नवीन लेखन...

श्री दत्तसंप्रदाय – विविध पंथ आणि परंपरा

दत्तनाथ

उज्जयिनी येथील दत्तनाथ ही मध्य प्रदेशातील श्रीदत्त परंपरा आहे. निरंजन – विष्णू – हसकमलासन – अत्री – दत्तगोपाळ – वेडा नागनाथ – निबंजनाथ – जनार्दन – एकनाथ – दत्तभाऊ – केशवबुवा – अंतोबादादा – दत्तनाथ अशी ही परंपरा आहे. याचे मूळ नाथसंप्रदायातील महिपतीनाथांकडे जाते. या परंपरेचे उपास्य दैवत श्रीदत्तात्रेय असून त्यांनी मध्य भारतामध्ये दत्तभक्तीचा प्रचार-प्रसार केला आहे.

श्रीनवनाथ

नाथसंप्रदायिकांच्या श्रद्धेनुसार श्रीदत्तात्रेय ही योगसिद्धी प्राप्त करून देणारी देवता आहे. उपास्य दैवत म्हणून नव्हे, तर सिद्धिदाता गुरू आणि अवधूतावस्थेचा आदर्श म्हणून नाथसंप्रदायात दत्तांचे महिमान गायलेले आहे. नाथपंथाचा महनीय वारसा घेऊन वारकरी संप्रदायाचे संजीवन करणारे श्रीज्ञानेश्वर हे नाथ परंपरेतील संत होत. ज्ञानेश्वरांच्या अभंग गाथेत ‘ज्ञानदेवांच्या अंतरी दत्तात्रेय योगिया’ असा दत्तविषयक एक अभंग आहे. नाथसंप्रदायामध्ये दत्तात्रेयांना फार मोठे स्थान आहे. योगविद्या, मंत्रसिद्धी, सिद्धिसामथ्र्य, वैराग्य, तपश्चर्या आणि अध्यात्मज्ञान यांमध्ये नाथसंप्रदायातील लोक पूर्ण समर्थ होते. या संप्रदायाचा उगम मध्ययुगीन काळात सामान्यत: इसवी सनाच्या आसपास झालेला आहे. नाथसंप्रदायाचे उगमस्थान आदिनाथ भगवान शंकर हेच आहेत. नाथसंप्रदायाच्या उत्तरकालीन ग्रंथात दत्तगोरक्षाच्या अद्भुत कथांचे वर्णन आहे. दत्तप्रबोध या ग्रंथात मत्स्येंद्र व गोरक्षांना दत्तात्रेयाने गिरनार पर्वतावर उपदेश केल्याचा वृत्तांत पाहावयास मिळतो. नवनाथ भक्तिसार या ग्रंथात नागनाथ आदि नाथांना दत्तदर्शनाचा लाभ झालेला दिसून येतो. सुमारे सातशे वर्षांपूर्वी दत्त उपासनेचा प्रचार या संप्रदायाने नेपाळपर्यंत पोहोचवला असे इतिहास सांगतो. नवनाथ या नावाने प्रसिद्ध असलेले सर्व सिद्धयोगी हे श्रीदत्तप्रभूंचे अंशावतार आहेत. मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालंधरनाथ, कानिफनाथ, चर्पटनाथ, नागनाथ, भर्तरिनाथ, रेवणसिद्ध व गहनीनाथ हे नवनाथ आहेत. त्यांच्या स्मरणमात्रानेच शुभफळ सिद्ध होते. श्रीदत्तप्रभूंची कृपा नवनाथांचे स्मरण करणाऱ्यांवर अपार असते.

