नवीन लेखन...

सर परशुरामभाऊ महाविद्यालय (S P College) – १०० वर्षांचा इतिहास

पुण्यातल्या प्रत्येकच रस्त्याला त्याची स्वतंत्र राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशी ओळख आहे. त्यातलाच एक रस्ता म्हणजे टिळक रस्ता. टिळक चौक आणि स्वारगेट यांना जोडणाऱ्या या रस्त्यावर न्यू इंग्लिश स्कूल, साहित्य परिषद, टिळक स्मारक, अभिनव कला महाविद्यालय, हिराबाग चौक, या वास्तूंच्या बरोबरीने एक वास्तू दिमाखदारपणे उभी असलेली दिसते ती म्हणजे सर परशुरामभाऊ महाविद्यालय. बाहेरून जाणारे काहीजण कुतूहलाने, काही जण नॉल्टेजिक होऊन आणि काही जण इथे येण्याच्या स्वप्नाळू नजरेने त्या दगडी इमारतीकडे बघतात.

स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच ‘नदीपलीकडचे पुणे’ आणि ‘पेठांचे पुणे’ असे पुण्याचे भाग पडले आहेत. या दोन्ही भागांमध्ये कळेल अशी, सांस्कृतिक तफावत जाणवते. त्यामुळे बुद्धीजीवी मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील मुलामुलींना शिक्षणासाठी हक्काचा पर्याय म्हणून स. प. महाविद्यालयाकडे बघितले जाते. १९१६ साली लोकमान्य टिळकांच्या शब्दाखातर जगन्नाथ महाराज पंडित यांनी शहराच्या मध्यवर्ती भागात सुमारे २५ एकर जागा संस्थेला दिली. याच जागेवरती रा. भि. कुलकर्णी, दामोदर करंबेळकर, कृष्णाजी डोंगरे, रामचंद्र देव यांच्या प्रयत्नाने स. प. महाविद्यालय वसलं. या महाविद्यालयात लेडी रमाबाई सभागृह, मुख्य इमारत, प्राचार्य निवास, विद्यार्थी वसतिगृह, ग्रंथालय आदींकडे स्थापत्यशास्त्राचा ऐतिहासिक नमुना म्हणून बघितला जातो. महाविद्यालयात ३० हून अधिक शैक्षणिक विभाग तसेच अनेक अभ्यासेतर समित्या, विभाग कार्यान्वित आहेत. कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांमध्ये ११ वी ते पदव्युत्तर शिक्षण एकाच छताखाली देणारे स. प. महाविद्यालय हे पुण्यातील एकमेव नामवंत महाविद्यालय आहे, असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.

भारतातील अभिजात भाषांपैकी एक अशा संस्कृत विषयाचा विभाग पुण्यात सर्वप्रथम स. प. महाविद्यालयमध्ये सुरु करण्यात आला. सर्वच महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातात आणि याला अर्थात स. प. ही अपवाद नाही. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याची स. प. ची परंपरा महाविद्यालयाइतकीच जुनी आहे. संगीत, नाट्य, चित्र सृष्टीला कलामंडळाच्या विद्यार्थ्यांनी कायमच अर्थपूर्ण देण दिली आहे.

मराठी भाषा लोप पावत चालली आहे, अशी ओरड असताना मराठी संस्कृती मंडळाने मराठीला जुने वैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला आणि आता सर्वच भाषांमधील अभिजात साहित्याची ओळख विद्यार्थी विसरत चालले आहेत हे लक्षात घेऊन सर्व भाषांचा अंतर्भाव करत ‘मराठी संस्कृती मंडळा’ने “वाङ्मय मंडळ” अशी नवी ओळख धारण केली आहे. पुणेकर नेहमीच आपल्या तिरकस आणि स्पष्ट बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. या धारदार बोलण्याला वैचारिक बैठकीची जोड देण्याचे काम स. प. च्या ‘वादसभेने’ केले आहे. स. प. जिमखान्याने विविध क्रीडा प्रकारांमध्ये अनेक नामवंत हिरे दिले आहेत. विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांची नोंद घेण्यासाठी तसेच त्यांच्यातील लेखकाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘परशुरामीय’ हा वार्षिकांक प्रकाशित केला जातो. गेली १०० वर्षे हा अंक प्रकाशित होत आहे. परशुरामीयच्या पहिल्या अंकांचे संकलन गोपाळ कृष्ण गोखले यांनी केले होते.

