नवीन लेखन...

मराठी बिराठी

न्यूनत्वातून एखादी भाषा शिकण्याची ऊर्मी निर्माण झालेल्या मध्यमवयीन महिलेच्या प्रयत्नांची मराठी कोंदणातली गोष्ट ‘इंग्लिश विंग्लिश’ या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येते. योग्य मराठी न येणारीही अनेक मराठी माणसं जगभरात आहेत. त्यांना मराठीबाबत असं न्यूनत्व वाटत नाही. ‘अक्षरास हसू नये,’ या वाक्याप्रमाणे ‘भाषेस हसू नये,’ असं कुणी म्हणत नाही. त्यामुळेच केवळ व्याकरणात्मकदृष्ट्याच नाही तर वाक्यरचनेतही प्रचंड चुका असलेल्या जाहिराती आणि मजकूर मराठी वाचकांच्या माथी मारण्याचं धाडस लोकांना होत राहतं.

छशिट हा शब्दप्रयोग मुंबईच्या लोकलमध्ये पाहायला मिळतो. छशिट म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनस. जाहिरातींमधल्या या शब्दप्रयोगावर आक्षेप नोंदवूनही तो पुन:पुन्हा येत राहातो. इंग्रजी सीएसटीप्रमाणे मराठी छशिट आम्ही करतो, असं त्यावरचं संबंधिताचं समर्थन असतं. मात्र इंग्रजीत अ‍ॅब्रिव्हिएशन्स चालतात, मराठीत किंवा हिंदीत ते वाईट दिसतं. मराठी लोक तक्रार करत नाहीत, अशी त्यांची सोयीस्कर समजूत होती. वर्तमानपत्रं आणि इतर माध्यमांतही अनेक जाहिराती चुकीच्या मराठीतून मांडलेल्या दिसून येतात. एजन्सीतला जो कुणी अमराठी कॉपीरायटर असतो तो ‘चलताय’ अशा मानसिकतेतून त्या जाहिराती पाडत असतो. त्यावरही आक्षेप हवाच. कारण एका मराठी कॉपी रायटरचं काम त्यामुळे हिरावलं गेलेलं असतंच, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठीत कसंही लिहिलं तरी चालतं ही वृत्ती ठेचणं गरजेचं आहे.

रेल्वेच्या अनेक स्थानकांवरच्या पाट्यांवरचं मराठी चुकलेलं असतं. प्लॅटफॉर्मवरच्या इलेक्ट्रॉनिक फलकावर हिंदी ‘धिमी’ला मराठी प्रतिशब्द नाही. मराठीतही लोकल धिमीच असते. हा काही मराठीत प्रचलित हिंदी शब्द नाही. मराठी लोक धिम्या गाडीला स्लो ट्रेन म्हणतात, हीही एक गंमतच.

मराठी चुकीचं लिहिलं, वाचलं, बोललं गेल्याचं कुणाला वैषम्य वाटत नाही हे चांगलं नाही. इंग्रजी नीट बोलता येत नाही, या न्यूनगंडाने पछाडलेल्या व्यक्तिरेखेवर एक आख्खा सिनेमा आलाय. ‘इंग्लिश-विंग्लिश’ या सिनेमाबद्दल सध्या सर्वत्र लिहून येतंय. सिनेमात श्रीदेवी एक महाराष्ट्रीय मध्यमवयीन महिला दाखवली आहे. प्रत्यक्षात घरावरची गोडबोले नावाची पाटी वगळता सिनेमात मराठीपण दिसत नाही. पटकथेच्या मराठी कोंदणामुळे आणि दिग्दर्शिका गौरी शिंदे या मराठमोळ्या नावामुळे अपेक्षा निर्माण होतात. आणि सिनेमातला मराठी घटक शोधायचा चाळा आपण करत राहतो.

