाला येणं यात गैर काहीच नाही, परंतु आपल्या जोडीदाराअभावी हवालदिल होणं, यामध्ये प्रेमाच्या भावनेपेक्षा जबाबदारी टाळण्याचा भाग, मला तरी अधिक दिसतो.

आयुष्यभर संसारातील कोणतीच जबाबदारी कणखरपणे स्वतःच्या खांद्यावर घेतलेली नसते, आपण सतत मागे राहून, बायकोची ढाल पुढे करत राहायची सवय लागलेली असते, आणि गंमत म्हणजे तिनेही या त्याच्या स्वभावाला मोडता न घालता, त्याच्या या सवयीला बढावा दिलेला असतो. कदाचित संसार रथाच्या ड्रायव्हिंग सीटवर आपण असल्याचा अभिमान आणि आनंद यामागे असू शकतो. या सगळ्याचा पश्र्चाताप तेव्हा होतो, जेव्हा पत्नी अंथरुणाला खिळते किंवा परस्वाधिन होते. त्याने अगदी साधा चहा सुद्धा आयुष्यात कधीही केलेला नसतो. असे पुरुष आहेत जे, बायको घरी नसेल किंवा अगदी काही दिवसांसाठी कुठे बाहेरगावी गेली असेल, तर तल्लफ आल्यावर चहा हॉटेलमध्ये जाऊन घेतात किंवा अगदी घेतच नाहीत. इथपर्यंतही ठीक आहे, पण यापुढे जाऊन दिवसातून सतत बायकोला फोन, व्हॉट्सॲप वर,
“तू कधी येणार आहेस परत”?
“मला कंटाळा येतो एकट्याला”
“बाहेरची पोळीभाजी खाऊन वैताग आलाय”. किंवा
“तू ये ग लवकर घरी”
अशी भूणभूण करत रहातात. आणि घरात एकटं असेल तर मी एकवेळ समजू शकतो, पण मुलगा सून नातवंडं घरात असूनही हे सुरू असतं.
हे कसलं प्रेम ? हा निव्वळ स्वार्थ. बायको कशाला पाहिजे, तर आपल्याला हवा तसाच चहा, जेवण करून द्यायला आणि आपल्या आजूबाजूला वावरत राहायला, जेणेकरून आपल्याला सुरक्षित वाटत राहील.

चहा कारणं, वरण भाताचा कुकर लावणं या इतक्या मूलभूत गोष्टी आहेत की, प्रत्येक पुरुषाला त्या यायलाच हव्यात. फक्त आपल्या एकटेपणाचा, असुरक्षिततेचा उगीचच बाऊ करत राहायचं आणि तिचा विचार मात्र जराही करायचा नाही. तिला जरा काही बरं वाटेना झालं, सर्दी पडसं झालं, कणकण भरली की हे हवालदिल. तिच्या काळजीपोटी कमीच, पण ती झोपली की स्वतःला हातपाय हलवावे लागणार म्हणून. मग आधीच थोडी कामाची जबाबदारी घेण्याची सवय लावून घ्यावी की, तेव्हां मात्र तंगड्या पसरून बसायचं आणि ती आजारी पडल्यावर म्हणायचं,
“तू काळजी घेत नाहीस स्वतःची”
“तुला काही झालं की मला टेन्शन येतं ग”
खरंच प्रेम असेल तर असं रडगाणं गात कशाला बसायचं ? बारीक सारीक आजार हे येतंच असतात. स्वतःला अगदी एखादी शिंक आली तरी घर डोक्यावर घेऊन बायकोचा जीव नकोसा करायचा, आणि ती खरच आजारी झाली की मात्र फक्त हवालदिल व्हायचं, हा कुठला न्याय. यापेक्षा तिची छान काळजी घ्यावी, सकाळी उठल्यावर तिला मस्त चहा करून द्यावा, एखादी सोपी पाककृती करून तिला खाऊ घालण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे आपल्यासाठी ती जे अगदी रोज करत असते, ते तिच्यासाठी करण्याची चालून आलेली संधी का दवडावी ? कारण एकदा ती ठीक झाली की आपण काही करणार नसतोच. आणि तसंही एकमेकांसाठी काही करायला कुणी आजारी कशाला पडायला हवं? करण्यासारखं खूप काही असतं, पण कोणाला ? तर खरंच इच्छा आणि खरं प्रेम आहे त्याला.
“मला ना चहा करायला जमतच नाही” किंवा
“मी करतो चहा पण पाणचट होतो, हीच्यासारखा होतंच नाही”
“हिने केलेला चहा म्हणजे तुला सांगतो, स्वर्गसुख”
काय अर्थ आहे या बोलण्याला ? मोजून आधन ठेवायचं, मोजून साखर आणि पावडर घालायची, की झाला चहा. पण हे काहीही न करता अवलंबून रहात, कारणं देत राहायचं बस्स.

