रस्टनबर्ग मधील १ वर्ष!!

रस्टनबर्ग मधील नोकरी ध्यानीमनी नसताना, हाताशी आली, म्हणजे इथे मी इंटरव्ह्यूसाठी २००४ साली आलो होतो पण पगाराबाबत आणि तेंव्हा ती कंपनीच्या Expansion Programme मध्ये प्रॉब्लेम्स आल्याने सगळेच रहित झाले आणि माझ्या डोक्यातून तो विचार निघून गेला होता. परत पीटरमेरीत्झबर्ग या शहरात सुखनैव (??) आयुष्य सुरु झाले होते. २००५ मधील, जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात ( वास्तविक या काळात सगळा साउथ आफ्रिका सुटीवर असतो) फोन आला आणि फोनवरच पगार, इतर पर्क्स नक्की झाले आणि नोकरी पक्की झाली. जेंव्हा २००४ साली इथे २ दिवस आलो तेंव्हा मला हे शहर काही फार आवडले नव्हते, किंबहुना गावात एकच मोठा मॉल वगळता फारसे काहीच बघण्यासारखे नव्हते (अर्थात इथून ४० मैलावर सन सिटी आहे, ही माहिती होती) आणि मला तसा खास उत्साह वाटला नव्हता.
पीटरमेरीत्झबर्ग इथली नोकरी सोडायचे नक्की केले होते कारण, इथे कामाचे स्वातंत्र्य, कामाच्या वेळा आणि वरिष्ठांची वागणूक, या पातळीवर बरेच प्रॉब्लेम्स होते आणि त्याचा निचरा होणे, केवळ अशक्य होते. थोडक्यात, एका नवीन शहराचा नव्याने अनुभव, हा विचार मनाशी बांधून, पीटरमेरीत्झबर्ग सोडले. वास्तविक, तेंव्हा माझ्याकडे कंपनीची गाडी असल्याने, ती मला परत करावी लागली. पीटरमेरीत्झबर्ग पासून रस्टनबर्ग शहर, जवळ पास ८०० किलोमीटर लांब, तिथे विमानतळ नाही तेंव्हा Intercity बसने आधी जोहान्सबर्ग इथे जायचे, तिथे मला कंपनीची गाडी न्यायला येईल आणि मग रस्टनबर्ग गाठायचे, असे ठरले. त्यानुसार मी बसने निघालो. इथली बस सर्विस अत्यंत सुंदर आणि पोटातले पाणी देखील हलणार नाही, याची काळजी घेतली जाते!!
जोहान्सबर्ग इथे माझ्या, पहिल्या कंपनीतील, विनय थलींजा, रहात होता आणि त्याच्याकडे त्यादिवसाचा मुक्काम करायचे ठरवले. विनय, इथे २ वर्षे रहात असल्याने, तिथे चांगला स्थिरावला होता. तो, बस स्टेशनवर उतरवून घ्यायला आला आणि मला हायसे वाटले. जोहान्सबर्ग शहर म्हणजे “विराट” या शब्दाला साजेसे शहर आहे आणि जर का तुम्हाला नेमका पत्ता माहित नसला तर या शहरात, तुम्ही पार गोंधळून जायला होते. (पुढे इथे नोकरी मिळाल्यावर मला, १,२ वेळा याचा अनुभव आला होता).
दुसऱ्या दिवशी दुपारी, केसी (वास्तविक हा गुजराती मुलगा – कमलेश,पण इथे येउन, इथल्या संस्कृतीला साजेसे नाव स्वीकारले!!) मला न्यायला आला. माझ्याकडे त्यावेळी २,३ Bags वगळता फारसे सामान नव्हते. पीटरमेरीत्झबर्ग इथे कंपनीने घर दिल्याने, काही सामान विकत घेण्याचा प्रश्नच नव्हता. जवळपास दीड तासाच्या प्रवासानंतर रस्टनबर्ग आले. वाटेत, गाडीत बसल्यावर, कंपनीची अधिक खोलवर माहिती, म्हणजे, माझ्या हाताखाली कितीजण आहेत तसेच एकूण कंपनीची कार्यपद्धतीबद्दल जुजबी माहिती मिळवली. अर्थात १ वर्षानंतर परत या शहरात आलो पण तसा फारसा आढळत नव्हता.