ही आपली जरा आणखी एक वेगळीच अडचण होऊन बसली आहे. म्हणजे राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठीपण ‘कॅरी’ करणा-यांविषयी आपल्याला विलक्षण अभिमान वाटायला लागतो. म्हणजे नाना पाटेकर वगैरे सारखे स्टारलोक बॉलिवुडच्या व्यासपीठावरून दणक्यात मराठी वगैरे बोलतात तेव्हा आपण सुखावून जातो. मराठीने पुन्हा अटकेपार झेंडे लावल्याचा आनंद-बिनंद आपल्याला होतो. हे असं असतं तोपर्यंत ठीक आहे. पण मराठी माणसाने मराठीपण आंतरराष्ट्रीय पातळीवर कॅरी करणं सोडलं की मात्र आपण नाराज होतो. सचिन तेंडुलकरने मी आधी भारतीय आहे, असं म्हटलं की मग त्याची १०० बिंदूवर असलेली लोकप्रियता ९७ वर वगैरे येते. सचिनसारखीच काही मराठी माणसं राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजू लागली की, एक नैसर्गिक आनंद होतोच. पण त्या पदावर गेला की तो राष्ट्रीय किंवा जागतिक होतो. त्याच्या सार्वजनिक वर्तणुकीतही आपण मराठीपणाचे अंश शोधत राहतो आणि मग गल्लत होत राहते.
ही आपली मराठी समूह म्हणून असलेली निजखूण (आयडेंटिटी) बाळगणं आपल्या अस्मितेशी निगडित झालेलं आहे. अस्मिता आणि भाषिक आग्रह पराकोटीला जाऊ लागले की, त्याचं राजकारण होऊ लागतं. आपले आग्रह दुराग्रहात कधी परिवर्तित होतात ते आपलं आपल्यालाही कळत नाही. पुरोगामी आणि बुद्धिमान मराठीवादी त्यावरही आपलं समर्थन तयार ठेवतात. इतर भाषिक समूह त्यांची निजखूण बाळगू लागल्यामुळे ही आमची प्रतिक्रिया आहे, असं जोरकसपणे सांगतात. या सगळ्या भानगडींमुळे आपण भाषावादी न राहता प्रतिक्रियावादी बनत जातो. जगातल्या बहुतांश फुटीरतावादी आंदोलनांची सुरुवात भाषिक दुराग्रहांमधून झालेली आहे. मात्र हे दुराग्रह जोपासताना प्रत्यक्षात त्या भाषेच्या उत्थानासाठी आपण किती प्रयत्न करतो, हे मात्र गुलदस्त्यातच राहतं.

चांगले मित्र आणि क्रियाशील मुक्तपत्रकार असलेले दिलीप जोशी यांच्याशी या भाषिक दुराग्रहांबाबत खूप वेळा चर्चा झडल्या होत्या. या विषयावर त्यांची मार्मिक मल्लिनाथी असते. ते म्हणतात, ‘‘आपल्याला आपल्या भाषेचा सार्थ अभिमान असावा. दुराभिमान नसावा. बंगाली लोक जगभर मोठमोठ्या पदावर गेलेले आहेत. पण ते आपसात अत्यंत आस्थेने बंगालीतच बोलतात. एकसुरात बंगाली गीते गातात. अचूक बंगालीचा आग्रह धरतात. मराठी भाषिकांनाही बहुभाषिक होणं आवश्यक आहे. न्यूनत्वातून मराठीचा आग्रह धरणारे भाषेला मागे घेऊन जातात. मुळात भाषा प्रवाही होण्यासाठी तिने पारिभाषिक शब्द पचवायला पाहिजेत. क्रियापद वळवून भाषेत पचवली की भाषा ओघवती होत जाते. उदाहरणच द्यायचं झालं तर ‘तहसीलदाराने मामलेदाराला जप्तीचा हुकूमनामा बजावण्यास फर्मावले’ या वाक्यात एकही मराठी शब्द नाही. सगळे फारसी आहेत. पण फर्मावले हे क्रियापद मराठी पद्धतीने चालवल्यामुळे आख्खं वाक्य मराठी झालं. मराठीची ही पचवण्याची ताकद मोठी आहे. आणि ती तशीच राहिली पाहिजे. तसवीर आपण तसबीर म्हणून सामावून घेतली. कॉटची खाट केली, पँटलूनची पाटलोण केली. ओढूनताणून शासकीय मराठी बोलायची आवश्यकता आहे, असं वाटत नाही. परवा एक जण माझं ‘लक’ बेकार आहे असं म्हणाला. त्याला सुधारण्यासाठी दुसरा म्हणाला, लक नको नशीब म्हण. मी त्याला म्हणालो की, तसं तर नशीब पण मूळ फारसी आहे, भाग्य हा शब्दच वापरावा लागेल. दुराग्रह मांडताना भाषेचा हा पैलू आपण दुर्लक्षित करत असतो. दिनांकसाठी बोलताना आजही तारीख हाच शब्द आपण जास्त वापरतो. म्हणजे आपण भाषेत अनेक गोष्टी पचवत जातो. मालवणीत ‘शिक’ पडलोय, हे इतकं मुरलंय की तो मूळ इंग्रजी शब्द आहे तेही लक्षात येत नाही. जोरजबरदस्तीने मराठी शब्द वापरणं योग्य नाही. परवाच वाचलं की, शासकीय मराठीत फाइलला नस्ती हा शब्द आहे. मुख्यमंत्र्यांनाही हा शब्द माहीत नव्हता. आता फाइलला नस्ती म्हणणं म्हणजे नस्ती उठाठेवच झाली.

