नवीन लेखन...

‘हाजी अली’ आणि ‘मा हजानी (मामा हजानी)’ दर्गा

Haji Ali and Maa Hajani Durgahs in Mumbai

p-29471-Haji-Ali-01‘हाजी अली’… मुंबईच्या महालक्ष्मीच्या शेजारी, वरळी नजीकच्या समुद्रातील एका लहान खडकावर वसलेलं मुस्लीम धर्मियांच श्रद्धास्थान. मुस्लिमच कशाला, इथे हजेरी लावणाऱ्यांत हिंदू धर्मीयांची संख्याही लक्षणीय असते. हाजी अलीच्या दर्ग्याचं स्थान मोठ रमणीय आहे त्यामुळे इथे सहज म्हणून फिरायला जाणाऱ्यांची संख्याही मोठी असते.

मुंबईच्या इतिहासातील पाउलखुणांचा सध्याच्या काळातील शोध घेता घेता मी हाजी अली पाशी आलो. या पूर्वी याच परिसरातील महालक्ष्मी मंदिर, हॉर्नबी व्हेलॉर्ड (आताचा लाल लजपतराय मार्ग) यावर लेखन केलं त्याचवेळी हाजी अली मला खुणावत होता. परंतु धार्मिक स्थळ आणि त्यातही विषय संवेदनशील असल्याने खात्रीशीर माहिती हाती लागल्याशिवाय लिहायचे नाही असे ठरवले होते.

p-29471-Haji-Ali-03श्री. गोविंद नारायण मडगांवकर यांनी सन १८६२ मध्ये लिहिलेल्या ‘मुंबईचे वर्णन’ या पुस्तकात मला हाजी अली भेटले. श्री. मडगांवकर यांनी पुस्तकात दिलेली माहिती असे सांगते की, ज्यांना आपण आज ‘हाजी अली’ म्हणून ओळखतो ते ‘अली मामा’ या नावाचे मुस्लिमधर्मीय गृहस्थ आणि त्यांची बहिण वरळीच्या टोकावर असलेल्या एका लहानश्या डोंगरीवर राहत होते. या पुस्तकात त्यांचे नांव कुठेही दिलेले नसले तरी इंटरनेट वरील विकीपेडियात याचं नाव ‘सैयद पीर हाजी अली शाह बुखारी’ असल्याची नोंद आहे. विकीपेडियामध्ये दिलेले संदर्भ तपासून पहिले तरी हेच नाव दिसते मात्र त्यांच्या बहिणीची किंवा तिच्या नांवाची नोंद श्री. मडगांवकरांच्या पुस्तकाव्यतिरिक्त कुठे पाहायला मिळाली नाही. ही डोंगरी आजही तिथेच आहे. हे गृहस्थ एक सधन व्यापारी होते. अडी अडचणीत असलेल्यांना त्यांच्या धर्म-पंथाकडे न पाहता मदत करणे हे या मामांचे कार्य..! यांचे नक्की नांव काय किंवा यांच्या बहिणीचे नांव काय आणि ही दोघं केंव्हापासून कधीपर्यंत या ठिकाणी होते त्या सालाचा कुठेही उल्लेख नाही. या गृहस्थाना ‘मामा’ या नांवानेच सर्व ओळखायचे.

