नवीन लेखन...

‘एप्रिल’चे एक्के (‘एप्रिल’ महिन्यात जन्मलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू)

‘एप्रिल’मध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या उत्साही, कार्यमग्न, सहृदय व प्रामाणिक असल्याचे मानले जाते. एप्रिल महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकणे नक्कीच रंजक ठरेल.

(  ** अजून कारकीर्द चालू )

( * फलंदाज नाबाद )

विनू मंकड (१२ एप्रिल १९१७) – मुळवंतराय उर्फ विनू मंकड हे अस्सल अष्टपैलू खेळाडू होते. ते कुठच्याही स्थानावर फलंदाजी करत तसेच उत्तम डावखुरे फिरकी गोलंदाज होते. ४४ कसोटीत त्यांनी ५ शतकांसह २१०९ धावा केल्या आणि १६२ बळी मिळवले. कसोटीत १ ते ११ अश्या सर्व स्थानांवर फलंदाजी करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. भारताच्या पहिल्या कसोटी विजयात त्यांचा सिंहाचा वाटा होता. कसोटीमध्ये १००० धावा व १०० बळी घेणारे तसेच, एकाच कसोटीत शतक करून डावात ५ बळी मिळवणारे ते पहिले भारतीय होते.

बापू नाडकर्णी (४ एप्रिल १९३३) – डावखुरे फिरकी गोलंदाज आणि उपयुक्त फलंदाज असलेल्या रमेशचंद्र उर्फ बापूनी ४१ कसोटीत ८८ बळी घेत १४१४ धावा केल्या. अतिशय कंजूष गोलंदाज अशी ख्याती असलेल्या बापूंच्या नावावर १९६४ साली इंग्लंडविरुद्ध सलग २१ निर्धाव षटके टाकण्याचा अबाधित विश्वविक्रम आहे. क्रिकेट व्यतिरिक्त बापू उत्तम राज्यस्तरीय बॅडमिंटनपटू होते.

अजित वाडेकर (१ एप्रिल १९४१) – आकर्षक डावखुरे फलंदाज असलेल्या वाडेकरनी ३७ कसोटीत २११३ धावा केल्या. मुंबई क्रिकेटच्या सुवर्णकाळाचे ते प्रमुख शिलेदार होते. पण एक सुंदर फलंदाज व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ह्यापेक्षा ते लक्षात रहातात ते कल्पक, यशस्वी कर्णधार म्हणून. वाडेकर यांच्या संघाने १९७१ मध्ये वेस्ट इंडिज व इंग्लंड यांना त्यांच्याच देशात प्रथमच मात देत इतिहास घडवला. पण नंतर एकाच मालिकेतील दारुण आपयशामुळे त्यांना कर्णधारपदाहून अपमानास्पदरित्या दूर केल्यावर त्यांनी तडकाफडकी निवृत्ती घेतली. पुढे ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ मधून ते उच्च पदावरून निवृत्त झाले.

श्रीनिवास वेंकटराघवन (२१ एप्रिल १९४५) – भारताच्या प्रसिद्ध फिरकी चौकडीचा भाग असलेल्या वेंकट यांनी ५७ कसोटीत १५६ बळी मिळवले. १९७५ आणि १९७९ च्या वन-डे विश्वचषकांमध्ये त्यांनी भारताचे नेतृत्व केले. निवृत्तीनंतर त्यांनी ७९ कसोटी आणि ७८ वन-डे सामन्यांत पंच म्हणून ठसा उमटवला.

दिलीप वेंगसरकर (६ एप्रिल १९५६) – कर्नल सी.के.नायडू यांच्याप्रमाणे उत्तुंग षटकार ठोकणाऱ्या दिलीप यांना विशीतच ‘कर्नल’ ही पदवी मिळाली. १९८० च्या दशकात भारतीय संघाचा आधारस्तंभ झालेल्या दिलीपनी ११६ कसोटी आणि १२९ एकदिवसीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले शिवाय १० कसोटी आणि १८ एकदिवसीय सामन्यांत भारताचे नेतृत्वही केले. १९८७ ते १९८९ दरम्यान २१ महीने ते फलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी होते. १९७९, १९८२ आणि १९८६ अश्या सलग तीन इंग्लंड दौऱ्यात लॉर्डस मैदानावर तीन शतके झळकावण्याचा पराक्रम त्यांच्या नावावर आहे.

