नवीन लेखन...

लिंगस्पर्धा

 
स्त्री-पुरुष असमानता हा आपल्या समाजाचा मोठा दोष. या दोषाशी सामना करण्यात, तो दूर करण्याचा प्रयत्न करण्यात पुरोगामी स्त्रियांची व समाजसुधारकांची बरीच शक्ती खर्ची पडली आहे, पडत आहे. समानतेचे स्वप्न अद्यापही प्रत्यक्षात आलेले नाही. मुळात हा लिगभेद कधी व कसा अस्तित्वात आला? लिगभेदाची बीजे पेरण्याची चूक कोणी

केली? लिगभेदामुळे परस्पर लिगांत जी तीव्र स्पर्धा सातत्याने चालू आहे, तिचा शेवट काय असेल? याचा वेध घेणारा लेख-प्रजनन म्हणजे स्वतःसारख्याच नवीन जिवांची निर्मिती करणे. हा सजीवसृष्टीचा एक महत्त्वाचा गुण आहे. एखादा जीव जन्माला येतो तेव्हाच हेही ठरते की, कधीकाळी त्याचा मृत्यू अटळ आहे. सजीवांच्या अशा अपरिहार्य मृत्यूमुळे त्यांच्या संख्येत होणारी तूट सतत भरून काढली गेली नाही, तर जीवसृष्टी नामशेष होण्याची पाळी येईल. हे टाळण्यासाठीच निसर्गाने जैवसृष्टीला प्रजननक्षमता बहाल केली आहे.

जैवसृष्टीच्या प्रारंभीच्या काळात प्रजननाची प्रक्रिया फार सरळ-सोपी होती. ती म्हणजे प्रजनन करणार्‍या सजीवाचे दोन वा अधिक भागांत विभाजन होऊन त्या प्रत्येक भागापासून त्याच प्रकारच्या नवीन सजीवाची निर्मिती होणे. अमिबासारख्या निम्नवर्गाच्या अनेक प्राण्यांत आणि बर्‍याच वनस्पतींत प्रजननाची हीच पद्धत आजही अस्तित्वात आहे. या प्रकारच्या प्रजननाला अलैंगिक किवा शाकीय (Asexual or Vegitative) प्रजनन म्हणतात. या प्रकारचे प्रजनन प्राण्यांच्या तुलनेत वनस्पतींमध्ये जास्त होते. कलम, गुटी, कळी वगैरेंचे रोपण आदी तंत्रे वापरून केलेले वनस्पतींचे प्रजनन हे अलैंगिक प्रजननाचेच प्रकार आहेत. लैंगिक प्रजननाप्रमाणे अलैंगिक प्रजननाला दोन सजीव (vçj DçççÆCç cççoçÇ) लागत नाही. अलैंगिक प्रजननाची प्रक्रिया एकाच सजीवाकडून पूर्ण होते. अलैंगिक प्रजननाने जन्माला येणार्‍या पुढील सर्व पिढ्यांचा जनुकसंच त्यांना जन्म देणार्‍या सजीवांपेक्षा भिन्न नसतो. त्यामुळे त्यांचे गुणही पूर्वीच्या पिढ्यांसारखेच असतात. त्यांच्यात भिन्नता उत्पन्न होण्यास वाव नसतो. जैवसृष्टीच्या दृष्टिकोनातून यामुळे एक मोठा तोटा असतो. तो हा, की अशा परिस्थितीत उत्क्रांती होण्याची शक्यता नसते.

