नवीन लेखन...

एकत्रित प्रयत्नांची गरज




प्रकाशन दिनांक :- 01/02/2004

‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’, हे संतवचन निश्चितच प्रेरणादायी आहे. फक्त बदलत्या काळानुरूप या वचनात किंचित बदल सुचवावासा वाटतो. केवळ केल्याने काही होईल याची आता शाश्वती राहिलेली नाही. कुण्या एखाद्या व्यक्तीने आपल्या सामर्थ्याच्या बळावर समाजाचा, देशाचा इतिहास-भूगोल बदलून टाकण्याचा काळ आता इतिहासजमा झाला आहे. त्यामुळे कुण्या एकाच्या काही करण्याने आता काही होत नाही. आता गरज आहे ती काही करणाऱ्यांच्या, करू शकणाऱ्यांच्या एकत्रित येण्याची आणि केवळ एकत्रित येण्याचीच नव्हे तर एकत्रित एका दिशेने प्रयत्न करण्याची. ‘केल्याने होत आहे रे’ ही उक्ती तेव्हाच कुठे सार्थ होईल.
समाजाच्या भल्यासाठी, उत्थानासाठी झटणाऱ्यांची संख्या आजही काही कमी नाही. स्वत:च्या वैयक्तिक आयुष्याची होळी करून समाजासाठी, देशासाठी निरलस वृत्तीने झटणाऱ्या लोकांची संख्या हजारोंच्या घरात आहे आणि त्यामधे तरूण, मध्यमवयीन लोकांचाच भरणा अधिक आहे, परंतु तरीही या हजारो झटणाऱ्या हातांना पाहिजे तसे यश मिळताना दिसत नाही. समाजाची दुरावस्था, मागासलेपणा (शैक्षणिक, आर्थिक, वैचारिक आदी सर्वच बाबतीतील) होता तसाच आहे. रोजच्या वर्तमानपत्रातील बातम्यांवरून साधी नजर जरी फिरवली तरी याची आपल्याला कल्पना येते. खून, दरोडे, बलात्कार, हुंडाबळी, अंधश्रद्धेचे बळी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कामगारांची उपासमार, भ्रष्टाचाराची विविध रंजक प्रकरणे, यापलीकडे वर्तमानपत्रात असते तरी काय? आणि या बातम्या छापायच्या नाही म्हटलं तर वर्तमानपत्रात छापायचे तरी काय? जे घडते तेच छापल्या जाते. याचा अर्थ समाजसुधाराचे पत हाती घेतलेल्या लोकांचे प्रयत्न वाया जात आहेत, असा घ्यायचा काय? तसा तो घेता येणार नाही. त्यांच्या प्रयत्नांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. फ
्त ते अपुरे पडत आहेत, असे आपल्याला म्हणता येईल आणि ते अपुरे यामुळे पडत आहेत की, या प्रयत्नांची दिशा विखुरलेली आहे.
इसापनीतीत एक सुंदर

