नवीन लेखन...

जेव्हा मी आडनांव बदलले

भाग्यश्री चंद्रकांत रसाळ या प्रिन्सिपॉल डिजिटल रिपोर्टर ने महाराष्ट्र टाइम्स वेब पेज वर सोनालिका जोशी यांच्या विवाहपूर्व कांबळे या आडनावा संदर्भात पोस्ट टाकली आहे. या बातमीचा मथळा ” ही कांबळे, आपल्या ग्रुपमध्ये बसत नाही, आडनावामुळं कामं गेली..सोनालिका जोशीनं केली मराठी सिनेइंडस्ट्रीची पोलखोल” असा आहे.
जयंती वाघधरे यांनी सोनालिका जोशी यांची मुलाखत त्यांच्या पॉडकास्ट वर घेतली आहे.

या बातमीत सोनालिका बाबत बातमी आहे की ” ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचली अभिनेत्री सोनालिका जोशी सध्या चर्चेत आहे. सोनालिका जोशी यापेक्षा माधवी भिडे या नावानं तिची ओळख आता जास्त आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनालिकानं तिच्या करिअरवर भाष्य केलं. तिला आलेले चांगले वाईट अनुभवही शेअर केले आहेत.

मराठी सिनेइंडस्ट्रीत केला जाणारा भेदभाव, गटबाजी यावरही ती व्यक्त झाली. जयंती वाघधरेच्या “आम्ही असं ऐकलंय” पॉडकास्टमध्ये ती बोलत होती. तर सुरुवातीला असं होतं की, माझ्या नावामुळं अनेक प्रोजेक्ट्स हातातून गेलेत. म्हणजे ही.. कशाला? ही आपल्या ग्रुपमध्ये बसत नाहीये… असं माझ्यासोबत घडलं होतं. तुम्ही माझी कला ,माझं काम बघत नाही तर माझं आडनाव पाहताय…. तुम्ही ती बाजू बघताय, ज्याची प्रेक्षकांना, लोकांना काहीच देणं घेणं नाहीये. कदाचित मी आत्ता मराठी इंडस्ट्रीत आले असते तर जास्त सक्रिय असते…असंही सोनालिकानं म्हटलंय”

या बातमीवर फेसबुक वर अनेक चांगल्या वाईट प्रतिक्रिया आल्या आहेत.
सोनालिकाचे विचार रास्त आहेत.केवळ आडनांव पाहून कोणत्याही कलाकाराची कुचंबना होऊ नये.
बातमीत सोनालिका यांच्या विवाहपूर्व कांबळे या आडनावांची खरी ओळख मुद्दाम हेतुपुरस्सर लपवण्यात आली आहे. या बातमीला त्यामुळे दलित विरोधी उच्च जात असा रंग दिला गेला आहे.

खरे पाहता सोनालिका कांबळे जोशी या मूळच्या देशस्थ ब्राह्मण परिवारातील आहेत. ही गोष्ट माझे स्नेही साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त वरिष्ठ अनुवादक चंद्रकांत भोंजाळ यांनी या आधीच सांगितली होती. जळगाव आकाशवाणी केंद्रात एका कार्यक्रमात सोनालिकाचे पिताश्री कांबळे यांच्याशी भोंजाळ यांचा परिचय झाला होता.

सतराव्या शतकातील सुप्रसिद्ध संत महिपती महाराज ताहाराबाद यांचे मूळ आडनांव “कांबळे” आहे.ते देशस्थ ब्राह्मण.त्यांच्या परिवार संबंधित सोनालिका आहेत.

माझे सुद्धा पहिले आडनांव कांबळे होते.नंतर ते कागदोपत्री बदलून “नगरकर”केले आहे.मी सुद्धा संत महिपती महाराज यांच्या परिवार संबंधित सदस्य आहे.माझी जात ब्राह्मण.

प्रश्न हा आहे की मी जात का लपवली?
शाहू फुले आंबेडकर यांच्या नावे कितीही ढोल ताशे, डीजे कर्कश आवाजात वाजत असला तरी जात ही ओळख कुणालाच लपवता येत नाही. मला कांबळे या आडनावामुळे काही फायदे काही तोटे पदरी पडले.