इथे मला राहायला एक छोटा बंगला होता परंतु इथे माझ्यासोबत, केसी, निमेश इत्यादी ४ गुजराती मुले होती. अर्थात, माझी स्वतंत्र व्यवस्था, बंगल्याचा वरच्या मजल्यावर केली होती. ही सगळी मुले, तेंव्हा पंचविशीच्या आसपास होती पण सगळी शाकाहारी!! आमचे किचन कॉमन होते, त्यामुळे स्वयंपाक एकत्र करणे, क्रमप्राप्तच होते!! सुरवातीला फारशी ओळख नसल्याने, वागण्यात बुजरेपणा होता. पुढे निमेशशी माझे फारच जवळकीचे संबंध निर्माण झाले.
दुसऱ्या दिवशी सरळ ऑफिस!! माझ्या खात्यात, टीना ले रुक्स (माझ्या आयुष्यात आलेली पहिली गोरी मुलगी), ली ( ही काळी मुलगी) आणि माझी रिसेप्शनिस्ट स्टेला ( ही दुसरी गोरी मुलगी) असे कामाला होते. गोऱ्या समाजाची ओळख आणि काहीप्रमाणात अंतरंग, मला इथेच लक्षात आले. इथेही सुरवातीला वागण्यात थोडा बुजरेपणा होता आणि त्यात मला तरी काहीच नवल वाटले नाही. पहिला आठवडा तर कामाचा चार्ज घेण्यात गेला. आमच्या कंपनीचा सुपर मार्केटचा व्यवसाय होता आणि त्याचा व्याप तसा खूपच मोठा होता. रिटेल आणि होलसेल, अशा दोन्ही धंद्यात कंपनीने जम बसवला होता.
जसजसे दिवस जायला लागले, तशी वागण्यात मोकळेपणा येत गेला. मी, या गोऱ्या लोकांचे एक वैशिष्ट्य बघितले आहे, जर का तुमच्या बरोबर काम करत असतील तर इतक्या मोकळेपणी वागतात की भारतातून येणाऱ्या माणसांना सुरवातीला थोडेसे बुजल्यासारखे होते. अर्थात, मला एव्हाना, या देशात येउन, १० वर्षे झाली असल्याने, इथल्या संस्कृतीचा बराचसा अंदाज आला होता.
जानेवारी असल्याने, इथे उन्हाळा होता. आजूबाजूचा प्रदेश खाणींचा असल्याने परिसर बराचसा रखरखाट होता. अर्थात, इथे स्थिरस्थावर व्हायला फारसा वेळ लागला नाही. घरातील नवीन मित्रांशी वागण्यातील बुजरेपण लवकरच निघून गेले. वास्तविक माझ्या आणि त्यांच्या वयात २० वर्षांचे अंतर होते तरीही मैत्री लगेच जुळली. सगळेच भारतातून आलेले आणि अर्थात माझा या देशातील १० वर्षांचा अनुभव असल्याने, ओळख मैत्रीत सहज झाली.
संध्याकाळी घरी परतल्यावर, एकत्र जेवण करणे, हा सोहळा असायचा. अर्थात, मसाले आणि चव, अर्थात गुजराती पद्धतीची!! हळूहळू, शनिवार संध्याकाळ, मॉलवर जाण्यात जाऊ लागली. इथला मॉल जरी मोठा असला तरी डर्बन इथल्या मॉलची सर नव्हती आणि ते क्रमप्राप्तच आहे. मुख्य कारण या गावाची लोकसंख्या दीड ते दोन लाख!! अगदी आजूबाजूची गावे धरली तरी चार लाखांच्या वर लोकसंख्या नाही तेंव्हा धंदा होणार कसा!! त्यातून, इथे बाहेरून येणारे सगळे सनसिटीला भेट देणारे म्हणजे त्यांच्याकडून देखील फार अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. असे असून देखील मॉल फार छान आहे, म्हणजे जगातील बहुतेक सगळ्या Branded वस्तू मुबलक उपलब्ध!! याचे दुसरे कारण, सनसिटी शॉपिंगच्या दृष्टीने कमालीचे महाग, त्यामुळे या गावातील सगळे इथेच खरेदीला येणार!!
गावात भारतीय वस्ती ( अगदी भारतीय वंशातील वस्ती धरून) जास्तीजास्त दहा ते बारा हजार, त्यामुळे गावात भारतीय हॉटेल नाही, एकच मुस्लिम धाटणीचे हॉटेल आहे आणि तिथे तर बहुतेक सगळे मांसाहारी पदार्थ, म्हणजे गुजराती मित्रांना जाणे, न जमणारे!!