बोधकथा आहे. एक फासेपारधी रोज

जंगलात जायचा आणि जाळे लावून बसायचा. जाळ्यात अडकलेली पाखरं उडण्याचा-सुटण्याचा प्रयत्न करायची, परंतु त्यांची धडपड कधी यशस्वी झाली नाही. हे नेहमीचेच झाल्यावर यातून मार्ग काढणे क्रमप्राप्त ठरले. शेवटी त्या पाखरांना सामूहिक शहाणपणाचा मार्ग सापडला आणि दुसऱ्या दिवशी जाळ्यात अडकलेल्या पाखरांनी एकाचवेळी, एकाच दिशेने जाळ्यासह उड्डाण करीत आपली सुटका करुन घेतली. सांगायचे तात्पर्य, प्रयत्न करणाऱ्यांची संख्या, इच्छाशक्ती एवढीच किंवा त्याहूनही अधिक महत्त्वाची बाब असते ती एकत्रित योग्य दिशेने प्रयत्न करण्याची. विशेषत: समस्या जेव्हा सामाजिक स्वरूपाच्या असतात तेव्हा तर अशा एकत्रित प्रयत्नांचीच अधिक गरज असते.
आज आपापल्या क्षेत्रात आपापल्या परीने अजोड कार्य करणारे अनेक समाजसुधारक, विचारवंत आपल्या देशात कार्यरत आहेत. त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे, त्यांच्या हाकेला ओ देणारे हजारो कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी आहेत. अगदी नावच घ्यायचे म्हटले तर कुष्ठरोग्यांसाठी ‘आनंदवनात’ स्वर्ग उभा करणारे बाबा आमटे आहेत. राळेगण सिद्धीच्या माळरानावर नंदनवन फुलविणारे आणि आता भ्रष्टाचार निर्मूलनाचे प्रतीक ठरलेले अण्णा हजारे आहेत, धरणठास्त विस्थापितांच्या न्याय्य हक्कांसाठी दोन तपापासून अविरत लढा देणाऱ्या मेधा पाटकर आहेत, चोरपावलांनी येणाऱ्या गुलामगिरीपासून जनतेला सावध करीत स्वदेशीचा महामंत्र देणारे राजीव दीक्षित आहेत, जलसंधारणाच्या अभिनव योजनेद्वारे शेकडो वर्षांपासून तहानलेल्या राजस्थानच्या शुष्क भूमीवर जलाशयाचे जाळे विणणारे राजेंद्रसिंह उ*र्फ ‘पाणीवाले बाबा’ आहेत. ‘सर्च’चे डॉ. अभय
बंग आहेत, ‘एड्स’ च्या बागुलबुवाविरुद्ध एकाकी लढा देणारे डॉ. शांतीलाल कोठारी आहेत. ही यादी इथेच संपत नाही. कर्तृत्ववान आणि झोकून देऊन काम करणाऱ्या व्यक्तींची व सामाजिक संस्थांची संख्या आपल्या देशात कमी नाही. आज खऱ्या अर्थाने गरज आहे ती या सगळ्या ज्ञात-अज्ञात कर्तृत्ववान लोकांनी, संस्थांनी एकत्रित होण्याची. आपापल्या क्षेत्रात या लोकांनी, संस्थांनी खूप भरीव कार्य केले आहे, परंतु सोबतच त्यांनी आपल्या कर्तृत्वाला त्या-त्या क्षेत्राच्या मर्यादेत बांधून ठेवले आहे. त्यापेक्षा या सगळ्या मंडळीने एकत्र येऊन, आपली संपूर्ण ताकद एक करून एकाच दिशेने प्रयत्न केल्यास समाजाची, देशाची स्थिती पालटायला असा कितीसा वेळ लागेल? या सर्व मंडळीने आधी एकत्र यावे. एक काडी मोडायला वेळ लागत नाही, परंतू अशा अनेक काड्यांचा भारा तयार झाला तर तो मोडता येत नाही. दुर्दैवाने आज ही वस्तुस्थिती ध्यानात घ्यायलाच आपण तयार नाही. समाजाला, देशाला ज्यांच्या पासून आशा आहेत त्या व्यक्तींनीच एक-एक क्षेत्र निवडून स्वत:ला त्या क्षेत्रापुरते मर्यादित करुन टाकले आहे.
‘दूर उडाली कबुतरे नभातून
गिधाडांचेच साम्राज्य माजले आहे
सर्वत्र गाजवतो सत्ता दुर्जन
कारण आजचा सज्जन तटस्थ आहे’
ही स्थिती बदलायची असेल तर ‘साथी हाथ बढाना साथी रे’ म्हणत सर्व सज्जनांनी आधी एकत्र यावे. समाजासमोर असलेल्या समस्यांची यादी बनवावी. समस्या हजार असतील, परंतु त्या सर्व एकाचवेळी सुटणार नाहीत. त्यामुळे त्यांचा प्राधान्यक्रम ठरवावा आणि त्यानंतर समस्यांच्या निराकरणासाठी एकत्रित प्रयत्न करावा. या सर्व मंडळींची एकत्रित ताकद एवढी असेल की, कोणतीही समस्या फार काळ टिकू शकणार नाही. त्याचवेळी ही गोष्टदेखील लक्षात घ्यायला पाहिजे की, दिसायला आपल्याला हजारो समस्या दिसत असल्या तरी त्या समस्यांचे मूळ कुठेतरी एकाच
ठिकाणी असते. त्या मुळावरच घाव घातला तर बाकीच्या समस्या आपोआपच गळून पडतील. उदाहरणच घ्यायचे झाल्यास भ्रष्टाचाराचे घेता येईल. भ्रष्टाचार हे एक समस्येचे मूळ आहे. या मुळाच्या आधारावरच तर हजारो समस्या उभ्या आहेत. हा भ्रष्टाचारच जर मुळापासून उखडून फेकला तर देशासमोरच्या 90 टक्के समस्यांचा तसाच निकाल लागतो. वरील सगळी मंडळी सध्या ज्या क्षेत्रात काम करीत आहे, ज्या समस्यांविरूद्ध यांचा लढा सुरू आहे, त्या समस्यांची नाळदेखील कुठेतरी भ्रष्टाचाराशी नक्कीच जुळलेली आहे. या भ्रष्टाचाराचे मूळ

