नवीन लेखन...

10.25 बदलापूर फास्ट

बीपीटी कॉलनीतील चाळीवजा बिल्डिंग मध्ये लहान खोल्यांमध्ये मागील वर्षापर्यंत गणेशोत्सव साजरा करणारे राघव काका आणि त्यांचा पुतण्या विजय, यावर्षी दोघेच जण भायखळ्याहुन गणपतीची मुर्ती न्यायला आले होते. राघव काकांनी वीस वर्षांपुर्वी घरात दीड दिवसांचा गणपती आणायला सुरुवात केली होती. तेव्हापासून बीपीटी कॉलनीत त्यांच्या घरी त्यांचा मोठा भाऊ आणि लहान भाऊ सह कुटुंब दोन दिवसांसाठी येऊन राहत होते.

राघव काका ,मोठा भाऊ शांताराम अण्णा आणि लहान भाऊ लक्ष्मण, आई देवाघरी गेलेली तर वडील शांताराम अण्णांच्या घरी असायचे. राघव काकांना दोन मुली तर शांताराम अण्णांना दोन मुली आणि एक मुलगा, लक्ष्मण काकांना दोन मुलेच असा मोठा परिवार. राघव काकांच्या दोन लहान खोल्यांच्या त्यांच्या घरात दोन रात्री सगळे मुक्कामी यायचे.

एका घरात दोन भावांचे किंवा दोन स्त्रियांचे पटत नाही पण राघव काकांचे घर अपवाद होते, गणपतीत तीन दिवस त्यांच्या घराचा ताबा शांताराम अण्णांच्या सौभाग्यवती म्हणजे मोठया आई यांच्याकडे असायचा. घरात जे काही हवं नको ते लक्ष्मण काका बघायचे. लक्ष्मण काकांची आर्थिक परिस्थीती दोघांपेक्षा खूपच चांगली होती,त्याने दहा वर्षांपुर्वी डोंबिवलीत खुप मोठे घर घेतले होते. पण बी पी टी कॉलनीत जागा लहान आहे गणपती माझ्या घरी बसवू या असा विचार त्यांच्या मनाला कधीच शिवला नाही.

वीस वर्षांपासून सगळे वेगवेगळे राहत असले तरी आतून एक होते. गणपतीत दोन दिवस सगळे एक होउन राहायचे. सगळ्यांना घरात एकत्र आल्यावर झोपायलाच काय पण एकत्र बसायला देखील जागा पुरायची नाही. तसे बघितले तर दोन रात्रं कोणी झोपायचेच नाही. आदल्या रात्री गणपतीची तयारी तर गणपती आल्यावर रात्रभर देवाची गाणी गात बैठे खेळ खेळत जागरण. घरातील प्रत्येक जण गणेशोत्सवाची आतुरतेने वाट बघायचे. राघव काकांच्या मजल्यावरील दोघं शेजारी कोकणातील वैभववाडीचे होते, ती दोन्हीं कुटुंबं गणपतीला गावी जाण्यापूर्वी त्यांच्या खोल्यांच्या चाव्या राघव दादांकडे देऊन जायचे.

एवढ्या सगळ्यांचा स्वयंपाक आणि जेवणं त्या दोन्ही खोल्यांत व्हायची त्यामुळे राघव दादांचा गणेशोत्सवात जागेची अडचण फारशी आडवी येत नसे. कॉलनीतील आजूबाजूच्या दोन्ही बिल्डिंग मधील कित्येक परिचित देवदर्शनासाठी यायचे. लक्ष्मण काकांच्या सौभाग्यवती कळीचे सुंदर मोदक बनवायच्या शंभर हून जास्त लोकं पहिल्या दिवशी जेवायचे प्रत्येकाच्या पानात मोदक वाढल्यावर, गुळाचा नारळीभात राघव काकांच्या सौभाग्यवती आग्रहाने वाढायच्या. डाळिंबीची लाल भडक भाजी आणि भेंडीची लसूण कांद्यावरील हिरवी भाजी वाढली जायची. लक्ष्मण काकांचा मोठा मुलगा वीस वर्षांपुर्वी पहिल्यांदा गणपती आणला त्यावर्षी आठ वर्षांचा होता तेव्हा पासून प्रत्येक पानात भातावर वरण वाढून झाले की तो त्यावर चमच्याने तुपाची धार सोडायचा आणि शांताराम अण्णांचा मुलगा त्यावर अर्धा चमचा साखर घालायचा. गेल्या वीस वर्षांपासून साग्र संगीत जेवणाचा मेन्यू आणि वाढायच्या पद्धतीत अजूनही बदल झालेला नव्हता.
राघव काकांच्या बिल्डिंग मधील वातावरण गोड वासाने आणि सगळ्यांच्या आनंदी वागण्याने प्रफुल्ल होउन जायचे.