दलितसमाजात महार या जातीत कांबळे हे ब्रँड नेम आहे.तसे हे आडनाव सकुन साळी,जैन,ब्राह्मण ,मराठा या अन्य जातीत सुद्धा आहे.
मी ज्या कलानगर भागात राहतो,तेथे राष्ट्रीय स्तरावर सुप्रसिद्ध चित्रकार,शिल्पकार प्रमोद कांबळे देखील राहतात. ते माझे मित्र. माझी कांबळे या नावावर आलेली पत्रे प्रमोद कांबळे यांच्या लेटर बॉक्स मध्ये टाकली जात असे.नंतर प्रमोदने ती पत्रे फोन करून दिली आहेत.प्रमोद कांबळे हे साळी जातीचे प्रमुख कलाकार. परंतु सुदैवाने त्यांना कांबळे आडनाव त्यांना पावले आणि ते प्रसिद्ध झाले.

महाराष्ट्रात उच्च वर्गात बालपणीच उच्च अहंकार गंड पाळला जातो. मूल शाळेत घालण्या आधीच अनेक आडनावांची जातिनिहाय ओळख करून दिली जाते. नंतर मोठेपणी ते जातीचे नांव हुंगत राहतात व आपल्या कळपात निवांत रवंथ करतात.

खरे पाहता जाती व्यवस्था ही भारतीय समाजाची जुनी जखम आहे, ज्यात दलित कुचंबणा हे सर्वांत गंभीर रूप आहे. कायदे आणि सुधारणांमुळे प्रगती झाली असली तरी, हिंसा आणि भेदभाव कायम आहे. दलितांच्या संघर्षाने एक समान समाज निर्माण करण्याची आशा आहे.

माझे वडील पोलिस खात्यात नोकरीस होते त्यामुळे सुदैवाने पोलिस चाळीत अनेक जातीच्या मुलांसोबत खेळलो बागडलो. तेथे ब्राह्मण अत्यंत अल्पसंख्यक. आमचे नातेवाईक आम्ही पोलिस चाळीत राहतो असे समजले की नाक मुरडत.
लहानपणी आमच्याकडे कोणी नातलग आला की आमची जानवे शोधण्यात धावपळ सुरू होत.आईने सक्त ताकीद दिली होती की नातलग आले तर निदान जानवे तरी घालत जा.

माझ्या वर्गातील मुसलमान मित्र फारुक मला म्हणाला ” तुमचे जानवे व शेंडी ही एरियल आहे. त्यामुळे तुम्हाला आकाशातून ज्ञान लहरी प्राप्त होतात” या त्याच्या विनोदावर मी खूप हसलो होतो.

मी जेव्हा टेलिफोन खात्यात नोकरीस लागलो तेव्हा माझे प्रशिक्षण औरंगाबाद येथील क्रांती चौकातील टेलिफोन भवन येथे पूर्ण झाले.माझ्या बॅच मध्ये माझ्या शेजारी देशपांडे नावाचा मराठवाडा भागातील मित्र होता.मी त्याला विचारले “तुम्ही देशस्थ का कोकणस्थ”
त्याला माझ्या प्रश्नाचा रोख कळला नाही. मी म्हणालो ” हे बघ माझे आडनांव जरी कांबळे असले तरी मी देशस्थ ब्राह्मण आहे”
यावर स्मित हास्य करीत म्हणाला ” मी ब्राह्मण नाही”
मी जागेवरच उडायचे काय ते राहिले होते. आश्चर्याच्या धक्क्यातून स्वतःला सावरत मी विचारले “तर मग तुम्ही सीकेपी का ?
त्याने नकारार्थी मान हलवत उत्तर दिले ” मी मुस्लिम आहे”

मला प्रथम वाटले तो धर्मांतरित असावा परंतु नंतर कळले की देशपांडे ही उपाधी आहे.अनेक मुस्लिम बंधूंची नांवे पाटील,देशमुख सुद्धा आहेत. अनेकांची आडनावे व्यवसाय,उपाधी मुळे स्थापित झाली आहेत.पारशी समाजात बाटलीवाला,इंजिनीयर अशी आह

एकदा मला मुंबई विद्यापीठात राष्ट्रीय स्तरावर आयोजित कार्यक्रमात तेथील संयोजक प्राध्यापकाने आमंत्रित केले होते. मी मला दिलेल्या विषयावर अभ्यास करून बोललो.सर्वांना भाषा आणि कॉम्प्युटर हा नवीन विषय आवडला. व्याख्यान संपल्यावर अनेक मागास वर्गीय प्राध्यापक माझ्या भोवती जमा झाली. ते म्हणाले “आपल्या लोकांना संधी दिली जात नाही. जातीमुळे बाजूला ठेवले जाते. आज संध्याकाळी बामसेफ संघटनेची बैठक आहे,त्याला तुम्ही मार्गदर्शन करा”
मी त्यावेळी मौन पाळले,माझी जात लपवली.

