नवीन लेखन...

राईचा पर्वत!

प्रकाशन दिनांक :- 26/12/2004

राघोबा दादांनी नारायणला ‘धरावे’ असा आदेश गारद्यांना दिला आणि आनंदीबाईंनी ‘ध’चा ‘मा’ करीत पेशव्यांच्या इतिहासातील एका काळ्याकुट्ट प्रकरणाला जन्म दिला. केवळ अक्षर बदलले आणि शनिवारवाड्याच्या भिंती कोवळ्या, निष्पाप नारायणाच्या रक्ताने न्हाऊन निघाल्या. एखादे अक्षर, एखादा शब्द किंवा एखादे वाक्य! तसे पाहिले तर आपल्या एकंदर जीवनात, व्यवहारात त्यांचे मूल्य किती क्षुल्लक असते. रोज शेकडो वाक्ये, हजारो शब्द आपण ऐकत तरी असतो किंवा ऐकवीत तरी असतो; परंतु एरवी अतिशय किरकोळ वाटणारे हे शब्दच वेळप्रसंगी आपल्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी देऊन जातात आणि प्रत्येकवेळी ही कलाटणी चांगलीच असेल असे नाही. अनेकदा किरकोळ शब्द, निरर्थक वाक्यच माणसाला आयुष्यातून उठवीत असतात. ‘आंधळ्याची पोरंही आंधळीच’ या द्रौपदीच्या एका वाक्याने अठरा अक्षौहोणी सैन्यासह अवघ्या कुरुकुलाचा संहार करणारे महाभारत घडवून आणले. सांगायचे तात्पर्य, एरवी अतिशय निरुपद्रवी वाटणारे शब्द आपल्यासोबत विशिष्ट संदर्भ घेऊन येतात तेव्हा त्यांची ताकद अमर्याद वाढलेली असते. शब्दाचे हे मूल्य लक्षात घेऊनच बोलताना सतत भान जपावे लागते. जसे ते बोलताना जपावे लागते तसेच ऐकतानाही जपणे आवश्यक ठरते.

‘नरो वा कुंजरोवा’ हे शब्द नीटसे कानी पडले नाहीत आणि द्रोणाचार्यासारख्या महान योद्ध्याला अतिशय अपमानास्पद मृत्यूला सामोरे जावे लागले. शब्द वापरताना जसा त्याचा नेमका अर्थ आणि संदर्भ नीट लक्षात घ्यावा लागतो तसेच बोललेले समजून घेतानासुद्धा बोलणाऱ्याला अपेक्षित असलेला अर्थ आणि त्या मागचा संदर्भ समजून घेणे तितकेच महत्त्वाचे ठरते. या दोन्ही प्रक्रियेतला सूर नीट जुळला नाही तर प्रचंड विसंवाद निर्माण होऊन अर्थाचा अनर्थ होण्याची शक्यता असते. आपल्या नेहमीच्या व्यवहारात तर याचा आपल्याला नित्य प्रत्यय येत असतो. एखाद्याला सांगायचे एक असते, तो सांगतो दुसरेच आणि ऐकणारा ऐकतो तिसरेच.

या संपूर्ण गोंधळात मूळ गोष्टीचा पार विचका होऊन जातो. केवळ शब्दांच्याच बाबतीत नव्हे तर एकूणच आकलनाच्या संदर्भात अशीच गोंधळाची परिस्थिती आहे. अनेकवेळा नको त्या गोष्टींना अवास्तव महत्त्व देऊन आपण नेमक्या आवश्यक गोष्टीचा कचरा करतो. एखादा शब्द, वाक्य आपल्या सोयीने वापरण्याचा किंवा त्याचा आपल्या सोयीने अर्थ लावण्याचा अनेकांना छंद असतो. छंद असतो म्हणण्यापेक्षा ती त्यांची मजबुरी असते. स्वत:चा नाकर्तेपणा झाकण्यासाठी त्यांना असे करावेच लागते. मग मालकाचे बोलणे सहन झाले नाही, आपण तर स्वाभिमानी आहोत किंवा साहेबांशी आपले पटत नाही, अशी तकलादू कारणे देत आपला नाकर्तेपणा झाकण्याचा हे लोकं प्रयत्न करीत असतात. बोलण्याच्या ओघात निघून गेलेल्या शब्दाचा बरेचदा असा अनर्थ लावल्या जातो. नको त्या शब्दाला किंवा वाक्याला अतोनात महत्त्व देत मूळ मुद्याला बगल देण्याचा स्वार्थी प्रयत्न अनेक लोक अनेकदा करीत असतात. मुळात ही माणसे पलायनवादी असतात. त्यांच्यात परिस्थितीशी झगडण्याची ताकद नसते. त्यामुळेच शब्दांचे खेळ करीत आपल्या आणि इतरांच्याही आयुष्याचा हे लोकं खेळखंडोबा करीत असतात. शब्दांचे नाहक अवडंबर उभे केले जाते आणि विनाकारण वादविवाद निर्माण होतात. सुरुवातीला अतिशय किरकोळ वाटणारे हे वाद पुढे गंभीर स्वरुप धारण करतात.