आपण इंग्रजी बोलायचा प्रयत्न करतो तो आपला एलाइट क्लास प्रस्थापित करण्यासाठी. ही वसाहतीची मानसिकता आहे. इंग्रजी आल्यामुळे शहाणपण यायला नको तर शहाण्या माणसाना इंग्रजी यायला हवं. त्यासाठी बहुभाषिक होणं हाच एक मार्ग आहे, तरच आपण अभिमानाने मराठी बोलू शकू.’’

जोशींशी बोलत असताना मराठीच्या पचनी पडलेला डाम्बिस हा शब्दही आठवला. गोरे सोजिर (सोल्जर्स) स्थानिकांना ‘डॅम बीस्ट’ अशी शिवी द्यायचे. या शिवीतूनच मराठी डाम्बिस ही शिवी उदयाला आली. मात्र मराठीच्या सार्थ अनुभवाचा त्यांचा मुद्दा नेहमीच पटणारा आहे. हल्ली काय झालंय की मराठीचा आग्रह धरणं म्हणजे व्याकरणापासून वर्णमालेपर्यंत अनेक गोष्टींच्या सुधारणेचा आग्रह धरणं. मराठी वर्णमालेवर कोलतेंच्या समितीने अनेक वर्ष संशोधन करून नंतर काम थांबवलं. सरोजिनी वैद्य यांनी राज्य मराठी विकास संस्थेच्या कालावधीत वर्णमाला पुन्हा दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला होता. बाराखडी की चौदाखडी या गदारोळात आपल्या कचतपय वर्णमालेतले बरेच वर्ण न वापरल्यामुळे बाद झाले आहेत. मात्र ही वर्णाची गोष्ट अशासाठी की, सध्या संगणकावर आणि अगदी स्मार्टफोनवरही मराठी वापरणं सुरू झालं आहे. ही सगळी युनिकोडची मेहेरबानी. कार्यालयातीलच एक सहकारी त्याच्या नवीन स्मार्टफोनवरचं मराठी टायपिंगचं अ‍ॅप्लिकेशन कौतुकाने दाखवत होता. मराठी इबुक्सचाही मार्ग त्यामुळे आता मोकळा झालाय. मात्र त्यावर अवतरणं आणि प्रश्नचिन्हासाठी सुलभ पर्याय नाहीत. ‘-या’ अजून टाइप करता येत नाही. ‘य’ला जोडली जाणारी ही आय लॅश अजून युनिकोडमध्ये टाइप करता येत नाही. अ‍ॅक्शनमधला ‘अ‍ॅ’ येत नाही. काही नव्या व्हर्शन्समध्ये ते आहे असं म्हटलं जातं. मात्र त्यामुळे खूप काही अडलंय असं नाही. पण त्यामुळे मराठीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढेल, अशी आशा वाटतेय.

