नवीन लेखन...

आगर व आगरी : एक धांडोळा

A Historical Review of Agari Community

आगरी समाजाच्या उगमाबद्दलचा कयास :

आगरी समाजाबद्दल महाराष्ट्र शब्दकोश सांगतो की, हे लोक जेजुरीच्या खंडोबाची भक्ती करतात. आपल्याला हें लोकगीतांमधूनही दिसून येतें. आतां प्रश्न असा की, कोकणातील जमात देशावरील (घाटावरील) देवाची भक्ती कशी करते ? हा प्रश्न प्रस्तुत करण्याचें कारण स्पष्ट करणें आवश्यक आहे. ‘देश’ भाग व कोकण हे सह्याद्रीमुळे विभागलेले आहेत. तत्कालीन घनदाट जंगलांमुळे प्रवासही सोपा नव्हता. व्यापारी तांडे किंवा तीर्थयात्रा सोडल्यास, लांबचा प्रवास करणें फारच कठीण होतें. त्यामुळे ‘देश’ व कोकण या दोन्ही विभागांमधील संस्कृतीतही कांहींसा फरक आहे. पुरातन काळापासून पठारावरील लोक कोकणावर राज्य करीत असले (यादवपूर्वकालीन नृपती, यादव, बहामनी राजे, विजयनगरचे राजे, निजामशाही, आदिलशाही, शिवाजी इत्यादी); देशावरील मंडली कोकणात वास्तव्याला आली, (उदाहरणार्थ, कर्‍हाडे मंडळींनी एक हजार वर्षांपूर्वी कर्नाटक भागातून, आणि ‘देश’ भागातून कोकणात स्थलांतर केलेलें आहे); असें असलें तरी, कोकणातील लोकांनी मात्र पेशवेकाळापूर्वी ‘देशा’वर स्थलांतर केल्याचें दिसत नाहीं. खेळे-दशावतार कोकणात दिसतात, देशावर ते ठाऊक नाहींत. देशावरील लेझीम वगैरे खेळ कोकणात विशेष दिसत नाहीत. खाण्याचे प्रकार पाहिले तर, मासे तर दोन्ही विभागांमधे वेगळे आहेतच; पण कोकणातील आंबोळी, आयतें, पातोळे, कुळथाचें पिठलें वगैरे पदार्थ देशावर दिसत नाहींत. देवांचेही असेंच आहे. राम-कृष्ण-शंकर वगैरे सार्वत्रिक लोकप्रिय देव सोडले तर, ‘देश’ विभागातील व कोकणातील देवही जरा भिन्नच आहेत. विठोबा व वारकरी पंथ देशावर खूपच लोकप्रिय आहे, पण कोकणात तेवढा नाहीं. दत्त हें दैवतही मूलत: देशावरलें. दत्ताची कांहीं देवस्थानें मध्य प्रदेश व गुजरातमधेही आहेत, पण कोकणात दत्त फारसा दिसत नाहीं. रवळनाथ हें देवनाम कोकणात दिसतें, देशावर नाहीं. शांतादुर्गा, विजयादुर्गा या महाराष्ट्रातील कोकण भागापासून ते गोवा-मंगळूरपर्यंतच्या किनारपट्टीतील लोकांच्या कुलदेवता असतात, पण ‘देशा’वर त्यांचे नांव ऐकू येत नाहीं ; ‘देशा’वरील देवींची नावें भिन्न आहेत. परशुरामाचें मंदिर कोकणात आहे ; ‘देशा’वर परशुरामी असें आडनाव आढळतें, पण परशुरामाचें मंदिर नाहीं. गणपति ‘देशा’वर लोकप्रिय झाला तो प्रथम पेशव्यांमुळे व नंतर लोकमान्य टिळकांमुळे. म्हणूनच, हा प्रश्न महत्वाचा वाटतो की, कोकणातील आगरी हे ‘देशा’वरील खंडोबाचे भक्त कसे ?

