नवीन लेखन...

डायरीतील विस्कटलेली पाने – भाग एक

(Deliberate mistakes in the systems hampers progress of the nation.)

डायरी तशी साधीच होती. पण जाडजूड होती. खादीच्या कापडाचं कव्हर होतं. वरवर सुस्थितीत असावी असं वाटत होतं. पण उघडल्यावर मात्र डायरीची पानं विस्कटल्यासारखी दिसत होती. डायरी चाळताना आणखी एक गोष्ट लक्षात आली. सुरुवातीच्या पानांवरचं अक्षर चांगलं होतं. काहीसं मोडी लिपीच्या वळणावर गेलेलं आणि शेवटी शेवट मात्र अक्षरात बदल होत गेलेला दिसत होता.

एखाद्या शंभर वर्षांच्या म्हाताऱ्यानं अट्टहासानं लिहिण्याचा प्रयत्न करावा आणि कापऱ्या हातानं लिहिताना अक्षर वेडंवाकडं व्हावं, अक्षरात गिचमीड दिसावी, अंतरा अंतरानं लिहिलेल्या अक्षरांमुळं शब्दाचा नेमका बोध होऊ नये, तसं काहीसं लेखन झालं होतं. पण सगळी डायरी मी चिकाटीनं वाचली आणि थक्क झालो .

डायरीच्या पहिल्याच पानावर श्री गजानन प्रसन्न असं किंवा तत्सम काही न लिहिता, भारतातील प्रमुख राजकीय पक्षांची निवडणूक चिन्ह चितारली होती आणि त्याखाली ‘लोकशाही चिरायू होवो’, असंही लिहिलेलं होतं.

खरं तर सगळी डायरी वाचावी अशी इच्छा होती, पण प्रत्यक्षात कापऱ्या हातानं लिहिलेल्या आणि विस्कटलेल्या पानांपासून मी सुरुवात केली आणि धक्क्यावर धक्के बसत गेले. हे काहीतरी विलक्षण होतं. अनाकलनीय होतं.

आत्ता याक्षणी मला त्यातल्या काही मोजक्या परिच्छेदातील घटना आठवतात…

पान क्रमांक दोनशे नव्वद

हॉलमध्ये फक्त फिरणाऱ्या पंख्याचा आवाज येत होता. सगळे सचिंत होऊन एकमेकांकडे बघत होते. गुप्तचर खात्याचा अहवाल पक्षाच्या निवडणूक समितीच्या सभासदांना कळला होता. लोकसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकांत पक्षाला साधं बहुमत सोडा पण दोन अंकी संख्या गाठता येईल की नाही याचा संदेह होता. कुणाला काही सुचत नव्हतं. नवं धोरण, नवं आश्वासन आणि नवीन चेहरे यांचं काय करावं असा संभ्रम निर्माण झाला होता. अध्यक्ष सर्वांकडे बघत होते. त्यांची नजर टाळण्यासाठी प्रत्येकजण मान खाली घालत होता. अचानक मला काहीतरी सुचलं आणि मी हात वर केला. अध्यक्षांनी मला खुणावलं. मी म्हणालो, “आपल्या पक्षाला प्रचंड बहुमत मिळेल अशी एक योजना माझ्याकडे आहे. आपण आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दारिद्र्य रेषेखालच्या लोकांना मोफत अन्नधान्य देण्याची घोषणा करू या. त्यांच्या मुलांचं शिक्षण मोफत करू या. जे जे म्हणून मोफत देता येईल ते ते देऊ या. संपूर्ण देशात मोफत च्या स्कीमचा धुरळा उडवू या.”

आणि आश्चर्य म्हणजे सगळ्यांना माझी योजना आवडली. सगळ्यांनी अभिनंदन केलं. पक्षातला माझा भाव वधारला. अध्यक्ष म्हणाले, “तुमचा योग्य तो सन्मान केला जाईल, तुम्ही आमच्यासाठी देवदूतच आहात.”

