नवीन लेखन...

आद्य मराठी ग्रंथ संग्रहालयाचे जनक – वि. ल. भावे

ठाणे शहरातील  साहित्यिक चळवळीचा पाया वि. ल. भावे यांनी १ जून १८९३ रोजी मराठी ग्रंथ संग्रहालयाची स्थापना करून घातला. १८७८ च्या पहिल्या मराठी ग्रंथकार संमेलनामुळे उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती करणे, ग्रंथ संग्रहाची आवड लोकात निर्माण करणे आणि साहित्य विषयक चर्चा घडवून लोकांमध्ये साहित्याभिरुची आणि मराठी भाषाप्रेम वाढीस लावणे हे कार्य होणे आवश्यक आहे. याची तीव्र जाणीव तत्कालीन सुशिक्षितांमध्ये निर्माण झाली होती. अशा समाजधुरीणांत ठाण्यातील वि. ल. भावे हे होते. आपली मराठी भाषा सुधारण्याचे अनेकांनी प्रयत्न केले. कोणी नवीन ग्रंथ रचना केली, कोणी परकीय भाषेतील ग्रंथांची भाषांतरे केली तर कोणी जुने ग्रंथ मिळवून ते प्रसिद्ध केले. परंतु हे ग्रंथ एकत्र करण्याचा प्रयत्न नीटपणे कोणी फारसा केला नाही. तत्कालीन ग्रंथ संग्रहालयात बहुतांशी इंग्रजी ग्रंथ खरेदी केले जात. त्यामुळे मराठी ग्रंथ संग्रहित होत नसत. ही उणीव दूर करण्यासाठी ठाणे येथे त्यांनी मराठी ग्रंथ संग्रहालयाची स्थापना केली. त्यावेळी त्यांचे वय अवघे बावीस वर्षांचे होते.

भावे यांचा जन्म पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्यातील (आता रायगड) पनवेल या मोठी व्यापारी पेठ असलेल्या गावा जवळील पळस्पे या गावी ६ नोव्हेंबर १८७१ रोजी झाला. १८९१ मध्ये ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होऊन महाविद्यालयात गेले. त्यांचे बालपण, शिक्षण ठाण्यात झाले. भावे लहान. पणी बहुतांशी वेळ उनाडपणे भटकण्यात घालवीत. भटकणे हा त्यांचा छंदच होता. कधी पारसिकच्या डोंगरावर जायचे तर कधी पोखरणीवर जायचे. कधी पाळलेली कबुतरे खिशात बालून खाडीकाठी भटकायचे. तर कधी ठाण्याच्या कारागृहाचे युरोपियन अधिकारी वेलीन यांच्या मुलांबरोबर खेळायला जायचे. वेलीन यांच्या मुलांशी असलेल्या मैत्रीमुळे इंग्रजी भाषा, साहित्य यांची ओळख आणि आवड त्यांच्यात निर्माण झाली. इंग्रजी संभाषण, शिष्टाचार, चालीरिती, संभाषण चातुर्य आणि वाङ्मयास्वाद त्यांना पुढे महाविद्यालयीन शिक्षणात उपयोगी पडला. त्यांचे ठाण्यातील शिक्षक श्री. मोडक यांच्यामुळे कवितांची ओळख त्यांना झाली. क्रमिक पुस्तके, नवनीत, काव्येतिहास संग्रह यामधील कवितांमुळे ते प्रभावित झाले. वाचनाचा छंद त्यांना लागला. त्याचा उपयोग पुढे महाराष्ट्र सारस्वताच्या रचनाकालात त्यांना झाला. १८९५ मध्ये ते बी. एस्सी. झाले. १८९८ मध्ये त्यांचे वडील प्लेगने वारले. त्यामुळे घरच्या प्रपंचाचा आणि वडिलोपार्जित मिठागरांच्या धंद्याचा भार त्यांच्या-वर पडला. अत्यंत कसोशीने त्यांनी धंद्यात जम बसवला. या काळात त्यांचे वाङ्मयप्रेम जरासेही आटले नाही. १९१७ मध्ये त्यांनी चक्रवर्ती नेपोलिअनवर अंक चरित्र-ग्रंथ लिहिला. अंकीकडे मिठाचा व्यवसाय आणि जुन्या संतकवींच्या मौलिक साहित्याचे परिशीलन, चिंतन आणि लेखन त्यांनी चालूच ठेवले होते. ग्रन्थ वाचन आणि ग्रन्थ संग्रहाचे जणु वेडच त्यांना लागले होते. त्याकाळात भावे यांच्याइतका ग्रन्थसंग्रह ठाण्यात कुणाकडेही नव्हता. केवळ सुस्थितीत होते म्हणून ते ग्रन्थसंग्रह करीत असे नव्हते, तर त्यांना ग्रन्थांबद्दल कमालीची ओढ होती. त्यांचा हा ग्रन्थ संग्रह पाहिल्याचे गेल्या पिढीतील अनेक लोक सांगतात. आजही त्यांच्या नातवाने त्यांचा ग्रंथ संग्रह जपून ठेवला असून अभ्यासकांना खुला ठेवला आहे.