याचें उत्तर मिळण्यापूर्वी आपण एक गोष्ट ध्यानात घेऊं. जमातींची नावें, त्यांच्या चालीरीती, आख्यायिका वगैरेंवरून त्यांचें मूळ सापडू शकतें. तसेंच हेंही लक्षात ठेवायला हवें की, वेगवेगळ्या जनसमूहांनी विविध कारणांनी एका भागातून दुसर्‍या भौगोलिक भागात कायमचें स्थलांतर केलेलें आहे. कांहीं उदाहरणें पाहूं या. शुक्ल-यजुर्वेदी माध्यंदिन ब्राह्मण महाराष्ट्राच्या ‘देश’ भागात (घाटावर) आहेत. (थोडेसे कांहीं काळापूर्वीच उत्तर कोकण, म्हणजे ठाणें जिल्हा भागात आलेले आहेत). पण, इतिहासाचार्य राजवाडे यांच्यानुसार ते जन , बौद्धकालीन ‘मध्यदेश’ इथून (मगधाच्या पश्चिमेकडील भागातून) उत्तर-बौद्धकाळात दक्षिणेत आलेले आहेत. सारस्वत काश्मीर-पंजाब भागातून आले असें राजवाडे सांगतात. कर्‍हाडे ब्राह्मणांचा उल्लेख आधी केलेलाच आहे. कर्‍हाड गाव देशावर आहे, मग कर्‍हाडे ब्राह्मण मूलत: कोकणातच कसे ? तर, ते १००० वर्षांपूर्वी कर्नाटक भागातून प्रथम कर्‍हाडला आले, व नंतर तेथून ते कोकणात उतरले.

( मध्य युगापर्यंत दक्षिण महाराष्ट्राचा भाग कर्नाटकाच्या अंतर्गत येत होता, हें सेतुमाधवराव पगडी यांनी दाखविलेलें आहे ). लाड ब्राह्मण गुजरातमधून विदर्भात आले. चित्पावन उत्तरेकडून आले, याचा मागेंच उल्लेख केलेला आहे. ते कुठून आले ? ते मूळचे ग्रीक वंशाचे असावेत असें मला वाटतें, हा उल्लेख मी आधी केलेलाच आहे. इ.स.च्या सुरुवातीच्या काळात, शक-कुशाण-हूण यांच्या एकामागोमाग आलेल्या रेट्यांमुळे ते उत्तर भारतातून खाली दक्षिणेकडे सरकले, असा माझा कयास आहे. शेवटी ते गुजरातच्या किनार्‍यावरून समुद्रमार्गानें कोकणात पोचले). लोणावळ्याजवळील ‘ठाकर’ जमात ही हिंदीभाषी प्रदेशातून आलेली आहे. गुजर हे उत्तरेकडून खाली ज्या प्रदेशात आले, त्याला हल्ली गुजरात राज्यप्रदेश म्हणतात. (आजही पंजाबमधे गुजरात नावाचें गाव आहे. उत्तरेकडील गुजरी महाल प्रसिद्ध आहे). गुजरातेतील पटेल
हे हरियाणामधून आलेले आहेत. अहिराणी भाषा खानदेशात बोलली जाते, पण अहीर हे महाभारतकाळात उत्तर भारत व गुजरात-सौराष्ट्र भागात होते. ( भाषाशास्त्रज्ञ म्हणतात की, अहिराणी ही हिंदीची बोली आहे). शिकंदरकालीन मालव गण उत्तर-पश्चिम भारतात होता, तो नंतर ज्या भागात उतरला त्याला माळवा असें नाव पडलें. तमिळनाडुमधील मध्ययुगीन पल्लव वंश उत्तरेकडून आलेला होता. अय्यर-अय्यंगार स्वत:ला श्रेष्ठ तमिळ समजतात. त्यांच्यापैकी एकानें मला सांगितलें की, १००० वर्षांपूर्वी त्यांच्या पूर्वजांना उत्तरेकडून मुद्दाम आमंत्रित करून आणवलें गेलेलें आहे.

