नवीन लेखन...

सत्यकथा चे संपादक अनंत अंतरकर

‘मराठी साहित्यात जोपर्यंत ललित नियतकालिकं चालू राहतील तोपर्यंत अनंत अंतरकरांचं नाव कायम टिकून राहील’, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी कै. अनंत अंतरकर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात काढले होते. त्यांचा जन्म १ डिसेंबर १९११ रोजी जमखिंडी येथे झाला. ‘हंस’, ‘मोहिनी’ आणि ‘नवल’ ही अनंत अंतरकरांनी सुरू केलेली ललित नियतकालिके केवळ दर्जेदार साहित्याच्याच जोरावर आज ७० वर्षे झाली तरी वाचकांमध्ये लोकप्रिय आहेत, हे अंतरकरांच्या वाङ्मयीन द्रष्टेपणाचेच द्योतक म्हणावे लागेल.

साहित्याचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला. बा. ल. अंतरकर हे कोकणातले एक प्रसिद्ध शिक्षक होते. ते संस्कृत पंडित होते, त्याचप्रमाणे इंग्रजी भाषेवरही त्यांनी प्रभुत्व मिळवले होते. ‘सरूप शाकुंतल’, ‘मेघदूतच्छाया’ आणि (उमर खय्यामकृत) ‘रुबाया’ हे त्यांचे मराठी अनुवादग्रंथ त्या काळात गाजले होते. अशा व्यासंगी आणि साहित्यिक वडिलांच्या सहवासात अनंत अंतरकरांची साहित्यरुची जोपासली गेली. त्या काळची ‘यशवंत’, ‘रत्नाकर’, ‘मनोरंजन’ यांसारखी साहित्यसंपन्न मासिके त्यांच्या वाचनात होती. अभिजात संस्कृत साहित्यकृतींबरोबरच गडकरी, ह. ना. आपटे, चिं. वि. जोशी, कोल्हटकर, कवी यशवंत, बालकवी यांची साहित्यसंपदाही त्यांनी अभ्यासली होती. वडिलांकडे विद्वज्जनांची ये-जा असल्यामुळे मराठी व इंग्रजी पुस्तकांवर साहित्यचर्चा झडत. त्या कानावर पडून इंग्रजी साहित्याचाही अंतरकरांचा अभ्यास सुरू झाला.

शाळेत असताना अंतरकरांनी ‘विद्याविनोद’ नावाचे एक हस्तलिखित मासिक हौसेने काढले होते. ते पाहून त्यांचे शिक्षक फाटक यांनी ‘हा मुलगा मोठेपणी उत्तम संपादक होईल’ असे भाकीत केले होते.
शिक्षणासाठी अंतरकर मुंबईत दाखल झाले. इथे त्यांना अभिनय, नाट्यदिग्दर्शन यांचा छंद जडला, पण साहित्याचे प्रेम प्रबळ ठरले. अंतरकरांनी पत्रकारिता सुरू केली. भिन्न भिन्न प्रकारच्या कथा, कविता, समीक्षापर पुस्तके, नाटके, विडंबन काव्य, विनोद आदींच्या वाचनाने आणि परिशीलनाने त्यांचा साहित्यिक पिंड घडत गेला. शेक्सपिअर, मार्लो, बर्नार्ड शॉ, ओ. हेन्री, चेकॉव्ह, टॉलस्टॉय, अॅुगाथा ख्रिस्ती प्रभृती अभिजात साहित्यकारांपासून पी. जी. वुडहाऊस, सॉमरसेट मॉम, ऑर्थर कॉनन डॉयल या लोकप्रिय लेखकांच्या साहित्याचे त्यांनी वाचन केले. मराठीतल्या तत्कालीन नियतकालिकांबरोबरच ‘स्ट्रँड’, ‘व्हरायटी’, ‘अॅागासी’ यांसारख्या अभिरुचिसंपन्न पाश्चाॉत्त्य नियतकालिकेदेखील त्यांच्या नियमित वाचनात होती. जोडीला मराठी नाटके आणि हिंदी व इंग्रजी चित्रपट पाहण्याची त्यांना आवड होती. त्यांचे साहित्य-कलाविषयक शिक्षण अनौपचारिकपणे बरेच पुढे गेले. यातूनच त्यांचे अभिजात संपादकीय व्यक्तिमत्त्व घडत गेले. याच काळात त्यांनी विपुल लेखनही केले.

सतरा-अठराव्या वर्षापासूनच त्यांच्या छंदोबद्ध कविता प्रसिद्ध होऊ लागल्या होत्या. 1930 ते 38 या काळात निरनिराळ्या दैनिकांत व साप्ताहिकांत अंतरकरांनी लेखन, वार्तांकन व संपादन केले. त्यांच्या कविता आणि गद्यलेखन ‘संजीवनी’, ‘विहार’, ‘विविधवृत्त’, ‘मौज’, ‘सत्यकथा’, ‘प्रभात’, ‘चित्रा’, ‘आशा’, ‘धनुर्धारी’, आदी नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले. वेगवेगळ्या चौदा टोपणनावांनी ते हे लेखन करीत असत. याखेरीज ‘आकाशवाणी’साठी ते दर आठवड्याला एक श्रुतिकाही लिहीत असत. ‘चोरटे हल्ले’ आणि ‘गाळीव रत्ने’ ही प्रसिद्ध झालेली अंतरकरांची पुस्तके अभिजात विनोदाचा उत्कृष्ट नमुना म्हणून गाजली.