राघव काका वर्षभरापूर्वी बदलापूरला शिफ्ट झाले त्यांच्या दोन्ही आणि शांताराम अण्णांच्या दोन्ही मुलींची लग्न झाली होती.
शांताराम अण्णांच्या मुलाचेही लग्न झाले होते. लक्ष्मण काकांच्या मोठ्या मुलाचे लग्न झाले होते तर विजय नुकताच नोकरीला लागला होता. राघव काकांचे वडील चार वर्षांपूर्वी वारले होते. राघव काका भायखळ्याच्या एका दुकानातून गणपतीची मुर्ती घ्यायचे, त्या दुकानात पेणच्या सुबक मुर्ती आणल्या जायच्या, राघव काका गेली वीस वर्षे त्याच दुकानातून एकाच मुर्तिकाराकडून मागवलेली मुर्ती घ्यायचे. मूर्तीचा आकार, रंग आणि सुबकता जशी वीस वर्षांपुर्वी पहिल्यांदा घेतली होती तशीच अजूनही टिकून असल्याने राघव काका यावर्षी सुद्धा मुर्ती न्यायला बदलापूर हुन भायखळ्याला आले होते. दरवर्षी प्रमाणे त्यांनी अगोदरच त्यांची मुर्ती बुक करून ठेवली होती.

सोमवारी रात्री मुर्ती घ्यायला गेल्यावर दुकानदार म्हणाला देखील की एव्हढ्या लांबून येऊन मुर्ती नेण्यापेक्षा तुम्ही बदलापूरलाच का नाही मुर्ती बघितली. त्यावर राघव काका म्हणाले जो पर्यंत तू मुर्ती मागवून देशील तोपर्यंत आणि मी जिवंत असेपर्यंत इतर कोणाकडूनही मुर्ती घेणार नाही, माझ्यानंतर ही पोरं जिथून आणतील तिथून आणू देत. सोमवार असल्याने गाड्यांना नेहमीप्रमाणे गर्दी होती. मुर्ती घेतल्यानंतर विजय आणि राघव भायखळा स्टेशन वर आले.

त्यांनी बदलापूर हून मुंबई सी एस टी चे रिटर्न तिकीट काढले होते. भायखळ्याच्या प्लॅटफॉर्म नंबर चार वरुन त्यांनी मुंबईला जाणारी फास्ट लोकल पकडायचे ठरवले. तीच लोकल मुंबई सी एस टी हून कर्जत दिशेकडे जाणारी असेल तर ठीक नाहीतर भायखळ्याला गर्दीत चढण्यापेक्षा मुंबई सी एस टी हून बदलापूर ला जाणारी लोकल मध्ये सावकाश चढू. पुढील पाचच मिनिटात दहाच्या सुमारास मुंबई सी एस टी ला जाणारी फास्ट लोकल आली. रात्रीचे दहा वाजायला आल्याने भायखळयाला फारशी चढणारी किंवा उतरणारी लोकं नव्हती.

विजय ने मुर्ती हातात धरली होती, दुकानदाराने पाऊस असल्याने मूर्तीवर प्लास्टिकची मोठी पिशवी घातली होती. वयाची साठी ओलांडलेले राघव काका आणि पंचविशीत असणारा विजय दोघेही मुर्तीसह लोकल मध्ये चढले. लोकल मधील दहा बारा लोकं त्या दोघांकडे आणि मूर्तीकडे कुतूहलाने बघू लागले.

विजयने रिकाम्या सीटवर गणपतीची मुर्ती व्यवस्थित ठेवली आणि तो सुद्धा बसला. राघव काका समोरच्या सीटवर बसले. गाडी मुंबई सी एस टी स्टेशन मध्ये पोचली. गाडी प्लॅटफॉर्मवर येण्यापुर्वी अनाउन्समेंट होउन इंडिकेटर वर 10.25 वाजताची बदलापूर फास्ट लावल्याने गाडी स्टेशन मध्ये शिरल्या शिरल्या धावत्या लोकल मध्ये लोकं पटापट चढू लागली.

