कैक दशकांची परंपरा असलेली ठाण्यातील आचार्य अत्रे कट्टा (व्याख्यानमाला) ! जिथे वपु, पुल पासून विविध शास्त्रज्ञ, अनेक पदमश्री व्यक्ती व्याख्यान देण्यासाठी येऊन गेलेल्या ! या कट्ट्याच्या संस्थापिका व समाजसेविका आणि लेखिका असलेल्या श्रीमती संपदा वागळे यांचा एकेदिवशी फोन आला आणि त्यांनी थेट आदेशवजा सूचना केली की, “यावेळी तुम्ही कट्ट्यावर व्याख्यान द्यायला येणार आहात, सायबर क्राईम जागृतीबद्दल.”
इतक्या मानांकित ठिकाणचे निमंत्रण आणि संपदाताईंचे शब्द टाळणे शक्यच नव्हते. होकार दिला आणि अत्रे कट्ट्यावर व्याख्यान संपन्न झाले तेही अगदी शिस्तबद्ध रीतीने आणि हाऊसफुल गर्दीने दाद देत एक तासाचे व्याख्यान सुमारे दोन सव्वा दोन तास चालवले.
आणि त्यानंतर संपदा ताईंनी व्याख्यानात सायबरविषयी मी ज्या टिप्स दिल्या त्या त्यांच्या पद्धतीने एक टिपण काढून सोशलवर व्हायरल केले. ते इतके व्हायरल होईल याची मला कल्पना नव्हती. पण ठाण्याचे पोलीस कमिशनर श्री आशुतोष डुंबरे (जे आमचेही जुने मित्र) त्यांचा निरोप आला की, दुसऱ्याच दिवशी त्यांच्यापर्यत ते टिपण पोचलं असून त्यांनी ते त्यांच्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना पाठवलं देखील आहे. शिवाय ते म्हणाले, “तुमच्या व्याख्यानाला मी माझ्या स्टाफला पाठवतो.” त्याप्रमाणे त्यांचे पोलीस अधिकारी आणि सायबर डिपार्टमेंटचेही अधिकारी आवर्जून पूर्णवेळ उपस्थित होते. त्यांना काही शंका होत्या त्याचेही निरसन त्यांनी करून घेतले !
एक समाधानी उपक्रम झाल्याबद्दल मीही समाधानी !
तर संपदाताईंनी त्यांच्या सोशल सर्कलमध्ये ते जे टिपण व्हायरल केले होते ते इथं आपल्या सर्कलसाठी शेयर करतोय. फारच कमी शब्दात अचूकपणे त्यांनी सायबरबद्दलच्या व्याख्यानातील टिप्स काढल्यात ! त्या तुम्ही तर वाचाच पण इतरानाही पाठवा !
हि कळकळीची विनंती !
संपदाताईचे टिपण
आपल्याला पण सावध राहायला हवे…….
सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात जनजागृती घडवून आणणारे सायबर क्राईम फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे विभाग प्रमुख डॉ. धनंजय देशपांडे (डीडी) यांचे ठाण्यातील आचार्य अत्रे कट्ट्यावर ‘सायबर क्राईम धोका, वेळीच ओळखा’ या विषयावर अत्यंत उद्बोधक आणि रंजक असे व्याख्यान झाले. त्यातील आचरणात आणायलाच हवेत असे काही ठळक मुद्दे.
– तुमच्या मोबाईलचा डेटा सदा सर्वकाळ चालू असणे म्हणजे हॅकरला आमंत्रण देणे.
– बँक व्यवहारासाठी दुसरा साधा फोन ठेवा आणि त्याचा नंबर कोणालाही देऊ नका
– बँकेच्या प्रिमायसेस मधील एटीएम मधूनच पैसे काढा
– मोबाईल वरून केल्या जाणाऱ्या पैशांच्या व्यवहारासाठी शुक्रवार हा घात वार होय. कारण बँकांना शनिवार रविवार सुट्टी असल्याने, व्यवहारात काही फ्रॉड झाल्यास ते समजायला सोमवार उजाडतो.
– बँक खाते भामट्यांद्वारे खाली झाल्याचे समजताच, एका तासाच्या आत सायबर क्राईम खात्याला कळवले तर पैसे मिळण्याची शक्यता वाढलेली असते.
