नवीन लेखन...

रजोनिवृत्ती

स्त्रीच्या आयुष्यात शारीरिक विकासाचे जे टप्पे आहेत त्यात रजोनिवृत्ती हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या काळात स्त्रियांमध्ये शारीरिक बदलांबरोबर मानसिक बदलही घडत असतात. चाळिशी-पन्नाशीच्या दरम्यानचा काळ रजोनिवृत्तीचा कालावधी असतो. नेमके याच दरम्यान तिच्या आयुष्यात काही मनाविरुद्ध व काही दुर्दैवी घटनाही घडतात. मुले आपापला संसार थाटून वेगळे नांदायला जातात. कधी आयुष्याचा जोडीदार अचानक जग सोडून जातो. कधी आयुष्यभर आधार देणाऱ्या माता-पित्याचे निधन होते. अनपेक्षित आजार विशेषत: मधुमेह व रक्तदाबासारखे जीवनशैलीविषयक आजार तिला याच काळात त्रास देत असतात.

नोकरदार स्त्रीची सेवानिवृत्तीही याच दरम्यान होते. यामुळे जीवनाची जी एक व्यस्त व मस्त अशी घडी असते ती विस्कळीत व्हायचाही हाच काळ असतो. यामुळे स्त्रीला आपल्या वैयक्तिक जीवनात खूप मोठा मोकळा वेळ निर्माण झाल्यासारखे वाटते. आपला आयुष्यावरचा ताबा हातातून गेला आहे म्हणून येणारी विमनस्कता आणि स्वत:बद्दलचा कमी होणारा विश्वास व महत्त्व यामुळे मानसिक खच्चीकरणही या काळात होते. विशेषत: ज्या भगिनींनी नुसती गृहिणी म्हणून भूमिका बजावलेली असते, त्यांना रजोनिवृत्तीमुळे येणाऱ्या बदलांना सक्षमपणे सामोरे जाता येत नाही. त्याचा मानसिक दुष्परिणामही त्यांना सहन करावा लागतो. याउलट ज्या स्त्रियांनी उत्तमपणे नोकरी केली आहे, करिअरमध्ये समाधान मिळविले आहे, हाताशी पसा आहे तो स्वत:साठी कुणावर अवलंबून न राहता वापरता येतो, त्या स्त्रिया रजोनिवृत्तीतील बदलांना शांतपणे सामोरे जातात.

बऱ्याच गृहिणींचा वाढता चिडचिडेपणा घरातील नातेवाईक विशेषत: नवरा समजून घेईलच असे नाही. त्यामुळे आता तुझे वय झाले आहे म्हणून उगाचच राग राग करतेस. ‘सायकिक’ झाली आहेस, उगाचच चिडचिडी झाली आहेस अशा टोमण्यांनी तिला आणखी सतावले जाते. रजोनिवृत्तीचा काळ स्त्रियांमध्ये साधारणपणे वयाच्या ४५ नंतर चालू होतो. काही स्त्रियांच्या बाबतीत तो खूप लवकर व खूप नंतरही येतो. रजोनिवृत्ती ही खरे तर नसíगक प्रक्रिया आहे. पण बऱ्याच वेळा गर्भाशय व अंडाशय काही महत्त्वाच्या वैद्यकीय कारणांमुळे जसे की, कर्करोग झाला तर शस्त्रक्रियेमुळे काढला गेल्यास रजोनिवृत्ती कृत्रिमरीत्या येते. रजोनिवृत्तीचा त्रास मासिक पाळी बंद झाल्यावर दोन ते चार वर्षांत आपसूक संपतो.

पाळी गेल्यानंतरच्या काळात शरीरातील इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन ही हार्मोन्स कमी होऊ लागतात. स्त्रीची मासिक पाळी थांबते आणि नसíगकरीत्या तिला आता गर्भधारणा होत नाही.

रजोनिवृत्तीच्या काळात जवळजवळ ८५ टक्के स्त्रियांना कमी-अधिक प्रमाणात शरीरातील कुठल्या ना कुठल्या भागात अचानक गरम झाल्यासारखे वा वाफा आल्यासारखे वाटते. विशेषत: चेहऱ्यावर मानेच्या भोवती, गालावर, कानशिलाजवळ हे जास्त प्रमाणात जाणवते. कधी कधी ही गरमागरम संवेदना एका ठिकाणी सुरू होऊन अचानक पूर्ण शरीरात पसरत जाते. काही स्त्रियांच्या बाबतीत ही संवदेना हलकीफुलकी व कालांतराने कमी कमी होत जाते. तर काहींच्या बाबतीत पूर्ण शरीरात एखादी ज्वाला भडकते आहे की काय, अशा प्रकारचा अनुभवही असू शकतो आणि तो दीर्घ काळही चालतो.

