नवीन लेखन...

शिक्षणाचा इतिहास !

नुकताच मी आणि गजा एका व्याख्यानमालेत “ शिक्षण दशा आणि दिशा ” यावर एका शिक्षणसम्राटांचे व्याख्यान ऐकायला गेलो होतो. मी नेहमीच नवनवीन व्याख्याने ऐकायला जातो . याचे दोन फायदे होतात. एकतर नवनवीन गोष्टी कानावर पडतात . दुसरा फायदा म्हणजे व्याख्यानानंतर असणारी रिफ्रेशमेंट . ही मात्र व्याख्यात्यावर अवलंबुन नसुन प्रायोजकांवर अवलंबुन असते. या गोष्टीचा मात्र माझा बराचसा अभ्यास आहे. कुठल्या कार्यक्रमात कुठल्या
प्रकारची रिफ्रेशमेंट असणार याचा माझा अंदाज सहसा चुकत नाही. उदाहरणार्थ “महाराष्ट्राचे शैक्षणिक धोरण ” या विषयावर व्याख्याता कितीही चांगला असला तरी प्रायोजक नसतो पण” द्राक्षबागांवरील फुलकिडींचा प्रादुर्भाव आणि उपाय” या विषयावरील व्याख्यानाला प्रायोजक अत्यंत चांगला असतो आणि त्यामागोमाग रिफ्रेशमेंटपण. त्यामुळे शैक्षणिकविषयी कार्यक्रमाला काहीही रिफ्रेशमेंट नसणार हा माझा अंदाज एकदम बरोबर असुनही मी या कार्यक्रमाला गेलो त्याचे कारण म्हणजे माझे शिक्षण या विषयावर असणारे आत्यंतिक प्रेम .माझे शिक्षणावर लहानपणापासुन अत्यंत प्रेम आहे.” भारताची शैक्षणिक परंपरा ” या विषयावर मी बारावीला असताना सखोल अभ्यास केला होता .बारावीच्या परिक्षेत मी या विषयावरची माझी मतेपण अत्यंत परखडपणे मांडली होती . याला आता बरीच वर्षे लोटली , तरीही माझे हे प्रेम कमी झाले नाही . मी अजुनही शिक्षणाविषयीच्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावतो , व्याख्यात्यांची मते ऐकतो आणि माझी मतेपण आवर्जुन मांडतो .