– OTP कोणाही अनोळखी व्यक्तीला देऊ नका, तोंडीही सांगू नका
– नवीन फोन घेताना, जुना फोन एक्सचेंज करू नका. तो घरातच लहान मुलांना खेळायला द्या अथवा खलबत्त्यात कुटून नष्ट करून टाका
– AI तंत्रज्ञानाचा उपयोग करून तुमच्या जवळच्या नातेवाईकाचा, पैसे हवे आहेत असा व्हिडिओ कॉल येऊ शकतो. यात फसू नये म्हणून आई- वडील ,पत्नी आणि मुले यांच्या फोनवरील संभाषणाची सुरुवात ठरलेल्या टोपण नावाने करा
– अनोळखी माणसाने स्वतःच्या फोन मध्ये काहीतरी बिघाड झालाय असं सांगून एखाद्या अर्जंट कॉलसाठी तुमचा फोन मागितल्यास कधीही देऊ नका
– कुरियरद्वारे अकल्पितपणे काहीतरी भेट आली, तर ती स्वीकारू नका, अशा पाच हजाराच्या भेटीत पन्नास लाखांचे नुकसान होऊ शकतं
– घराचे किंवा कुठे बाहेर जात असाल तर तेथे काढलेले तुमचे व तुमच्या ग्रुपचे फोटो सोशल मीडियावर कधीही टाकू नका
– रिसॉर्ट मध्ये वा अन्य ठिकाणी फोटो आयडी मागितल्यास ड्रायव्हिंग लायसन्स द्या, आधार कार्ड शक्यतो नको. आधारकार्डाऐवजी मास्क कार्डाचा वापर करा. यात फक्त शेवटचे चार डिजिट दिसतात. हे कार्ड मिळण्यासाठी आधार कार्डच्या पोर्टलवर ऑप्शन उपलब्ध आहे अन्यथा जवळच्या ई सेवा केंद्रात
– # या चिन्हाने सुरू होणारा नंबर कधीही घेऊ नका किंवा डायल करू नका
– कोणताही व्हिडिओ कॉल आल्यास, मोबाईल हातात आडवा ठेवून बोला म्हणजे त्यात समोरच्याला फक्त छत दिसेल तुम्ही दिसणार नाही त्यामुळे ब्लॅकमेल होणार नाहीत
– जी पे करताना स्कॅनरचा वापर शक्यतो करू नका. त्याच्या मोबाईल नंबर वर पैसे पाठवा. तसेच जीपे द्वारे व्यवहार करण्यासाठी त्या खात्यात कमीत कमी (लागतील तेवढेच) पैसे ठेवा
– प्रत्येक ॲपला (फेसबुक इंस्टाग्राम इ.) लॉक (स्वतंत्र पासवर्ड) ठेवणे आवश्यक
– हनी ट्रॅप मध्ये अडकू नये म्हणून अनोळखी व्यक्तीशी कोणत्याही प्रकारे संभाषण करू नका. What is the Safe time to call ? हा प्रश्न तुमचा घात करू शकतो कारण तिथूनच हनीट्रॅप सुरु होतो.
– True caller ॲप डाऊनलोड करू नका. कारण त्यात अनेक डुप्लिकेट अँप आलेत
– रिक्षावाले भाजीवाले यांच्याकडे दोन scaner असेल, तर का आहे विचारा आणि तिथे शक्यतो कॅशच द्या.कारण दुसरा स्कॅनर हॅकरचा असू शकतो.
– तुमच्या नावावर traffic चलन आले असेल तर RTO कडे अथवा जवळच्या ट्रॅफिक ऑफिस मध्ये जाऊन खात्री करून घ्या.
– गुगल लोकेशन मॅप हिस्ट्री रोज delete करा.
– किचन मध्ये काम करताना महिलांना जर unknown फोन आला, तर कानाशी मोबाईल लाऊन बोलू नका.घरातील दुसऱ्याला फोन घ्यायला सांगा. कारण तुम्हाला बोलण्यात गुंतवून लुटलं जाते.
– कधी रिक्षा मध्ये दोन QR code असतात. अशा वेळी QR code ने payment करू नका.
– नेहमी ‘Google Play Store’ सारख्या अधिकृत Android स्रोतांकडूनच ॲप्स इंस्टॉल करणे सुरक्षित असते. अनोळखी वेबसाईटवरून डाऊनलोड केलेल्या APK फाइल्समध्ये ( Android package Kit किंवा Android Application package असेही म्हटले जाते) मालवेअर किंवा व्हायरस असण्याची शक्यता असते, ज्यामुळे तुमच्या फोनच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो.
– ज्येष्ठांसाठी खास सूचना – फोनची रिंग वाजली की पळत सुटायचं नाही. कारण असे करताना अनेकजण घसरून पडून जायबंदी होत आहेत तर तो कॉल मिस झाला तरी पुन्हा येऊ शकतो किंवा तुम्ही करू शकता. ‘आजारी पडल्यावर उपचार घेण्यापेक्षा आजारी न पडण्यासाठी उपाय करणे महत्त्वाचे’ हे डीडींचे वाक्य कायम स्मरणात राहू दे… काळजी घ्या, सुरक्षित रहा.
आपली स्नेहांकित
संपदा वागळे
संस्थापिका आचार्य अत्रे कट्टा, ठाणे
आचार्य अत्रे कट्टा (ठाणे) व्याख्यान
आणि उपयुक्त सायबर टिप्स
डॉ. धनंजय देशपांडे (dd)


Leave a Reply