अनेक भाषांचे अभ्यासक आणि लेखक अविनाश बिनीवाले यांच्याशी ब-याचदा याविषयी बोलणं होतं. ते सांगतात, ‘‘पन्नासच्या दशकात केंद्र सरकारने देवनागरीच्या विकासासाठी एक कमिटी नेमली होती. त्यांनी बरेच फेरफार केले होते. -हस्व वेलांटीसाठी त्यांनी ती दीर्घच ठेवून काना अर्धा केला होता. या लिपीला लोकांनी लखनऊ लिपी म्हणायला सुरुवात केली. आणि लंगडी लिपी म्हणून हिणवून ती बाद करून टाकली. लिपीमधले बदल जरी लॉजिकल असले तरी ते लोकांना रुचत नाहीत. आणि असे बदल करूही नये यावर अभ्यासकांचं एकमत झालंय. मल्याळी भाषेत पंचवीस वर्षापूर्वी असे बदल केले गेले आणि त्याचे तोटे त्यांना आता कळू लागलेत. त्यामुळे नव्या पिढीला जुनं वाचता येत नाही. जुनी पुस्तकं एकदम रद्दी होऊन जातात. इंग्रजीतही त्याबाबतीत असे बदल करण्याचा प्रयत्न झाला होता आणि तो सोडून देण्यात आला. गुडघ्यासाठी असलेला इंग्रजी भाषेतल्या शब्दाचा उच्चार ‘क्नी’ असाच होता म्हणून त्याचं स्पेलिंगही तसंच होतं. हा उच्चार पुढे नी झाला आणि मग स्पेलिंग बदलण्याचा प्रयत्न झाला तर ते स्वीकारलं गेलं नाही. म्हणून नी उच्चार असूनही स्पेलिंग मात्र क्नीसारखंच आहे. भाषा आणि लिपीबाबत लॉजिकल वाटले तरी लोकांना बदल स्वीकारार्ह होत नाहीत.

सावरकरांनीही मराठीत काही बदल सुचवले होते. मात्र त्यांनी काही जुजबी काटछाट केली होती. त्यामागचा उद्देश होता तो खिशात मावणारा टाइपरायटर विकसित करण्याचा. आता संगणक आलेत. त्यामुळे टंकलेखनातली अक्षरांची उणीव भासण्याची आवश्यकता नाही. पण भाषा टिकवण्यासाठी ती आधी वापरणे गरजेचे आहे.’’

बिनिवालेसरांनी भाषेतल्या मूलभूत बदलांना समाज स्वीकारत नाही, हा एक महत्त्वाचा अभ्यासू विचार मांडला. त्याचमुळे आपण अगदी संस्कृतमधले दोन हजार वर्षापूर्वीचे ग्रंथही वाचू शकतो. त्याचवेळी सावरकरांची खिशातला टंकलेखक ही खूपच पुढची संकल्पना होती. आज खिशातल्या स्मार्टफोनमुळे त्याही पुढे आपण येऊन पोहोचलो आहोत. भाषा वापरण्यातल्या तांत्रिक अडचणी आपण केव्हाच पार केल्यात तरीही आपली भाषा ओघवती ठेवण्यासाठी ती वापरली गेली पाहिजे, हा विचार महत्त्वाचा आहे. इंग्रजीने ती पाचनशक्ती कमावलेली आहे, मराठीला आपला कोठा नाजूक ठेवून चालणार नाही. आपण उदार राहायला हवं, पण इतकंही नाही की कुणीही येऊन आपल्या भाषेची लक्तरं वेशीवर टांगावीत. नाहीतर ‘इंग्लिश विंग्लिश’प्रमाणेच आपल्यालाच एक दिवस ‘मराठी बिराठी’ असा सिनेमा काढावा लागेल.
संदर्भ – 
http://prahaar.in/

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..