अमस्टरडॅम, रोटरडॅम आणि सिक्स ऑन सिक्स ऑफ.

लूफथान्साच्या विमानाने मुंबई विमानतळावरून टेक ऑफ घेतला आणि फ्रँकफर्ट विमानतळावर लँड केले. तिथून अम्सटरडॅम साठी कनेक्टिंग फ्लाईट पकडली. युरोप मध्ये बऱ्याच देशांमधे रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत नो फ्लाय टाइम असतो म्हणून युरोप किंवा अमेरिकेत जाणारी विमाने भारतातून मध्यरात्री नंतर पहाटे पहाटे निघतात जेणेकरून सहा ते सात तासानंतर विमानतळाजवळ राहणाऱ्या यूरोपियन लोकांची झोपमोड न होता विमाने लँड करु शकतील. अमस्टरडॅम एअरपोर्ट वर एजन्ट ने पिक अप केलं. त्याच्या कार मध्ये बसून रोटरडॅम बंदरात जायचे होते. साधारण एक ते दीड तासाचा प्रवास होता. रोटरडॅम बंदरात जहाज कार्गो डिस्चार्ज करण्यासाठी आले होते. अमस्टरडॅमला उतरल्याबरोबर हवेतील गारवा जाणवायला लागला होता. एजन्ट च्या गाडीत बसल्यावर थंडी वाजेनाशी झाली. गाडी रस्यावरून ताशी 120 किलोमीटर वेगाने पळत होती. स्पीड लिमिट साइन दिसल्यावर एजन्ट गाडीचा स्पीड कमी करत होता. रस्त्यावर कुठंही क्रॉसिंग नव्हती जिथे तिथे क्रॉसिंग ऐवजी एग्झिट देऊन पलीकडे जायला किंवा यायला वर्तुळाकार ब्रिज बांधले होते किंवा सब वे तरी होते. रस्त्याच्या बाजूला लांबच्या लांब शेतं आणि त्यांना पाणी देण्यासाठी मोठं मोठी स्प्रिंकलर सिस्टिम दिसत होती. संपूर्ण रस्त्याच्या बाजूला हिरवीगार शेतं किंवा झाडे दिसत होती. पाण्याचे रुंद कालवे कालव्यांच्या शेजारी पाणी उपसा करण्यासाठी पवनचक्क्या डौलात उभ्या असलेल्या दिसत होत्या. कालव्यांमध्ये लहान लहान बोटी आणि एक दोन पासून दहा बारा कंटेनर वाहून नेतील अशा लहान मोठ्या बार्जेस इकडून तिकडे जाताना दिसत होत्या. रोटरडॅम बंदर जवळ येऊ लागताच मोठं मोठ्या ऑईलच्या टाक्या, प्रचंड मोठे ऑइल टर्मिनल्स आणि जेट्ट्या दिसू लागल्या होत्या. जहाजावर गेलो तर माझ्यासोबत प्री सी ट्रेनिंग ला असलेला बॅचमेट माझी वाट बघत बसला होता. सहा सात वर्षांनी एकाच कंपनीत असून प्रत्यक्ष पहिल्यांदा भेटला होता पण त्यालाच मी रिलीव्ह करणार होतो. हॅन्डीन्ग ओव्हर करताना त्याने जहाजावरील सिस्टीम आणि कुठे काय अडजस्टमेन्ट करायच्या ते दाखवून दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी जहाज निघायच्या पहिले तो जाणार होता. जहाजाचे डिस्चार्ज पूर्ण होऊन संध्याकाळी जहाज रोटरडॅम हून निघाले. जाताना बंकर म्हणजेच जहाजासाठी लागणारे इंधन भरून घेतले. जहाजाला इंधन पुरवठा करणारी बंकर बार्ज खूप अत्याधुनिक होती. बार्ज च्या नेव्हिगेशनल ब्रिज वरून सगळ्या मशिनरी ऑपरेट केल्या जात होत्या. जेवढं इंधन द्यायला पाहिजे होतं नेमकं तेवढंच दिलं गेलं. नाहीतर सिंगापूर, माल्टा या ठिकाणी कमी देऊन नंतर घासाघीस करून पाच ते दहा टन डिझेल असेल तर सहा ते आठ हजार अमेरिकन डॉलर्सचा घपला अशा सप्लायर कडून करणे हे नेहमीचच होतं पण बंकर ऑपेरेशन म्हणजेच इंधन भरण्याची प्रक्रिया लवकर आटोपली आणि जहाज निघाले. जहाज उत्तर समुद्रातून डेन्मार्क जवळून बाल्टिक समुद्रातील रशियाच्या विसोस बंदरात लोड करण्यासाठी जाणार होते. मी थर्ड इंजिनियर असल्याने रोटरडॅम पासून फोर्थ इंजिनियर आणि मी दोघे जण सिक्स ऑन सिक्स ऑफ वॉच म्हणजे माझा दुपारी 12 ते संध्याकाळी 6 मग फोर्थ इंजिनियर संध्याकाळी 6 ते रात्री 12. पुन्हा मग रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत मी यायचो आणि सकाळी 6 ते दुपारी 12 पर्यंत फोर्थ इंजिनियर अशी सिस्टीम होती .