सर्व संपत्ती अशी गोर-गरीबांमध्ये वाटून टाकल्यावर ही दोघ भावंड हजच्या यात्रेला गेली. हज यात्रेवरून परतल्यानंतर भाऊ फकीर बनून सध्या ज्याठिकाणी हाजी अली दर्गा आहे त्या ठिकाणी जाऊन राहिले तर बहिण शेजारीच असलेल्या वरळीच्या डोंगरावर जाऊन राहिली. हज यात्रा केल्यामुळे अली मामाच्या नावापुढील मामा हे नाव लुप्त होऊ ‘हाजी’ ही आदराची पदवी लागून त्यांचं नांव ‘हाजी अली’ असं झालं असं झालं तर बहिणीला ‘हाजीआनी’ अशी पदवी मिळाली. हज करून आलेल्या पुरुषाला ‘हाजी’ तर महिलेला ‘हाजीआनी’ असे म्हणण्याची प्रथा आहे. बहीणीचं खर नांव माहित नसल्याने ती ज्याठिकाणी राहिली त्या वरळीच्या डोंगरावरील जागेचं नाव ‘मामा’च राहून या नांवापुढे बहिणीची ‘हाजीआनी अशी पदवी लागली आणि या जागेच नांव ‘मामा हाजीआनी’ असं झालं. पुढे काळाच्या ओघात या नावाचा अपभ्रंश होत होत ते ‘मामा हजानी’ असं स्थिर झालं. पुढचा सर्व काळ या बहिण-भावाने परवरदिगाराच्या चिंतनात घालवला. फकीर हाजी अलीच्या मृत्यू पश्चात त्यांची कबर त्यांच्या इच्छेनुसार सध्याच्या ठिकाणी बांधली गेली आणि ‘हाजी अली’चा दर्गा म्हणून प्रसिद्ध झाली तर बहिणीच्या मृत्यू पश्चात तिची कबर वरळीच्या डोंगरीवर बांधली गेली. आजही ही कबर आणि दर्गा तिथे पाहायला मिळतो. हाजी अलीचा दर्गा सन १४३१ साली बांधल्याचा उल्लेख विकीपेडिया देतो.

श्री. गोविंद नारायण मडगांवकर यांच्या ‘मुंबईचे वर्णन’ या सन १८६२ मध्ये लिहिलेल्या पुस्तकात ही माहिती दिलेली आहे. माहितीचा खरेपणा तपासून पाहावा म्हणून मी आणि माझे छांदिष्ट मित्र डॉ. राजेश घांगुर्डे आम्ही वरळीच्या डोंगरावरील ‘मामा हजानी’ दर्ग्यावर गेलो. या ठिकाणी ‘मामा हजानी’ या पुस्तकात दिलेल्या माहितीत एक बदल झालेला मला दिसला. तो म्हणजे ‘मामा हजानी’ या नावातल्या ‘मामा’चा एक ‘मा’ गळून पडला आणि आता त्या दर्ग्याच आणि तिथे असलेल्या मशिदीचे नांव ‘मा हजानी’ असं झालाय. मी तिथल्या मौलानांना भेटलो. माझा परिचय देऊन त्यांच्याकडे काही माहिती आहे का असे विचारलं. त्यानाही फार माहिती नव्हती. मी त्यांना ‘मामा’च ‘मा’ कसं झालं विचारलं,.त्याचं म्हणणं लॉजिकली धरून होत. ते म्हणाले, की “ यहा पर जो दर्गा है वोह एक औरत संत का है और इसीलिये किसीने सोचा होगा कि वो ‘मा’ होगी, ‘मामा’ यु ही लग गया होगा”. मी माझ्या कडे असलेली लिखित माहिती त्यांना दाखवल्यावर त्यांना आठवले की त्यांच्याकडे असलेल्या सरकारी कागदपत्रावर सगळीकडे ‘मामा हजानी’ असे नाव आहे. त्यांनी ‘मामा हजानी’ असा उल्लेख असलेले एक सरकारी प्रमाणपत्र मला दाखवले आणि म्हणाले, की “शायद आपकी बात सच है..!”

श्री. माडगावकर यांनी आपल्या पुस्तकात दिलेली वरील माहिती बऱ्याच अंशी खरी असल्याचे या भेटीतून लक्षात आले. मौलाना साहेबांनी आम्हाला सर्व दर्ग्याची भेट करवली. बहिणीची, हजीआनीची कबर दाखवली. पुरातन इस्लामिक आर्किटेक्चर असलेले ते छोटेखानी बांधकाम अतिशय सुरेख असून तेथील वातावरण अगदी आपल्या कुठल्याही देवळासारखेच होते. ‘हाजीआनी’च्या दर्ग्यात आणखी दोन कबरी नव्याने म्हणजे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला बांधण्यात आल्या आहेत. मात्र ‘हाजीआनी’ची कबर अत्यंत पुरातन आहे.
‘मामा हजानी’ म्हणजे आताच ‘मा हजानी’ दर्गा हा एक ट्रस्ट आहे. आमचे तेथे झालेले स्वागत आणि त्यातील अगत्य आम्हाला जाणवल्याशिवाय राहिले नाही. सुकामेवा-चहा देऊन त्यांनी आमचे आतिथ्य केले. सर्व माहिती तर दिलीच शिवाय आमच्याकडे असलेली माहितीही आवर्जून विचारून घेतली. श्री. मडगावकरांच्या पुस्तकाची प्रत किंवा माझ्याकडे असलेल्या पुस्तकाची झेरॉक्स त्यांना देण्याची विनंती केली. या ठिकाणी आम्हाला जाणवलेल एक वेगळेपण सांगतो आणि थांबतो.

