नवीन लेखन...

“सांज ये गोकुळी”

…. यमूनेशी कलून बसलेल्या यशोदेची अस्वस्थता काठाच्या पाण्याबरोबर लपलप करत होती. तिचं  पाण्यातलं प्रतिबिंब विरळ होत चाललं… यमूना सावळी दिसू लागली, तशी आपल्या मागे चोरपावलांनी खट्याळ कान्हाच येऊन उभा की काय वाटून गर्रकन फिरून यशोमती उभी झाली. पण तिची काजळभरली नजर लांब जाऊन रिकामीच परत आली.. दूरपर्यंत फक्त हळूवार पावलांनी उतरत जाणारी सांज तेव्हढी दिसली. क्षितीजावर कायम उठावदार दिसणारी पर्वतरांग खरोखरच धूसर झालीय, की तिच्या डोळ्यांची डबडब धुकं होऊन उरलीय तिला कळेना…
…. यमुनेपल्याडच्या देवळात संध्यारतीचा घंटारव झाला अगदी त्याचवेळी दूर धुळीचा लोळ उठला, गाई परतून येतानांचा घुंगुरवाळा वातावरणात घुमला तशी माऊली आनंदली…
कान्ह्याच्या इच्छेविरुद्ध आज त्याला गाई राखायला पाठवल्याने, दुपारी त्याने गोपाळकाला केला पण स्वतः खाल्ला नाही ह्याची खबर तिच्यापर्यंत आली होती. त्याचं असं उपाशी राहणं तिला वेदना देतं हे पक्क जाणून असलेला तो नाठाळ, सांजेला परतून जाऊ तेव्हा यशोदेनं ताजं लोणी घुसळून ठेवलेलं असणार आणि आज नेहमीपेक्षा जास्त मायेने मला ती ते भरविल हे जाणून त्याने मुद्दाम काला चुकवला हे तिलाही कळलं होतंच…. पण म्हणून असा राग मनात धरून संपूर्ण गोकुळातल्या गाई- गुराखी परतून घटका उलटत आली तरी ह्याने मात्र परतू नये, ही शिक्षा आता माऊलीला सहन होईना… धुळीच्या लोटाकडे सावळ्याच्या ओढीनं धावत सुटलेली ती कुठल्याही क्षणी त्याचं दर्शन होईल आणि त्याला कुशीत घेऊ, गोंजारू अपार मायेने भरवू ह्या आशेनं निघाली. सांज गडद होत गेल्याने तिला आता वाटा दिसेनात, प्रत्येक वाट जणू तिच्या सावळ्याच्याच रंगाची होऊन गेलीय असं तिला वाटलं आणि त्या वाटण्याचं हसू फुटलं…
गाई गोपी परतले… पाखरं परतली… धूळ शमली….. कान्हा मात्र दिसेना.
नक्की लपून बसला असेल, आज तिला टोकाचं अस्वस्थ केल्याशिवाय हा शांत होणारच नाही, ओळखून तिने त्याच्या सार्‍या जागा धुंडाळल्या. ताजं लोणी वाडग्यात भरून, ते हाती घेऊन इथे- तिथे शोधत राहिली… त्याला आर्त हाका मारत राहिली… बाळ गोपाळांच्या घरी गेली, विचारपूस केली, सारी म्हणाली आम्ही त्याला दुपारनंतर पाहिलंच नाही.. आता मात्र माऊलीच्या डोळ्यांचं पाणी खळेना. का मी त्याला त्याच्या मनाविरुद्ध धाडलं म्हणत स्वतःला दुषण देऊ लागली. हातातलं लोणी पाहून अजूनच हळवी झाली. त्याचा माग काढायला ह्याला- त्याला पाठवू लागली.
इतक्यात हवेच्या झोताबरोबर बासरीचा स्वर कानी आला आणि कान्हा येत असल्याची तिला खूण पटली.. आवाजाच्या दिशेने तिने धाव घेता, तो आवाज मात्र चारी दिशांनी येऊ लागला… इथे जावे की तिथे सैरभैर झाली. सारी त्याची माया आहे, रुसवा गेलेला नाही उमजून, शेवटी आहे तिथे बसली.
भरल्या डोळ्यांनी सभोवताली पाहता उभं गोकूळच शामरंगाने रंगलंय असं तिला जाणवलं. तिने ज्याला दारात- घरात शोधलं त्याची छाया विश्वावर उमटलीय, जो तिला बसल्याजागी ब्रम्हांड दर्शन घडवतो त्याची चिंता करणारी ती कोण? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधू लागली.
बघता बघता, ही सांज म्हणजे स्वतः यशोदा आहे आणि गडद अंधार जणू तिचा पान्हा होऊन चौफेर पसरतो आहे असं तिला वाटू लागलं… त्या पान्हयाची ओळख पटून तरी कान्ह्याने माऊलीकडे धाव घ्यावी अशी उर्मी तिच्या तना- मनातून वाहू लागली. त्याचवेळी खांद्यावर झालेल्या उबदार स्पर्शानं ती अचानक शांत झाली आणि डोळे अथक झरू लागले. तिच्या हातातलं वाडगं काढून घेत, लोण्याचा शांतपणे आस्वाद घेत तो तिच्या पुढ्यात बसला….
तिचं ओतप्रोत वात्सल्यानं माखलेलं ते रूप कान्हा कितीतरी वेळ बघत राहिला….

-बागेश्री देशमुख
*******
“सांज ये गोकुळी” हे गाणं मला असं भेटतं.
सुधीर मोघेंच्या शब्दातली जादू मनावर रेंगाळत राहते. सावळी सांज धुंद करून टाकते… आशाबाईंचा आवाज, (श्रीधर) फडके सरांचं संगीत प्रत्येक शब्दाला काळजापर्यंत पोहोचवतो.

WhatsApp वरील संजीव वेलणकर यांच्या संगीत संगीत आणि फक्त संगीत या ग्रुप वर आलेला लेख साभार प्रकाशित.

Avatar
About संगीत WhatsApp ग्रुप 23 Articles
श्री. संजीव वेलणकर यांनी सुरु केलेल्या “संगीत संगीत आणि फक्त संगीत” या Whatsapp समूहावरील पोस्ट आणि लेख....

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..