मॉलमध्ये, आम्ही मित्र जेंव्हा जायचो, तेंव्हा मात्र मी मांसाहारी खाण्याची “तलफ” भागवून घेत असे!! तिथे सिनेमा थियेटर होते पण, बहुतांशी इंग्रजी चित्रपट. जरी माझे मित्र गुजराती असले तरी त्यांच्या आवडी/निवडी टिपिकल गुजराती!! वाचनाची आवड शून्य आणि संगीताची आवड फक्त चित्रपट संगीताची आणि ती देखील, माझ्या आवडीच्या पूर्ण विरुद्ध!! अर्थात, माझ्याकडे सिस्टीम असल्याने, मी, माझ्या वरच्या मजल्यावर शांतपणे, गाणी ऐकणे किंवा पुस्तक वाचणे, इत्यादी छंद पुरवून घेत असायचो. तरीही, ऐकलेल्या गाण्याबद्दल किंवा वाचलेल्या पुस्तकाबद्दल कुणाशी काही बोलणे, केवळ अशक्य!!
त्यातल्या त्यात, निमेशला जगजीत सिंग, अति प्रिय असल्याने, तो वर येउन, माझ्या बरोबर ऐकत असे. परंतु, एक फरक पडायचा आणि तो म्हणजे त्याची ऐकायची पद्धत आणि माझी पद्धत, यात जमीनअस्मानाचा फरक तरीही माझ्या सोबतीला कुणीतरी ऐकायला आहे, हे देखील मला बरे वाटायचे!!
ऑफिसमध्ये आठवडाभरात रुळून गेलो, इतका की टीना आणि स्टेलाशी एकत्रित गप्पा मारायला सुरवात केली. अगदी वैय्याक्तील स्वरूपाच्या गप्पा मारायला सुरवात झाली. स्टेलाचे पहिले लग्न मोडले होते (इथला नेहमीचा रिवाज) पण सध्या एका बॉयफ्रेंडबरोबर एकत्र रहात होती ( आता परत एकटीच रहात आहे, असे समजले) तर टीना – बॉयफ्रेंड नंबर ३ बरोबर रहात होती (दोन वर्षापूर्वी त्याच्याशीच लग्न केले). यात गमतीचा भाग असा, माझ्याशी याबद्दल बोलताना, त्यांना काहीच विशेष वाटत नव्हते. टीना म्हणजे स्मोकिंगचे “आगर”, दर अर्ध्यातासाने सिगारेट आवश्यक!! माझ्या कंपनीत जवळपास, ६ तरी गोऱ्या मुली/स्त्रिया होत्या आणि त्यातील बहुतेकांची कहाणी या दोघींपेक्षा फार वेगळी नव्हती.
पुढे, दोन एक महिन्यांनी त्यांच्या बॉयफ्रेंडशी व्यवस्थित ओळखी वगैरे झाल्या, आणि त्यांच्या घरात प्रवेश मिळविण्याइतपत मैत्री झाली. अर्थात, कामाच्या बाबतीत सगळ्या इतक्या व्यवस्थित आणि टापटीप की मला कधीही कामाबद्दल आठवण करून देण्याची वेळदेखील आली नाही, किंबहुना, काहीवेळा मलाच थोडे उशिरापर्यंत बसून, माझे काम संपवावे लागायचे!!
अर्थात, पुढे इतर कंपन्यात अनेक गोऱ्या व्यक्तींशी ओळखी झाल्या पण माझ्या या मतात कधीही तसूभर देखील फरक पडला नाही. दोन, तीन महिन्यांनी कमलेश, निमेश आणि मी, सनसिटीला जायचे ठरविले. तसा, २००० साली, मी, स्मिता आणि आदित्य, असे तिथे फिरायला जाउन आलो होतो. परंतु मित्रांबरोबर जाणे आणि घरच्यांबरोबर जाणे, यात फरक पडतोच!!
भारतात, सनसिटी हे साउथ आफ्रिकेतील एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे, त्यातून, मला वाटते १९९४ साली (आता मला नक्की साल आठवत नाही) तिथे ऐश्वर्या रायने मिस वर्ल्ड किताब मिळवल्यापासून तर त्याला बरीच प्रसिद्धी मिळाली आहे. तसे पाहिले तर सनसिटीचे दोन भाग आहेत. १] Sun city , २] Lost City. सनसिटी, मुळात एक हॉटेल आहे आणि त्यात, प्रचंड casino आहे!! माझ्या अंदाजाने, आफ्रिका खंडातील सर्वात मोठा casino इथे आहे, Last City म्हणजे ऐषारामाची परमावधी!!