समजा की, एका शाळेतील एखाद्या वर्गात ५० विद्यार्थी आहेत. कर्मधर्मसंयोगाने या सर्व विद्यार्थ्यांत कमालीचे साम्य आहे. त्यांची आकलन शक्ती, बुद्धिमत्तेची पातळी, विचार करण्याची कुवत आणि प्रवृत्ती, उत्तरे लिहिण्याची भाषा, ढब, त्यांची मांडणी आदी सर्व गोष्टी अगदी एकसारख्या आहेत. याचा परिणाम असा होईल की, प्रत्येक परीक्षेत सर्व विषयांत त्या सगळ्यांना सारखे गुण मिळतील. परीक्षकांना त्यांची क्रमवारी लावता येणार नाही. त्यांच्यात श्रेष्ठ कोण, हे सांगता येणार नाही. त्या सर्व विद्यार्थ्यांचा वर्गात प्रथम क्रमांक लागेल किवा ते सर्व नापास होतील. परस्परांत स्वाभाविकपणे असणारी स्पर्धा त्यांच्यात राहणार नाही. स्पर्धा नसली की दुसर्‍या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त गुण मिळविण्याची जिद्द कुठल्याही विद्यार्थ्यात निर्माण होणार नाही. ते विद्यार्थी पुढच्या वर्गात गेले तरी ही परिस्थिती बदलणार नाही. असा वर्ग एका तर्‍हेने अगदी निर्जीव असेल. वर्गातील कुठल्याही विद्यार्थ्यात शिक्षणाच्या किवा कुठल्याही अन्य दृष्टिकोनातून काहीच बदल किवा सुधारणा होणार नाहीत. परंतु वर्गातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांच्यात निर्भेळ स्पर्धा असणे आणि वर्गातील इतर विद्यार्थ्यांच्या पुढे जाण्याची इच्छा व त्यासाठी योग्य मार्गाने धडपड करण्याची वृत्ती असणे आवश्यक असते. जैवसृष्टीच्या उत्क्रांतीचेही असेच आहे. उत्क्रांतीसाठी सजीवांत गुणभिन्नता आणि स्पर्धा असणे आवश्यक आहे. डार्विनच्या नैसर्गिक निवड या सिद्धांताप्रमाणे गुणभिन्नता आणि स्पर्धा असलेल्या परिस्थितीतच निसर्गाला उत्क्रांतीसाठी निवड करण्याचा वाव असतो. त्यातून आपोआप त्या परिस्थितीत जो गुण सर्वात योग्य ठरतो, तो गुण असलेल्या घटकांचीच निवड होते.

अलैंगिक प्रजननाने हे साध्य होत नाही. सजीवात गुणभिन्नता येत नाही. यासाठी प्रजनन क्रियेत एकाच जातीच्या, पण थोडीशी तरी गुणभिन्नता असणार्‍या दोन सजीवांचा सहभाग असणे आवश्यक असते. उत्क्रांतीसाठी आवश्यक अशा या निवडीतूनच लैंगिक प्रजननाची प्रक्रिया अस्तित्वात आली. लैंगिक प्रजननाच्या क्रियेत दोन सजीवांचा सहभाग आवश्यक असतो. अशा प्रजननापासून जन्माला येणार्‍या नव्या सजीवांचा जनुकसंच त्यांना जन्म देणार्‍या सजीवांच्या जनुकसंचापेक्षा अनेक बाबतीत निराळा असतो. त्याच्या जनुकसंचात जन्मदात्या सजीवांच्या जनुकसंचांचे मिश्रण होते. त्याचे ५० टक्के जनुक एका जन्मदात्याकडून, तर उरलेले ५० टक्के जनुक दुसर्‍या जन्मदात्याकडून मिळालेले असतात. यामुळे त्यांचे काही गुण एका जन्मदात्यासारखे, तर काही दुसर्‍या जन्मदात्यासारखे असतात. अशा प्रकारे लैंगिक पद्धतीने जन्माला येणारा नवा जीव त्याच्या दोन्ही जन्मदात्यांपेक्षा थोडा निराळा असतो. त्याच्यात गुणभिन्नता येते. या सर्व कारणांमुळे अलैंगिक प्रजननाच्या तुलनेत लैंगिक प्रजनन उत्क्रांतीसाठी जास्त फायद्याचे असल्याने पुढे लैंगिक प्रजननाला प्रारंभ झाला.