सचिन तेंडुलकर ( २४ एप्रिल १९७३) – भारतीय क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर, खेलरत्न, विक्रमवीर, भारतरत्न अश्या सर्वांच्या लाडक्या ‘सचिन तेंडुलकर’ याने गेल्या वर्षी आयुष्याचे अर्धशतक पूर्ण केले. एका साहित्यिक कवीच्या या मुलाने २५ वर्षे जगभरातल्या मैदानांवर आपल्या बॅटने लालित्यपूर्ण कविता सादर करत आबालवृद्धांना मंत्रमुग्द्ध केले. या महान खेळाडूने फलंदाजीतले अनेक विक्रम स्थापित केलेत जे कदाचित कधीही मोडले जाणार नाहीत. इतके यश, पैसा, प्रसिद्धी मिळूनही कायम सुसंस्कृत, विनम्र व संयमी असणे हे त्याचे गुण युवा व बाल पिढीसाठी विशेष अनुकरणीय आहेत.

रोहित शर्मा** (३० एप्रिल १९८७) – ‘हिट-मॅन’ नावाने लोकप्रिय असणारा भारताचा सध्याचा तिन्ही क्रिकेट-प्रकारातील कर्णधार. अतिशय प्रेक्षणीय व आक्रमक फलंदाज. वन-डेच्या एका डावामध्ये सर्वाधिक २६४ धावा, २०१९ च्या विषचषकात ५ शतके, टी-२० मध्ये ५ शतके, कसोटी पदार्पणाच्या पहिल्या दोन सामन्यांत शतके, असे काही खास विक्रम मुंबईकर रोहितच्या नावावर आहेत.

 

डेव्हिड गॉवर (१ एप्रिल १९५७) – इंग्लंडचा हा सोनेरी केसांचा, देखणा, डौलदार चालीचा खेळाडू मैदानावरचा राजपुत्रच वाटे. शैलिदार डावखुऱ्या गॉवरची गणना इतिहासातील सर्वात आकर्षक फलंदाजांमध्ये केली जाते. ११७ कसोटीत ८२३१ धावा व ११४ वन-डेत ३१७० धावा केलेल्या गॉवरने अनेक सामन्यांत इंग्लंडचे नेतृत्वही केले.

माल्कम मार्शल (१८ एप्रिल १९५८) – वेस्ट इंडिजचा वादळी जलदगती गोलंदाज मार्शलच्या वेगाने फलंदाजांना पळता भुई थोडी होत असे. ८१ कसोटीत ३७६ बळी व १३६ वन-डेत १५७ बळी घेणाऱ्या मार्शलच्या गोलंदाजीवर अनेक फलंदाज जखमी, रक्तबंबाळ झाले आहेत.

अॅलेक स्टुअर्ट (८ एप्रिल १९६३) – इंग्लंडच्या या यष्टीरक्षक-फलंदाजाने १३३ कसोटींमध्ये ८४६३ धावा करताना यष्टीमागे २७७ बळी टिपले आहेत. तसेच १७० वन-डे सामन्यांत ४६७७ धावा करतानाच यष्टीमागे १७४ बळी घेतले आहेत. वन-डे मध्ये एका डावात यष्टीमागे ६ बळी घेण्याचा तसेच, कप्तान असताना यष्टीरक्षण करून फलंदाजीसाठी सलामीला २८ वेळा जाण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.

अॅंडी फ्लॉवर (२८ एप्रिल १९६८) – झिंबाब्वेच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडू असे याचे वर्णन करता येईल. जबरदस्त डावरा फलंदाज असणाऱ्या अॅंडीने ६३ कसोटींमध्ये ५१ च्या सरासरीने ४७९४ धावा केल्या शिवाय यष्टीमागे १६० बळी टिपले. तसेच २१३ वन-डे मध्ये ६७८६ धावा आणि यष्टीमागे १७३ बळी घेतले. त्याशिवाय दोन्ही प्रकारांत अनेक सामन्यांत कुशल नेतृत्व केले. सलग ७ कसोटी डावात अर्धशतके, तसेच यष्टीरक्षक म्हणून सर्वोच्च २३२* धावा, असे विक्रम त्याच्या नावावर आहेत.