सनसिटी मधील हॉटेल, उडप्याचे वाटावे, इतके प्रशस्त, आलिशान असे हॉटेल आहे. मुळात, हि दोन्ही हॉटेल्स डोंगरात वसवली आहेत, त्यामुळे इथे दुपार कलंडली की लगेच थंड वारे बारमाही वाहतात. Lost City मध्ये केवळ हॉटेल, हेच आकर्षण नसून, तिथे यंत्राच्या सहाय्याने काही भागात भूकंपाचा अनुभव देतात, ठिकठिकाणी डोंगरात निरनिराळ्या प्राण्यांचे मुखडे कोरले आहेत आणि त्यात रात्री दिव्यांची रोषणाई केली जाते, तसेच इथे कृत्रिम तलाव तयार केलेला असून, त्यात कृत्रिम प्रवाहाने महाकाय लाटा निर्माण केल्या जातात, त्यामुळे पाण्यावरील खेळ खेळणे, हे दुसरे आकर्षण!!
इथे मात्र, भारतीय पद्धतीचे जेवण मिळू शकते पण किंमती मात्र तितक्याच आलिशान!! इथेच मी, भारतातून आलेल्या चित्रपट तारकांचा शो पहिला होता, म्हणजे शाहरुख,सैफ, राणी, प्रीती वगैरे कलाकार आले होते. शाहरुखची प्रसिद्धी इथे बघून तर मला थक्कच व्हायला झाले!! असो, थोडक्यात, एकदा जाण्यासाठी हे ठिकाण ठीक आहे, ज्यांना जुगार खेळायचा आहे, त्यांना ही जागा म्हणजे स्वर्ग!!
तसे पाहिले तर या गावात राहणे म्हणजे फार सुखाचे नाही, एकतर इतर शहरांप्रमाणे, एकदा संध्याकाळचे सहा वाजले की सगळे शहर स्वत:ला मिटून घेते!! बरे बाहेर जाऊन, विरंगुळा व्हावा, अशातले हे गाव अजिबात नाही. मॉल वगळला तर करमणुकीचे कसलेच साधन नाही आणि मॉल कितीही आलिशान झाला तरी त्यातील औत्सुक्य फार लवकर संपून जाते, मग उरतो तो कधीही न संपणारा वेळ!! मी तर सहा, सात महिन्यात कंटाळलो. त्यातून, कमलेशला नोकरीवरून काढून टाकले कारण त्याने नोकरीच्या जागी केलेली “हेराफेरी!!”
निमेश माझ्याबरोबर असायचा पण तरीही गप्पा माराव्यात अशी काही मनापासून “आच” वाटायची नाही. अर्थात, असे मित्र देखील आवश्यक असतात. एके संध्याकाळी, अचानक माझ्या तब्येतीत थोडा बिघाड झाला आणि डॉक्टरकडे जाणे अत्यावश्यक झाले, किडनीचा जुना प्रॉब्लेम उपटला होता आणि थोडावेळ सैरभैर झाले होते आणि त्या विमनस्क क्षणी, निमेशने जी मदत केली, त्याला तोड नाही, मला लगेच गाडीत घातले, मोबाईलवरून जोहान्सबर्ग इथल्या डॉक्टरची वेळ नक्की केली आणि गाडी प्रचंड वेगाने हाकून, (जवळपास, १५० किलोमीटर अंतर आणि संध्याकाळची वेळ) मला डॉक्टर समोर उभा केला, रात्री, त्याच्याच ओळखीच्या मित्राच्या घरी राहिलो आणि दुसऱ्या दिवशी मला परत आणले.
अखेर, प्रत्येकाला नेहमीच स्वत:चा विचार करणे आवश्यक असते आणि त्यानुसार, या गावातील माझा खेळ वर्षभरात संपला!!
– अनिल गोविलकर

About अनिल गोविलकर 92 Articles
मी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच "रागरंग" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रत्नागिरी जिल्ह्यातील नारळ संशोधन केंद्र

रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. हे केंद्र ...

सातारा जिल्ह्यातील पवनऊर्जा प्रकल्प

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा पवनऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तो ...

सातवाहनकालीन कर्‍हाड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन ...

महाभारतकालीन कुंतलनगर काटोल

महाभारत काळात कुंतलनगर या नावाने काटोल प्रसिध्द होते. कुंतीच्या नावावरुन ...

Loading…