लैंगिक प्रजननाला सुरुवात झाल्यावरही प्रारंभीच्या काळात लैंगिक प्रजननात भाग घेणार्‍या दोन सजीवांत नर आणि मादी असा भेद नव्हता. प्रजननात सहभागी असणारे दोन्ही सजीव विशेष प्रकारच्या पेशींची निर्मिती करतात. या पेशींना युग्मक म्हणतात आणि त्यांचा उपयोग फक्त प्रजननासाठीच होतो. युग्मक पेशीत गुणसूत्रांची संख्या त्या सजीवाच्या शरीरातील इतर- म्हणजे कायिक पेशीत असलेल्या गुणसूत्रांच्या संख्येच्या निम्मी असते. म्हणजे कायिक पेशीत गुणसूत्रांची संख्या २ अ असली तर त्याच्या युग्मकातील गुणसूत्रांची संख्या फक्त अ असेल. लैंगिक प्रजननाच्या दोन युग्मकांचे मीलन होते. या क्रियेला फलन किवा निषेचन (fertilization) म्हणतात. या मीलनातून तयार होणार्‍या नव्या पेशीला युग्मनज म्हणतात. या युग्मनजात अ गुणसूत्र एका युग्मकातून आणि अ गुणसूत्र दुसर्‍या युग्मकातून येतात. यामुळे युग्मनजात गुणसूत्रांची संख्या २ अ म्हणजे त्या सजीवाच्या कायिक पेशीत असलेल्या गुणसूत्रांएवढी होते. पुढे या युग्मनजापासून नवा जीव जन्माला येतो. अशा प्रकारच्या लैंगिक प्रजननात सहभागी असलेले दोन्ही युग्मक सारखे असल्याने त्यांना समयुग्मक म्हणतात. त्यांच्यात लिगभेद- म्हणजे शुक्रपेशी आणि अंडपेशी असा भेद नसतो. आजही कवकासारख्या (fungi) अनेक सजीवांत लैंगिक

प्रजनन होत असले तरी त्यांच्यात लिगभेद नसतो आणि त्यांच्यात याच प्रकाराने लैंगिक प्रजनन होते.

यापुढील उत्क्रांतीत लिगभेदाची (vçj DçççÆCç cççoçÇ) सुरुवात झाली. प्रारंभीच्या काळात हा भेद फार ठळक नव्हता. अजूनही वनस्पती आणि बर्‍याच प्राण्यांत नर कोण आणि मादी कोण, हे सांगणे सोपे नसते. लिगभेदाचे सरसकट सर्वांना लागू पडेल असे वर्णन करणे शक्य नाही. पण असा भेद सजीवांच्या प्रजनन पेशीत स्पष्टपणे दिसून येतो. या आधारावर प्रजनन पेशींना पुंबीज किवा शुक्राणू आणि स्त्रीबीज किवा अंडाणू अशी नावे देण्यात आली आहेत. शुक्राणूंचा आकारमान फार सूक्ष्म असतो. पण अंडाणूंचा आकार बराच मोठा असतो. मासे, बेडूक, पक्षी यासारख्या जीवांत अंडाणूचा आकार शुक्राणूंपेक्षा फारच मोठा असतो. कारण अशा प्राण्यांच्या अर्भकाची वाढ अंडाणूतच होत असल्याने अंडाणूत त्यांना अर्भक अवस्थेत पुरेल एवढ्या आहाराची शिदोरीही असते. यामुळेच त्यांचा आकार शुक्राणूंपेक्षा बराच मोठा असतो. सस्तन प्राण्यांत अर्भकाची वाढ मादीच्या गर्भाशयात होत असल्याने त्यांच्या अंडाणूत खाद्यपदार्थ नसतात. म्हणूनच त्यांचा आकार फार मोठा असत नाही. तरी त्यांच्यातही अंडाणूंचा आकार शुक्राणूंपेक्षा मोठाच असतो. शुक्राणू आणि अंडाणू यांच्यातील दुसरा महत्त्वाचा फरक म्हणजे शुक्राणूंची निर्मिती अंडाणूंच्या तुलनेत फार मोठ्या संख्येने आणि अतिवेगाने होते. शिवाय शुक्राणूत हालचाल करण्याची चांगली क्षमता असते, पण अंडाणूत ही क्षमता नसते. याच आधारावर नर आणि मादी यांच्यातील भेद स्पष्ट करता येऊ शकतो. शुक्राणूंची निर्मिती करणार्‍या सजीवांना ‘नर‘ आणि अंडाणू निर्माण करणार्‍या सजीवांना ‘मादी‘ अशा संज्ञा देण्यात आल्या आहेत.