तशी भारतातील शैक्षणिक परंपरा खुप जुनी आहे. ही चालु होते इस्वीसनपुर्व कालापासुन . त्याकाळी वेगवेगळे राजे राज्य करीत . राज्यांच्या बाउंड्रीच्या मधेमधे जंगले असायची .या जंगलांमधे ऋषीमुनींच्या शाळा असायच्या . प्रत्येक ऋषींची एक शाळा . उदाहरणार्थ सांदिपनी ऋषींची सांदिपनी शाळा , द्रोणाचार्य ऋषींची द्रोणाचार्य शाळा . या शाळांमधे विद्यार्थी जाऊन रहात .सर्व विद्यार्थ्यांना एकत्र रहावे लागे . मग गुरुजी शिक्षण देत .बहुधा हे शिक्षण युध्दाविषयी असे. कारण त्याकाळी युध्दे खुप होत . गुरुजींना वेगवेगळ्या प्रकारची अस्त्रे शस्त्रे माहीत असायची . आणि ती कुठल्याही पुस्तकातपण नसायची . ही शिकण्यासाठी मग गुरुजींची मर्जी संपादन करावी लागायची .( अजुन दुसरा मार्ग म्हणजे डायरेक्ट देवाला प्रसन्न करुन घेणे . पण त्यासाठी बाराबारा वर्षे एका पायावर उभे राहुन तपबिप करावे लागायचे . हे भयंकर अवघड. त्यापेक्षा गुरुजींची मर्जी संपादन करणे तुलनेने सोपे असणार ) मग आता गुरुजींची मर्जी कशी संपादन करणार ? त्याची एक ट्रीक होती . त्यासाठी विद्यार्थ्याला डायलॉगबाजी या कलेत प्रावीण्य मिळवावे लागे . आता उदाहरणार्थ . गुरुजी कुठेतरी झाडावर एक पोपट टांगायचे , आणि विचारायचे ,” सांगा मुलांनो , तुम्हाला काय काय दिसते ? “ मग रोल नंबर १ पुढे यायचा . सांगायचा .” गुरुजी मला आकाश दिसते ,चंद्र दिसतो . सुर्य दिसतो . ”
इथे विद्यार्थी बाण मारायच्या आधीच आउट . मग रोल नंबर २ पुढे यायचा . पुन्हा सेम प्रश्न . उत्तर मात्र असे .” मला पोपट दिसतो , झाड दिसते . “ रोल नंबर २ आउट. हळुहळु संपुर्ण वर्ग आऊट व्हायचा .शेवटचा रोल नंबर पुढे यायचा . गुरुजी अत्यंत निराश भावनेने सेम प्रश्न विचारायचे . हा शेवटचा विद्यार्थी डायलॉगबाजी या कलेत अत्यंत प्रवीण असायचा . तो सांगायचा . “गुरुजी मला काहीही दिसत नाही . फक्त पोपटाचा डोळा दिसतो .” एकदम कडक डायलॉग . अमिताभच्या तोडीचा . गुरुजी खुश. त्याच विद्यार्थ्याला बाण मारायचा चान्स मिळायचा . बाकी विद्यार्थी कितीही हुशार असोत , चान्सच मिळायचा नाही . अशा प्रकारे तुम्ही डायलॉगबाजीत परफेक्ट असाल तर तुम्हाला चांगले शिक्षण मिळायचे.
तुम्हाला डायलॉगबाजी येत नसेल तर शिक्षण घेण्याचे अजुन दोन मार्ग उपलब्ध असत . पहिला मार्ग म्हणजे तुम्ही त्या ऋषींचेच अपत्य असणे . ऋषीमुनी आपल्या अपत्यांना ही शस्त्रे लपुनछपुन शिकवीत . त्यामुळे त्यांची संततीपण हुशार व्हायची . पण हे डायलॉगबाजीत परफेक्ट नसत . त्यामुळे युध्दबिध्द करायच्या भानगडीत न पडता ते पुढच्या पिढीत आपल्या वडीलांसारखे शिक्षक होत . दुसरा मार्ग म्हणजे ऋषीमुनींचा नाद सोडायचा , जंगलात जायचे ( म्हणजे एका जंगलातुन दुसर्‍या ) आणि ऋषींची एक मुर्ती तयार करायची , आणि सेल्फ स्टडी करायची . हा मार्ग थोडा धोकादायक असायचा , कारण शिक्षण जरी मिळाले तरी गुरुजी गुरुदक्षिणा म्हणुन अंगठ्यासारखा एखादा भाग मागुन घ्यायचे , आणि विद्यार्थ्याला तो द्यावा लागायचा . म्हणुन हा मार्ग तेवढा फुलप्रुफ नसायचा . फुलप्रुफ मार्ग एकच . डायलॉगबाजीत परफेक्ट होणे .