आपल्या दैनंदिन आणि सार्वजनिक जीवनात आपल्याला अनेकवेळा विविध प्रश्नांना, समस्यांना सामोरे जावे लागते. थोडा थांबून त्यावर विचार केला तर हे आपल्या सहज लक्षात येईल की, यापैकी बहुतेक समस्या निव्वळ गैरसमजातून किंवा समजून घेण्याच्या क्षमतेच्या अभावी निर्माण झाल्या आहेत. एखादा प्रश्न सांगणारा नेमक्या शब्दात सांगत नाही, समजून घेणाराही त्या प्र
्नाचे नेमके स्वरुप समजून घेत नाही आणि या विसंवादातूनच प्रश्न चिघळत जातो. ज्याप्रमाणे एक साधी जखम केवळ दुलर्क्षामुळे चिघळत जाऊन गँगरीनमध्ये परावर्तित होते आणि शेवटी तो अवयव कापून टाकावा लागतो, त्याप्रमाणेच केवळ सुसंवादाच्या अभावी अनेक प्रश्न किंवा समस्या चिघळत जाऊन बिकट बनतात. हा संपूर्ण प्रकार केवळ आकलन क्षमतेच्या अभावी घडून येतो. कोणत्या शब्दाला, कोणत्या वाक्याला, कोणत्या प्रसंगाला, कोणत्या व्यक्तीला किंवा कोणत्या विचाराला अधिक महत्त्व द्यावे, याचे स्पष्ट आकलन न झाल्यानेच अनेक निरर्थक वाद निर्माण होतात. कालांतराने हे वाद वाढत जाऊन त्याचा समाजावर, देशावर विपरीत परिणाम होतो. माणसामाणसातील अंतर या वादाने वाढत जाते. दुरावा निर्माण होतो. दळणवळण आणि संदेशवहनाच्या अत्याधुनिक सुविधांमुळे संपूर्ण जग आज एक खेडे बनल्याचा दावा केल्या जात असला तरी त्याचवेळी माणसामाणसातील अंतर त्याच गतीने वाढत आहे, हा विरोधाभासही आपल्याला दृष्टीस पडतो. त्या मागचे मुख्य कारण माणसाच्या तौलनिक बुद्धीचा सातत्याने होत असलेला ऱ्हास हेच आहे. आज 21 व्या शतकात प्रवेश केलेल्या आधुनिक समाजात जातिपातीचा, धर्माचा विद्वेष तेवढ्याच तीपतेने पसरत असल्याचे पाहून हेच म्हणावेसे वाटते की, माणसाची बौद्धिक उंची वाढली असली तरी माणूस म्हणून तो मोठा होऊ शकला नाही. कुणीतरी एखादा सडकछाप नेता किंवा धर्मगुरु कुठेतरी एखादे वाक्य बोलून जातो आणि आमच्या गल्लीबोळात रक्ताची होळी खेळली जाते. अमक्या जातीच्या माणसाने विहिरीवर पाणी भरले म्हणून विहीर बाटली, असे आजही समजल्या जाते. हा राग एवढ्यावरच थांबत नाही तर पाणी भरण्याची भयंकर चूक केलेल्या त्या माणसाला जिवंत जाळण्याची शिक्षादेखील दिली जाते. पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्रातच अशा घटना घडल्या आहेत. एकूण काय तर अतिशय क्षुल्लक गष्टींचे भांडवल करुन अकांडतांडव करण्याची प्रवृत्ती, स्वार्थासाठी ‘राईचा पर्वत’ करण्याचा स्वभाव, माणूस अजूनही ज्ञानाच्या क्षेत्रात खूप मागासलेला असल्याचे स्पष्ट करते. भलेही विज्ञानाच्या क्षेत्रात माणसाने उत्तुंग भरारी घेतली असेल तरी ज्ञानाच्या क्षितिजावर अद्यापही अंधारच आहे. मोठमोठे ग्रंथ, विचारप्रवर्तक ज्ञानसंपदा, थोरामोठ्यांचे तत्त्वज्ञान आमच्या माणूसपणाची साक्ष देत असले तरी त्या ग्रंथातील शब्दांचा, तत्त्वज्ञानातून झळकणाऱ्या

अर्थाचा नीट बोध करुन घेणारी आकलन शक्ती मात्र अद्यापही आमच्यात विकसित होऊ शकलेली नाही. अन्यथा सर्वच धर्म शांतीचा उपदेश करीत असताना धर्माच्या नावावर दंगली भडकण्याचा प्रसंगच आला नसता. ‘राईचा पर्वत’ करणाऱ्यांना राई आणि पर्वताची खरी ओळख कधीच नसते.

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..