नामांतरामुळे मराठवाड्यातील सामाजिक वातावरण ढवळून निघाले होते. त्या काळात माझी बदली मराठवाड्यातील बीड कार्यालयात झाली होती.मी प्रथमच मराठवाडा भागात आलो होतो. मी भाड्याने जागा शोधित होतो. परंतु कोणीच मला कांबळे आडनांव ऐकून जागा देत नव्हते.
त्यावेळी मला मागासवर्गीय लोकांच्या सामाजिक प्रश्नांची जाणीव झाली. मी ब्राह्मण असून सुद्धा केवळ कांबळे आडनावा मुळे तिरस्कृत झालो होतो.

बाबुराव बागूल (जुलै १७, १९३० – मार्च २६, २००८) हे आंबेडकरवादी साहित्यासाठी ओळखले जाणारे मराठी लेखक, कवी होते. विद्रोही आंबेडकरवादी कथांचे प्रमुख उद्गाते आणि प्रखर वास्तववादी कादंबरीकार तसेच शोषित, उपेक्षित, झोपडपट्टीतील, फुटपाथवरील भणंग जनजीवनाचे भेदक चित्रण करणारे लेखक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचा कथा संग्रह “जेव्हा मी जात चोरली” मराठी साहित्यात खूप गाजला.

शेक्सपियर भले म्हणो नावांत काय आहे,परंतु भारतीय समाजात नावांत तिरस्कार,अपमान, दुर्लक्ष सर्व काही आहे. नंतर माझे मामा तेथे पोलिस खात्यात नोकरीस होते.मी त्यांना शरण गेलो. मामाने भाच्यासाठी ब्राह्मण वाड्यात खोली मिळवून दिली.

कांबळे आडनावाने माझा चांगला पिच्छा पुरवला. माझ्या मुलीला शाळेत प्रवेश मिळत नव्हता तेव्हा माझ्या मित्राने ओळख काढून ब्राह्मण संचालका कडे माझी शिफारस केली की आपलाच माणूस आहे.

तो म्हणाला “ मी महार जातीचा आहे, आरक्षणाचा आम्हाला तसा काही विशेष फायदा होत नाही.आमच्या मागास वर्गात आम्हाला अपमानास्पद वागवले जाते. आमच्या लोकात खूप भेदा भेद आहेत.चांभार समाजाला विशेष फायदा मिळतो. नव बौद्ध लोकांची संघटना खूप मजबूत आहे. साहेब प्रामाणिक काम केले,कष्ट घेतले की आरक्षण कुबडी काय कामाची? सरकार तरी किती नोकऱ्या देणार आहेत?
त्याचा सवाल रास्त वाटला.

माझा एक मित्र व्यावसायिक नाट्य क्षेत्रातील ब्राह्मण परिवारातील आहे.त्याच्या मुलाचे प्रेम वडार समाजातील मुलीवर जडले.दोघे उच्च शिक्षित. माझा मित्र लग्नास तयार झाला.मुलगी म्हणाली “ तुम्हाला माझ्या आई वाडीला सोबत बोलणी करावी लागेल”
मित्र त्यांच्या घरी गेला.मुलीचे वडील म्हणाले “ तुम्ही आम्ही तयार असून काय फायदा? आम्हाला आमच्या जात पंचायती सोबत चर्चा करावी लागेल”
नंतर मित्र त्या जात पंचायतीत गेला. लग्न जुळले.