माझें मत असें आहे की, जसें हे इतर समूह स्थलांतर करून आले, त्याचप्रमाणे ‘आगरी’ समाज हा महाराष्ट्राच्या ‘देश’ भागावरून (घाटावरून) हजार-दोन हजार वर्षांपूर्वी उत्तर कोकणात उतरलेला आहे. म्हणूनच, त्याचें दैवत खंडोबा आहे, कारण येतांना तो समाज आपलें दैवत बरोबर घेऊन आला. अर्थात् आतां हा समाज पूर्णपणें कोकणी म्हणावा लागेल, कारण त्याच्या त्या स्थलांतरानंतर ५० ते १०० पिढ्या, (होय, ५० ते १०० पिढ्या), लोटल्या आहेत.

समारोप :

मी भाषाशास्त्रज्ञ अथवा समाजशास्त्रज्ञ नाहीं., फक्त एक अभ्यासक आहे. माझ्या अभ्यासामधून माझ्या मतीला जें गवसलें, तें इथें मांडलेलें आहे. ज्ञानवंत जन त्यावर नक्कीच आणखी प्रकाश टाकूं शकतील. आगरी समाजाची भाषा, चालीरीती, इतर दैवतें, वगैरेंमधूनसुद्धा बरीच माहिती मिळू शकेल. प्रस्तुतचा लेख हा एक छोटासा प्रयत्न आहे. तो पुढच्या अभ्यासाला चालना देईल, अशी आशा आहे.


संदर्भ :

• राजवाडे लेखसंग्रह. सं. – तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
• आदर्श मराठी शब्दकोश. संपादक – प्र. न. जोशी
• मराठी व्युत्पत्ति कोश. सं. – कृ. पां. कुलकर्णी ; पुरवणी संपादक – श्रीपाद जोशी
• Saurus शब्द-कौमुदी अमरकोश – (मराठी). सं. – मो.वि.भाटवडेकर.
• महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश. सं. – य. रा. दाते , चिं. ग. कर्वे
• महाराष्ट्र शब्दकोश. सं. – य. रा. दाते, चिं. ग. कर्वे, आबा चंदोरकर, चिं. शं. दातार
• मराठी-मराठी-इंग्रजी पर्याय शब्दकोश. सं. – वि. शं. ठकार
• समांतर कोश हिंदी थिसारस. सं. – अरविंद कुमार, कुसुम कुमार.
• बृहत् प्रामाणिक हिंदी कोश. सं. – आचार्य रामचन्द्र वर्मा ; संशोधन-परिवर्धन – डॉ. बदरीनाथ वर्मा
• भाषा शब्द कोश – (हिंदी). सं .- रामशंकर शुक्ल ‘रसाल’
• सुलभ हिंदी मराठी कोश. सं. – य. रा. दाते
• अभिनव शब्दकोश – ( हिंदी-मराठी, मराठी-हिंदी). सं. – श्रीपाद जोशी
• भार्गव बाल हिंदी कोश. सं. – आर्. सी. पाठक
• उर्दू-हिंदी शब्दकोश. सं. – मुहम्मद मुस्तफ़ा खाँ ‘मद्दाह’
• उर्दू-मराठी शब्दकोश. संकलक-संपादक – श्रीपाद जोशी ; समीक्षक-संपादक – एन्. एस्. गोरेकर
• Sanskrit-English Dictionary. Editor – V. S. Apte
• A Dictionary of Old Marathi. Editor – S.G. Tulpule, Anne Fellhaus
• The New Standard Marathi-English-Marathi Dictionary. Editor – M. S. Sirmokadam
• English-Hindi-Marathi शब्दानंद कोश. Editor – सत्वशीला सामंत
• Gala’s Pocket Dictionary ( English-Gujarati). Compiler : B. L. Shah
• Longman Advanced American Dictionary
• Longman Family Dictionary
• Hobson-Jobson
• Wikipedia.
• Webster’s Encyclopedic Unabridged Dictionary.

— सुभाष स. नाईक

 

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..