नवीन लेखन...

तीन बाळ

माझ्या आठवणीतील हे तीन बाळ…

बाळू

रायगड जिल्ह्यातील कर्जतजवळील जांभिवली हे माझ्या वाडवडिलांचे गाव. मला कळायला लागल्यापासूनच्या जास्त आठवणी या गावाशी निगडित आहेत. गावातील बोडके परिवार हे आमचे कूळ. त्यांचे घर म्हणजे आम्ही आपले घर मानत असू. जांभिवली जवळ कातकरी वाडी आहे. तेथील बाळू कातोडी (कातकरी) आणि त्याची बायको लाडीबाई हे विशेष परिचित. ओहोळावर, नाल्यावर जाताना बाळूच्या कुडाच्या खोपटा जवळ कोंबड्या, बकर्‍या दिसायच्या. परसातील बांबू कापून धनुष्य व सळकांडीच्या काड्यांचे बाण बनवायला त्याने आम्हा पोरांना शिकवले. नंतर विटी दांडू, बेचकी व क्रिकेटची बॅटही बनवली. तो त्याच्या शिकारीच्या धनुष्यातून वेगाने बाण सोडत असे. आमची ताकद मात्र धनुष्याची दोरी आकर्ण ओढण्यास कमी पडत असे त्यामुळे काही फुटांवर बाण कोसळायचा. काय कौतुक वाटले त्याचे जेव्हा झाडावरच्या पक्षावर त्याने नेम धरला तेव्हा. ससा, पक्षी, डुक्कर यांची शिकार तसेच खेकडे, शेतातले उंदीर व मासे हे त्यांचे अन्न होते. पक्षाचे प्राण घेणे त्याची गरज होती. प्राणी-पक्षी यांच्या विषयी करुणा ही आमची भावना होती. शेवटी उपजीविका प्रबळ ठरते हे खरे. रोज खायला मिळणार की नाही अशी विवंचना असायची या कुटुंबाला. पुढे त्याची परिस्थिती थोडी सुधारली. लाडीबाई घरी आली की सर्वजण तिला भेटत असत. एकदा ती म्हणाली, ‘माझा मुलगा आता डोक्याला तेल लावल्या शिवाय भांग पाडत नाही.’ आपल्या कुटंबाच्या प्रगतीचा अभिमान ओसंडत होता तिच्या चेहर्‍यावर. ‘समाधान’ कशावर मानता येऊ शकते ते समजले बाळूच्या कुटुंबाकडून. बाळू गेल्यावरसुद्धा लाडी जांभिवली, कर्जतच्या घरी येत असे.

बाळ्या

माझ्या वडिलांचा लोकसंपर्क मोठा होता. आसपासच्या गावातील, वाड्या-वस्तीतील लोकांचा आमच्या घरी राबता असे. जवळच्या डोंगरावर असलेले ढाक हे गाव बहिरी या देवस्थानामुळे ओळखले जाते. कपारीत दडलेले, शिरकाव करण्यास कठीण अशी ढाकच्या बहिरीची ख्याती आजही आहे. या गावचा एक रहिवासी आमच्या भेटीगाठीतला. त्याला ढाकोळ बाळ्या (ढाकचा बाळ्या) या नावाने आम्ही ओळखत होतो. कमरेला कोयता अडकवलेला असे. तो डोंगर उतारावर नाचणी, वरई यांची पिके घेत असे. कधीतरी शेताचे वा परसातील काही काम करण्यासाठी हा बाळ्या जांभिवलीस येत असे. डोंगर उतरून कर्जतला यायचे असल्यास जाता-येता केव्हातरी तो आम्हाला भेटत असे. उपरोक्त दोघेजण, बाळू व बाळ्या यांच्यासाठी दारू पीणे हे नित्याचे होते. कधी कधी कामाचे बाबतीत अळंटळं करीत, शिव्या शाप खात, पण शेवटी काम करत. ढाकोळ बाळ्याचा मुलगा बाळकृष्ण. तो माझ्यापेक्षा 4-5 वर्षांनी लहान होता. तोही जांभिवलीस येत असे वडिलांबरोबर. जांभिवली व कर्जतच्या घरी या तिघा बाळांचे येणे-जाणे असे.