आमच्या ओळखीत एक गृहस्थ आहेत, कधी संध्याकाळचा चहा झाल्यावर सहज त्यांना फोन लावला, आणि बोलता बोलता म्हटलं,
“झाला का चहा ?” तर म्हणणार,
“अहो नाही, आज ही घरी नाहीय”.
म्हटलं, “मग”?
तर म्हणणार,
“अहो मी नाही जात गॅसकडे, मला नाही जमत ते सगळं. एखाद दिवस ही नसली तर नाही घेत चहा, नाहीतर जातो टपरीवर आणि घेऊन येतो.”
काय बोलायचं सांगा यावर ?
आमच्या नात्यातले एक गृहस्थ, संपूर्ण आयुष्यात चहा कॉफी वगैरे सोडाच, पण शारीरिक काहीही मदत केली नाही. स्वतःचे प्रातर्विधी आंघोळ सोडल्यास. अगदी आंघोळीला जाताना त्यांचा टॉवेल न्हाणीघरात ठेवणं, चहा खाणं हातात आणून देणं इतकंच नव्हे तर पाकीट, रुमाल त्यांचे कपडे बाहेर काढून ठेवणं सगळं त्यांची बायको करत असे. याचा अर्थ ते हुकूमशहा होते किंवा त्यांचा जाच होता असं अजिबात नाही. छान संसार होता, पण तरीही आम्हाला नेहमी वाटायचं, बायको यांच्या आधी गेली, तर यांचं कसं होईल, कारण आपल्या घरात कोणती वस्तू किंवा अगदी आपली वस्तूही कुठे ठेवलीय किंवा कुठे ठेवतात हे सुद्धा त्यांना माहीत नसायचं. त्यांच्या पत्नीने आपल्या नवऱ्याचं मुलांचच नाही, तर आल्या गेल्या पै पाहुण्याचं, आप्त सगे सोयऱ्यांचं साऱ्यांचं आगत स्वागत अगदी प्रेमाने मनापासून केलं, पण नशीब कसं असतं पहा, त्यांना झोपेत अगदी शांत मरण आलं आणि जिने सगळ्यांसाठी आयुष्यभर केलं, ती मात्र बराच काळ आंथरुणावर पडून दिवस काढत गेली.