याच काळात किंवा पाळी जायच्या काही महिने आधीपासूनच रात्री अचानक खूप घाम फुटल्यामुळे काही स्त्रिया घाबऱ्याघुबऱ्या होतात. टॉवेल पूर्ण भिजला आहे, गाऊन, कपडे पूर्ण भिजले आहेत अशा प्रकारचा घाम फुटण्याचा अनुभव भयंकर असतो. त्यामुळे त्यांची झोपही पूर्ण होत नाही. पूर्ण रात्रभर त्या अस्वस्थ राहतात. त्यांच्यात दिवसा चिडचिडेपणा आणि तणाव वाढतो. रात्रीचे हे घाम फुटणे इतर वैद्यकीय कारणांमुळेही होऊ शकते. म्हणून यासाठी डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यावा.

काही स्त्रियांना पाळी जाण्याच्या दरम्यान विलक्षण अशक्तपणा जाणवतो. शरीरातील ऊर्जा कमी झाली आहे व खूप थकवा जाणवतो आहे, अशा तक्रारी त्या करतात. या थकव्याबरोबर त्यांना खूप चिडचिडल्यासारखे वाटते व इतर गोष्टींबद्दल काही आकर्षण वाटत नाही. बऱ्याच वेळा हा थकवा प्रचंड तीव्रतेने येतो आणि अचानक येतो. स्त्रिया आपले नियमित साधे कामसुद्धा करू शकत नाहीत. त्यांना पूर्ण गळून गेल्यासारखे वाटते. हे खरे तर रजोनिवृत्तीमधले खूप महत्त्वाचे लक्षण आहे बरं. पण बऱ्याच वेळा घरच्यांच्या ते लक्षात येत नाही. या काळात बऱ्याच स्त्रियांच्या मुलाचे लग्न झालेले असते. सूनबाई घरी आलेली असते. ती आजकालच्या काळात नोकरीला जात असते. अशा वेळी घरात काम करायचे नाही म्हणून सासूबाई सुनेला छळण्यासाठी थकल्याचे हे सोंग करताहेत असे घरातल्यांना वाटते. यामुळे घरच्यांची आणखी चिडचिड होते. कमी होणाऱ्या इस्ट्रोजनसारख्या हार्मोनबरोबर स्त्रीच्या शरीरातील शक्ती ही कमी होते. अशा तऱ्हेचा दीर्घकालीन थकवा स्त्रीची दमछाक करतोच पण तिचे नातेसंबंध व विधायकतेवरही दुष्परिणाम घडवितो. बराच काळ तिच्यात क्षमता असूनही ती सुप्तावस्थेत जाते आणि काहीच करत नाही.

भावनिक अस्थर्य हे रजोनिवृत्तीचे आणखी एक महत्त्वाचे लक्षण आहे. बऱ्याच वेळा स्त्रीला स्वत:लाच हा भावनांचा हिंदोळा कळत नाही. एका क्षणी ती पूर्णपणे स्थिरचित्त असते, प्रसन्न असते तर पुढच्या काही क्षणात ती अचानक चिडते काय, रडते काय, रागावते काय? हे सगळे भावनिक बदल इतरांनाही कळत नाहीत. तिच्या अशा बदलत्या मूडमुळे नातेवाईक तिला टाळायला लागतात. काही महत्त्वाच्या गोष्टी सांगेनासे होतात. कारण ती कसा काय प्रतिसाद देईल याची त्यांना खात्री नसते. मग तिला घरातले सगळे बेइमान वाटतात. आपली प्रतारणा करत आहेत असे वाटते.

या काळात स्त्रियांना रात्री नीट झोप येत नाही. इतर अनेक लक्षणांमुळे तिची झोप बिघडते. पण रजोनिवृत्तीच्या प्रत्यक्ष परिणामामुळेसुद्धा झोप येत नाही. ती सतत उसासे देत कुशीवर वळत असते. स्त्रीला रात्र म्हणजे एक भयंकर शिक्षाच वाटते. कित्येक रात्री शांत झोप लागली नाही म्हणून पूर्ण दिवसभर अस्वस्थ वाटते. रक्तदाब वाढला आहे, मधुमेहावरचा ताबा राहत नाही. झोप न आल्यामुळे दिवसा कामात किंवा कशातही मन रमत नाही. मन एकाग्र होत नाही. नोकरीवर असल्यास नेहमीच्या कामात चुका होतात. घरातसुद्धा साध्या साध्या गोष्टी जमत नाहीत. स्वयंपाक हमखास बिघडतो. खरे तर काही स्त्रियांना रजोनिवृत्ती सुरू व्हायच्या एक-दोन वर्षे आधीच हार्मोन्सचे असंतुलन झाल्यामुळे झोप न येण्याची तक्रार सुरू होते. याच काळात बऱ्याच स्त्रियांना झोपेच्या गोळ्या घ्यायचे व्यसनही जडते. म्हणून झोपेचे नियोजन करणे आवश्यक आहे.