चढणाऱ्या सगळ्यांची स्वतः साठी आणि त्यांच्या ग्रुप मधील मेंबर्स साठी जागा पकडुन अडविण्याचा आटापिटा सुरू होता. एरवी ग्रुप मेंबर त्यांच्या सीटवर कोणी चुकून बसला तर त्याला उठवून दुसऱ्या रिकाम्या सीटवर जायला सांगतात. पण आज डब्यात सीटवर गणपती बाप्पाची मुर्ती बघून प्रत्येक जण थबकत होता. गाडी सी एस टी ला पुर्णपणे थांबण्यापूर्वीच डब्यातील बहुतेक सीट भरुन गेल्या. उरलेल्या रिकाम्या सीट भायखळ्याला भरल्या जाऊन दादरला उभं राहायला पण जागा उरणार नव्हती.

गाडी राईट टाईम आली आणि सुटली देखील. गाडी सुटताना त्या डब्यातून जोराने गणपती बाप्पा…… मोरया ,मंगल मुर्ती…….मोरया , उंदीर मामा की………. जय या घोषणा मोठ्याने दुमदुमल्या. विजय आणि राघव काका दोघेही भारावून गेले. भायखळा येण्यापुर्वीच विजय ने मुर्ती मांडीवर घेतली आणि बाजूला उभ्या असलेल्या एका मुलीला बसायला जागा दीली. जसजसा गाडीने वेग पकडला मुर्तीवरील प्लास्टिक पिशवी वाऱ्याने फडफडू लागली.

कामावरून उशिरा घरी परतणारे नोकरदार गाडीत बसायला जागा मिळाल्यावर आणि गाडीने वेग धरल्यावर मुंबईतील वाऱ्याची थंडगार झुळुक लागल्यावर दिवसभर झालेल्या कामाची दगदग क्षणभर विसरतात आणि सुस्तावून काहीसे विसावतात. पण आज सगळेजण अगदी पाठमोरे असणारे देखील मागे वळून वळून गणपतीची मुर्ती बघत होते. प्लास्टिक पिशवी असूनही आतील मुर्ती एवढी सुंदर आणि मोहक वाटत होती की कितीही पहिले तरी प्रत्येकाला त्या मुर्तीकडे पुन्हा पुन्हा बघावेसे वाटतं होते. दोन तीन प्रवासी विजयला बोलले सुद्धा भाऊ मुर्ती कडे बघितल्यावर असे वाटते की गणपती बाप्पा आमच्याचकडे बघतो आहे असं वाटते. ही मुर्ती तुम्ही कुठून घेतली, कितीला घेतली, खूपच आकर्षक आणि सुंदर आहे.

दादरला गाडी खचाखच भरली एरवी दोन सीट मधील पॅसेज मध्ये चार पाच जण एका मागे एक चिकटून उभे असतात पण आज विजय बसला होता त्या पॅसेज मध्ये कोणीही उभं राहायला आला नाही मुद्दाम हून ती जागा मोकळी ठेवली होती. डब्याच्या मागील भागात दादरला काहीजण चढल्यावर भजनी मंडळ पुर्ण होउन त्यांचे भजन सुरू झाले. डब्यात गणपतीची मुर्ती आहे हे बघून त्यांनी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय म्हणुन सुरुवात केली आणि फक्त गणपतीची गाणी गायला सुरुवात केली.

मुलुंड स्टेशनचा प्लॅटफॉर्म संपता संपता पुन्हा एकदा संपूर्ण डब्यातून जोराने गणपती बाप्पा…… मोरया ,मंगल मुर्ती…….मोरया , उंदीर मामा की………. जय या घोषणा मोठ्याने दुमदुमल्या. ठाणे स्टेशन गेल्यावर राघव काकांसह सी एस टी आणि भायखळ्याहून बसून आलेले प्रवासी एका मागोमाग एक उठून उभे राहू लागले आणि उभ्या असलेल्या प्रवाशांना बसायला जागा देऊ करू लागले. राघव काका उभे राहिले असता त्यांना समोरच्या तरुणाने उठू न देता बसून राहा काका तुम्हीच असे हसून सांगितले. डोंबिवलीला गाडीतील बरीचशी गर्दी कमी झाली. कल्याणला आणखीन कमी झाली. कल्याण नंतर गर्दी कमी झाल्यावर विजय च्या बाजूच्या सीटवरील तरुण उठला आणि त्याने विजयला मुर्ती मांडीवरून सीटवर ठेवण्यास सांगितले. अंबरनाथ गेल्यावर राघव काकांचा मोबाईल वाजला, त्यांनी फोन उचलून सांगितले की आम्ही अंबरनाथ सोडले पंधरा वीस मिनिटात पोचतो घरी. १०.२५ वाजताची लोकल बदलापूरला रात्री बारा वाजता पोचली. गाडीतून उतरताना कित्येक जणांनी डब्यातून प्रवास केलेल्या गणपती बाप्पाला मनोभावे हात जोडून नमस्कार केला. वीस वर्ष राघव काकांच्या कुटुंबातील जिव्हाळा अनुभवणाऱ्या गणपती बाप्पांनी आज लोकल मधील मुंबई स्पिरीट सुद्धा अनुभवले.