अनेक ब्राह्मण कुटुंबातील पौरोहित्य करणाऱ्या मुलांना ब्राह्मण जातीत मुली मिळत नाहीत. त्यांना आता कर्नाटक,तेलंगणात जाऊन मागास वर्गीय मुली लाखो रुपये देऊन आणतात. याच गुरुजी मंडळींना उच्च वर्गीय समाजातील लग्न विवाह विधीत मानाचे स्थान आहे मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूप दयनीय परिस्थिती आहे. उच्च शिक्षित ब्राह्मण कुटुंबाने आता पूर्व परंपरेतील पूर्वाहित्य काम सोडून दिले आहे.ग्रामीण भागात त्यामुळे अन्य जातीतील लोकांनी मंदिर ताब्यात घेऊन ते आता पुजारी, हभप झाली आहेत.ते म्हणतात “ आताच्या बामनाने धर्म बुडवला”

माझा मराठा जातीचा बाल मित्र दत्तात्रय परभणे खूप दिवसांनी भेटला.त्याने माझ्या हाती त्याचे व्हिजिटिंग कार्ड दिले.त्यावर लिहिले होते की सर्व धार्मिक विधी,लग्न,अभिषेक करून दिले जाईल.हभप पंडित दत्तात्रय परभणे.

महाराष्ट्रात आडनावावरून भेदभावाची अनेक उदाहरणे आहेत. उदाहरणार्थ, मुंबई किंवा पुण्यात घर भाड्याने घेताना, दलित किंवा मागासवर्गीय आडनाव असलेल्या व्यक्तींना नकार दिला जातो. एका व्यक्तीने सांगितले की, “माझे आडनाव पाहून ब्रोकरने सरळ सांगितले की, अमुक जातीचे लोक इथे घेत नाहीत.

कोल्हापूरमध्ये एका विद्यार्थ्याने सांगितले की, पीजी बुकिंग करताना आडनावावरून SC/ST असल्याची शंका घेतली गेली, आणि ओपन कॅटेगरी सांगितल्यावर वागणूक बदलली.
लग्न बाजारातही हे दिसते: उच्च वर्गीय कुटुंबे आडनाव पाहून जोडीदार निवडतात, ज्यामुळे अंतर्जातीय विवाह कमी होतात.

आजही महाराष्ट्रात जातीवाद कायम आहे. शहरी भागात तो छुपा आहे. बीड पोलिसांनी आडनावे काढून टाकण्याचा निर्णय घेतला, ज्यात पोलिसांच्या युनिफॉर्म आणि नेमप्लेटवर फक्त पहिले नाव वापरले जाते. हे देशमुख हत्येनंतरच्या तणावामुळे, ज्यात जातीवरून पक्षपाताचे आरोप होतात. मराठा क्रांती मोर्चाचे विनोद पाटील यांनी याचे समर्थन केले, म्हणाले की हे संविधानिक मूल्ये जपेल. पण ओबीसी नेते हरिभाऊ राठोड आणि न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी म्हटले की, हे केवळ लक्षणे दूर करते, मूळ कारणे नाही.

मानव मातृ वंशावळी ‘माइटोकॉन्ड्रियल ईव’ संबंधित आधुनिक संशोधन सांगते की
सर्व मानव आपल्या मातृ वंशावळीने एका विशिष्ट स्त्रीशी संबंधित आहेत, जिला “माइटोकॉन्ड्रियल ईव” म्हणून ओळखले जाते.

ही स्त्री सुमारे १,५०,००० ते २,००,००० वर्षांपूर्वी आफ्रिकेत राहत होती.
ती अशी शेवटची स्त्री पूर्वज आहे जिचे माइटोकॉन्ड्रियल डीएनए आज जगातील प्रत्येक जिवंत व्यक्तीपर्यंत अखंडपणे पोहोचले आहे.

म्हणजे काय, तर आपल्या सगळ्यांची सर्वात मोठी आजी आफ्रिकेत राहत होती . मग हा जातीभेदाच्या भिंती का रचल्या गेल्या आहेत ?

~ विजय नगरकर
अहिल्यानगर, महाराष्ट्र
मो 9422726400
vpnagarkar@gmail.com

विजय प्रभाकर नगरकर
About विजय प्रभाकर नगरकर 34 Articles
मी बीएसएनएल मधील सेवानिवृत्त राजभाषा अधिकारी आहे. राजभाषा विभागामध्ये कार्यरत होतो. अनुवादित कवितांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..