नवीन लेखन...

बंड्या आणि शिक्षणमंत्री

“शाळेचा शोध कुणी लावला?” हा प्रश्न माझ्या सहावीत जाणार्‍या बंड्याला सिनीयर केजीत गेल्यापासून भेडसावतो आहे. खेळणी, कार्टुन आणि छोट्या भीमच्या जगात सुखी असता असता इवल्याशा लहान जीवाच्या मागे हा शाळा नावाचा प्रकार कशासाठी असतो हा त्याचा रास्त प्रश्न आहे. शाळा एकवेळ परवडली पण ट्युशन? ह्या ट्युशनचा शोध ज्याने कुणी लावला असेल त्याला कुठेही गाठून चोपायला (शक्यतो गनिमी काव्याने) बंड्याबरोबरची गँग मागे पुढे पहाणार नाही. खरे म्हणजे ही चिमुकली मुले शाळा, ट्युशन आणि अभ्यास या विषयांवर जाम फ्रस्ट्रेट आहेत. त्यांना थोडे बोलते केले की लगेच सांगून टाकतात.

बरं, बंड्याच्या दिवसाची सुरवातही पहा, सकाळी सहाला बस हलणार. त्याआधी हा बसमध्ये बसला पाहिजे. या बाळगोपाळांना सकाळसकाळी झोपेतून उठवून तयार करणे म्हणजे एक चॅलेंज असते. अंघोळ करून कपडे घालून जाता जाता केसांवरून कंगवा फिरवतानाही त्यांची मान कलंडत असते एवढे ते झोपेच्या अधीन असतात. बंड्या तर बसमध्ये बसल्या बसल्याच पेंगायला लागतो.

याउलट शाळा सुटल्यावर तो जेव्हा परत येतो, तो शाळेतून आलाय की कुस्तीच्या आखाड्यातून अशी शंका येण्याइतपत त्याचा अवतार असतो. रोजच्यारोज कपडे मळवलेच पाहिजेत हा त्याचा नियम आहे. दोन मुलांची मारामारी झाल्यावर होतात तसे केस, पाठीवर विस्कटलेले दफ्तर आणि एका हाताने गोफण फिरवल्यासारखे शाळेचे आयकार्ड फिरवत घामाघुम होऊन आला की तो नॉर्मल आहे हे समजावे.

पहिलीची परीक्षा झाल्यावर बंड्या घरी आल्या आल्या म्हणाला होता “आता स्कुल बस झाले.” का म्हणून विचारल्यावर “आता एबीसीडी आणि इंग्लिश शिकलो की. वाचायला येते, लिहायलाही येते, मॅथ्सही माहित आहे, आता आणि अजून काय शिकायचे आहे?” हा त्याचा भाबडा प्रश्न होता.
लिहीण्याचा त्याला प्रचंड कंटाळा आहे. म्हणजे शाळेत शिक्षक लिहून देतात त्यावेळी हा लेकाचा काय करत असतो कुणास ठाऊक! घरी येऊन अमक्या क्लासचे मी नाही लिहीले म्हणून सांगतो. मग बायकोची धावपळ सुरु होते. वॉट्सअॅप इथे चांगल्या कामाला येते. आज शाळेत काय झाले असे त्या पालकांच्या गु्रपवर टाकले की कोणतरी पालक त्या तासाला शाळेत काय लिहून दिले आहे त्याचा फोटो घेऊन टाकतो आणि वेताळासारखी मागे लागून ही त्याला लिहायला लावते. त्याचा अभ्यास म्हणाल तर हाच. म्हणजे शाळेत झालेले सगळे पूर्ण आहे आणि स्वत:हून तो कधी पुस्तक घेऊन वाचत बसलाय हे मला त्याच्या बालपणापासून आठवत नाही.

अगदी परीक्षेतही जेवढ्यास तेवढेच लिहीतो. एखाद्या प्रश्नात कोणतीही दोन उत्तरे लिहा म्हणून सांगितले की हा दोन म्हणजे दोनच लिहील. एखादे चुकले तर बॅकअपला असावे म्हणून तिसरे लिहावे ही भानगड नाही. दोनच का लिहीलीस म्हणून ओरडले की तो ‘फक्त दोन’ असे लिहीलेला कंस दाखवतो.
हा अभ्यास सोडून मात्र बाकीच्या सगळ्या विषयात त्याला गती आहे. पोकेमॉनची नावे सांगा म्हणाले की लगेच चालू होईल. कबड्डी, फुटबॉल किंवा आयपीएल मधले विचारा लगेच सांगेल. कॅरम काढा, एकदा खेळायला बसल्यावर रात्री झोपायलादेखील तो उठू देणार नाही. तेच तुझे पाढे पाठ आहेत का म्हटल्यावर त्याला झोप येते. काहीतरी जबरदस्तीने वाचायला किंवा लिहायला दिल्यावर शास्त्रज्ञ जसे अतिश्रमामुळे सगळया शोधांचे पेपर आजुबाजूला पडलेले असतानाही त्यात झोपतात, तशी त्याची अवस्था होते.