१९३८ साली, वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी ‘सत्यकथा’ या तेव्हा अगदी गंभीर स्वरूपात प्रसिद्ध होत असलेल्या मासिकाचे ते कार्यकारी संपादक बनले आणि पुढे गाजलेल्या अनेक लेखकांचे उत्तम साहित्य त्यात साक्षेपाने प्रसिद्ध करून त्यांनी त्या मासिकाला आघाडीचे ललित साहित्यिक मासिक बनवले. १९४२ ते ४५ या काळात त्यांनी ‘वसंत’ या मासिकाचे संपादन समर्थपणे केले.
साहित्यक्षेत्रातील पूर्ण एक तपाच्या तपश्च्र्येनंतर अनंत अंतरकरांना ओढ लागली होती ती स्वत:च्या मालकीचे एक सर्वांगसुंदर आणि अभिरुचिसंपन्न मासिक काढण्याची. आपले हे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी अविश्रांत श्रम करून, प्रसंगी अर्धपोटी राहून थोडीशी पुंजी जमा केली आणि १९४६ मध्ये ‘हंस’ हे स्वत:चे मासिक सुरू केले. ‘हंस’च्या पाठोपाठ अंतरकरांनी १९५० साली विनोदप्रधान ‘मोहिनी’ची स्थापना केली आणि नंतर चार वर्षांनी १९५४ मध्ये सर्वार्थाने नवलपूर्ण अशा ‘नवल’ या मासिकाचा आरंभ केला. याच काळात या मासिकांची कचेरी त्यांनी दुबईहून पुण्याला हलवली.
‘हंस’च्या द्वारे कलात्मक कथावाङ्मयाला प्रोत्साहन देऊन त्यांनी यशस्वीरीत्या त्याचे पोषण व संवर्धन केले. नव्याने रूढ होत असलेल्या लघुकथेला अधिक प्रतिष्ठा प्राप्त करून देऊन त्यांनी एक नवेच ‘हंसयुग’ मराठी वाङ्मयात प्रस्थापित केले. कोणत्याही विशिष्ट संप्रदायाचा पगडा बसू न देता स्वच्छंद कथेच्या स्वायत्त अस्तित्वाला मान्यता देणारे ‘हंस’ हे एकमेव मासिक ठरले. गेल्या काही पिढ्यांतल्या श्रेष्ठसाहित्यिकांची सुरुवात ‘हंस’ व ‘मोहिनी’ या मासिकांमधून झाली आहे.

‘हंस’मध्ये कथांबरोबरच श्री. म. माटे, श्री. के. क्षीरसागर, वसंत शांताराम देसाई यांचे वैचारिक व समीक्षात्मक साहित्यदेखील नियमितपणे प्रसिद्ध झाले. विनोदी लेख, कथा, व्यंगचित्रे, नाटक-चित्रपटादी कलांचा आस्वाद यांच्यासाठी ‘मोहिनी’ हे एक दर्जेदार व्यासपीठ त्यांनी निर्माण केले. मुखपृष्ठावरील हास्यचित्र हे मोहिनीचे अनन्यसाधारण वैशिष्ट्य बनले. विनोदलेखनाच्या विकासात ‘मोहिनी’ने केलेल्या योगदानाची महती सुप्रसिद्ध समीक्षक वा. ल. कुलकर्णी यांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून सांगितली होती. ‘नवल’मुळे रहस्यमय, भयकारी, विस्मयकारी, विज्ञानाधिष्ठित, आदी आगळ्या आणि उपेक्षित साहित्यप्रकारांना उचित आणि मानाचे प्रतिष्ठान मराठीत प्रथमच प्राप्त झाले. भारतीय साहित्यकोषात तज्ज्ञ अभ्यासकांनी विज्ञानकथेचे अस्तित्व मराठीत टिकवून धरण्याचे श्रेय केवळ ‘नवल’ला दिलेले आहे. रत्नाकर मतकरी आणि नारायण धारप यांनी या मासिकासाठी लिहिलेल्या कथांमध्ये वैचित्र्याबरोबरच साहित्यगुणही होते. वेगळ्या प्रकारचे लेखन करणार्याठ तरुण लेखकांची पिढी ‘नवल’मधून उभी राहिली. मराठी वाङ्मयाच्या विकासाला अंतरकरांच्या अभिजात आणि उदारमनस्क संपादकीय दूरदृष्टीने नेमकी दिशा दिली. त्यांच्या तीनही मासिकांचे आपापले वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप इतके विलोभनीय आणि सौंदर्यसंपन्न होते, की समकालीन नियतकालिकांनी त्यांचे अनुकरण केले. त्यांच्या मासिकांच्या धर्तीची बरीच मासिके पुढे सुरू झाली. केवळ ‘नव’संप्रदायात संकुचितपणाने अडकून न बसणार्याम लघुकथा, गूढकथा, फँटसी, रहस्यकथा, भयकथा यांसारख्या अनेक नवीन कथाविधांचा विकास मराठीत होऊ शकला तो अंतरकरांच्या जाणीवपूर्वक प्रयत्नांमुळेच.

