( पूर्वप्रसिद्धी : “वृत्त” दिवाळी अंक (USA) – २०२४ )
अर्थशास्त्र, करआकारणी, आर्थिक व्यवहार, बँकिंग हे आपल्या दैनंदिन आयुष्यातले अविभाज्य आणि अतिशय महत्त्वाचे घटक असले तरी ते बऱ्याच जणांना नकोसे, कटकटीचे, कंटाळवाणे वाटतात. पण काही प्रतिभावान वल्ली अश्या रुक्ष विषयांबाबतीतही असे काही चटपटीत लिहून, बोलून जातात की ते ऐकल्यावर, वाचल्यावर आपल्या चेहऱ्यावर आपसूक स्मितहास्य फुलते. अश्याच काही प्रसिद्ध, अप्रसिद्ध किंवा अनामिक व्यक्तींच्या खुमासदार, चटकदार ‘अर्थ’पूर्ण वकतव्यांचा फराळ जो आपल्या चेहऱ्यावर हास्य फुलवेल –
˃˃ ‘मृत्यू आणि कर’ या मानवी आयुष्यातल्या दोनच गोष्टी शाश्वत आहेत – बेंजामिन फ्रँकलिन (१८ व्या शतकातील बहुआयामी अमेरिकन व्यक्तिमत्व)
˃˃ जर तुम्ही बँकेकडून १०० डॉलर्सचे कर्ज घेतलं असेल तर ती तुमची समस्या आहे, पण जर तुम्ही बँकेकडून १०० दशलक्ष डॉलर्सचे कर्ज घेतलं असेल तर मात्र ती बँकेची समस्या आहे – जे पॉल गेट्टी (अमेरिकन उद्योगपती)
˃˃ आपण कर ‘भरत’ नाही, ते कर ‘घेतात’ – ख्रिस रॉक (अमेरिकन विनोदी अभिनेता)
˃˃ पैसा सहाव्या इंद्रियासारखा आहे. बरोबर, पण त्याच्याशिवाय आपण इतर पाच इंद्रियांचा वापर करू शकत नाही – सॉमरसेट मॉम (ब्रिटिश साहित्यिक)
˃˃ जेव्हा एकच चोर असतो, तेव्हा तो दरोडा असतो. जेव्हा खूप चोर असतात, तेव्हा ती कर-आकारणी असते – वान्या कोहेन (रशियन कलाकार)
˃˃ कर म्हणजे चांगले काम केल्याबद्दल केलेला दंड, आणि दंड म्हणजे चुकीचे काम केल्याबद्दलचा कर – मार्क ट्वेन (अमेरिकन साहित्यिक)
˃˃ जर तुम्ही तुमचे पैसे मोजू शकत असाल तर त्याचा अर्थ असा की, तुमच्याकडे अब्जावधी डॉलर्स नाहीत – जे पॉल गेट्टी (अमेरिकन उद्योगपती)
˃˃ काही लोक ‘महिना संपला आणि थोडेच पैसे राहिलेत’ अश्या स्थितीत असतात. पण बऱ्याच जणांची अवस्था ‘पैसे संपले तरी बराच महिना शिल्लक आहे’ अशी असते – जॉन बॅरीमोर (अमेरिकन अभिनेता)
˃˃ पैसा आपल्याला आवडत नसलेल्या गोष्टी न करण्याची मुभा देतो. आणि मला कोणतीच गोष्ट करायला आवडत नसल्याने पैसा माझ्यासाठी फारच उपयोगी आहे – ग्रोको मार्क्स (अमेरिकन अभिनेता)
˃˃ आपले पैसे दुप्पट करण्याचा सुरक्षित मार्ग म्हणजे ते अर्धे दुमडून आपल्या खिशात ठेवणे. – किन हबर्ड (अमेरिकन पत्रकार व व्यंगचित्रकार)
˃˃ श्रीमंत कोण? जो समाधानी आहे तो….. आणि तो कुठे सापडेल? ते कोणालाच माहित नाही –बेंजामिन फ्रँकलिन (१८ व्या शतकातील बहुआयामी अमेरिकन व्यक्तिमत्व)