मुथय्या मुरलीधरन (१७ एप्रिल १९७२) – श्रीलंकेचा जादुई फिरकी गोलंदाज मुरलीच्या नावावर कसोटी आणि वन-डे मध्ये सर्वाधिक ८०० व ५३४ बळींचा विक्रम आहे. त्याशिवाय – एकाच मैदानावर सर्वाधिक बळी, डावात ५ बळी सर्वाधिक वेळा, सामन्यात १० बळी सर्वाधिक वेळा, सलग ४ कसोटीत सामन्यात १० बळी, कसोटी कारकीर्दीत सर्वाधिक चेंडू, मालिकावीराचा पुरस्कार सर्वाधिक वेळा, कसोटी खेळणाऱ्या सर्व संघांविरुद्ध सामन्यात १० बळी, यांसारखे असंख्य विक्रम मुरलीच्या नावावर आहेत.

स्टीफन फ्लेमिंग (१ एप्रिल १९७३) – न्यूझीलंडचा हा नेत्रसुखद डावखुरा फलंदाज त्यांचा सर्वात यशस्वी कप्तान आहे. १११ कसोटीत ७१७२ धावा करणाऱ्या फ्लेमिंगने १७१ झेल घेताना ८० सामन्यात नेतृत्व केले. त्याचप्रमाणे २८० वन-डे खेळताना त्यातील तब्बल २१८ सामन्यात तो कप्तान होता. वन-डे मध्ये त्याने ८०३७ धावा करताना १३३ झेल टिपले.

मायकल क्लार्क (२ एप्रिल १९८१) – ऑस्ट्रेलियाचा हा अतिशय शैलिदार फलंदाज, उपयुक्त डावरा फिरकी गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि यशस्वी कप्तान होता. त्याने ११५ कसोटीत ८६४३ धावा करताना १३४ झेल व ३१ बळी घेतलेत. त्याशिवाय २४५ वन-डे सामन्यात ७९८१ धावांच्या बरोबरीने ५७ बळी व १०६ झेल घेतले आहेत. कसोटी पदार्पणात शतक, ५ व्या क्रमांकावरच्या सर्वाधिक ३२९* धावा, या विक्रमांबरोबरच तो २००७ व २०१५ च्या विश्वचषकविजेत्या संघांचा अनुक्रमे खेळाडू व कर्णधार म्हणून मानकरी होता.

ईतर काही प्रमुख खेळाडू à 

[अ] परदेशी खेळाडू :-   

सिडने बार्न्स (१९ एप्रिल १८७३) – इंग्लंड : मध्यमगती गोलंदाज – सार्वकालिक महान गोलंदाजांपैकी एक; २७ कसोटीत १६.४३ च्या सरासरीने १८९ बळी. एका मालिकेत सर्वाधिक ४९ बळी घेण्याचा तसेच सर्वात जलद १५० बळी घेण्याचा जागतिक विक्रम अजूनही अबाधित.

जॉन गोडार्ड (२१ एप्रिल १९१९) – वेस्ट इंडिज : अष्टपैलू – २७ कसोटी. इंग्लंडमध्ये मालिका जिंकणारा पहिला विंडीज कप्तान.

आल्फ व्हॅलेंटाईन (२८ एप्रिल १९३०) – वेस्ट इंडिज : फिरकी गोलंदाज – ३६ कसोटी (१३९ बळी). कसोटी पदार्पणात डावात ८ बळी घेण्याचा विक्रम.

कॉलीन ब्लांड (५ एप्रिल १९३८) – दक्षिण आफ्रिका : फलंदाज – २१ कसोटी. क्रिकेट इतिहासात जॉन्टी ऱ्होडस्च्या बरोबरीने अविश्वसनीय, महान क्षेत्ररक्षक म्हणून मानला जातो.

