नवीन लेखन...

स्मरणगाथा : ३ 

मे महिन्याचे दिवस होते .
चार दीपावली अंकांना लघुकथा पाठवून झाल्या होत्या . एका दीपावली अंकासाठी दीर्घकथा लेखन चालू होते .
आणि अचानक मेनका च्या संपादकांचा – राजाभाऊ बेहरे – यांचा फोन आला . ” मेनकासाठी भुईचाफा कथा मिळाली . आता जत्रा दीपावली अंकासाठी विनोदी कथा हवी आहे . सांगायला उशीर झाला आहे , पण कितीही उशीर झाला तरी कथा पाठवा . ”

बेहरे यांना नकार देणं शक्यच नव्हतं .
मी म्हटलं , ” मी विनोदी लेखन कधी केलं नाही , पण प्रयत्न करतो . आवडली नाही कथा तर साभार परतीचा पर्याय मला आवडेल . ”
पलीकडून हसण्याचा आवाज आला .
आणि नेहमीप्रमाणे मी डोक्याला हात लावून बसलो .
भिडस्त स्वभावामुळे कुणाला नकार देता येत नव्हता . आणि इथे राजाभाऊंचा शब्द होता .
त्यांना नकार देणं म्हणजे कृतघ्नपणा ठरला असता .

कारण माझी पहिली कादंबरी मेनका प्रकाशनामार्फत त्यांनीच प्रकाशित केली होती . त्यासाठी पुन्हा पुन्हा लेखन करायला लावून माझ्यातल्या लेखकाला आकार देण्याचे काम केले होते . ती कादंबरी मी तीन वेळा लिहिली होती . विषय आवडल्यामुळे त्यांनी लेखनाचा आग्रह धरला होता . त्यांची माझी साधी ओळखही नव्हती . कादंबरीचे पहिले हस्तलिखित तयार झाल्यावर कुणाला पाठवावे म्हणून विचारात असताना , रत्नागिरीच्या स्टँडवर एका बुकस्टॉल वर मेनकाचा अंक दृष्टीस पडला . त्यावरचा पत्ता लिहून घेतला आणि घरी हरचिरीला आल्यावर ते हस्तलिखित त्यांना पोस्टाने पाठवून दिले . पंधरा दिवसांनी ते साभार परत आले . सोबत चुका दाखवणारे आणि पुन्हा लेखन करा असा आग्रह धरणारे पत्र होते . मी ते बाड फाडून नव्याने लेखन केले . तेही पंधरा दिवसात परत आले . मी निराश झालो . पण बेहेरेंचं एका महिन्याने पत्र आलं , कादंबरीचं लेखन कुठपर्यंत आलं याची विचारणा करणारं .
मग मात्र मी सगळ्या चुका लक्षात घेत , नवीन शैलीत लेखन केले , आणि कादंबरी पाठवून दिली . मनाशी पक्का निश्चय केला , की आता हस्तलिखित परत आले तर कधीही लेखन करायचे नाही .

पण अहो आश्चर्यम !
कादंबरी स्वीकारल्याचे , ती मेनका मासिकात क्रमशः प्रसिद्ध करण्याचे , त्यानंतर पुस्तक काढण्याचे , मानधनाचे करारपत्रच त्यांनी पाठवून दिले होते .
तेव्हा मी हरचिरी हायस्कूल येथे शिक्षक म्हणून नोकरी करत होतो .
आई अण्णांना खूप आनंद झाला होता . अर्थात मलाही गगन ठेंगणे वाटत होते .

त्या एका पत्राने माझे सगळे आयुष्यच बदलून गेले .
त्यानंतर राजाभाऊंनी माझ्या अनेक कादंबऱ्या क्रमशः प्रसिद्ध केल्या . मेनका , रविवारची जत्रा यासारख्या अंकातून त्यांनी मला महाराष्ट्रभर प्रसिद्धी दिली . महाराष्ट्रात जिथे जिथे एस टी स्टँड होते त्या त्या ठिकाणी त्यांची मासिके आणि साप्ताहिके खूप विकली जात होती . त्यामुळेच मला खूप मोठा वाचकवर्ग लाभला . फॅन मेल च्या पत्रांनी माझ्याकडच्या फाईल्स भरून जाऊ लागल्या .
हरचिरीला आमच्याकडे अगदी क्वचित पत्र घेऊन येणारा पोस्टमन आता आठवड्यातून तीन तीनदा येत होता .
आई अण्णांना त्याचेही खूप अप्रूप वाटत होते . त्यांचाही वेळ चांगला जाऊ लागला होता . किंबहूना माझ्यापेक्षा अण्णांच आता पोस्टमन ची वाट बघू लागले होते .

या प्रसिद्धीचा आणखी एक चांगला परिणाम झाला तो म्हणजे अन्य दिवाळी अंकांसाठी लेखन पाठवण्याची विनंती करणारी पत्रे येऊ लागली होती .
महाराष्ट्र टाइम्स , कालनिर्णय , लोकसत्ता , अंतर्नाद , किस्रीम अशा अनेक अंकांसाठी मी लेखन करू लागलो . ( त्याविषयी नंतर केव्हातरी लिहीनच . )

— पण जत्रा साठी विनोदी कथा लिहिणे , आव्हानच होते .