लिगभेदाची सुरुवात कशी झाली असावी? ज्या काळात युग्मकात लिगभेद नव्हता आणि सर्व युग्मकांचा आकारही जवळजवळ सारखा होता, तेव्हा असे काही युग्मक असणे स्वाभाविक होते- ज्यांचा आकार सर्वसामान्य युग्मकापेक्षा किचित मोठा होता. त्याचप्रमाणे काही युग्मक सर्वसामान्य युग्मकापेक्षा आकाराने किचित लहान होते. म्हणजे समयुग्मकांमध्येही एकमेकांपेक्षा थोडीशीच भिन्नता असलेले तीन प्रकाराचे युग्मक होते- (१) सर्वसामान्य आकार असलेले युग्मक, (२) सर्वसामान्य युग्मकापेक्षा थोड्या मोठ्या आकाराचे युग्मक, आणि (३) सर्वसामान्य युग्मकांपेक्षा थोड्या लहान आकाराचे युग्मक. या तीन आकारांमध्ये सर्वसामान्य युग्मकापेक्षा थोडा मोठा किवा लहान आकार असणे फायद्याचे होते. कारण सर्वसामान्य युग्मकांच्या तुलनेत या युग्मकांना इतर युग्मकांशी समागम करणे सोपे होते. पुढे मोठ्या आकाराच्या युग्मकात खाद्यसामग्रीचा साठा वाढल्याने त्यांचा आकार वाढत गेला आणि कालांतराने त्यांचे रूपांतर अंडाणूमध्ये झाले. याच तर्‍हेने लहान आकाराच्या युग्मकात हालचाल करण्याची क्षमता उदयास आली आणि त्यांचा आकार अधिकाधिक सूक्ष्म होऊन त्यांचे शुक्राणूत रूपांतर झाले. याबरोबर सर्वसामान्य आकार असणारे युग्मक नामशेष झाले. कारण त्यांना इतर युग्मकांशी समागम करण्यास वाव उरला नाही. शुक्राणूंचा आकार फार लहान असल्याने त्यांची निर्मिती फार मोठ्या प्रमाणात आणि जलदगतीने होऊ लागली. त्याचप्रमाणे अंडाणूंच्या निर्मितीचे प्रमाण आणि वेग- त्यांचा आकार बराच मोठा असल्याने बराच कमी होता. शुक्राणूंची निर्मिती करणार्‍या सजीवांना नराचा आणि अंडाणूंचा निर्माण करणार्‍या सजीवांना मादीचा दर्जा मिळाला.लैंगिक प्रजननाचे अनेक प्रकार आढळतात. मासे, बेडूक यांसारख्या प्राण्यांच्या नर आणि मादी यांच्यात समागम करण्याची ंत
रणा नसल्याने अंडाणूंचे फलन मादीच्या शरीरात न होता बाहेर (बहुधा पाण्यात) होते. अशा प्रकारच्या फलनाला बाह्य फलन म्हणतात. अशा प्राण्यांत मादीने अंडी घातल्यावर त्यांच्याकडे बघण्यास तिला वेळ नसतो. ती रामभरोसेच वाढतात. याला काही अपवादही आहेत. यापुढील वर्गाच्या प्राण्यांत अंडाणूंचे फलन मादीच्या शरीरात होते. यांच्यात नर-मादी समागमाची व्यवस्था असते. फलित अंडाणूंची वाढ मादीच्या शरीरात होत नाही. तिला अंडी घालावी लागतात. अशा फलनाला आंतरिक फलत म्हणतात. अंडी घालणार्‍या प्राण्यांना ‘अंडज‘ म्हणतात. मासे, बेडकाच्या जातींचे प्राणी, सरीसृप, पक्षी वगैरे प्राणी या वर्गात मोडतात. सस्तन प्राण्यांत अंडाणूंचे फत्त* फलनच नव्हे, तर फलित अंडाणूंची वाढही मादीच्या शरीरात होते. अर्भकाची वाढ पूर्ण झाल्यावर मादी अपत्य जन्माला घालते. अशा प्राण्यांना ‘जरायुज‘ म्हणतात. खालच्या वर्गाचे काही सस्तन प्राणीही अंडज असतात. कांगारूसारख्या काही सस्तन प्राण्यांत गर्भाची पूर्ण वाढ मादीच्या शरीरात होत नाही. तिचे अपत्य पूर्ण वाढ न झालेल्या अवस्थेत जन्माला येते. पुढे त्याची वाढ मादीच्या पोटावर असलेल्या एका विशेष पिशवीत पूर्ण होते. गांडुळासारख्या प्राण्यात नर आणि मादी या दोन्ही लिगांचे अवयव एकाच शरीरात असतात. काही प्राण्यांना आवश्यकतेप्रमाणे आपले लिग बदलता येते. लैंगिक प्रजननाची अशी स्थित्यंतरे होताना अपत्यांची काळजी घेण्याच्या वृत्तीतही बदल होतो. जरायुज प्राणी अंडज प्राण्यांच्या तुलनेत आपल्या संततीची जास्त काळजी घेतात. माणसात या प्रवृत्तीचे सर्वोच्च शिखर बघायला मिळते. कारण तो स्वतः जिवंत असेपर्यंत कुठल्या न् कुठल्या प्रकार आपल्या अपत्यांची काळजी घेतच असतो.