माईक ब्रेअर्ली (२८ एप्रिल १९४२) – इंग्लंड : फलंदाज, यष्टीरक्षक, कर्णधार. ३९ कसोटी, २५ वन-डे.  इतिहासातील सर्वात कुशल, चाणाक्ष कप्तानांपैकी एक. उच्चविद्याविभूषित. भारताचा जावई (वैज्ञानिक विक्रम साराभाई यांची पुतणी ‘माना’ ही यांची पत्नी).

डेनिस अमिस (७ एप्रिल १९४३) – इंग्लंड : फलंदाज – ५० कसोटी, १८ वन-डे. एकदिवसीय क्रिकेटमधील पहिला शतकवीर.

अॅलन नॉट (९ एप्रिल १९४६) – इंग्लंड : यष्टीरक्षक, फलंदाज – ९५ कसोटी (यष्टीमागे २६९ बळी, ४३८९ धावा), २० वन-डे.

मुदस्सर नझर (६ एप्रिल १९५६) – पाकिस्तान : फलंदाज, मध्यमगती गोलंदाज – ७६ कसोटी (४११४ धावा, ६६ बळी); १२२ वन-डे (२६५३ धावा, १११ बळी).

सलीम मलिक (१६ एप्रिल १९६३) – पाकिस्तान : फलंदाज, कप्तान – १०३ कसोटी (५७६८ धावा), २८३ वन-डे (७१७० धावा). कसोटी पदार्पणात शतक. सामनानिश्चिती प्रकरणात दोषी ठरल्याने बंदी घातला गेलेला पहिला क्रिकेटपटू.

ईयान हिली (३० एप्रिल १९६४) – ऑस्ट्रेलिया : यष्टीरक्षक – ११९ कसोटी (यष्टीमागे ३९५ बळी, ४३५६ धावा); १६८ वन-डे (यष्टीमागे २३३ बळी, १७६४ धावा).

क्रेग मॅक्डरमॉट (१४ एप्रिल १९६५) – ऑस्ट्रेलिया : जलदगती गोलंदाज – ७१ कसोटी (२९१ बळी), १३८ वन-डे (२०३ बळी).

पॉल राफाएल (१९ एप्रिल १९६६) – ऑस्ट्रेलिया : [अ] खेळाडू नात्याने > जलदगती गोलंदाज – ३५ कसोटी (१०४ बळी), ९२ वन-डे (१०६ बळी); [ब] पंच नात्याने** > १०८ कसोटी, १५९ वन-डे, ५० टी-२०.

कुमारा धरमसेना (२४ एप्रिल १९७१) – श्रीलंका : [अ] खेळाडू नात्याने > फिरकी गोलंदाज – ३१ कसोटी (६९ बळी), १४१ वन-डे (१३८ बळी); [ब] पंच नात्याने** > ११४ कसोटी, २०३ वन-डे, ६९ टी-२०.

जेसन गिलेस्पी (१९ एप्रिल १९७५) – ऑस्ट्रेलिया : जलदगती गोलंदाज – ७१ कसोटी (२५९ बळी), ९७ वन-डे (१४२ बळी). शेवटच्या कसोटीत द्विशतक ठोकले.

मधुसुदन (मॉन्टी) पनेसर (२५ एप्रिल १९८२) – इंग्लंड : (भारतीय शीख वंशाचा) डावखुरा फिरकी गोलंदाज – ५० कसोटी (१६७ बळी), २६ वन-डे (२४ बळी).

इयान बेल (११ एप्रिल १९८२) – इंग्लंड : फलंदाज – ११८ कसोटी (७७२७ धावा, २२ शतके), १६१ वन-डे (५४१६ धावा, ४ शतके).

सिकंदर रझा** (२४ एप्रिल १९८६) – झिंबाब्वे : (मूळ पाकिस्तानी) फलंदाज, फिरकी गोलंदाज – १८ कसोटी, १५१ वन-डे, १०५ टी-२०.

दीमुथ करुणारत्ने (२१ एप्रिल १९८८) – श्रीलंका : डावखुरा सलामी फलंदाज, कप्तान – १०० कसोटी, ५० वन-डे.

