अडुसष्ट वर्षांपूर्वी – भाग १

मी त्यावेळी चौदा वर्षांचा होतो. तो दिवस मला आठवतो. 30 जून ही तारीख होती. महिन्याचा शेवटचा दिवस-‘मंथ एण्ड’ म्हणून शाळेला अर्धा दिवस सुट्टी मिळाली होती. म्हणजे शाळेचं काम चालूंच होतं पण मुलांना अर्ध्या दिवसाची सुट्टी मिळाली होती. कोंडवाड्यातून सुटल्याप्रमाणे मी धावत घरी आलो.

दाराबाहेर बायकी सॅंण्ड़ल्सचा जोड दिसला. तो थोडा लहानच वाटला. कोण आलं असावं, असा विचार करत मी घरात शिरलो.
“अरे, ती तुझीच वाट पहात आहे” आई म्हणाली. आणि नलू समोर उभी राहिली. तिला पाङून मला आश्चर्य आणि आनंद झाला.
“चल. आपण गप्पा मारूया. तूं इकडे कशी काय आलीस?” मी तिला आतल्या खोलीत नेत विचारलं.
“तुला मी आलेलं आवडलं नाहीं कां?” तिने भाबडेपणे विचारलं.
“तसं नाहीं गं, तू आल्यामुळे मलाच काय पण घरच्या सर्वांना आनंद झाला आहे”. मी म्हणालो.
“बरं, तूं भुकेली आली असशील, आईने तुला कांहींतरी दिलं कां नाहीं?” मी विचारलं.
“हो तर, मामीने तुझ्यासाठी ठेवलेल्या भाकरीतून मला वांटा दिला”. माझ्या आईला ती मामी म्हणत असे. आई तिथे आली. माझ्या साठी तिने गरम भाकरी आणि चटणी दिली. आणि पाव्हणी साठी पुन्हा दुसरी थाळी दिली.
“मामी, दुसरी थाळी नको. मी मधूच्या थाळीतून घेई” असं म्हणत तिने माझ्या ताटलीतली अर्धी उष्टी भाकर खाल्ली.माझ्या विरोधाला न जुमानतां तिने तो भाकरीचा तुकडा खाल्ला.
आमच्या गप्पा रंगल्या. तिला आठवण झाली. तिने मला गप्पांतून उठवलं.
“मला आईने सामंतच्या दुकानातून लोणी आणायला सांगितलंय. तूं चल ना माझ्याबरोबर” ती म्हणाली. तेव्हढ्यात माझी आई तिथे आली.
“जा रे तिच्याबरोबर. तिला लोणी घ्यायला मदत कर.” आई म्हणाली.

मी नलूला बरोबर घेऊन निघालो. सामंतच्या दुकानांत लोणी घेऊन आम्ही परतलो.
मी अतिशय आनंदात होतो. नलू- माझी मैत्रीण मला अचानक भेटली होती. चौदा वर्षाचा मी आणि अकरा वर्षांची नलिनी. आमची भेट चिपळूणला झाली होती. मे महिन्याच्या सु़ट्टीत ती तिच्या आजोळी आली होती. मी माझ्या आई-वडलांबरोबर माझ्या काकांकडे आलो होतो. आमच्या घराशेजारीच तिचं आजोळ होतं. बघता बघतां आमची मैत्री वाढली. मी मूळचा लाजाळू आणि बुजरा. मुलींपासून चार हात लांब रहाणारा पण नलूशी मैत्री जमली. तिच्या आईवडलांना व माझ्या आईवडलांना आमची मैत्री आवडली होती. आम्ही मुंबईतच रहातो हे समजल्यावर मुंबईत भेटायचं असं ठरलं. आणि नलू आली, भेटली. आईने मला नलूला तिच्या घरी पोहोंचवून यायला सांगितलं. मी आनंदलो.

आम्ही दोघे निघालो. कोहीनूर मिल नंबर ३ च्या बस स्थानकावर आलो. त्याकाळी A 3/Ltd अशी बस नव्याने चालू झाली होती. ती बस माहीमच्याही पुढे जाणार होती. आम्ही दुमजल्या बसच्या वरच्या मजल्यावर बसलो. बस माहीमपर्यंत आली आणि बंद पडली. त्यानंतरची बस केंव्हा येणार हे तिथल्या कोणालाही सांगता येत नव्हतं.

“चल आपण पायी जाऊया” असंं नलूने सुचवलं. आम्ही पायी निघालो. पाऊस लागला. आधी रिमझिम पडणारा पाऊस जोरदार पडूं लागला. आम्ही पावसांत भिजूं लागलो. तशात नलूच्या उजव्या सॅंण्डलचा आंगठा तुटला. डाव्या हातात सॅंण्डल्सचा जोड आणि लोणी घेतलेली पिशवी घेऊन आपला उजवा हात तिने माझ्या डाव्या हातांत गुंफला व ती माझ्याबरोबर चालू लागली.

“आपण आ़डोश्याला थांबूया कां? पाउस ओसरल्यावर चलूंया” मी म्हणालो.संध्याकाळ संपून काळोख पडला होता.
“नको. असंच पावसांत भिजत जाऊंया.” कांहीश्या ह़ट्टी पण आर्जवी सुरांत ती म्हणाली. तोंडाने गप्पा चालूंच.पावसांत चिंब भिजत आणि गप्पा मारत आम्ही तिच्या घरी केंव्हा पोहोचलो ते कळलंच नाहीं. घरी तिचे वडील होते.तिची आई व इतर भावंडं अजून आली नव्हती. “थांब हं, मी आलेच” असं म्हणत नलू आंतल्या खोलीत गेली. तिने एक टावेल आणला. आपल्या हाताने तिने माझं ओलं डोकं पुसलं. तिच्या वडलांनी “लीच” नांवाची फळं दिली. “खूप उशीर झाला आहे, मी तुला थांबवत नाही. तूं लवकर घरी जा” त्यांनी मला स्पष्ट शब्दात सांगितलं. मी निघालो. मला निरोप द्यायला नलू दारापर्यंत आली. पुन्हा हातांत हात देऊन तिने निरोप दिला.

मी एका वेगळ्याच तंद्रीत घरी परतलो.

 

— अनिल शर्मा

About अनिल शर्मा 15 Articles
वास्तव्य – बेंगलूरू-कर्नाटक, वय एक्क्यांशी, शिक्षण मराठी भाषेतून झाले. सध्या वृद्धाश्रमात रहातो. एके काळी वकीलीचा व्यनसाय केला. आता स्वस्थ बसून संगणकावर काहीेतरी लिहीत आसतो.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

पर्वतीच्या टेकडीवरची लेणी

पर्वताई देवीच्या नावावरुन टेकडीस पर्वती हे नाव पडले, पुण्याच्या अनेक ...

रत्नागिरी जिल्ह्यातील नारळ संशोधन केंद्र

रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. हे केंद्र ...

सातारा जिल्ह्यातील पवनऊर्जा प्रकल्प

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा पवनऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तो ...

सातवाहनकालीन कर्‍हाड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन ...

Loading…