कोणत्याही महाविद्यालयाचा आत्मा म्हणजे त्याचं ग्रंथालय . पूर्वी महाविद्यालयाची समृद्धता त्यात उपलब्ध असलेल्या ग्रंथासंपदेवरून मोजली जात असे. स. प. च्या ग्रंथालयामध्ये मराठी बरोबरच संस्कृत, जर्मन, फ्रेंच, मोडी, फार्सी आणि अशा एकूण ११ भाषांमधील लेखन उपलब्ध आहे. तसेच अनेक दुर्मिळ इंग्रजी भाषांमधील ग्रंथांचे संगणकीकरण करण्याचे काम देखील सुरु आहे.

असे म्हणतात की वास्तू ही काळाची साक्षीदार असते. स प. चे रमाबाई सभागृह हे पुण्यातील जणू सांस्कृतिक केंद्रच होते. सावरकर, वाजपेयी,टिळक, अत्रे, पु. ल.देशपांडे आणि अनेक साहित्य, राजकारणातील दिग्गजांनी हे सभागृह एके काळी आपल्या भाषणांनी गाजवले होते. प्रसिद्ध ‘अत्रे आणि फडके’ वादाच्या काही फैरी देखील इथूनच झाडल्या गेल्या होत्या. स्वातंत्र्य पूर्व काळातील सभा, व्याख्याने या द्वारे चालणारे अनेक क्रांतिकारकांचे ‘सोशल नेट्वर्किंग’ रमाबाई मधेच घडले. आजही संदीप वासलेकर, भालचंद्र नेमाडे जेव्हा इथे बोलायला उभे राहतात त्या वेळी सभागृहाच्या जुन्या भाषणांचा विषय सहज निघतो आणि तिथे बसलेल्या प्रत्येकालाच पुन्हा पुन्हा अभिमान वाटायला लागतो.

महाविद्यालयाचा अविभाज्य घटक म्हणजे त्या महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी. अनेक थोर शिक्षकांची आणि उत्तमोत्तम विद्यार्थ्यांची मांदियाळीच स. प. ला लाभलेली आहे. मराठी विषयामधील पहिले पी. एच. डी. धारक डॉ. पु. ग. सहस्त्रबुद्धे, शांता शेळके, वसंत बापट, श्री. म. माटे, प्रा. विजय देव, अनुराधा पोतदार असे अनेक प्रख्यात शिक्षक या महाविद्यालयाला लाभले. सध्या कार्यरत असणाऱ्या प्राध्यापकांपैकी अनेक प्राध्यापकांच्या नावावर निरनिराळी पेटंटस, शिष्यवृत्त्या आहेत. डॉ. मोहन आगाशे, रोहिणी हट्टंगडी, वसंत बापट, माणिक वर्मा, अमृता सुभाष, मृणाल कुलकर्णी असे अनेक कलाकार, साने गुरुजी, ग. प्र. प्रधान, डॉ. सदानंद मोरे असे अनेक साहित्यिक, राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी खासदार एकनाथ ठाकूर असे राजकीय व्यक्तिमत्वे या महाविद्यालयाने घडवली. राष्ट्रीय पुरस्कार विजेती गौरी गाडगीळ, चार देशांचा सी. ए. असलेला पराग कुलकर्णी देखील स. प. चेच आहेत. याव्यतिरिक्त अनेक प्रशासकीय अधिकारी, उच्चपदस्थ या महाविद्यालयाने घडवले. क्रीडा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ,राष्ट्रीय खेळाडूंची नोंद घ्यायला गेलं तर स्वतंत्र लेखच लिहायला लागेल.

प्रत्येकाच्याच आयुष्यात महाविद्यालयीन आठवणींना विशेष स्थान असते. स. प. महाविद्यालयाने नुकतेच शताब्दी वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त अशाच काही विशेष आठवणींना उजाळा देण्यासाठी हा लेखनप्रपंच.

मूळ लेखिका – गायत्री पाठक

Contact: 8237784231
(महाजालावरुन साभार)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..