जहाज UMS क्लास म्हणजे अन अटेंडेड मशिनरी स्पेस ज्यामध्ये इंजीन आणि इतर मशिनरी सलग आठ तास ऑटो मोड मध्ये टाकून मनुष्यविरहित चालू ठेवता येतात. पण जहाजाचा रूट आणि शेड्युल असं होते की UMS मोड खूप कमी मिळायचा मग रोजच वॉच सुरु असायचा. सेकंड इंजिनियर सकाळी आठ ते पाच या वेळेत यायचा. कार्गो डिस्चार्ज करताना सेकंड इंजिनियरला प्रॉब्लेम आल्यावर कधीही यावे लागेल म्हणून तो वॉच करत नाही पण इतर वेळी त्याने वॉच केला तर थर्ड आणि फोर्थ इंजिनियरला सिक्स ऑन सिक्स ऑफ वॉच ऐवजी फोर ऑन एट ऑफ म्हणजे चार तासाचे वॉच आणि आठ तास रेस्ट करायला मिळत असे. सिक्स ऑन सिक्स ऑफ मध्ये दिवसातून बारा तास सुट्टी मिळते पण सहा सहा तासाच्या दोन्ही रेस्ट पिरियड मध्ये खाणे पिणे आणि झोपण्याचे सगळं टाईम टेबल बिघडून जातं. एक दोन दिवस काही वाटत नाही. पण तीन ते चार दिवसापेक्षा जास्त सिक्स ऑन सिक्स ऑफ वॉच केला की पुरेशा झोपेअभावी शारीरिक त्रासासह मानसिक त्रास पण व्हायला लागतो. जहाज फक्त चार वर्षं जुने होते त्यामुळे मेंटेनन्स किंवा इतर प्रॉब्लेम अशी कामं खूप कमी निघायची तरीपण सेकन्ड इंजिनियर वॉच करायला मागत नव्हता कारण त्याला पहाटे चार ते आठ वॉच करायला जीवावर यायचे. भारतीय नौसेनेतून रिटायर झाल्यानंतर त्या सेकंड इंजिनियरने मर्चन्ट नेव्ही जॉईन केली होती. पंचेचाळीशी ओलांडल्याने रोज संध्याकाळी तासभर जहाजाच्या मेन डेकवर जॉगिंग करण्याची आणि चालण्याची त्याला सवय होती. ही सवय मोडू नये म्हणूनही तो चार ते आठ वॉच करायला तयार नव्हता. जहाज रशिया मध्ये लोड करून पुन्हा रोटरडॅम बंदरात यायला निघाले होते. संध्याकाळी पाच वाजता सेकंड म्हणाला की तू आता रात्री 12 ते सहा वॉच करायला लागेल, मी म्हणालो रात्री वॉच करायचा होता तर दुपारी बारा वाजता का नाही सांगितले तर म्हणाला मला आता कळलं की जहाज रात्री डेन्मार्क च्या स्ट्रेट मधून बाहेर पडण्यासाठी पायलट येणार आहे त्यामुळे वॉच ठेवायला लागेल. रात्री पावणे अकरा वाजता मोटरमनचा वेक अप कॉल आला मी म्हटलं फोर्थ इंजिनियरकडे फोन दे. फोर्थ इंजिनियर पण सिक्स ऑन सिक्स ऑफ करून फ्रस्ट्रेट झालेला होता, त्याला म्हणालो की सेकंड इंजिनियरला फोन कर आणि सांग तीन साबचे डोकं खूप दुखतंय आणि अंगात ताप पण भरलाय तो काही वॉच वर येणार नाही. फोर्थ ने सेकंड ला फोन केला त्याने सांगितलं चीफ इंजिनियरला फोन करून सांग सेकंड चार वाजता वॉच मधे येईल. फोर्थ इंजिनियर ने चीफ ला फोन केला मग चीफ ने मला फोन करून अचानक काय झालं बरं वाटतंय का वगैरे विचारलं आणि फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी बारा वाजता वॉच वर फोर्थ इंजिनियरने मला बघितल्यावर हसायला सुरवात केली बोलला चीफ इंजिनियर आणि सेकंड इंजिनियरची तोंडं बघण्यासारखी झाली होती. दुपारी तीन वाजता चीफ इंजिनियर टी ब्रेक मध्ये नेहमीप्रमाणे इंजिन कंट्रोल रूम मध्ये आला आणि अपेक्षेप्रमाणे विचारू लागला. कसला त्रास झाला आता बरं वाटतंय का वगैरे वगैरे. त्याला सांगितलं मला सिक्स ऑन सिक्स ऑफ नाही जमणार डिस्चार्ज पोर्ट असेल तेव्हा एक दोन दिवस करायला हरकत नाही. पण इतर वेळी सेकंड इंजिनियर असताना सिक्स ऑन सिक्स ऑफ करणार नाही. मी ऑफिस मध्ये बॉसशी या विषयावर बोलून आलोय, बॉसने उलट मलाच सांगितलं की कार्गो डिस्चार्ज नसेल तेव्हा इतर वेळी सेकंड इंजिनियर ने वॉच केले पाहिजेत. मग त्याने सारवासारव केली की यापुढे असे होणार नाही आपण वॉच अड्जस्ट करून घेत जाऊ. पण आठवडा भरात पुन्हा सेकंड इंजिनियर दिवसा काहीतरी कामं आहे त्याचे निमित्त काढून वॉच मध्ये न येता फोर्थ आणि थर्ड ने सिक्स ऑन सिक्स ऑफ करावे यासाठी बहाणे करू लागला. तेव्हा मात्र सेकंड आणि चीफ इंजिनियरला स्पष्ट शब्दात सांगितले की मला हे जमणार नाही तुम्ही कळवा ऑफिसमध्ये आणि मला घरी पाठवून द्या. घरी सेकंड इंजिनियर वॉच करत नाही म्हणून थर्ड पण सिक्स ऑन सिक्स ऑफ वॉच करायला तयार नाही अशी माझ्याविषयी तक्रार करता येणे शक्य नसल्याने. चीफ इंजिनियरने सेकंड इंजिनियरची समजूत घालून त्याला वॉच मध्ये यायला भाग पाडले त्यानंतर सगळं सुरळीत झालं होतं.