अशा प्रकारे सजीवसृष्टीत लिगभेद उदयास आला. आजच्या स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टिकोनातून पुरुष आणि स्त्री असा लिगभेद करणे ही निसर्गाची एक फार मोठी चूक होती. इथेच लैंगिक स्पर्धेचे बीजारोपण झाले. पण असली चूक अपरिहार्य होती आणि निसर्गाला ती टाळता आली नाही. निसर्गाच्या या चुकीबद्दलचे माझे विधान काही लोकांना कदाचित पटणार नाही. पण पुढील उदाहरणांवरून माझ्या विधानात थोडेसे तरी तथ्य आहे, हे मानण्यास हरकत नसावी. समानतेच्या दृष्टिकोनातून बघितले तर प्रजननातून निर्माण होणार्‍या पुढच्या पिढीच्या संरक्षणाची आणि संगोपनाची जबाबदारी त्या पिढीला जन्म देणार्‍या दोन्ही म्हणजे नर आणि मादी यांच्याकडे समप्रमाणात असायला हवी. पण त्यात सुरुवातीपासूनच भेदभाव झाला आहे, असे म्हणायला बराच वाव आहे. नव्या पिढीच्या निर्मिती आणि संगोपनासाठी अंडाणूकडून गुणसूत्रांबरोबर खाद्यपदार्थांचाही पुरवठा केला जातो, पण शुक्राणूंकडून त्यासाठी फक्त गुणसूत्रांचाच पुरवठा होतो, खाद्यपदार्थांचा नव्हे. बहुतांशी अंडज प्राण्यांत असे आढळून येते की, नर-मादी समागम झाल्यावर फलित अंडाणूंची सुरक्षा, संवर्धन, अपत्याचे संगोपन आदी गोष्टींची जबाबदारी फक्त मादीच्या वाट्याला येते. समागमानंतर नर दुसर्‍या माद्यांच्या मागे लागण्यास मोकळा होतो. कुत्रा, मांजर यांच्यासारख्या जरायुज प्राण्यांतही समागमानंतर नराचा पुढच्या पिढीशी काही संबंध राहत नाही. गर्भाची वाढ मादीच्या शरीरात होत असल्याने अपत्यजन्मापर्यंत त्याची सर्व जबाबदारी कळत-नकळत मादीलाच घ्यावी लागते. भ्रूणवृद्धी आणि अपत्य- जन्माच्या वेळी होणार्‍या सर्व शारीरिक हालअपेष्टा मादीलाच सोसाव्या लागतात. इथेसुद्धा नर-मादी समागमानंतर नर दुसर्‍या मादीबरोबर समागम करण्यास स्वतंत्र असतो. पहिल्या मादीबरोबर त्याने केलेल्
या समागमामुळे तिच्यावर आलेल्या जबाबदार्‍यांशी त्याचे काहीच देणे-घेणे नसते.मानव समाजात असलेल्या सामाजिक बंधनांमुळे पुरुषाला बहुधा एवढे स्वातंत्र्य नसते. तरीही यामुळे आई म्हणजे स्त्रीच्या जबाबदार्‍या कमी होत नाहीत. मानव समाजाची सांस्कृतिक उत्क्रांती झाली नसती तर इथले चित्रही अन्य सजीवांपेक्षा फारसे निराळे दिसले नसते. हे सर्व असूनही आपण मानव आहोत, हे पूर्णपणे विसरून इतर सजीवांच्या नरांप्रमाणे वागणार्‍या पुरुषांची संख्या जास्त नसली, तरी कमीही नाही, असे म्हटले तर अतिशयोक्ती नक्कीच होणार नाही.गेल्या दोन-तीन शतकांत जैवशास्त्राच्या क्षेत्रात अभूतपूर्व संशोधन झाले आहे. त्यातूनच विलक्षण क्षमता असलेले जैव-तंत्रज्ञान उदयास आले आहे. या तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनाशी संबंधित सर्व क्षेत्रांत एका क्रांतीची सुरुवात झाली आहे. वैद्यकशास्त्रातही प्रगती होऊन आजपर्यंत अशक्य वाटणार्‍या अनेक गोष्टी करणे आता शक्य झाले आहे. जैवसृष्टीच्या प्रजनन क्रियेसंबंधी अनेक मौलिक गोष्टी उघडकीस आल्या आहेत. उदा. शुक्राणू आणि अंडाणूंशिवाय प्रजनन होऊ शकत नाही- या संकल्पनेला डॉलीच्या क्लोनिगमुळे हादरा बसला आहे. डॉली जन्माला येण्यात शुक्राणू किवा अंडाणूंचा काहीही सहभाग नव्हता. डॉलीच्या क्लोनिगनंतर अन्य अनेक प्राण्यांचे क्लोनिग करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. काही शास्त्रज्ञांनी तर माणसाचे क्लोनिगही यशस्वीपणे केल्याचा दावा केला आहे.

