नवीन लेखन...

आठवावेसे वाटले म्हणून( उत्तरार्ध )

‘टीब्रेक’ नंतर गोलंदाजांनी आपला एण्ड बदलावा तसा विषय बदलून मी गाडी हळूच त्यांच्या करीअरकडे वळवतो. गाडी मला हव्या त्या स्टेशनवर ,इंग्लंडच्या १९६३/६४ च्या भारत दौऱ्यावर येऊन थांबते.पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला, १० जानेवारी ते १५ जानेवारी १९६४ दरम्यान खेळला गेलेला, मद्रासच्या नेहरु स्टेडियमवरचा कसोटी सामना. दुसऱ्या दिवसअखेर धावफलक …..
भारत..पहिला डाव….७ बाद ४५७
( डाव घोषित…. बुधी कुंदरन-१९२,विजय मांजरेकर-१०८ )
इंग्लंड… पहिला डाव….२ बाद ६३
१२ जानेवारी….. सामन्याचा तिसरा दिवस. लकाकी गेलेला चेंडू भारताचा तरणाबांड कर्णधार मन्सूर अली खान पतौडी बापूंच्या हातात देतो. पहिल्याच कसोटीत पराभवाचे काळे ढग इंग्लंडच्या डोक्यावर जमा होत असतात.

अंगात ब्रिटिश खडूसपणा पुरेपूर भिनलेली बोलूस आणि केन बँरींग्टन ही जोडी मैदानात असते. आणि त्यादिवशी नकळत, यापुढे कोणाच्या स्वप्नातही मोडला जाण्याची सुतराम शक्यता नसलेला एक जागतिक विक्रम नोंदला जातो. त्या दिवशी बापू सलग २१ षटके ( अगदी नेमके सांगायचे तर १३१ चेंडू ) निर्धाव टाकतात.( आजच्या २०-२० च्या जमान्यात एक डाव १२० चेंडूंचा असतो,म्हणजे विचार करा.) बोलूस ८८ ( ४१५ चेंडू ) आणि बँरींग्टन ८० (३१२ चेंडू ), हे दोघेही आलटूनपालटून बापूंचे षटक सुरु असताना नॉनष्ट्रायकर एण्डला , बॅटवर रेलून हलकीशी डुलकी घ्यायचे अशी सत्याच्या सीमारेषेवर रेंगाळणारी आख्यायिका चेपॉकच्या “मद्रास कॅफे” मधे अगदी आत्ताआत्तापर्यंत सांगितली जात असे.चौथ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव ( शेवटी एकदाचा ) संपतो तेव्हा बापूंचे पृथःकरण असते ३२-२७-५-० . आणि दुसऱ्या डावात ६-४-६-२.

“हे दोघे लेकाचे माझ्या बॉलिंगवर बॅटच उचलणार नसतील तर मला विकेट मिळणारच कशी ?”
बापू २५ वर्षांपूर्वीच्या त्या दिवसांचे असे काही वर्णन करतात की आत्ताच बत्तीसावे षटक संपवून ते पॅव्हेलियनमधे परतले असावेत. इतिहासाचे बोट धरुन मद्रासच्या नेहरु स्टेडियमवर चक्कर मारुन आल्याचा मला भास होतो. वयाच्या ५७ व्या वर्षीही त्यांच्या डोळ्यात दिसणारी चमक मला थरारुन टाकते. तो दिवस त्यांचा होता, फक्त त्यांचाच. त्या दिवशी त्यांनी डोळ्याला पट्टी बांधून गोलंदाजी केली असती तरी ती अचूक टप्प्यावरच पडली असती. इतिहासाच्या दुर्मिळ पानांतील एक अजरामर सुवर्णपान आपल्या नावानं लिहिलं जाण्याचं भाग्य आयुष्यात किती जणांना लाभतं ?
शायर शकील बदायुनी म्हणतो, सवाल उनका, जवाब उनका, सुकूत उनका, खिताब उनका
हम उनकी अंजुमन में सर न करते ख़म , तो क्या करते ।
“अजून एक चहा घेणार का ?” बापू आस्थेने विचारतात. त्या क्षणी बापूंनी सांगितलं असतं तर मी उकळत्या चहाच्या पातेल्यात उडीदेखिल मारली असती.

‘नाही…. नको… मी येतो आता’…
जवळजवळ पाऊणएक तास झालेला असतो. मी जायला निघतो.

“पुन्हा कधी आलात या बाजूला तर नक्की या! आता तुम्हाला अँपॉईंमेंटची गरज नाही”…बापू मला प्रेमाने निरोप देतात.
मी कशासाठी आलो होतो हे बापू पार विसरुन गेलेले असतात.( आणि मी तर ते लक्षात ठेवण्याचा प्रश्नच नसतो. जिथं खुद्द भगवान श्रीकृष्णाच्या तोंडून भगवद्गीता ऐकली त्या कुरुक्षेत्रावर घोड्यांना खरारा करण्याचं काम कोण करणार ?)
युनोच्या आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेत भारताविरुद्ध वापरण्यासाठी चीनने आपला ‘व्हेटो’ जपून ठेवावा तसे बापूंनी दिलेले आमंत्रण मी आठवणींच्या कालकुपीत जपून ठेवलंय.