पान क्रमांक तीनशे

पक्षाच्या उमेदवारांची शेवटची यादी प्रसिद्ध झाली. त्यातही माझे नाव नव्हते. गोड बोलून माझा पत्ता कट केला होता बहुधा.

पान क्रमांक चारशेवीस

माझ्या योजनेमुळे पक्षाला निर्विवाद बहुमत मिळालं होतं. पण त्या विजयोत्सवात मला कुठेही स्थान नव्हतं. अध्यक्ष तर ओळखही दाखवत नव्हते, उलट भेटायला गेल्यावर अपमानच वाट्याला आला. वाईट वाटलं.

पान क्रमांक सहाशे

आता शंभरी पार झाली. जगायची इच्छाच मेली. घरी दारी कुणी विचारत नाहीत. सगळीकडून मानहानी. कुत्सित टोमणे. राजकारणात अगदी किचन कॅबिनेट मध्ये असूनही घराचं, मुलांचं संसाराचं भलं करून घेता आलं नाही म्हणून रोज येताजाता घरात शिव्याशाप, लाथाडणं नित्याचं झालंय.
त्याचं काही वाटत नाही पण आता देशाचा विचार मनात येतो आणि त्यावेळी पक्षहितासाठी केलेल्या मोफतच्या योजना आता उरावर येऊन बसतात.
पक्ष निवडून आला, पण त्यानंतरच्या पहिल्याच बैठकीत, देशाची आर्थिक स्थिती खालावल्याने मोफत देण्यात येणाऱ्या सगळ्या गोष्टी, आर्थिक स्थिती सुधारल्यावर देण्यात याव्यात असा ठराव झाला. वाईट त्याच गोष्टीचं वाटतंय.

भविष्यात सगळ्याच राजकीय पक्षांनी जनतेला सगळ्याच गोष्टी मोफत द्यायची आश्वासनं दिली तर! वीज, अन्नधान्य, शिक्षण, पाणी, प्रवास, औषधं, वेगवेगळे भत्ते, सगळ्या प्रकारचं इंधन, राहण्याची जागा आणि जगण्यासाठी लागणाऱ्या सगळ्याच गोष्टी मोफत पुरवल्या जाऊ लागल्या तर! तसं आश्वासन देऊन नंतर मतदारांच्या तोंडाला पानं पुसली जाऊ लागली तर? किंवा सगळ्याच गोष्टी मोफत पुरवल्या जाऊ लागल्या तर? या देशाचं काय होईल? देशाच्या आर्थिक स्थितीचं काय होईल? या देशातल्या भावी पिढ्यांचं काय होईल? शिक्षणाचं, नोकऱ्यांचं, शेतीचं, उद्योगांचं भवितव्य काय? सतत मोफत मिळत गेल्यानं, देश सुस्तावेल, त्याचं काय?

मला काही सुचत नाहीये. पक्ष वाचवण्यासाठी मी मोफत योजना सुचवली खरी. पण आता जाणवतंय की ती मी मोठी चूक केली होती. मी माझ्या हातानी देशाला नकळत अधोगतीला नेलं होतं. दूरदृष्टी नव्हतीच आपल्याला. पुढच्या काळात काय होईल देशाचं? प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांचा विचार का नाही मनात आला? त्यांच्यावर आणि मध्यमवर्गीयांवर भविष्यात काय वाढून ठेवलं जाईल, याचा का नाही विचार केला? पण आता पश्चात्ताप करून आणि जगून काय उपयोग?

डायरी उगीचंच लिहायला घेतली.

डायरीतील पुढच्या पानावरील लेखन पुसट झाले होते. बहुधा अश्रू पडले असावेत त्यावर, आणि उर्वरित सगळीच पाने विस्कटून गेली होती.

डॉ . श्रीकृष्ण जोशी.

९४२३८७५८०६

रत्नागिरी.

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 109 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..