जोडीदार गेल्यावर राहिलेल्या व्यक्तीला एकटेपण येतं. काहीजण म्हणतात, बायको गेली तर पुरुष एकटा होतो तशी नवरा गेल्यावर स्त्री होत नाही. अर्थात या बोलण्यात काहीच तथ्य नसतं. स्त्री आपलं दुःख उगाळत न रहाता, इतर कामात आपल्याला गुंतवून घेते. आम्ही आयुष्यभर बायकोला पिडण्या व्यतिरिक्त कसलीच आवड, छंद जोपासलेले नसतात. आपल्या एकटेपणाचा मी किती बाऊ करायचा, आणि आयुष्यभर बायकोवर अवलंबून रहाण्याच्या आजवरच्या सवयीला मुलाच्या अंगावर टाकण्याच्या प्रयत्नात राहायचं का ? की या जगात आलेल्या प्रत्येकाला जायचच आहे. जोडीदार हयात असताना एकमेकांसोबत घालवलेल्या सुंदर क्षणांना(असतील तर)आठवत, तिने आयुष्यभर मनात जपलेल्या, तिला भवणाऱ्या किंवा स्वतःला आवडणाऱ्या एखाद्या प्रकल्पात, गोष्टीत रमून जायचं, त्याचा आनंद घ्यायचा आणि आपल्या मुलांनाही आपल्या अस्तित्वाचा कंटाळा न आणता आनंद द्यायचा, जमल्यास घरात काही मदतीचा वाटा उचलायला. पण अनेक पुरुष हे न करता, भरलेल्या घरात वाकडं तोंड ठेवून, किरकिरत, नकारात्मक आठवणी उगाळत आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना उगीचच आपली कर्मकाहाणी कथन करत आयुष्य जगत रहातात, आणि आपणच इतरांच्या मनात आपल्याबद्दलचा दुरावा निर्माण करत रहातात. आता जोडीदारणीने इतकी वर्ष हे सगळं निमूटपणे सहन केलेलं असतं, पण मुलांना ते शक्य नसतं. मग आपण त्यांनाही, आपल्याकडे लक्ष देत नाहीत म्हणून दोष देत रहातो.

अखेर हे सगळं कशामुळे होतं ? तर आयुष्यभर जपलेलं परावलंबी जीवन, कटकट्या स्वभाव आणि कसलीही जबाबदारी अंगावर न घेण्याची सवय.
आमच्या ओळखीतले एक ज्येष्ठ गृहस्थ, बायको निवर्तली होती. यांची प्रकृती उत्तम. पहाटे पाच वाजता नेमाने चालायला जायचे. कधी भेटलेच की सांगायचे आपला नेम, मग पुढे सांगायचे,
“पहाटे निघण्यापूर्वी मला चहा लागतो, पण तो काही सूनबाई करून देत नाही.”

आता आदल्या दिवशी उशिरा ऑफिसमधून येऊन पुढे घरचं सगळं करून रात्री उशीरा झोपलेल्या सुनेने, पाच वाजता उठून यांना चहा करून द्यावा, ही अपेक्षा कितपत योग्य आहे ?. आणि लागतो ना चहा, मग करा की तुम्ही नाहीतर बाहेर घ्या कुठेही टपरीवर. इतका साधा सोपा विचार, पण प्रत्येक गोष्टीकडे नकारात्मक दृष्टीने पहात राहायचं किंवा तक्रारीचा सूर लावायचा आणि फक्त आपली बाजू मांडत राहायचं बस्स.

माझा एक मित्र एकटाच रहातो. त्याच्याकडे एक गृहस्थ paying guest म्हणून राहायचे. वय सत्तरीच्या पुढे पण तब्येत एकदम मस्त. आयुष्यभर त्यांच्या आत्मकेंद्रित आणि तुसड्या स्वभावाने बायको कंटाळून एका लेकिसोबत राहायची. दुसरी लेक बाहेरगावी. यांच्या स्वभावामुळे लेकी बायको कुणीही यांना जवळ करत नसल्यामुळे हे तिसरीकडे paying guest म्हणून राहायचे. का आणायची ही परिस्थिती स्वतःवर. मध्यंतरी खूप आजारी झाले तेव्हा कर्तव्य भावनेने मुलींनी त्यांचं केलं, पण कायम स्वरुपी घरी न्यायला कुणीही तयार होईना. इतकं होऊनही स्वभाव बदलायला हा माणूस तयार नाही. गाठीला पैसा असेल तर वृद्धाश्रम, नाहीतर रस्त्यावर पडण्याची पाळी.

म्हणून म्हणतो, वयोमानानुसार आपल्या जगण्यात, स्वभावात आणि आपल्या जोडीदाराला जाणून घेण्यात तारतम्य ठेवायला हवं. आयुष्यभर स्वतःचाच विचार करत न रहाता, आनंदाने, एकमेकांना सांभाळून घेत, आनंद शेअर करत जगायला हवं. अन्यथा……भयाण एकटेपण वाट्याला येतं.

प्रासादिक म्हणे
प्रसाद कुळकर्णी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..