कथेच्या स्वायत्त स्वरूपाचे अंतरकरांनी हिरिरीने रक्षण केले. त्यामुळे जी.ए. कुलकर्णी, दि. बा. मोकाशी, गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, द. पां. खांबेटे, वसुंधरा पटवर्धन यांच्यासारख्या अनेक असामान्य लेखकांच्या प्रतिभेचे नवनवोन्मेष मराठी साहित्याला संपन्न करते झाले. नवनवीन कथालेखक व कथेबाबतचे नवनवे प्रयोग पुढे आणण्याबाबत अंतरकर नेहमी प्रयत्नशील असत. लेखकांमधील प्रतिभेचा स्फुल्लिंग नेमका हेरणे, तो फुलवणे, लेखकाशी त्याचे लेखन अधिक प्रत्ययकारी कसे होऊ शकेल याबाबत विचारविनिमय करणे, त्याला आणखी कोणत्या प्रकारचे लेखन शक्य होईल याबाबत मार्गदर्शन करणे, प्रसंगी एखाद्याचे लिखाण पूर्णपणे पुन्हा लिहिणे, कथास्पर्धा घेणे, अशा नानाविध प्रकारे नव्या लेखकांची पिढी निर्माण करण्याचे कार्य अंतरकरांनी निष्ठेने आणि परिश्रमपूर्वक सातत्याने केले. नव्या लेखकांना उपयुक्त ठरेल असा वाङ्मयविचारही त्यांनी आपल्या मासिकांतून- विशेषत: ‘हंस’मधून- विपुल प्रमाणात दिला.

लेखकांप्रमाणेच वाचकांनाही घडवण्याचे कार्य अंतरकरांना महत्त्वाचे वाटे. वाचकांची साहित्यविषयक दृष्टी अधिक विशाल व जाणती करण्याच्या उद्देशाने अंतरकरांनी एक महत्त्वाचा उपक्रम चालवला, तो म्हणजे श्रेष्ठ अशा परकीय साहित्यकृतींचा मूल्यमापनासहित परिचय. अनेक भारतीय आणि परकीय भाषांतील अभिजात साहित्याचे सरस अनुवादही अंतरकरांनी आपल्या मासिकांतून प्रसिद्ध केले. अनुवादित कथांची स्पर्धा ते आयोजित करीत असत. दर्जेदार जागतिक वाङ्मयाच्या संदर्भात मराठी साहित्याचा विचार होण्यासाठी आणि त्याचा वेगळ्या दिशेने विकास होण्यासाठी या उपक्रमांचा निश्चिततच हातभार लागला. ‘हंस’-‘मोहिनी’मधील हास्यचित्रांचा दर्जा तत्कालीन इतर मराठी नियतकालिकांमधील हास्यचित्रांच्या तुलनेत फार वरचा होता. अंतरकरांनी अनेक विदेशी मासिकांमधल्या चित्रांची उदाहरणे दाखवून, चर्चा करून हास्यचित्रकारांचे मन:पूर्वक प्रबोधन केले. विदेशी हास्यचित्रांबद्दलचे आस्वादपर लेखही त्यांनी आवर्जून प्रसिद्ध केले. त्यामुळे कमीत कमी व मार्मिक शब्दांचा आधार घेणारी, रेखासुंदर, सुबुद्ध हास्यचित्रे साकार होऊ लागली. सजावट हा अंतरकरांच्या मासिकांचा मानबिंदू होता. मुळातच तल्लख असलेल्या दृश्य सौंदर्यदृष्टीमुळे चित्रकारांच्या कलेला न्याय देणारे उत्तम ले-आऊट्स आणि तंत्राचा अधिकाधिक उपयोग करून साधलेले परिपूर्ण मुद्रण त्यांच्या मासिकांना अधिक वैशिष्ट्यपूर्ण बनवीत असे.

स्वत: सर्जनशील लेखक आणि उत्तम चित्रकार असलेले अंतरकर हे मराठीमधील एक दुर्मिळ, निष्ठावंत संपादक. मराठीत सर्वाधिक पुस्तके ज्यांना अर्पण केली गेली आहेत असे एकमेव संपादक.
अभिरुचिसंपन्न कलात्मकता हा जीवनोद्देश असलेली अंतरकरांची मासिके जाहिरातींचा आधार बाणेदारपणे नाकारूनही, कोणतेही सरकारी अनुदान वा सवलत न घेता, केवळ रसिक वाचकांमधील लोकप्रियतेच्या जोरावर यशस्वी झाली. मराठी वाचकांची कथाभिरुची संपन्न करणार्याक हया द्रष्ट्या संपादकाचे ४ ऑक्टोबर १९६६ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. अरुणा अंतरकर, हेमलता अंतरकर

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..