त्याचवेळी मुंबईला नातेवाईकांकडे लग्न होते आणि जाणे गरजेचे होते . एसटी ने जाण्यापेक्षा मी रेल्वेने जायचे ठरवले .
त्याकाळात दादर पॅसेंजर ही माझी अतिशय आवडती ट्रेन होती .
मी अनेक वेळेला त्यातून प्रवास केलेला आहे .
रत्नागिरीहून जाताना किंवा दादरहून येताना प्रचंड गर्दी असायची . पण बसायला जागा मिळत असे . अर्थात थोडी घुसखोरी करायला लागायची . पण मजा यायची .
त्या गाडीत एकदा चढायला मिळाले की वेगवेगळ्या चवींचा चहा , खाण्याचे विविध पदार्थ , विविध वस्तू विकणारे विक्रेते , पाणी , कोल्ड्रिंक्स असं काही काही मिळायचं . तेही स्वस्तात .
गाडीत खाण्यासाठी घरून काही नेलेलं मला आठवत नाही . एक मात्र आठवतंय , रत्नागिरीहून जाताना चिपळूण किंवा खेड स्टेशनवर एक म्हातारे गृहस्थ , गरमागरम उपमा विकायला यायचे . तो मात्र मी आवडीने घेत असे . स्टीलच्या स्वच्छ डब्यात ते उपमा घेऊन यायचे आणि गोड हसत विकायचे . अनेकांना त्यांच्या उपम्याने वेड लावले होते . डबा रिकामा झाला की पुढच्या स्टेशनला ते उतरून जायचे . त्यांच्या उपम्याची चव अजून आठवते .

पण खरी मजा यायची ती प्रवाशांच्या गप्पा ऐकण्यात .
अगदी घरात असल्यासारखे प्रवासी मोठमोठ्यांदा बोलायचे , गप्पा मारायचे . बायकासुद्धा बडबडत असायच्या . सासरच्या व्यथा , माहेरच्या आठवणी , मुलांची प्रगती असं सगळं त्या एकमेकींना सांगायच्या .
मला त्या सगळ्यांच्या गप्पांचा हेवा वाटायचा . कोण काय म्हणेल , मॅनर्स याचा विचारही लोक करत नसत . सगळी बोगी म्हणजे गप्पांचा पार वाटायचा .
खरं सांगायचं तर दादर पॅसेंजर मधून प्रवास करण्याचा माझा हेतू स्वच्छ होता . एक म्हणजे आपल्याकडे कोण बघतंय की काय याचा विचार न करता आवडेल तो पदार्थ विकत घेऊन हादडता येत होता आणि गप्पा ऐकता येत होत्या .
आणि खोटं कशाला बोलू , मला कथांसाठी त्या गप्पांतून कथाबीजं सुद्धा मिळत होती . व्यक्तिरेखा सापडत होत्या . मानवी भावभावनांचा कल्लोळ अनुभवायला मिळत होता . ( त्याविषयी पुन्हा केव्हातरी )

तर त्या ट्रेन ने प्रवास करताना कोकणी बाण्याचे काही प्रवासी इलेक्शनवर जोरजोरात वाद घालत होते . नेहमीच्या सवयीनं शिव्या , कुळाचा उध्दार, उमेदवारांचा भ्रष्टाचार असे अनेक मुद्दे रंगत होते .

त्या गप्पा ऐकताना अचानक कुणी तरी म्हणाला , ‘ आजच्या काळात निवडून यायचे असेल तर साध्या सरळ माणसाला मुश्किल होऊन जाईल , त्या स्वच्छ चारित्र्याच्या माणसाला सुद्धा इतर भ्रष्ट उमेदवारांसारखे वागावे लागेल .’
अर्थात हे म्हणताना तो ज्या शिव्या वापरत होता त्या इथे लिहिण्यासारख्या नाहीत .

पण मला ते वाक्य खूप काही देऊन गेले .
आणि जत्रा दीपावली अंकासाठी , शीर्षकासह कथा मनात आकार घेऊ लागली .
त्यावर्षी चिमणरावांची निवडणूक ही विनोदी कथा मी लिहिली आणि राजाभाऊंना पाठवली . त्यांनाही ती कथा खूप आवडली आणि नंतर वाचकांनाही .

आज दादर पॅसेंजर ही ट्रेन आठवली त्या ट्रेनने सुद्धा मला लेखक होण्यात किती मोलाची कामगिरी बजावली आहे . याचे स्मरण झाले .

आणि कोकण रेल्वेला सलाम करावासा वाटला !

डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
दिनांक : २५ जुलै २०२५
८९५१९०६७०१
—————
स्मरणगाथा आवडल्यास नावासह सर्वदूर पाठवायला हरकत नाही

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 150 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..