नवीन लेखन...

अंड्याची मसालेदार भुर्जी

गणेशोत्सव-नवरात्रोत्सवातले कायकर्ते असोत, उशिरा कामावरून घरी निघालेले नोकरदार असोत किंवा जिवाची मुंबई करायला बाहेर पडलेले उत्साही तरुण असोत; कितीही रात्र झाली तरी आपली भूक भागवण्यासाठी अंडाभुर्जीची गाडी असणार याची त्यांना खात्री असायची. गरीब असो वा श्रीमंत, सारेच एकदिलाने अंडाभुर्जीच्या गाडीवर हक्काने ताव मारताना दिसायचे.

-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–

पावभाजीच्या गाड्यांच्या जोडीने मुंबईच्या नाक्यानाक्यांवर उभ्या असलेल्या अंडा भुर्जीच्या गाड्या म्हणजे एकेकाळी मुंबईची शान होती. भूक नसली, तरी या गाडीच्या शेजारून जाताना येणाच्या वासानेच पोटात कावळ्यांची काव-काव सुरू व्हायची आणि इच्छा नसतानाही पावलं अंडा भुर्जीच्या गाडीकडे वळायची, मग ‘एक अंडा भुर्जी’ अशी गुस्ती ऑर्डर दिली की, एखादा कोडवर्ड मिळाल्याप्रमाणे गाडीवाल्याचे हात एका लयीत कामाला लागायचे सगळ्यात आधी शेगडीवर चढवलेल्या भल्यामोठ्या तव्यावर दोन चमचे तेल टाकलं जायचं. मग तेलावर कांदा-टोमॅटो टाकून ते चांगलं परतलं जायचं. नंतर गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि मीठ, हे सर्व मिश्रण चांगलं एकजीव झालं की, एकेक अंडे उचलायचं आणि तव्याच्या कडेवरच टॅकटॅक करत फोडून आतला द्राव मिश्रणावर ओतायचा. तवा गरमच असल्यामुळे क्षणात अंड्याचा द्राव फुलून यायचा की लगेच लोखंडी कालथ्याने अंड्यासकट सगळं मिश्रण खालीवर करून पुन्हा एकजीव करायचं. मग कालथा त्या मिश्रणावर सतत आपटत राहायचा की हळूहळू एकजीव झालेल्या मिश्रणाचे बारीकबारीक तुकडे होत जातात आणि थोड्याच वेळात भुर्जी तयार. मग ती भुर्जी एका डिशमध्ये काढायची. तिच्यावर मस्त बारीक केलेली कोथिंबीर भुरभुरवायची आणि सर्व्ह करायची. सोबत त्याच भुर्जीच्या तेलावर खरपूस गरम केलेले दोन पाव. बस्स! मग आणखी काही सोबत नसलं तरी चालेल. किंबहुना नकोच! 

गणेशोत्सव नवरात्रोत्सवातले कायकर्ते असोत, उशिरा कामावरून घरी निघालेले नोकरदार असोत किंवा जिवाची मुंबई करायला बाहेर पडलेले उत्साही तरुण असोत, कितीही रात्र झाली तरी आपली भूक भागवण्यासाठी अंडाभुर्जीची गाडी असणार याची त्यांना खात्री असायची. एकट्यादुकट्याने खाण्यापेक्षा ग्रूपने जाऊन या गाड्यांवर खाण्यात मजा असायची. मुख्य म्हणजे तेव्हा गरीब असो वा श्रीमंत, सारेच एकदिलाने अंडाभुर्जीच्या गाडीवर हक्काने ताव मारताना दिसायचे. आजच्यासारखी मॅक्डोनल्ड-पिझ्झाहट विरुद्ध पावभाजी-अंजाभुर्जी-वडापावच्या गाड्या अशी आर्थिक-सांस्कृतिक विभागणी तेव्हा झालेली नव्हती. अर्थात हा सांस्कृतिक-आर्थिक भेद मिटवण्यासाठी कारणीभूत ठरायची, ती या गाड्यांवरची पदार्थाची चव.

या गाड्यांवरची स्टाईल बघून तशीच्या तशी भुर्जी घरी करण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी तशी टेस्ट कधीच यायची नाही. त्यामुळे घरी केलेली भुर्जी ही कायमच ‘अंड्याची कोशिंबीर’च व्हायची. मग ‘भुर्जी’साठी गाडी गाठण्याशिवाय दुसरा पर्याय नसायचा.

काळाच्या ओघात आता रस्त्यावरच्या गाडीवर खाणं दर्जाहीन ठरू लागलंय. परिणामी पावभाजीच्या थोड्याफार गाड्या टिकून असल्या, तरी अंडाभुर्जीच्या गाड्यांची संख्या कमी झालीय. मात्र आजही अंडाभुर्जीची खरी चव चाखायची असेल, तर गाडीवर जाण्याशिवाय पर्याय नाही. गिरगाव, दादर, सांताक्रूझ, अंधेरी अशा ठिकाणी नाक्यांवर असलेल्या अंडाभुर्जी गाड्यांनीही आपली चव आणि आब आजही कायम राखलेला आहे. याच गाड्यांमध्ये आता बोरीवली पश्चिमेला शिंपोली रोडवर गोखले शाळेच्या समोर असलेल्या ‘राजू भूर्जीवाला’ या अंडाभुर्जीच्या टपरीची भर पडली आहे. अगदी छोट्या टपरीत पुढ्यातल्या शेगडीवर मोठा तवा घेऊन राजूभाईंचा हात चालत असतो आणि ऑर्डरप्रमाणे अंडाभुर्जी, इंडा घोटाळा आणि अंडा पाप्लेट असे एक से एक पदार्थ बनवून देत असतो. इथली अंडाभुर्जी आणि अंडाघोटाळा एकदम फेमस आहे. अंडाभुर्जीच रेसिपी नेहमीसारखीच आहे. पण अंडाघोटाळा थोडी वेगळा आहे. अंडाघोटाळा म्हणजे आधी नेहमीसारखी भुर्जी बनवून घ्यायची. ती एका डिशमध्ये काढायची. नंतर तव्यावर नुस्तं अंड फोडून टाकायचं आणि ते हाफ फ्राय करून भुर्जीवर काढायचं. मग भुज आणि हाफ फ्राय ऑम्लेट चमच्याने कालवायचं की झालं अंडाघोटाळा तयार! 

राजूभाईंच्या हातची खास भुर्जी आणि अंडाघोटाळा खाण्यासाठीच रोज संध्याकाळी त्यांच्या टपरीबाहेर गर्दी होते. या गर्दीत मराठी माणसं असतातच. पण सगळ्यात जास्त गुजराती पब्लिक असतं. विशेष म्हणजे राजूभाईदेखील गुजरातीच आहेत. आधी त्यांचा अंड्याचा व्यवसाय होता. पण तो करता करता त्यांना भुर्जीची लज्जत कळली आणि त्यांनी थेट अंडाभुर्जीची गाडीच टाकली. गाडीवरून आता ते एका छोट्या दुकानात शिफ्ट झालेत. पण गाडीवरची गर्दी आता तिथेही पोचलीय आणि याचं एकमेव कारण म्हणजे गाडीवरच्या भुर्जीची अप्रतिम चव!

ही चवच अंडाभुर्जीच्या गाड्यांचं उरलंसुरलं अस्तित्व टिकवून आहे.

श्री मुकुंद कुळे यांनी लिहिलेला हा लेख समाजमाध्यमांतून मिळाला. आजही तसाच लागू असल्याने सगळ्यांच्या माहितीसाठी देत आहे.

संकलन : शेखर आगासकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..