मला खात्री आहे , स्वर्गातल्या “इंद्रप्रस्थ” स्टेडियममधे , त्या आमंत्रणाच्या जोरावर मला VVIP स्टँडमधे सहज प्रवेश मिळेल. तिथे कर्णधार इंद्राचा ‘देवेन्द्र’ संघ विरुध्द मन्सूर अली खान पतौडीच्या ‘भारतीय’ संघातील कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ सुरु असेल. नाणेफेक जिंकून ‘ब्रम्हा’ आणि ‘विष्णू’ हे देवेंद्र संघाचे आघाडीचे फलंदाज मैदानात उतरले असतील. रमाकांत देसाईच्या अनुपस्थितीमुळे दुबळी झालेली भारतीय वेगवान गोलंदाजी फोडून काढत “ब्रम्हा-विष्णूंनी”, आणि खास करुन विष्णूंनी जोरदार सुरुवात केली असेल.( रमाकांत देसाईंचा तर वेगळाच किस्सा असेल. अजून { मेल्यावरही } रमाकांत माझ्या स्वप्नात येतो आणि पहिल्या चेंडूवर माझी विकेट काढतो अशी तक्रार हनिफ मोहम्मदने धन्वंतरी ऋषींकडे केली असेल. त्याचा हा मानसिक आजार कायमचा दूर करण्यासाठी तू स्वतः हनिफला घेऊन माझ्या आश्रमात ये अशी विनंती खुद्द धन्वंतरी ऋषींनी रमाकांतला करुन नेमकी आजचीच वेळ दिली असेल. त्यामुळे सज्जन व पापभिरु रमाकांत , विजय मर्चंटसरांची विशेष परवानगी घेऊन, हनिफला स्कुटरवर मागे बसवून धन्वंतरी ऋषींच्या आश्रमात गेला असेल.)

उपहारापूर्वी शतक करुन व्हिक्टर ट्रम्पर , चार्ल्स मॅकॅर्टनी,डॉन ब्रॅडमन, माजीद खान ,डेव्हिड वॉर्नर आणि शिखर धवनच्या पंक्तीत बसण्याचे आणि हे शतक लक्ष्मीला तिच्या वाढदिवसाची ‘खास भेट’ म्हणून अर्पण करण्याचे मांडे विष्णुजी मनातल्या मनात खात असतील.लेगस्पिनरला त्याचा टप्पा मिळून द्यायचा नाही या विक्स ,वॉरेल व वॉलकॉट या वेस्ट इंडियन त्रयीने शिकविलेल्या अलिखित नियमानुसार सुभाष गुप्तेच्या पहिल्याच षटकात त्याने कव्हर ड्राइव्हजच्या दोन खणखणीत चौकारांसह ११ धावा वसूल केल्या असतील. चिंतेत पडलेला भारताचा सर्वोत्कृष्ट कर्णधार (अर्थात महेंद्रसिंग धोनी व सौरभ गांगुलीची क्षमा मागून ) मन्सूर अली खान पतौडी मग भारताच्या सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकाशी ( अर्थात फारुख इंजिनीअर व सय्यद किरमाणीची क्षमा मागून ) नरेन ताम्हाणेशी सल्लामसलत करेल.

इतका वेळ थर्डमॅनला क्षेत्ररक्षण करणाऱ्या, कोणाच्या नजरेत न भरलेल्या एका कृश खेळाडूला हाक मारुन , त्याच्याशी दोन शब्द बोलून कर्णधार निर्धास्तपणे त्याच्या हाती चेंडू सोपवेल. त्याला पहाताच इतका वेळ विव्ह रिचर्डसच्या मिजाशीत वावरणाऱ्या विष्णूंच्या चेहेऱ्याचा रंगच उडेल. उपहारापूर्वी तर सोडाच पण दिवसभरात आपले शतक पूर्ण झाले तरी नशीब असे नासिर हुसेन अधिक मनमोहन कृष्णसारखे रडके भाव त्याच्या चेहेऱ्यावर येतील. आणि आपले ठेवणीतले स्मितहास्य करत , साडेचार पांच पावलांचा स्टार्ट घेत, ‘नरक’ एंडकडून “बापू” पहिल्या चेंडूपासून, गुडलेंग्थ स्पॉटवर चेंडूंचा चुंबक ठेवल्यागत,अचूक डावखुरी गोलंदाजी सुरु करतील. आता बराच वेळ आपल्याला काही काम नाही या खात्रीने रंभा, मेनका व उर्वशी या चिअरगर्ल्स फ्रेशरुमकडे वळतील. आणि प्रत्यक्ष देवांची सुरु झालेली साडेसाती, शिवाजीपार्कला पुनर्जन्म मिळेपर्यंत , मी अभिमानाने आणि कौतुकभरल्या नजरेने पहात राहीन.

शायर हैदर कुरेशी म्हणतो,
ये चंद घड़िया ही जन्नत नजी़र हो जायें ,
फ़िर अपने अपने जहन्नम मे हमको जलना है !

संदीप सामंत

८ – ३ – २०२०

Avatar
About संदीप सामंत 6 Articles
संदीप सामंत हे फेसबुकवरील लोकप्रिय लेखक आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..