या ग्रन्थ प्रेमापोटीच त्यांनी ठाण्याच्या मराठी ग्रन्थ संग्रहालयाची स्थापना केली. त्यासाठी स्वतःच्या संग्रहातील ग्रन्थ दिले. आपल्या भोवतालच्या लोकांना ग्रंथ वाचनास प्रवृत्त करून त्यांनी अखंड ज्ञानसत्रच सुरू केले. यासाठी त्यांना विष्णु भास्कर पटवर्धन या सम-कालिनाने मदत केली. भारतातले हे पहिले मराठी ग्रंथ-संग्रहालय वृद्धींगत होण्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले. अनेकांकडून पुस्तके गोळा केली. सुरुवातीची अनेक वर्षे संस्थेचा अहवाल ते स्वतः लिहीत. जुनी पुस्तके आणि हस्तलिखिते गोळा करण्याचा त्यांना छंद होता. लोकांना सद्भिरुची, पूर्ण वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांनी ‘महाराष्ट्र कवि’ हे मासिक १९०४ मध्ये सुरू केले. या मासिकाची वार्षिक वर्गणी एक रुपया होती आणिसभासद संख्या १५०० होती. त्यावेळच्या मानाने ती खूपच मोठी होती. यावरून ‘महाराष्ट्र कवि’ ची लोक-प्रियता लक्षात यावी. या मासिक पुस्तिकेत देवगिरीकर जाधवांच्या आमदानीच्या अखेरी पासून ते पुणेकर पेशव्यांच्या राजवटी पर्यंत महाराष्ट्रातील काव्यवाङ्मय निर्माण करणाऱ्यांचा अंतर्भाव असे. ‘महाराष्ट्र कवि’ चें पन्नास अंक निघाले होते. दुर्मिळ ग्रंथ संग्रहालयाबाहेर जाऊ नयेत म्हणून त्यांनी ग्रंथ संग्रहालयाचे संदर्भ आणि वाचनालय असे दोन भाग पाडले. त्यामुळे गरजवंत अभ्यासकांना संदर्भासाठी एका जागी ग्रंथ उपलब्ध झाले. त्यांनी यासाठीच संग्रहालयातील पुस्तके घरी नेण्यास प्रतिबंध केला होता. संग्रहालयाचे आजही ‘संदर्भ’ आणि ‘वाचनालय’ असे दोन भाग आहेत ते याच मुळे.

मराठी ग्रंथ संग्रहालयाची स्थापना झाली. त्यावेळी मराठीत सुमारे सहा हजार ग्रंथ प्रकाशित झालेले होते. त्यापैकी सुमारे दोन हजार ग्रंथ भाव्यांनी संस्थेच्या संग्रही जमविले होते. त्यांचे अखंडित ग्रंथप्रेम आणि तत्कालिन महाराष्ट्र साहित्य परिषद, भारत इतिहास संशोधक मंडळ अशा साहित्य-संशोधन विषयक संस्थांशी स्थापनेपासून असलेले त्यांचे संबंध ठाण्यातही अशा संस्थांची कार्ये सुरु करण्यास कारणीभूत झाले. साहित्य परिषदेचे ते पहिले चिटणीस होते. १९०६ ते १९०८ ही तीन वर्षे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर आणि वा. गो. आपटे यांच्यासह त्यांनी चिटणीस पढाची धुरा सांभाळली. मुळातच संशोधक वृत्तीच्या वि. ल. भावे यांनी १९०७ मध्ये प्राचीन मराठी कवींच्य कृतींची एक यादी तयार करून स्वखर्चाने परिषदेच्या नावावर छापली. मराठी ‘दसर’ संस्थेची स्थापना त्यांनी १९१७ मध्ये केली आणि त्याद्वारे रुमाल पहिला, दुसरा आणि तिसरा प्रकाशित केले. सर्वांना ज्ञात असलेला ‘महाराष्ट्र सारस्वत’ हा त्यांचा ग्रंथ सुरुवातीस त्यांनी शंभर पानांचा काढला. त्यात भर घालून तिसरी आवृत्ती काढली ती ११२० पानांची होती. दोन भागात प्रसिद्ध झालेला हा ग्रंथ मराठी वाङ्मयाच्या अभ्यासकांना अतिशय मोलाचा आहे. त्यांनी शोध घेतलेले अनेक कागदपत्र प्रसिद्ध केले आहेत.

