नवीन लेखन...

एजन्ट

बरेच जणांना प्रश्न पडतो की आम्ही जहाजावर कसे जातो किंवा जहाजावरुन घरी कसे येतो. आम्हाला घ्यायला किंवा सोडायला जहाज मुंबईत किंवा भारतात येते का किंवा कसे. मी असलेले एकही जहाज आजपर्यंत मुंबई काय भारतातील कोणत्याही पोर्ट मध्ये आलेले नाही. फक्त एकदाच सिंगापूरहुन गल्फ मध्ये जाताना भारतीय सागरी हद्दीतून काही तास गेले आहे. जिथे जहाज असेल तिथे आम्हाला पाठवले जाते. मग ते जहाज परदेशात असो किंवा भारतातील कोणत्याही पोर्ट मध्ये असो. जहाज ज्या देशात असेल तिथला विजा, इमिग्रेशन किंवा ईतर सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतरच जहाजावर पाठवले जाते तसेच जहाजावरून घरी पाठवले जाते. जहाजावर जसे कोणाला तरी रिलीव्ह करायला जावे लागते तसेच कोणी रिलिव्हर आल्याशिवाय जहाजावरुन खूप दुर्मिळ वेळा परत यायला मिळते. दुसरा कॅप्टन आल्याशिवाय सध्याचा कॅप्टन जाऊ शकत नाही तसेच पॅम्पमॅन आणि फिटर यांच्यापैकी एखादा खलाशी सुद्धा रिलिव्हर आल्याशिवाय जाऊ शकत नाही.

जहाज ज्या देशात असेल तिथल्या पोर्ट जवळ जे विमानतळ असेल तिथे विमानाने पाठवले जाते. विमानतळापासून जहाजावर न्यायला किंवा जहाजावरुन घरी जाताना त्या पोर्ट जवळील विमानतळावर नेण्याचे आणि पोचवण्याचे काम करण्यासाठी, कंपनी त्या त्या देशात आणि पोर्ट मध्ये एजंट अरेंज करते. विमानतळावर रिसिव्ह केल्यानंतर किंवा ड्रॉप करण्यापूर्वी तिथल्या स्थानिक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा एजंट जहाजापर्यंत सोडतो किंवा जहाजावरून घेऊन जातो.

अमेरिका, इंग्लंड सोडून इतर सर्व देशांत स्वतःची गाडी घेऊन येणाऱ्या बऱ्याचशा एजन्टना मोडकं तोडके किंवा कामचलाऊ इंग्लिश येत असतं. प्रत्येकाची बोलण्याची पद्धत, एकसेन्ट किंवा उच्चार समजता समजता नाकी नऊ येतात. त्यांना पण आमच्या बाबतीत सुद्धा हाच अनुभव येतो. तरीपण विनाअडथळा आणि काही अडचण न येता जहाज जॉईन करता येत. काही एजंट गंभीर असतात तर काही खूप गमतीशीर असतात काहीजण कामापुरते बोलतात तर काहीजण गाईड सारखी माहिती पुरवत असतात. आमच्या देशात हे आहे, तिथे हे बघण्यासारखं आहे वगैरे वगैरे. कधी कधी ज्या देशात जातो तिथले चलन नसते मग एजंट त्याची व्यवस्था करून देतो. घरी जाताना प्रत्येक जण शॉपिंग करण्यासाठी प्रयत्न करत असतो, त्यावेळेस बऱ्याचवेळा एजंट तासन तास शॉपिंग होईपर्यंत वाट बघतो. कधी कधी जहाजावर जायला कायदेशीर अडचण येते किंवा जहाज पोर्ट मध्ये यायला उशीर होतो मग त्यावेळी एक, दोन किंवा चार दिवस जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ हॉटेल मध्ये ठेवले जाते. काही जहाजांवर तिथल्या स्थानिक कंपन्यांकडून किंवा स्थानिक प्रशासनाच्या निर्देशाप्रमाणे मेडिकल टेस्ट केल्या जातात. मग हॉस्पिटल मध्ये नेऊन मेडिकल टेस्ट आणि ईतर सगळ्या प्रक्रिया या एजंटद्वारेच पार पाडल्या जातात. रशियन पोर्ट मध्ये असताना आमच्या चीफ इंजिनियरच्या डोळ्याला दुखापत झाली म्हणून हॉस्पिटलला नेण्याकरिता जेट्टीवर ऍम्ब्युलन्स आली होती, ते बघून आमचा पन्नाशी ओलांडलेला सेकंड इंजिनियर सांगू लागला की, १९९५ साली तो एका भारतीय कंपनीत कामाला होता आणि त्याचे जहाज मुंबई बंदरात होते त्याला खूप ताप आला होता आणि अशक्तपणा पण होता, कॅप्टन ने एजंट ला कळवून हॉस्पिटल मध्ये न्यायला सांगितले, सेकंड इंजिनियर जहाजवरून उतरून गेटवर गेला तर एजंट स्कुटर घेऊन उभा होता. मग त्या मुंबईकर एजंटने माझगाव मधल्या कुठल्यातरी क्लिनिक मध्ये नेऊन त्याला इंजेक्शन देऊन आणले असल्याची आठवण त्याने हसत हसत सांगितली.

प्रगतच काय कोणत्याही देशात सहसा कोणी एजंट टीप मागत नाहीत ज्याचा तो खुशीने काय देईल ते घेण्यास एकतर नकार देतात नाहीतर आनंदाने स्वीकारून आभार मानतात. पूर्वी वर्षातून पाच ते सहा महिन्यांसाठी एकच जहाज केले जायचे आता तीन महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट आल्याने वर्षातून दोन किंवा तीन वेळा जहाजावर जावे किंवा यावे लागते. विमानतळावर आपल्या नावाची प्रिंट आऊट घेऊन उभा असलेला अनोळखी एजंट जहाजावर पोचेपर्यंत मोडक्या तोडक्या इंग्रजीत संवाद साधून मित्र होऊन जातो.

© प्रथम रामदास म्हात्रे.

मरीन इंजिनियर.

B.E.(mech), DIM

कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 145 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..