नवीन लेखन...

आहाररहस्य-उपवास-नैसर्गिक उपवास भाग ९

सूर्य नसतो म्हणून……..

दिवस आणि रात्र यांचा, म्हणजेच सूर्य असण्याचा आणि नसण्याचा शरीरावर काय परिणाम होतो ते आज बघू.
फक्त मीच माझ्या मनानेच ठरवून हे नैसर्गिक उपवास सांगतोय असं नाही हो !
आज ससंदर्भच सांगतो.
अष्टांगसंग्रह या ग्रंथात सूत्रस्थान अकराव्या अध्यायातील 63 या श्लोकात दोन शब्द आलेले आहेत. तो श्लोक मुळातून देतो,

प्रातराशे तु अजीर्णे अपि,
सायमाशो न दूष्यति ।
अजीर्णे सायमाशे तु ,
प्रातराशो हि दूष्यति ।।

याचा अर्थ असा आहे, सकाळी घेतलेले अन्न योग्य रीतीने पचले नाही, आणि जर सायंकाळी जेवण केले तरी विशेष हानी होत नाही.
पण, सायंकाळी घेतलेले जेवण जर सकाळी पचले नसेल आणि पुनः सकाळी पुनः अन्नसेवन केले तर मात्र हानी अवश्य होते.

इथे मूळ सूत्राच्या अर्थापेक्षा, त्यातील दोन शब्दांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छीतो.
इथे जेवणाच्या दोन वेळा अगदी स्पष्टपणे सांगितल्या गेल्या आहेत. प्रातः आणि सायम्.
सकाळ आणि संध्याकाळ.
काळाचा विचार करता त्या काळी सकाळी आणि संध्याकाळी जेवणे हे अगदी सामान्य होते. त्यामुळे त्यावर आणखी विशेष भाष्य पुढील टीकाकारांना करावेसे वाटले नसेल. पण आता काळ बदललाय, सवयी बदलल्या आहेत, म्हणून हा मुद्दा पुनः पुनः फिरवून फिरवून सांगावासा वाटतोय. क्षमस्व !!!

सायंकाळी (आताच्या पद्धतीप्रमाणे रात्री) घेतलेले अन्न जर सकाळी पचले नसेल तर सकाळी भूक लागेपर्यत उपवास करावा, नाहीतर जास्त त्रास वाढतात. असे या श्लोकातून सांगायचे आहे.
.
आजकाल रात्री ऊशीरा जेवण्यामुळे अन्नपचन तर नीट होत नाहीच, पण भूक लागली नसली तरीही पुनः सकाळी नाश्त्याची वेळ झाली की नाश्त्याला हजर. हेच तर रोगाचे मूळ कारण आहे. भूक लागली की नाश्त्याच्या ऐवजी सरळ जेवावेच ना !

ग्रंथकार यापुढे श्लोक 64 ते 68 मधे विस्ताराने म्हणतात, (ते श्लोक आता सांगत नाही, सरळ अर्थ लिहितो.)
दिवसा सूर्यनारायणाच्या उष्णता आणि प्रकाशामुळे जसे कमळ क्रियाशील बनते. तसे प्राण्यांचे कोष्ठ, शरीरदेखील क्रियाशील बनते. अधिक हालचाली झाल्यामुळे शरीरातील रसरक्ताभिसरण, मलविसर्जन इ. गतीशी संबंधीत कार्ये मोकळेपणाने नीट होत असतात. एवढेच नव्हे तर या गतीशीलतेचा परिणाम म्हणून चिंतन मनन इ. मानसिक कार्येदेखील उत्तम होत असतात. त्यामुळे रसरक्तादि स्त्रोतसांमधे आलेला चिकटपणा आणि मनातील रज तम गुण नाहीसे होत असतात. क्लेद/आम पचून जातो. आणि वाहिन्या मोकळ्या रहातात.शुद्ध आणि स्वच्छ वाहिन्यांमधील आलेले अन्नरस देखील दूषित होत नाही. तोपण शुद्ध रहातो. जसे, शुद्ध दुधात चांगले ताजे दूध मिसळले तरी ते नासत नाही.

पण,
रात्रौच्या वेळी कोष्ठाच्या हालचाली किंवा शारिरीक व्यायाम कमी होतात, सूर्याची उष्णतादेखील नसते, स्रोतसे आकुंचीत अवस्थेत असतात, वाहिन्यांमधील गती अवरूद्ध झालेली असते, चिकटपणा वाढलेला असतो. मुख्य कोष्ठ देखील कमी कार्यशील असते. त्यामुळे क्लेदाचे पचनही नीटसे होत नसते. म्हणून रात्रौच्यावेळी स्रोतसे आणि वाहिन्या चिकटपणामुळे भरलेल्या रहातात.दूषित होतात. या दूषित वाहिन्यांमधे आलेला अन्नरसदेखील दूषित होत जातो.
जसे, भरपूर चांगल्या दुधात नासलेले थोडे दूध जरी घातले तर सर्वच दूध नासते तसे !

किती सुंदर आॅखोदेखा हाल वर्णन केला आहे.
अगदी असेच शरीरात होत असते. रात्री उशीरा जेवल्याचे हाल पण आपण अनुभवतोच.
पण……
हा पण आरोग्याच्या मधे अडथळा बनत असतो.
कळतंय सगळं पण वळत नाही, वळवता येत नाही, म्हणून सगळं खापर बदललेल्या लाईफस्टाईलच्या माथी किंवा कलीयुगाचा परिणाम यावर फोडले जाते.

जसे रेल्वे इंजिन सुरू आहे, गाडी इकडून तिकडे सारखी धावते आहे, तिला साहाजिकच इंधन जास्त लागेल,
पण सुरू गाडी नुसती प्लॅटफॉर्म वर उभी आहे, धावत नसेल, तर त्या इंजिनाला इंधन कमी लागेल.
तसेच दिवसा आपल्याला देखील आहाररसाची जास्ती गरज असते, पण रात्रौची गरज नसते.

सूर्य असण्याचा एवढा परिणाम होतो तर सूर्य नसण्याचा परिणाम पण, तेवढाच असरदार असणार ना !

म्हणून सूर्य नसताना, आत इंधन टाकू नये. बारा तासांचा नैसर्गिक उपवास करावा.
हेच खरे, हेच बरे !

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021
09.08.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..