वाङ्मयीन संशोधनाबरोबरच इतिहास संशोधन हाही वि. ल. भावे यांचा आवडता विषय होता. भारतीय इतिहासाची इंग्रज लेखकांनी केलेली विटंबना पाहून त्यांना संताप अनावर होत असे. त्यांच्या मते आपल्या राष्ट्राचा तेजोभंग करणारा इंग्रज लेखकांनी लिहिलेला इतिहास जर पुसून टाकून नव्याने लिहावयाचा असेल तर आपली इतिहास साधने परिश्रमपूर्वक धुंडाळली पाहिजेत आणि ती भारतीय दृष्टिकोनातून तपासून राष्ट्रीय इतिहासाची पुनर्रचना केली पाहिजे. वि. ल. भावे ‘शिवचरित्र’ लिहि-ण्याच्या प्रयत्नात होते. त्यासाठी त्यांनी अनेक साधने गोळा केली होती. कारण भावे ‘शिवभक्त’ होते. त्यांनी लिहिलेले ‘अफझलखानाचा वध अथवा शिवाजी महाराजांचा पहिला पराक्रम’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

वि. ल. भावे यांनी मोठ्या संस्था उभ्या केल्या. त्यासाठी तन मन धनाची पर्वा केली नाही. तरीही या क्रांतदर्शी माणसाने आपण उभारलेल्या संस्थेत कोणतेही पद स्वीकारले नाही. हे लक्षात घेतले पाहिजे. जैन तारुण्यात त्यांनी मराठी ग्रन्थ संग्रहालयाची स्थापना केली आणि भारतातील पहिली केवळ मराठी ग्रन्थ-संग्रह करणारी संस्था निर्माण झाली. त्यावेळी त्यांच्या तरुण मित्रांनी त्यांना खूप साथ दिली. या तरूगांमध्ये त्यावेळी जो अमाप उत्साह होता त्याची साक्ष एका प्रसंगावरून देता येईल. एकदा भावे मित्र-मंडळींसह मुंबईत फिरत होते. रस्त्यावर एका कपाटाचा लिलाव चालला होता. त्या लिलावात त्यांनी ते कपाट खरेदी केले. ते आगगाडीतून ठाण्यास आणले. पण ठाण्यात उतरल्यावर ते कपाट स्टेशनवरुन नेण्यासाठी हमाल दीड रुपया मागू लागला. दीड रुपयाही त्यावेळी खूप मोठी रक्कम होती. त्यामुळे या भावे आणि त्यांच्या तरुण मित्रांनी आपल्या पगड्या आणि फेटे काढून एका मित्राजवळ दिले आणि उपरणी डोक्याला गुंडाळून आठ जणांनी ते कपाट मुक्कामावर आणले. अशा ध्येयवादी, वाङ्मय, इतिहास इत्यादींचे संशोधन करणाऱ्या आणि मराठी ग्रन्थसंग्रहालय ही ठाण्यातील साहित्यिक चळवळीचे केंद्र असलेली संस्था स्थापन करणाऱ्या वि. ल. भावे यांचे ते कपाट आजही मराठी ग्रंथ संग्रहालयात जपून ठेवले आहे.

— ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचे  तत्कालिन अध्यक्ष पां. के. दातार यांचा हा लेख.
ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेतून साभार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..