शोधण्याचा प्रयत्न केल्यास आपण सत्ताकेंद्रित राजकारणापर्यंत जाऊन पोहचतो. त्यामुळे

‘सत्ता मिळविण्याकरीता पैसा आणि तो जमा करण्यासाठी सत्तेचा (गैर)वापर’ ही प्रचलित राजकीय व्यवस्थाच आम्हाला बदलावी लागेल. प्रयत्न त्या दिशेने करावे लागतील, सुरूवात तिथूनच करावी लागेल. फांद्या छाटत बसण्यापेक्षा मुळावर घाव घालणे केव्हाही श्रेयस्कर. सत्ता जेव्हा स्वच्छ, प्रामाणिक, राष्ट्राप्रती समर्पित लोकांच्या हाती जाईल तेव्हा आपोआपच बहुतेक समस्यांचे निराकरण होईल. त्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळे लढे उभारण्याची गरजच राहणार नाही.
अर्थात हे सहज शक्य नसले तरी आज विविध क्षेत्रात विखुरलेली प्रचंड योग्यतेची माणसं एकत्रित झाली तर ते अशक्यही नाही. सातत्त्याने कोसळणारी पाण्याची धार प्रचंड खडकालाही तडा देऊ शकते. प्रयत्नांना दिशा एक असेल आणि त्याला चिकाटीची जोड असेल तर सर्व समस्यांच्या मुळाशी असलेली वर्तमान व्यवस्था सहज बदलता येऊ शकते. कदाचित काही काळ प्रतीक्षा करावी लागेल, पण यश निश्चित आहे. त्यासाठी देशाच्या विकासाची, समाजाच्या भल्याची कळकळ असणाऱ्या लोकांनी आधी एकत्र येणे आणि नंतर समस्यांचा प्राधान्यक्रम ठरवून त्या दिशेने एकत्रित प्रयत्न करणे अधिक गरजेचे आहे; नव्हे
ीच खरी काळाची गरज आहे. एक नवी चळवळ उभारावी लागेल, त्या चळवळीतला प्रत्येक कार्यकर्ता एक नेता असेल तर प्रत्येक नेता एक कार्यकर्ता असेल आणि सगळ्यांचे लक्ष्य एकच असेल. हा देश ‘सुजलाम् सुफलाम्’ करायचा असेल, हे राष्ट्र खऱ्या अर्थाने ‘महान’ बनवायचे असेल, सोन्याचा धूर निघणारा भूतकाळ पुन्हा एकदा जिवंत करायचा असेल तर सर्वांच्या एकत्रित आणि व्यापक प्रयत्नातूनच ते शक्य होईल, मात्र त्याकरीता व्यक्तिगत अहंकार व स्वार्थ बाजूला ठेवावे लागतील.

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..