कोकणातील भाजपचा ८० च्या दशकातील एकमेव चेहरा आप्पा गोगटे

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे देवगड विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा विधानसभेत नेतृत्व करणारे आप्पा गोगटे यांनी उभ्या हयातीमध्ये जनतेप्रती वडीलकीचे नाते जपले.

त्यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९२५ रोजी झाला. आप्पा गोगटे सदरा, धोतर अशा साध्या वेशातील आमदार मंत्रालयात एखाद्या ठिकाणी जात असे तेव्हा नवागतास ते आमदार आहेत, याचा भासही कधी झाला नाही. पराकोटीची साधी राहणी, संयमी पण ठाम वक्तृत्व, वडीलकीचे नातं जपणारी व्यक्ति अशी अनेक वैशिष्ट्यं त्यांच्याबाबतीत सांगता येतील. त्यांची राजकीय वैशिष्ट्येही आहेत. स्वच्छ चारित्र्याच्या आप्पांकडे गेलेला कार्यकर्ता किंवा सर्वसामान्य माणूस समाधानाने परतला नाही, असे कधीच झाले नाही. ‘काम होणार नाही’ हा शब्द त्यांना माहितच नव्हता. आलेली लहानातली लहान तक्रारीची दखलही ते घेतल्याशिवाय राहत नाहीत. अगदी आमदारकीनंतर अलिकडच्या काळातही ते विविधकार्यक्रमांच्या माध्यमातून सक्रिय होते.

कृषी उत्पन्नावर केंद्र शासनाचा आयकर नाही. मात्र, राज्यशासनाने कृषी उत्पन्नावर मोठा कर बसवला होता. ३६ हजारांवर उत्पन्न असणार्‍यांना ५० टक्के कर आकारला होता. सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हय़ातील आंबा बागायतदारांवर यामुळे मोठेच आर्थिक संकट कोसळले होते. तशा नोटिसाही आल्या.. मात्र, अन्य प्रकारच्या कृषी उत्पादकांना अशा नोटिसा काढल्या नव्हत्या. आप्पासाहेब गोगटे यांनी हा प्रश्न विधानसभेत वेळोवेळी मांडला. अन्य आमदारांना याबाबतची कल्पना त्यांनी दिली. अखेर १९८६ साली अर्थ संकल्प मांडताना तत्कालीन मंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी देवगडचे आमदार आप्पासाहेब गोगटे यांच्या पाठपुराव्यानंतर हा कर रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. आप्पासाहेबांनी आमदारकीच्या सुरूवातीस तमाम बागायतदारांना मिळवून दिलेला हा भरीव फायदा होय.

देवगड प्रादेशिक नळपाणी योजनेची पाणीपट्टी शहरी दराने घेतली जात होती. आजकाल झपाट्याने विस्तार होणारे देवगड तेव्हा एवढे काही विकसित झाले नव्हते. ही बाब हेरून आप्पासाहेबांनी पाणीपट्टी ग्रामीणच्या दरानुसार करून घेतली. ग्रामीण योजना असताना शहरी प्रमाणे दर आकारणी करणे योग्य नाही, भागात लहानशी नगरपरिषदही नाही. देवगड जामसंडेसह ११ गावांना पाणीपुरवठा करणारी ही योजना संपूर्णपणे ग्रामीणच आहे. ही बाब आप्पासाहेबांनी तत्कालीन पाणीपुरवठामंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे मांडली. यानंतर निर्णय झाला. पण तरीही स्थानिक पातळीवर अंमलबजावणी होत नव्हती. यासाठी आप्पासाहेबांनी अखेरचे शस्त्र उपसून उपोषणाचा इशारा दिला आणि काही दिवसांत हा प्रश्नच मार्गी लागला.

आप्पासाहेबांनी विजयदुर्ग नळपाणी योजनेचे मनावर घेतले. पियाळी नदीवर महाळुंगे येथे अगर योग्य जागी बंधारा बांधावा व नदी किनारी विहीर काढून त्यावरून नळयोजना कार्यान्वित करावी, अशी ही कल्पना होती. १८ कोटींवर त्याकाळी खर्चाचा अंदाज असणार्‍या या योजनेचे काम तातडीने सुरू झाले. अनेक अडीअडचणींवर मात करून ही योजना पूर्णत्वासही गेली. आजकाल या दोन्ही नळयोजनावरून निर्माण होणारे ‘बिलांचे प्रसंग’ दुर्दैवी आहेत, असेच आप्पासाहेबांच्या प्रयत्नांकडे पाहून कुणालाही म्हणावेसे वाटेल. याप्रमाणेच पाळेकरवाडी गावातील पाणीसमस्या सोडवण्यासाठी आप्पासाहेबांनी तेथेही एक नळयोजना करवून घेतली.

कणकवली तालुक्यातील वायंगणी, कुरंगवणे अशा अनेक गावांतील पाणीप्रश्नांवर तोडगा काढून आप्पासाहेबांनी मतदारसंघ टँकरमुक्त होण्यासाठी आपल्या कार्यकालात अपार मेहनत घेतली. शेतकर्‍यांची शेती-बागायती वाचवण्यासाठी आप्पासाहेबांनी अनेक बंधारे मंजूर करून घेतले. जुन्या किंवा आतापयर्ंत प्रचलित असणार्‍या देवगड मतदारसंघातील किनारपट्टी भागात गावोगावी आप्पांच्या कार्याची साक्ष देत हे बंधारे उभे आहेत. यातील अनेकांची दुरवस्था झाली असेलही.. त्यामागे काही कारणे असतीलही.. पण, त्यामुळे आप्पांचे याबाबतचे लाभलेले योगदान दुर्लक्षित करता येत नाही.रोजगार हमी योजनेंतर्गतची सर्वाधिक कामे आप्पासाहेबांनी देवगड तालुक्यात करवून घेतली. यासाठी प्रसंगी त्यांनी पदरमोडही केली. पण, चार लोकांच्या रोजगारासाठी आणि त्यातून शेकडो नागरिकांच्या भल्यासाठी ठरणारी अनेक विकास कामे त्यांनी या योजनेतून केली.

गाव तेथे एसटी हे शासनाचे ब्रीद वाक्य आप्पांनी आपल्या मतदारसंघात विशेषत देवगड तालुक्यात यशस्वी केले. आप्पांच्याच कारकिर्दीत गावोगावची रस्त्यांची कामे पार पडली. पोंभुर्ले, मुटाट, खारेपाटण, चिंचवली, बेर्ले, शेर्पे, शिडवणे, खुडीपाट, सौंदळे, वाघोटण, गढीताम्हाणे, फणसगांव, धारंबा, हिंदळे, फणसे, पडवणो अशा अनेक गावांत कच्चे किंवा पक्के रस्ते निर्माण करण्यात किंवा त्यांची नव्याने दुरूस्ती करण्यात आप्पासाहेबांचे मोलाचे योगदान आहे. श्रावण, वायंगणी, बांदिवडे, पाणलोस, रामगड, गोठणे, तोंडवळी, तळाशील आदि मालवण तालुक्यातील भागातही आप्पांनी रस्ते विकास घडविला.

आप्पा गोगटे यांचे १६ जुन २०१३ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.प्रशांत लाड

(हा लेख प्रकाशित करताना श्री आप्पा गोगटे यांचा एकही फोटो इंटरनेटवर सापडला नाही. किती हे दुर्दैव… कित्येक सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक, कलाकार, आणि इतरही क्षेत्रातील व्यक्तींचे एकही छायाचित्र इंटरनेटवर नाही. )

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 2285 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…