नवीन लेखन...

अमेरिकेतील ऋतुचक्र – भाग ३

USA - Rutuchakra Part-3

सारा उंचसखल भाग असल्यामुळे ठिकठिकाणहून वहात येणार्‍या पाण्याने रस्त्याच्या दोहोबाजूस ओहोळ झालेले असतात. ते पाणी वाहून, बर्‍याच ठिकाणी रस्त्याची सोबत करत, दोन्ही बाजूंना खोलगट पन्हाळी तयार झालेल्या असतात. पावसात त्यातून डोंगरावरचे तांबडे मातकट पाणी वहात असते. इतर वेळेला पन्हाळीत ओल टिकून रहाते. त्या ओल्या मातीत, गवताच्या साथीनं रामबाण उगवलेले असतात. रंगीबेरंगी फुलं, गवताची डुलणारी पाती, रामबाणाचे जागोजागी उगवलेले पेव आणि त्यांवरची असंख्य फुलपाखरं, किडे, चतुर यांनी, रस्त्याकडेच्या या पन्हाळी नुसत्या गजबजून गेलेल्या असतात.

रस्त्याकडेच्या घरांपुढे लोक आपापल्या बागांमधे काम करताना दिसायला लागतात. विविध प्रकारच्या फुलांचे ताटवे बागांची शोभा वाढवायला लागतात. एप्रिल मे हा tulip फुलांचा सिझन. अनेक घरांपुढे ट्युलीपच्या रंगी बेरंगी फुलांची पखरण झालेली दिसते. Daffodils देखील खूप दिसतात. थंडी कमी झाल्यामुळे लोकं घराबाहेर अधिक पडायला लागतात. चांगलं ऊन पडलं असलं तर जॉगिंग करायला, सायकलिंग करायला बाहेर पडलेले लोक दिसतात. पण इथे सायकलिंग म्हणजे आपल्यासारखं पायजम्यामधेच सायकलवर टांग मारली असा प्रकार नसतो. सायकल चालवणार ते देखील हेल्मेट, टाइट शॉर्टस्, गॉगल्स, पाण्याची बाटली, शूज असा सरंजाम हवाच! संध्याकाळी रस्त्याकडेच्या ग्राउंड्सवर कुठे कुठे गावातल्या मुलांचा बेसबॉलचा खेळ रंगात आलेला असतो. त्यांचे आई, वडील गाड्या, पिकअप ट्रक्स पार्क करून गप्पा मारत उभे असतात.

शेतांत आधीच्या हंगामात कापलेल्या मक्याचे खुंट तसेच राहिलेले असतात. ते हारीने उभे असलेले खुंट, सुकून पिवळे पडलेले असतात. त्या सुकलेल्या खुंटांच्या मधली सगळी जमीन पावसाच्या आगमनासरशी हिरव्या तणांनी, गवताने भरून जाते. मे च्या सुरवातीस नांगरणी सुरू होते. शेतांतून ट्रॅक्टर्स फिरताना दिसायला लागतात. काळीभोर माती पुन्हा नवीन बीज स्वीकारण्यासाठी उतावीळ होऊन जाते. नांगरलेली काळीभोर शेतं आणि चराऊ गवताची हिरवीगार कुरणं असा संमिश्र बाज माळरानांवर पसरतो. कुरणांत गवत पुरेसं वाढलं की गायींना आणि वासरांना बाहेर चरायला सोडलं जातं. टेकड्यांच्या हिरव्यागार उतारांवर काळ्या पांढर्‍या गायींचे कळप अधाश्यासारखे चरू लागतात.

जूनच्या मध्यापर्यंत पेरणी संपून मक्याच्या रोपांची टोकं मातीतून वर यायला लागलेली असतात. दिवस चांगलाच मोठा झालेला असतो. रात्री ९-९॥ वाजता देखील चांगला प्रकाश असतो. सूर्य मावळून गेला तरी मावळतीचं आकाश चांगलंच प्रकाशमान असतं. सूर्याचा परावर्तित प्रकाश आसमंतात भरून राहिलेला असतो. कधी कधी रात्री लॅबमधून परत येताना पूर्वेकडे चंद्र उगवत असतो आणि मावळतीला बुडालेली सूर्याची किरणं अजून आपला प्रभाव सोडायला तयार नसतात.

सूचिपर्णी वृक्ष जरी वर्षभर हिरवेगार दिसत असले तरी निरखून बघितल्यावर त्यांच्यावर देखील वसंताचा हात फिरल्याचं जाणवतं. ज्युनीपरच्या हिरव्यागार फांद्यांमधून पोपटी रंगाचे नाजुक बड्स उगवलेले दिसतात. सारं झाड या पोपटी बड्सनी भरून जातं आणि एखाद्या ख्रिसमस ट्री वर रंगीत दिव्यांच्या माळा लावाव्यात तसं वाटायला लागतं. झाडाच्या जुन्या सुया गर्द शेवाळी रंगाच्या असतात. या सुयांच्या टोकाला निळसर हिरव्या रंगाच्या नव्या सुया वसंतात येतात त्यामुळे सारं झाड ही दोन रंगांची रंगसंगती अंगावर वागवतं – झाडांच्या बुंध्यांजवळचा फांद्यांचा रंग गर्द शेवाळी तर परीघाजवळ फांद्यांचा रंग निळसर हिरवा!

जुलै ते सप्टेंबर म्हणजे उन्हाळा, मोठे दिवस, बर्‍यापैकी सूर्यप्रकाश, मधून मधून पडणारा पाऊस, हिरव्या रंगाचं एकछत्री साम्राज्य! पशु, पक्षी, किटक, फुलपाखरं सार्‍यांची लगबग जाणवण्या इतपत वाढलेली. रान आता सहस्र कंठांनी बोलायला लागलेलं असतं. दिवसा मधमाश्या आणि फुलपाखरं आणि रात्रीच्या वेळी काजवे (fire flies) भरपूर दिसतात.

ओढ्यांच्या काठांवर झाडाझुडपांची गर्दी झालेली असते. झाडांच्या सावल्यांनी पाणी झाकोळून गेलेलं असतं. बालकवी ठोंबरे यांच्या कवितेतल्या औदुंबरासारखी काही झाडं जळात पाय सोडून बसलेली असतात. जुन्या मोडून पडलेल्या फांद्या ओढ्यातल्या दगडांत, चिखलात रुतून बसलेल्या असतात, आणि त्यांची वेडीवाकडी धडं पाण्याबाहेर डोकावत असतात. अशाच एखाद्या ओढ्यात, वरच्या झाडांची सावली शोधून, एखादी बदकीण आपला पोरवडा सांभाळत, किडे शोधत पाण्यात डुबक्या मारत असते.

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..