या सर्व शाळांमधे सर्व विद्यार्थी एकत्र रहात . राजाचा मुलगा असो वा प्रजेचा सर्व एकत्र . राजांची मुले आपले जेवण प्रजेच्या मुलांसमवेत एकत्र वाटुन खायची . त्यामुळे एकात्मतेची भावना वाढीस लागायची . पण पुढच्या आयुष्यात राजाची मुलेच यशस्वी व्हायची . प्रजेच्या मुलांचे काय व्हायचे कुणाला पत्ताही नसायचा . उदा . क्रुष्ण सुदाम्यातल्या सुदामाचे काय झाले पुढे कुणाला आठवते ? ही परंपरा मात्र आधुनिक भारताने अजुनही जपुन ठेवली आहे .
ही झाली इस्वीसनपुर्व भारताची शैक्षणिक परंपरा . इसवीसनानंतरचा शैक्षणिक परंपरांचा इतिहास थोडा वेगळा आहे . या वेळेपर्यंत परकीयांची आक्रमणे भारतावर चालु झाली . सामान्य जनता परकीयांशी लढुन परेशान . मग शिक्षणाला वेळ कुठुन असायला ? त्यामुळे ( फंडाअभावी ) हळुहळु ऋषीमुनींचे आश्रम बंद पडले . अजुन एक प्रॉब्लेम झाला . सामान्य जनता ऋषीमुनींच्या संस्क्रुतला कंटाळली . आणि मराठीला त्यांनी आपलेसे केले . याचे कारण म्हणजे संस्क्रुत भाषेची डिफिकल्टी लेव्हल भलतीच हाय होती . लोकांना ही भाषा समजेना . परकीयांशी लढावे का संस्क्रुतशी हा प्रश्न ऊभा राहीला आणि लोकांनी परकीयांशी लढण्याचा मार्ग स्वीकारुन संस्क्रुतला विश्रांती दिली . मग ऋषीमुनींना काम न उरल्याने ते पुन्हा जंगलांकडे गेले आणि संस्क्रुत भाषेत सुभाषिते करायला चालु केली . झाड दिसले कर सुभाषित . फळ दिसले कर सुभाषित . मग अशाप्रकारे हजारो सुभाषिते तयार झाली , पण सामान्यजनांना ती कळतच नसल्याने हळुहळु ती लोप पावली .

हा काळ गेला , इंग्रजांचे राज्य आले , आणि त्यांनी आपल्यासोबत शाळा कॉलेजेस आणली . नुसतीच शाळा कॉलेजेस नाही तर मॅट्रिक , बारावी , आर्टस , सायन्स , कॉमर्स वगैरे प्रकापण आणले . हळुहळु सर्व देशात हे प्रकार लोकप्रिय झाले . इंग्रज गेले तरी या प्रकारांची भरभराट होतच राहीली . आपण तोच फॉर्म्युला पुढे चालु ठेवला आणि अजुनही आपण त्याच प्रकारात शिक्षण घेतो.अगदी आत्ता लोक या प्रकाराला नावे ठेवायला लागली आहेत . कुणी म्हणतात दहावीला बोर्ड नको , कुणी म्हणतात मेरिट नको . काही अतिसुधारणावादीतर शिक्षणच नको म्हणतात . मग आपले सरकार शिक्षणाचा नवीन आक्रुतीबंध , नवनवीन पध्दती यावर चर्चा घडवुन आणते . निर्णय मात्र काहीच घेत नाही . इंग्रज जाताजाता आपल्या सर्व संस्था इथल्या लोकांच्या स्वाधीन करुन गेले . त्या लोकांनी पुढे अजुन संस्था वाढवल्या . आणि त्या लोकांचा शिक्षणसम्राट म्हणुन गौरव झाला . शिक्षणसम्राट म्हणजे ज्यांच्याकडे खुप शिक्षण आहे असे लोक नसुन ज्यांच्याकडे खुप शिक्षणसंस्था आहेत असे लोक . हल्ली कित्येक शिक्षणसम्राट आपल्या देशात आहेत आणि सध्या त्यांचीच चलती आहे.
बारावीच्या मराठीच्या पेपरमधे माझी अशी बरीच मते मी मांडली होती . पेपर तपासणार्‍यांना ती न पटल्याने मी नापास झालो . पण हल्ली कुठलीही परिक्षा द्यायची नसल्याने मी माझी मते ठणकावुन मांडु शकतो . मेलेली कोंबडी आगीला भिते थोडीच !

–निखिल नारायण मुदगलकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..