एका दिवशी चीफ इंजिनियर इलेक्ट्रिकल ऑफिसरला सकाळी सकाळी विचारू लागला की तू ड्रिंक करतोस का, त्याने नाही सांगितल्यावर मला पण विचारले मी सुद्धा नाही बोललो. मग फोर्थ इंजिनियरला विचारले, फोर्थ इंजिनियर सरदार होता तो म्हणाला हा सरजी मै तो दबाके पिता हूँ, लेकिन जहाज पे झिरो अल्कोहोल पॉलिसी है दारू कौन लायेगा और पिनेको देगा . फोर्थ ने चीफ ला बोलल्यानंतर माझ्याकडे बघितलं आणि गालातल्या गालात हसायला लागला. चारच दिवसांपूर्वी दुपारी वॉच हॅन्ड ओव्हर करताना फोर्थ इंजिनियर मला एअर कंडिशन रूम मध्ये घेऊन गेला होता तिथे एका मोठ्या मोटर खाली कोणालाही दिसणार नाही किंवा लक्षात येणार नाही अशा ठिकाणी दोन व्हिस्कीच्या बाटल्या लपवून ठेवल्या होत्या. त्यांच्याकडे दाखवून फोर्थ इंजिनियरने मला विचारले होते आप पिते हो क्या, मी नाही सांगितल्यावर बोलला मग मी घेतल्यात इथून असं कोणाला सांगणार नाही ना. मी विचारलं पण कोणी लपवून ठेवल्यात इथे, तर तो म्हणाला समजेल नंतर त्यावेळेस बघू. तर त्या दारूच्या बाटल्या जहाजावर कोणी कशा आणि कधी आणून ठेवल्या हे आम्हा दोघांनाही माहिती नव्हतं. पण चीफ इंजिनियर सगळ्यांकडे ड्रिंक घेता का अशी आस्थेने चौकशी करत होता ते पाहून फोर्थ इंजिनियर गालातल्या गालात हसत होता आणि त्याला बघून मला हसू आवरत नव्हते. नंतर त्याला बाटल्यांबद्दल विचारले असता तो बोलला काल रात्री दुसरी बाटली रिकामी झाल्यावर पाण्यात फेकून दिली आता शेकडो किलोमीटर मागे समुद्राच्या खाऱ्या पाण्याने भरून तळाशी बसली असेल.
सिनियर रँक मध्ये गेल्यावर जुनियरना गरज नसताना त्रास द्यायची सवय काही काही अधिकाऱ्यांना असते वास्तविकतेत सगळे सिनियर अधिकारी जुनियर रँक पासूनच परीक्षा देत देत वर गेलेले असतात. काहीजण आपण ज्या त्रासातून, जाचातून आणि परिस्थितीतून जाताना जे भोगलंय ते इतरांना भोगावे लागू नये असा विचार करतात. तर काहीजण मी जे भोगलय ते इतरांना पण भोगू दे असा विचार करतात. सगळे जण कामं करायलाच येतात जहाजावर. इमर्जन्सी किंवा महत्वाचे असेल तर कधी कधी दिवसातून अठरा तास काय पण चोवीस तास सुद्धा सलग काम करावे लागते आणि सगळे करतात देखील. पण गरज नसताना अधिकार आहेत म्हणून किंवा सिनियर आहे म्हणून हरासमेन्ट करायला लागल्यावर स्वतःच्या तब्येतीचा आणि मानसिक आरोग्याचा विचार करून अशा लोकांना प्रतिप्रश्न आणि प्रतिउत्तर केले नाही तर जहाजावर दिवस काढणे कठीण होऊन जातं.

© प्रथम रामदास म्हात्रे 
मरीन इंजिनियर, 
B. E. (mech), DIM. 
कोन, भिवंडी, ठाणे.


हा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 57 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..