आहारातील बदल भाग ५६ – चवदार आहार -भाग १७

 

तिखट पदार्थात सर्वात जास्त वापरला जाणारा पदार्थ म्हणजे मिरची. कोशिंबीरी लोणच्या पासून ते सर्व भाज्या आणि फक्त मिरचीच्या ठेच्यापर्यत आपला ठसका दाखवणारी ही मिरची, तिखट पदार्थात आपले स्थान अबाधित राखून आहे.

अति सर्वत्र वर्ज्ययेत, या न्यायाने प्रदेश विचार करून, मिरचीचा वापर युक्तीने करावा. काही जण मिरच्या चराचरा चावून खातात, त्यांना भविष्यात काही गंभीर आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते.

सुकी लाल मिरची आणि हिरवी ओली मिरची यामधे तुलना करायची झाल्यास सुकी लाल मिरची त्यातल्या त्यात बरी म्हणावी. कढी, पिठले, डाळ तडका इ. पदार्थांना लाल मिरचीशिवाय शोभा नाही.
आणि कोशिंबीर, कांदेपोहे, सोलकढी, आमटी या मधे हिरव्या मिरचीचा वास, काही खास असतो.

पण या हिरव्या मिरचीची साल किंवा बी आतड्यांना जर चिकटून राहिली तर तिथे व्रण म्हणजे जखम होण्याची शक्यता असते. म्हणजेच ही साल किंवा बी पोटात जाताना अगदी बारीक होऊन गेली तर धोका तेवढा नाही.

यासाठी युक्ती काय करावी ?
एकतर या हिरव्या मिरचीचे तुकडे करून वापरण्याऐवजी, ती फोडणीमधे अख्खीच वापरावी. म्हणजे त्याचा खास वासपण येईल आणि खाताना ती बाजूला काढून पण ठेवता येईल. किंवा याची सरळ पेस्ट म्हणजे चटणी करून ती वापरावी. कमी पुरते. बी आणि साल पण चिकटून रहाण्याची शक्यता कमी ! ( फोडणीमधे अख्खी वापरताना पुढचे टोक जरा मोडावे, नाहीतर गरम तेलात ती फुटते, आणि गरम तेल उडते. सावधान ! )

ज्यांना तिखट तर हवेच आहे, पण हिरव्या मिरचीने त्रास होतो, त्यांनी जिथे शक्य आहे तिथे लाल मिरची वापरावी. ही मिरची पूर्णपणे पिकल्यानंतर वाळवून ठेवलेली असते. त्यामुळे पचायला हलकी किंवा त्रास द्यायला हिरवीपेक्षा सहनशील असते.

लाल मिरचीची पावडर तर सहजपणे सर्व ठिकाणी वापरली जाते. रंग येण्यापासून, चव वाढवणे आणि सजावटीपर्यंत ही लाल मिरची उपयोगी ठरते.

मिरचीच्या सालीचे गुण बघितले तर एक महत्वाचा गुण लक्षात येतो, तो म्हणजे ती कफाच्या विरोधी गुणाची आहे. चिकटपणा कमी करणारी आहे, रक्तातील चिकटपणा पण कमी करणारी आहे. रक्तातील चिकटपणा म्हणजे आजच्या भाषेत, कोलेस्टेरॉल !

आणि मिरचीची बी, याच्या बरोबर विरूद्ध गुणाची म्हणजे मधुर रसाची ! साठवणीची मिरचीपूड करताना, त्यातील बीया काढून टाकल्या तर ती मिरचीपूड टिकते. नाहीतर मधुर रसाची असल्याने, बीयांना किड लागण्याची शक्यता जास्ती असते.

म्हणून तर प्रमेहात आणि स्थौल्यात मिरचीची बी वर्ज्य सांगितली आहे…. इति कै. विद्याताई जळूकर मॅडम.

पोपट मिरच्या खातो, पण साल नाही खात. फक्त गोड बीयाच खातो.

तिखट खाण्यात पण एक मजा असते. भाजी, उसळ आणि आमटी या तिखट पदार्था व्यतिरिक्त आणखी काही विशिष्ट तिखट पदार्थ आपल्या खाण्यात असतात. जे तिखट असतातच, पण त्यांची काही खास तिखट चव हेच त्यांचे वैशिष्ट्य असते. जसे पावभाजी, पाणीपुरी, भेळ, भजी, बटाटेवडे, आणि त्याच्याबरोबरची ओली सुकी तिखट चटणी.

हे पदार्थ म्हणजे अगदी जानी दुश्मन नाहीत, पण ते डाव्या बाजुलाच वाढलेले आहेत, हे विसरूनही चालणार नाही.

वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
17.11.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..