प्रसंग पहिला : मी आपल्या शिक्षणमंत्र्याना ट्वीटरवर फॉलो करतो. म्हणजे मी अतिशय टेकसॅव्ही आहे अशातला प्रकार नाही. खूप पाऊस वगैरे पडल्यावर ते लगेच महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांना सुट्टी वगैरे देतात म्हणून. एकदा बाहेर धो धो पाऊस पडत असताना ट्वीटर पहात बसलो होतो. अगदी घरात बसलो असतानाही होडीत बसलो असल्याचा फील येत होता. बंड्या आता हमखास उद्या शाळेला सुट्टी असणार म्हणून खुश होता पण मंत्रीसाहेब काही सुट्टी देत नव्हते.

बाहेर पावसाचा धुमाकुळ चालू असताना मी मोबाईलमध्ये एवढा घुसून काय पहातोय याचे त्याला आश्चर्य वाटले. मी त्याला मोबाईल दाखवला. मी मंत्रीसाहेबांचे ट्वीट चेक करत होतो.
“कोण आहेत ते काका?” बंड्याचा अजून एक भाबडा प्रश्न.
“माहित नाहीत तुला?”
“नाही.”
मग मी त्याला सांगितले, “या काकांकडे एवढी पॉवर आहे की आज यांनी सांगितले की उद्या शाळेला सुट्टी, तर महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळा उदया बंद!”
बंड्याच्या चेहर्‍यावर साहेबांबद्दल आदराची भावना आली.
“काय रे? भारी आहेत ना हे काका?”
“मग! एक नंबरच! माझ्याकडे जर अशी पॉवर असती तर पहिल्यांदा सगळ्या शाळा बंद करून मुलांना खेळायला सोडा अशी ऑर्डर सोडली असती.”

प्रसंग दुसरा : परवा एक संप होता. आजकाल संप एवढे झालेत की कारण लक्षात ठेवणे मुश्किल झाले आहे. सगळ्या मुंबई आणि ठाण्यातल्या शाळांना सुट्टया जाहीर झाल्या होत्या पण बंड्याच्या शाळेचा काही मेसेज येईना. बंड्या उद्या शाळेला जावे लागणार की काय म्हणून हवालदिल झालेला!
“पप्पा, त्या काकांनी तरी सुट्टी दिली आहे का ते बघा.”
ते काका म्हणजे ट्वीटरवाले शिक्षणमंत्री!
मी चेक केले तर तिथेही सुट्टी नव्हती. बंड्या अजून निराश झाला.
शेवटी झोपता झोपता मेसेज आला आणि तो सांगितल्यावर खुश होऊन बंड्याने हातातली वही भिरकावून दिली, “याला म्हणतात पॉवर. मी खूप शिकून शिक्षणमंत्री होणार. आणि एकदा का शिक्षणमंत्री झालो की सगळ्या शाळा पहिल्यांदा बंद करणार!”
“शाळा बंद करून काय करणार मग?”
“त्याठिकाणी फुटबॉल, क्रिकेटची आणि कबड्डीची प्रॅक्टिस सेंटर्स चालू करणार. सगळ्या मुलांना नुसते खेळा म्हणून सांगणार. खेळून भुक लागली की जेवायचे आणि पुन्हा ग्राऊंडवर पळायचे. काय मज्जा येईल. सगळी पोरं खुश होतील.”
कल्पनाशक्तीचा एक अचाट नमुना माझ्यासमोर दिवास्वप्न बघण्यात रंगला होता. मला त्याच्या कल्पनाशक्तीची मौजही वाटली आणि कारण काहीही असो, आमच्या बालपणासारखे त्यांना मनोसक्त खेळता येत नाही याची खंतही!

— © विजय माने, ठाणे

https://vijaymane.blog/

Avatar
About विजय माने 21 Articles
ब्लॉगर व खालील पुस्तकांचे लेखक : १. एक ना धड (सर्वोत्कृष्ट विनोदी पुस्तक २००८. महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा राज्यपुरस्कार) २. एक गाव बारा भानगडी ३. All I need is just you! (English). मराठीतील ‘आवाज’ व इतर अनेक नामवंत दिवाळी अंकातून लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..