˃˃ आपल्या ‘नावडत्या’ लोकांना प्रभावित करण्यासाठी, बरेच लोक त्यांना ‘नको’ असलेल्या गोष्टींच्या खरेदीसाठी ‘अनावश्यक’ पैसे खर्च करतात. – विल रॉजर्स (अमेरिकन कलाकार)
˃˃ तुमच्याकडचा पैशांचा अभाव तुमच्या मुलांना पैशांबद्दल जाणून घ्यायला अधिक प्रेरित करतो – कॅथरीन व्हाइटहॉर्न (ब्रिटिश पत्रकार व लेखिका)
˃˃ कोणीतरी माझे सर्व क्रेडिट कार्डस् चोरलेत पण मी त्याची तक्रार करणार नाही, कारण चोर माझ्या पत्नीपेक्षा कमीच खर्च करतोय – हेनी यंगमेन (ब्रिटिश-अमेरिकन विनोदवीर व संगीतकार)
˃˃ आपल्या उत्पन्नामध्ये समाधानी असणाऱ्या मनुष्याकडे कल्पनाशक्तीचा अभाव असतो – ऑस्कर वाइल्ड (आयरीश लेखक व नाटककार)
˃˃ बचत ही खूप चांगली गोष्ट आहे… विशेषत: जेव्हा आपल्या पालकांनी ती आपल्यासाठी केलेली असते – विन्स्टन चर्चिल (इंग्लंडचे भूतपूर्व पंतप्रधान व साहित्यिक)
˃˃ अर्थतज्ञांच्या मते महाविद्यालयीन शिक्षणामुळे माणसाच्या आयुष्यभराच्या उत्पन्नात हजारो डॉलर्सची भर पडते…जे नंतर तो आपल्या मुलांच्या कॉलेजशिक्षणासाठी खर्च करतो. – बिल वॉन (अमेरिकन लेखक)
˃˃ ‘पैशाने आनंद विकत घेता येत नाही’ असे म्हणणाऱ्याला खरेदीला कुठे जायचे हे माहित नसते – बो डेरेक (अमेरिकन अभिनेत्री)
˃˃ पैसा आपल्याला सुख विकत घेऊन देऊ शकत नाही, परंतु तो आपल्या दु:खाचे रूप थोडे सुखद करू शकतो – स्पाइक मिलीगन (आयरीश अभिनेता, लेखक, विनोदवीर)
˃˃ लहान असताना मला वाटायचे की आयुष्यात पैसा ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे; आणि आता म्हातारा झाल्यावर त्याबद्दल माझी खात्री पटली आहे – ऑस्कर वाइल्ड (आयरीश लेखक व नाटककार)
˃˃ पैसा नव्हे तर प्रेम ही जगातली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे….पण सुदैवाने मला पैशाची आवड आहे – जॅकी मेसन (अमेरिकन विनोदवीर व अभिनेता)
˃˃ जर महागाई अशीच वाढत राहिली तर आपल्याला कुत्र्यासारखे जगण्यासाठीपण कुत्र्यासारखे काम करावे लागेल – जॉर्ज गोबेल (अमेरिकन अभिनेता व विनोदवीर)
˃˃ बँक ही अशी जागा आहे जी आपल्याला तेव्हाच कर्जाऊ पैसे देते जेव्हा आपण सिद्ध करू शकतो की आपल्याला त्या कर्जाची आवश्यकता नाही – बॉब होप (अमेरिकन विनोदवीर व अभिनेता)
˃˃ ‘परिचिता’ची व्याख्या : अशी व्यक्ती ज्याच्याकडून कर्ज घेण्याइतपत आपली ओळख असते पण कर्ज देण्याइतपत नाही – एम्ब्रोस बिअर्स (अमेरिकन पत्रकार व लेखक)
˃˃ पैसे नेहमी निराशावादी व्यक्तीकडून उधार घ्या…..कारण त्याला ते परत मिळण्याची फारशी आशा नसते – ऑस्कर वाइल्ड (आयरीश लेखक व नाटककार)