श्रीरामदासी आणि श्रीधर स्वामी परंपरा

समर्थ रामदास स्वामींनी सुरू केलेली रामदासी परंपरा ही प्रामुख्याने श्रीरामचंद्रांची उपासना करते. यामध्ये श्रीदत्तात्रेय हे सिद्ध पुरुष मानले गेले असून ते विश्वगुरू, सर्वत्र संचारी आणि सिद्धिदाता आहेत असे मानले आहे. श्रीदत्तात्रेयांनी गोरक्षनाथांना अवधूतगीता हा ग्रंथ प्रदान केला असे श्रीरामदास स्वामींनी म्हटले आहे. श्रीदत्तात्रेय हे सर्व प्रिय आणि सर्वाना आवडणारे दैवत आहे अशी रामदासी परंपरेची श्रद्धा आहे. समर्थ रामदासांना श्रीदत्तात्रेयांनी मलंगरूपात दर्शन दिले होते. समर्थ रामदास आणि दत्तसंप्रदाय यांचे नाते अतूट आहे. समर्थ जेव्हा माहूर गडावर गेले होते तेव्हा त्यांना श्रीदत्तात्रेयांचे दर्शन झाले असा उल्लेख समर्थाच्या घराण्यातील हनुमंत-स्वामींनी आपल्या बखरीत केला आहे. श्रीधर स्वामी हे रामदास स्वामींनी प्रत्यक्ष अनुग्रह दिलेले दत्तावतार होऊन गेले, असे मानले जाते. त्यांनी पहिल्यांदा कर्दळीवनाची परिक्रमा केली. त्यांचेच शिष्य श्रीरामस्वामी यांनी पीठापूर या श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्म ठिकाणाचा जीर्णोद्धार केला आहे. श्रीपाद श्रीवल्लभांच्या तेहतिसाव्या पिढीतील मल्लादी गोविंद दीक्षितलू यांनी काही वर्षांपूर्वी श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र प्रकाशात आणले असून त्यांच्या विलक्षण अनुभूती असल्याचे दत्तभक्त सांगतात.

श्रीमहानुभव

महानुभव परंपरेमध्ये श्रीदत्तात्रेय, श्रीकृष्ण, चक्रपाणी, गोविंदप्रभू आणि चक्रधर हे पाच ईश्वराचे अवतार आहेत असे मानले आहे. चक्रधर स्वामींनी या परंपरेची स्थापना केली आहे. श्रीदत्तात्रेय म्हणजेच सर्वोच्च ब्रह्म अशी या परंपरेची श्रद्धा आहे. श्रीचक्रधरांनी लिहिलेल्या ‘लीळाचरित्र’ या ग्रंथामध्ये दत्तावताराच्या कथा आहेत. तसेच त्यांनी लिहिलेल्या सूत्रपाठामध्ये दत्तात्रेय महिम्याची चार सूत्रे लिहिलेली आहेत. महानुभवांचे सात पवित्र ग्रंथ आहेत. त्यामधील सैहाद्रवर्णन या भागामध्ये श्रीदत्तात्रेयांचा महिमा गायला आहे. महानुभव परंपरेतील चांगदेव राऊळ यांना श्रीदत्तात्रेयांनी वाघाच्या रूपामध्ये दर्शन दिले, अशी श्रद्धा आहे. असे सांगितले जाते की संसाराला कंटाळून ते सर्वसंगत्याग करून माहुरगडावर गेले. श्रीदत्तात्रेय शिखराकडे जात असताना समोरून एक वाघ डरकाळ्या फोडीत आक्रमकपणे त्यांच्याकडे चालत आला. त्यांच्याबरोबरचे सगळे लोक घाबरून पळून गेले. मात्र चांगदेव राऊळ तेथेच थांबले. वाघाने प्रसन्न होऊन त्यांच्या डोक्यावर आपल्या हाताचा पंजा ठेवला आणि त्यांना अनुग्रह दिला. महानुभवांच्या पंचकृष्णामध्ये श्रीदत्तात्रेय आहेत. ‘या मार्गासि श्रीदत्तात्रेयप्रभू आदिकारण’ असे चक्रधरस्वामीनी नोंदवून ठेवले आहे. महानुभव पंथाचे पंचकृष्ण म्हणजे श्रीकृष्ण चक्रवर्ती, श्रीदत्तात्रेयप्रभू, श्री चांगदेव राऊळ, श्रीगुंडम राऊळ आणि श्रीचक्रधर हे आहेत. महानुभव परंपरा हीसुद्धा विविध दत्तपरंपरेतील एक समृद्ध परंपरा आहे.