टॉम लॅथम** (२ एप्रिल १९९२) – न्यूझीलंड : फलंदाज,यष्टीरक्षक – ८८ कसोटी, १५७ वन-डे, २६ टी-२०.

मोहम्मद आमीर** (१३ एप्रिल १९९२) – पाकिस्तान : डावखुरा जलदगती गोलंदाज – ३६ कसोटी, ६१ वन-डे, ६२ टी-२०. सामनानिश्चिती प्रकरणात दोषी आढळल्याने ७ वर्षांची बंदी व नंतर पुनरागमन.

 

[ब] भारतीय खेळाडू :-  

नवूमल जेवूमल (१७ एप्रिल १९०४) : सलामी फलंदाज – ३ कसोटी. भारताच्या पहिल्यावहिल्या  कसोटीतील सलामीचे फलंदाज. कराचीचा जन्म असल्याने फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये वास्तव्य आणि तेथील राष्ट्रीय संघाला प्रशिक्षण. मात्र मृत्यूसमयी भारतात परत व मुंबईत अंतिम श्वास.

सी. एस. नायडू (१८ एप्रिल १९१४) : लेग-ब्रेक फिरकी गोलंदाज – ११ कसोटी.

अजित पै (२८ एप्रिल  १९४५) : मुंबईकर मध्यमगती गोलंदाज – १ कसोटी.

मनोज प्रभाकर (१५ एप्रिल १९६३) : दिल्लीचा मध्यमगती गोलंदाज, फलंदाज – ३९ कसोटी, १३० वन-डे. अनेकदा भारतासाठी फलंदाजी व गोलंदाजीची सुरुवात. आधी कपिलदेववर सामनानिश्चितीचा आरोप केल्याने वादग्रस्त, पण निवृत्तीनंतर त्याचेच मॅच-फिक्सिंग प्रकरणात नाव आले.

जतिन परांजपे (१७ एप्रिल १९७२) : डावखुरा मुंबईकर फलंदाज, वासू परांजपे यांचा मुलगा – ४ वन-डे.

नीलेश कुळकर्णी (३ एप्रिल १९७३) : डोंबिवलीचा डावखुरा फिरकी गोलंदाज – ३ कसोटी, १० वन-डे. कसोटी पदार्पणाच्या पहिल्याच चेंडूवर बळी.

मुरली विजय (१ एप्रिल १९८४) : तामिळनाडूचा सलामी फलंदाज – ६१ कसोटी (३९८२ धावा), १७ वन-डे.

के. एल. राहुल** (१८ एप्रिल १९९२) : कर्नाटकचा फलंदाज, यष्टीरक्षक – काही सामन्यांत भारताचे नेतृत्व. ५८ कसोटी, ८५ वन-डे, ७२ टी-२०. सलग ७ कसोटी डावात अर्धशतके करणारा आणि पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात शतक करणारा पहिला भारतीय खेळाडू.

मित्रहो, एप्रिलमध्ये जन्मलेल्या या प्रमुख आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडले असेल. आपल्या काही प्रतिक्रिया, सूचना असतील तर जरूर कळवा तसेच हा लेख आपल्या क्रिकेटप्रेमी मित्रपरिवारासोबत सामायिक करायला विसरू नका.

धन्यवाद !

– गुरुप्रसाद दि पणदूरकर (मुंबई)

** (पूर्वप्रकाशित लेखाची संपादित आवृत्ती)

Avatar
About गुरुप्रसाद दिनकर पणदूरकर 11 Articles
माजी बँकर, मुक्त लेखक. विविध संकेतस्थळे, दिवाळी अंकांतून क्रिकेटविषयक, बँकिंगसंबंधी व व्यक्तिचित्रणात्मक लेखन. विशिष्ट संकल्पनांवर आधारित शब्दकोडी रचण्याचा छंद. या शब्दकोड्यांना अनेक दिवाळी अंक, हिंदुस्थान पोस्ट साप्ताहिक यांमधून प्रसिद्धी. मराठी साहित्य, खेळ (क्रिकेट), भारतीय इतिहास यांमध्ये विशेष रुची.
Contact: Twitter

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..