जैवशास्त्राचा उपयोग प्रजनन क्रियेतही होऊ लागला आहे. यापैकी काही गोष्टींचा उल्लेख करायचा झाला तर अंतःपात्री फलन (In vitro fertilization), पर्यायी माता (Surrogate Mother) या तंत्रांचा करावा लागेल. यांना टेस्ट-ट्यूब बेबी चाच प्रकार म्हणता येईल. या तंत्रांचा वापर करून अपत्य नसलेल्या दाम्पत्यांनाही अपत्यप्राप्तीचा आनंद घेता येऊ शकतो. आजीबाईच्या वयाच्या स्त्रियाही पुन्हा एकदा संततीला जन्म देण्याचा अनुभव घेऊ शकतात. आता रक्तपेढ्या, नेत्रपेढ्यांप्रमाणे वीर्यपेढ्याही अस्तित्वात आल्या आहेत. यामुळे आता मानव समाजात पुरुषाचे महत्त्व कमी होण्याची शक्यता आहे. एक दिवस असाही येऊ शकतो, जेव्हा प्रजननासाठी पुरुषाची आवश्यकताच राहणार नाही. स्त्रियांच्या बाबतीत तसे घडणे अजून तरी शक्य वाटत नाही. कारण वर उल्लेख केलेल्या सर्व नवीन तंत्रांत प्रजननासाठी स्त्रीचे गर्भाशय अपरिहार्य असते. यापैकी कुठल्याही तंत्राने गर्भाची निर्मिती केली गेली तरी गर्भाची पुढील वाढ स्त्रीच्या गर्भाशयातच होऊ शकते. क्लोनिगसाठीही शेवटी स्त्रीचे गर्भाशय लागतेच. तज्ज्ञांना नव्या तंत्रांच्या मदतीने प्रजननासाठी स्त्रीच्या गर्भाशयाला दुसरा काही पर्याय अजून तरी सापडलेला नाही आणि असा पर्याय सापडेपर्यंत स्त्रीचे समाजातील स्थान अक्षुण्ण राहणार आहे. पण पुरुषाचे महत्त्व कमी होऊन त्याचे अस्तित्व फक्त वीर्यपेढ्यांपुरतेच मर्यादित झाले तर आश्चर्य वाटायला नको.

उत्क्रांतीच्या काळात निसर्गाने प्रजननाच्या बाबतीत पुरुषांच्या- म्हणजे नरांच्या बाजूने थोडे झुकते माप देऊन पुरुषाच्या जबाबदार्‍या कमी केल्या असतील, पण स्त्री-म्हणजे मादीला यादृष्टीने मिळालेली दुय्यम दर्जाची वागणूक भविष्यात तिला तिच्या अस्तित्वासाठी एक मोठे वरदान ठरू शकते.

— भालचंद हादगे उर्फ भाली

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..