बाळकृष्ण

वर्ष सरत गेली. कामानिमित्त मी ठाणे येथे राहण्यास गेलो. एक दिवस दारावरची बेल वाजली. समोर बाळकृष्ण उभा होता. आश्चर्य वाटले. पाच फूट दहा इंच उंची, शिडशिडीत बांधा अशा चणीचा बाळकृष्ण माझ्यासमोर उभा होता. काही नावांची गंमत असते. व्यक्तीच्या नावाला जो भाषिक अर्थ असतो तो वय, व्यवसाय बदलल्याने बदलत नाही. कधी थोडी विसंगती दिसते, पण लगेच विसरताही येते. या माणसाने शारीरिक ऊंचीप्रमाणे माणूस म्हणूनही ऊंची गाठली आहे. काही वर्ष संपर्कात नसलेला बाळकृष्ण लेंगा, सदरा व पांढरी टोपी या वेशात पूर्वी असायचा. टोपी हे त्याच्या पेहरावाचे वैशिष्ठ्य आहे. आता तो शर्ट-पँट घालतो, पण डोक्यावरची टोपी उतरली नाही. सध्या तो कर्जतजवळच्या फार्महाऊसवर केअरटेकर म्हणून आहे. आज तो साठ वर्षाचा आहे आणि तरी बाळ? होय. आमच्यासाठी हेच त्याचे नाव आहे. या बाळने दोन लग्ने केली. दोन्ही बायका नांदत आहेत. त्याच्या नव्याने जुळलेल्या नात्यामधील काही जण ठाण्यात राहणारे आहेत. त्यानिमित्त बाळकृष्णाचे ठाण्याला येणे होऊ लागले. थोडं शिक्षण घेऊन त्याची मुले संसाराला लागली. आमच्या घरी येताना प्रत्येक वेळी तो काहीतरी घेऊन येत असे. माझ्या मुलाला तो ‘बाळा’ म्हणायचा, त्याच्यासाठी खाऊ आणयचा. बाळा वीस वर्षाचा झाला तरी त्याच्यासाठी बिस्किटाचा पुडा चुकला नाही. ढाकहून येताना घराभोवतीच्या बागेतली कारली, काकडी, चार कोकमं वा पसाभर धान हे आमच्यासाठी. रीती-रिवाज आणखी कशाला म्हणतात? मोकळ्या मनाच्या बाळकृष्णाने गाठलेली ही उंची मोजण्यापलिकडची होती. कधी फार्महाऊसवरून आणलेला भोपळा, अळू आम्ही वीकत घेत होतो. ती भाजी त्याच्या मालकाची असायची. आमच्या घरी जेवल्या-खाल्ल्याशिवाय त्याचा पाहुणचार होत नसे.

ढाकला त्याने बकर्‍या पाळल्या होत्या. एकदा कोणीतरी त्या पळविल्या. पोलीस स्टेशनसाठी कर्जतच्या वार्‍या कराव्या लागल्या त्याला. काही वर्षापूर्वी रायगड जिल्ह्यात झालेल्या प्रचंड पावसाने पूर येऊन त्याच्या घराची नासधूस झाली व अंगणातील बकर्‍या पाण्याच्या लोंढ्याबरोबर वाहून गेल्या. माझी बहीण व मेहुणे ‘शबरी सेवा समिती’चे काम करतात. या संस्थेने काही कुटुंबांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी घेतली. त्यामुळे बाळकृष्णाला आधार मिळाला.

एक बिर्‍हाड डोंगरावर व एक पायथ्याजवळ असे बायका पोरांसकट दोन संसार चालविणे बाळकृष्णाला जमले. एकदा त्याची तब्बेत बिघडली तेव्हा पाठुंगळी घेऊन एक गाववाला त्याला सरकारी दवाखान्यात घेऊन आला. बाळकृष्णाने माझ्या बायकोला सांगितले, ‘ आधी या माणसाला खायला द्या.’ उपजत नम्रपणा व दुसर्‍याची कदर करणारा होता तो. एकदा ढाकच्या बायकोबरोबर वाणसामान खरेदी करून तो कर्जतच्या घरी आला. ‘नुसतं भेटायचं म्हणून आलोय’ असं सांगतच दारात दोघांनी चपला काढल्या. खरोखरीच पाचव्या मिनिटाला ते निघाले सुध्दा. चहा तर नाहीच, हातावरही खायला काही नको म्हणत असताना त्याने बिस्किटाचा पुडा माझ्या हाती ठेवला. नको म्हणायची माझी टाप नव्हती. घाईघाईतच मी त्याच्या बायकोच्या हाती राजगिर्‍याच्या लाडवांचे पाकीट व पाण्याची बाटली ठेवली आणि सांगितले, ‘वाटेत झाडाखाली सावलीत बसून लाडू खा व पाणी प्या.’ सामानाची एक पिशवी बायकोच्या डोक्यावर व एक पोतं स्वतःच्या डोक्यावर संभाळत दोघे निघाले. तीन तासांच्या चालीत डोंगर चढायचा आहे याचे काही विशेष वाटत नव्हते त्यांना.

माझी आई वारली तेव्हा बाळकृण भेटायला आला. घरातील सर्वांशी आठवणी काढत बोलला. ही खाऊ आणण्याची वेळ नव्हती. त्याने साखर व चहा पावडरीचा पुडा आणला होता. ही रीत आम्हाला कुठे ठाऊक होती? याला कोणी शिकवली? ना तो शाळेत गेला होता ना त्याने पुस्तकं वाचली होती. संस्कृती जपण्यासाठी कशाची गरज असते? बाळकृष्णाने आपल्या वनवासी समाजाकडून व आजूबाजूच्या समाजजीवनातून चांगले तेच घेतले व आचरणात आणले. आपला स्वभाव व वर्तन कसे असावे हे आपलं कुळ, शिक्षण, रूप, रहाणीमान व सामाजिक प्रतिष्ठा ठरवत असते असा जर कोणाचा समज असेल तर त्याने तो काढून टाकलेला बरा. बाळकृष्णाचा दाखला त्यासाठी पुरेसा आहे.

– रविंद्रनाथ गांगल

 

Avatar
About रविंद्रनाथ गांगल 42 Articles
गणित विषयात M.Sc. पदवी. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात (TCS) काम. निवृत्तीनंतर पुणे येथे वास्तव्य. वैचारिक लेख, अनुभवावर आधारित व्यक्तीचित्रे, माहितीपूर्ण लेख लिहिण्याची आवड आहे.Cosmology व Neurology चा अभ्यास. ब्रिज स्पर्धांमधे सहभाग.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..