वारकरी

भारतातील सर्वात मोठी भक्ती परंपरा म्हणजे वारकरी परंपरा ही आहे. अद्वैत वेदांताच्या पायावर आधारलेल्या या परंपरेमध्ये श्रीदत्तगुंरूचे महत्त्व अवर्णनीय आहे. निवृत्तिनाथ, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, जनाबाई, मुक्ताई, सोपानदेव, गोरोबा, सावता माळी, चांगदेव, कान्होबा, सेना न्हावी, नरहरी सोनार, सोयराबाई, कान्होपात्रा अशा अनेक संतांनी त्यांच्या कार्याने, साहित्य निर्मितीने आणि प्रत्यक्ष जीवनामधून वारकरी पंथाचा प्रचंड विस्तार केला आहे. संत ज्ञानेश्वरांनी श्रीदत्तात्रेयांचे वर्णन करताना ‘मेरू शिखरी एक योगी निराकारी’ असे लिहिले आहे. संत एकनाथ महाराज हे तर थोर दत्तउपासक होते. तुकाराम महाराजांनी ‘तीन शिरे, सहा हात, तया माझा दंडवत’ अशी दत्तात्रेयांची स्तुती गायली आहे. संत गुलाबराव महाराज यांनी त्यांच्या ‘प्रियलीला महोत्सव’ या ग्रंथामध्ये श्रीदत्तात्रेयांचे माहात्म्य वर्णन केले आहे. अशा प्रकारे वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत श्रीपांडुरंग हे असले तरी त्यांनी श्रीदत्तात्रेयांचे माहात्म्य तितकेच मानलेले आहे असे दिसून येते.

आनंदसंप्रदाय

सदानंद नावाच्या ऋषींनी आनंद संप्रदाय सुरू केला आहे. ते दत्तात्रेयांचे शिष्य होते. त्यांचा जन्म जनमेजय राजाने केलेल्या पुत्रकामेष्ठी यज्ञातून झाला होता, असे सांगितले जाते. ते सर्वत्र संचार करीत असताना प्रत्येकी शंभर पावले टाकल्यावर ‘श्रीदत्त’असे उच्चारण करीत असत. कर्नाटकातील बसवकल्याण येथे आनंद संप्रदायाचे मूळ पीठ आहे. या संप्रदायाची गुरुपरंपरा विष्णू-विधी-अत्री-दत्त-सदानंद अशी मानली जाते. संपूर्ण विश्वामध्ये आनंद आणि प्रेमभाव निर्माण व्हावा, माणसाने माणूस म्हणून सर्वाबरोबर व्यवहार करावा आणि संपूर्ण विश्व आनंदमय करावे ही आनंद संप्रदाय परंपरेची श्रद्धा आहे.

अन्य परंपरा 

याशिवाय नृसिंहसरस्वती (आळंदी) परंपरा, विदर्भातील देवनाथ परंपरा, श्रीगुरुचरित्राचे लिखाण करणारे सायंदेव परंपरा, निरंजन रघुनाथ परंपरा, प्रकाश परंपरा, स्वरूप संप्रदाय परंपरा, चैतन्य परंपरा इ. अनेक समृद्ध आणि भव्य परंपरा आणि उपसंप्रदाय श्रीदत्तसंप्रदायामध्ये दिसून येतात. विविध नावांनी प्रसिद्ध असलेले आणि विभिन्न प्रकारच्या उपासना पद्धती असलेले हे संप्रदाय आणि परंपरा मूळ दत्त संप्रदायाशी निगडित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..