बऱ्याच स्त्रियांचे रजोनिवृत्तीच्या काळात वजन प्रचंड प्रमाणात वाढू लागते. हे पुन्हा हार्मोन्स कमी झाल्यामुळेच होते. हे वजन वाढल्याने स्त्रीला स्वत:विषयीच राग येऊ लागतो. आपण बेढब दिसायला लागलो आहोत, आपले म्हातारपण जवळ आले आहे, आपले सौंदर्य कमी झाले आहे, असे वाटायला लागते. कामाची जबाबदारी घरात किंवा नोकरीवर पूर्वीच्या तुलनेने कमी होते. सुस्तपणा व थकवा आल्याने शारीरिक चापल्य कमी होते. त्यामानाने आहारावरही नियंत्रण राहत नाही. शरीराची हालचाल मंदावली जाते. या काळात हाडांचे दुखणे वाढते. गुडघे दुखू लागल्याने बाहेर जाणे कमी होते आणि वजन जास्त वाढायची प्रक्रिया चालू राहते.

या दरम्यान पोटाला फुगारा येतो वा फुगल्यासारखे वाटते. खूप अस्वस्थ वाटते. पोटात दुखतेही. अन्नपचन होत नाही. गॅस झाल्यासारखे वाटते. अॅ सिडिटी झाल्यासारखे वाटते. हा फुगारा एक प्रकारचा रोगच आहे की काय असे स्त्रियांना वाटते. मग घरगुती औषधे सुरू होतात. बऱ्याच वेळा स्वत:च्याच मनाने किंवा दुसऱ्याने सांगितले म्हणून इनोसारखं औषध घे, आयुर्वेदिक औषधे घे असे प्रकार सुरू होतात, ज्यामुळे स्त्रियांना आणखी त्रास होऊ शकतो. म्हणून वैद्यकीय उपचार डॉक्टरांना सांगूनच करावेत.

काही स्त्रियांचे डोके खूप दुखते आहे किंवा डोक्याभोवती स्नायू आवळल्यासारखे वाटतात. डोकेदुखी वा मायग्रेन पाळी यायच्या आधी पूर्वीपासून होत असेल तर रजोनिवृत्तीच्या काळात ती जास्त प्रमाणात दिसून येते. सांधेदुखी ही दुसरी महत्त्वाची तक्रार स्त्रिया या काळात सतत करतात. मानेच्या, खांद्याच्या, पाठीच्या स्नायूंमध्ये ताण आला तर त्यांना पूर्वीची जी कामे व्यवस्थित करता येत होती, ती आता करता येत नाहीत. याच्यावर वेळीच लक्ष दिल्यास हाडांची पुढे होणारी झीज लक्षात येऊ शकते व उपचाराने ती रोखताही येऊ शकते. रजोनिवृत्तीच्या काळात हाडांची झीज होणे अपेक्षित आहे. हाडांना ठिसूळपणा येऊन ओस्टिवोपोरोसिस व आर्थायटिससारखा विकार बळावू शकतो. या काळात हाडे नव्याने भरून यायची तरुणपणातली प्रक्रिया चांगलीच मंदावते. म्हणून पुढे येणारी हाडांची व एकंदरीत हालचाल करण्याची दुर्बलता थांबविण्यासाठी कॅल्शियम किंवा ‘ड’ जीवनसत्त्वाबाबत डॉक्टरी सल्ला व्यवस्थित घेणे आवश्यक आहे.
याशिवाय आणखी महत्त्वाची तक्रार म्हणजे स्तनांमध्ये थोडे थोडे दुखरेपण जाणवते. एकदम तीव्र नसले तरी ठुसठुसणारी ही वेदना अस्वस्थ वाटायला लागते. आजकाल तर स्त्रियांना आपल्याला कर्करोग झाला आहे, असा संशय पटकन येतो. त्यामुळे त्या घाबरतात व डॉक्टरांकडे जायचे टाळतात. स्तनांमधली ही अशी वेदना जी कधी खुपल्यासारखी, टोचल्यासारखी, थोडय़ाशा दबावाने येणारी असेल तर स्त्रियांनी जरूर तपासून घ्यावी. ज्यायोगे इतर काही कर्करोगासारखे आजार असतील तर तात्काळ ओळखता येतील.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. डॉ. शुभांगी पारकर

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..