विजयने स्टेशन वरुन रिक्षा करण्या ऐवजी राघव काकांना सांगितले की मी डोक्यावरच मुर्ती घेतो पाच मिनिटात पोहचू मधल्या गल्लीतून.
राघव काकांच्या धाकट्या मुलीकडे गणपती असल्याने ती येणार नव्हती पण मोठी मुलगी आणि तिचा दोन वर्षांचा मुलगा आला होता.
लक्ष्मण काका आणि काकू आणि काकांचा मोठा मुलगा सपत्नीक हजर होता. शांताराम अण्णांच्या दोन्ही मुली दुसऱ्या दिवशी येणार होत्या, अण्णा आणि मोठी आई आणि त्यांचा मुलगाही सपत्नीक येऊन पोचला होता. बिल्डिंगच्या खाली मोठी आई सोडून सगळेजण येऊन थांबले होते.

गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया करत सगळ्यांनी राघव काका आणि विजय यांचे आनंदाने स्वागत केले. लिफ्ट मधुन वर बाहेर पडल्यावर दरवाजात मोठी आई वाटीत पाणी घेऊन उभी होती. तिने विजयच्या पायावर पाणी घातले आणि मुर्ती घरात आणायला सांगितली. राघव काकांचा दोन वर्षांचा नातू दोन्ही सूना आणि सगळे जण साडे बारा वाजले तरी जागे होते. राघव काकांचे घर बदलले होते , चाळीतून फ्लॅट मध्ये आले होते, मुलींची लग्नं होऊन घरी सुना आल्या होत्या तरीपण त्या सगळ्यांची आजची रात्र गणपतीची तयारी करण्यात आणि उद्याची रात्र जागरणातच जाणार होती. सकाळी ताज्या फुलांनी सजवलेल्या सुंदर मखरात मुर्तीची प्रतिष्ठापना करून विधिवत पूजा केली जाणार होती. तोवर मुर्ती बेडरूम मध्ये ठेवली जाणार होती. विजयने मुर्ती खाली ठेवली, राघव काकांचा दोन वर्षांचा नातु आनंदाने टाळ्या वाजवुन बाप्पा आला बाप्पा आला असं बोबड्या आवाजात बोलू लागला, घरातील सगळेच जण त्याच्याकडे बाप्पा आला हो आता आपल्या घरी म्हणून कौतुकाने बोलत होते.

राघव काकांनी गणपती बाप्पाला दुकानदाराने घातलेली प्लास्टिकची पिशवी काढून मुर्तीकडे पाहू लागले. गणपती बाप्पा त्यांच्याचकडे प्रसन्न हसत बघत आहेत असं राघव काकांना वाटू लागले.

-प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनिअर
कोन, भिवंडी, ठाणे.

180923
( फोटो कर्ट्सी – गुगल)
काहीशा अपरिचित आणि अनभिज्ञ अशा रोमांचक आणि आव्हानात्मक मर्चंट नेव्ही या करिअर संदर्भातील महत्वाचे व मानाचे पुरस्कारप्राप्त माझी पुस्तकं,
सृजन संवाद प्रकाशन, ठाणे, प्रकाशित,
(अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वर उपलब्ध)
१) “द फ्लोटिंग लाईफ इन मर्चंट नेव्ही ”
( मराठी वाड्मय परिषदेचा अखिल भारतीय अभिरुची गौरव आणि
सारांश राज्य स्तरीय पुरस्कारप्राप्त)
२) “सातासमुद्रापार ”
( ठाणे ग्रंथंग्रहालयातर्फे वा. अ. रेगे पुरस्कार ,
दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रतिष्ठानचा राज्य स्तरीय पुरस्कार आणि
सारांश राज्य स्तरीय पुरस्कारप्राप्त)
संपर्क: 8928050265

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 185 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..