˃˃ जर तुम्हाला असे वाटत असेल की आपण जिवंत आहोत की नाही याची कोणीही पर्वा करत नाही, तर गृहकर्ज किंवा वाहनकर्जाचे काही हप्ते थकवून बघा – अर्ल विल्सन (अमेरिकन पत्रकार)
˃˃ आपल्या मुलांना करांबद्दल शिकविण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांचे ३०% आईस्क्रीम खाणे – बिल मरे (अमेरिकन अभिनेता व विनोदवीर)
˃˃ मला देशाच्या आर्थिक तुटीची चिंता नाही, स्वत:ची काळजी घेण्याइतपत ती चांगलीच मोठी आहे. – रोनाल्ड रेगन (भूतपूर्व अमेरिकन राष्ट्राध्यक्ष)
आणि आता काही अज्ञात, निनावी, अनामिक व्यक्तींचे बोल :-
˃˃ बँका कॅसिनोसारख्या असतात….. दोघांनाही तुमच्या पैशांशी खेळायला आवडतं.
˃˃ जो कोणी तुम्हाला सांगतो की पैसा हे सर्व वाईट गोष्टींचे मूळ आहे, त्याने कधीही भरपूर पैसा कमावलेला नसतो.
˃˃ बँकर्स जादूगारांसारखे असतात….. ते फक्त कार्डच्या स्वाइपने पैसे गायब करू शकतात.
˃˃ गरिबांना मुलं जास्त असतात, तर श्रीमंतांना नातेवाईक जास्त असतात.
˃˃ बँकांना सहसा खिडक्या का नसतात?….. कारण लोकांच्या पैशांवर दिवसाढवळ्या पडणारा दरोडा कोणी वाकून बघू नये अशी त्यांची इच्छा असते.
˃˃ डॉलर कितीही खाली गेला तरी फरक पडत नाही….. प्रत्येकवेळी खाली वाकून तो उचलण्याची माझी तयारी असते.
˃˃ बँकांना उन्हाळ्याच्या दिवसात लोकांना छत्री द्यायला आवडते. पण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा त्यांना ती लगेच परत हवी असते.
˃˃ सिगारेटवरील कर हा धूम्रपानापासून परावृत्त करण्यासाठी असेल तर, आयकर हा काम करण्यापासून परावृत्त करणार नाही का?
˃˃ बँका उत्तम कथाकार का घडवतात?…… कारण त्या आर्थिक संकटाचे (खोटे) किस्से पसरवण्यात माहिर असतात.
˃˃ बँका ‘मॅजिक-शो’ सारख्या आहेत…… त्या आपल्याला सारख्या या विचाराने आश्चर्यचकित करतात की ‘आपण साठवलेले पैसे कुठे गायब झाले?’.
˃˃ शोकांतिका आणि आपत्ती यात काय फरक आहे? – शोकांतिका म्हणजे वादळात भरकटलेले अर्थतज्ञांनी भरलेले जहाज….. आणि आपत्ती म्हणजे जेव्हा त्या जहाजावरील सर्व प्रवासी पट्टीचे पोहणारे असतात.
˃˃ बँकर्सना ‘सायन्स फिक्शन’ का आवडतात?….. कारण ते नेहमीच लोकांचे भले करण्याच्या भविष्यकालीन मार्गांची (केवळ) कल्पना करत असतात.
तर मंडळी तुमचे करसल्लागार, बँकर्स, अर्थखाते कितीही नावडते असले तरी त्यांच्यावर सतत वैतागून फायदा नाही. त्यांच्यावर विनोद करा आणि आपले टेन्शन कमी करा
- गुरूप्रसाद दि पणदूरकर (माहीम, मुंबई)


Leave a Reply