हा ट्रस्ट मुस्लीम धर्मियांचा असला तरी याच्या ट्रस्टीपैकी काहीजण पारशी आहेत. त्यातील श्री. अस्पी यांची आमची भेट योगायोगाने झाली. त्यांनीही श्री. श्री. मडगावकरांच्या पुस्तकाची प्रत देण्यास आवर्जून सांगितलं. या ट्रस्ट मध्ये नोकरीस असणारे अनेक कर्मचारी हिंदू-मराठी आहेत. आमच्यासाठी हे आश्चर्यच होते. आम्हाला हे सर्व पाहून खूप बरं वाटलं. आपण उगाच जाती-धर्माच्या भिंती उरावर घेऊन फिरत असतो.

आता ‘मा हजानी’ दर्ग्यात जायचं कसं ते सांगतो. पेडर रोडवरून आपण दादरच्या दिशेने लाला लाजपतराय रोडने निघालो की उजव्या हाताला प्रथम रेसकोर्स आणि डाव्या बाजूला समुद्रात काही दूर अंतरावर ‘हाजी अली दर्गा’ दिसतो. असेच पुढे गेलो की रेसकोर्सच्या पुढे उजव्या हाताला ‘सरदार वल्लभभाई पटेल’ इंडोअर स्टेडियम लागते. हे स्टेडियम कुस्ती आणि आता ‘प्रो कबड्डी’ सामन्यांसाठी प्रसिद्ध आहे. या स्टेडियमच्या उत्तर दिशेच्या अंगाला असलेल्या प्रवेशद्वारापाशी बी.ई.एस.टी.चे टर्मिनस वजा स्टॉप्स आहेत. या टर्मिनसच्या बरोबर असलेल्या समोर सिग्नल वरून एक लहान रस्ता डावीकडे समुद्राशेजारून वरळीच्या डोंगराकडे जातो. हा रस्ता 100-150 मिटर अंतरावर जिथे थांबतो तिथेच ‘मा हजानी’ किंवा ‘मामा हाजीआनी’ दर्गा दिसेल. आपण या दर्ग्यात जाऊन तिथले पावित्र्य सांभाळून ‘मा हजानी’ दर्ग्याचे दर्शन घेऊ शकता.

मुंबईतील हाजी अली दर्गा बहुतेकांना सर्वाना माहित आहे. मुंबई दर्शनला येणारे अनेकजण या ठिकाणी भेटही देतात. परंतु या दर्ग्याच्या शेजारीच समुद्राच्या काठावर काहीश्या उंचावर असलेली ‘हाजी अली’च्या बहिणीच्या ऐतिहासीक कबरीची माहिती बहुतेकांना नसते. कधी हाजी अली येथे गेलात तर शेजारीच असलेल्या ’मा हजानी’ दर्ग्यात जाऊन तेथील कबरीची आणि त्या दर्ग्याच्या सर्वांगसुंदर, नक्षीदार कलाकुसर असलेल्या आणि इस्लामिक वास्तुरचनेचा नमुना असलेल्या इमारतीचेही दर्शन अवश्य घ्या..!!

-नितीन साळुंखे
9321811091
२६.१०.२०१६
salunkesnitin@gmail.com
मुंबईतील ‘ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा’ लेखमाला – लेख २३ वा

संदर्भ –
१. ‘मुंबईचे वर्णन’, श्री. गोविंद मडगावकर –सन १८६२
२. प्रत्यक्ष दर्ग्यात जाऊन केलेलं निरीक्षण
३. इंटरनेट

 

 

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..