नवीन लेखन...

युडीआरएस : तंत्रज्ञान की अचूकता ?

मैदानावरील पंचांचा एखादा निर्णय चुकल्यास खेळाडूंना त्याविरुद्ध तिसर्‍या पंचाकडे दाद मागता येते. युडीआरएस या पद्धतीत हे शक्य आहे. आयसीसीने ही पद्धत वापरायचे ठरवले असले तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा युडीआरएसला ठाम विरोध आहे. खेळाडूंमध्येही या पद्धतीबद्दल अनेक मतभेद दिसून येत आहेत. शेवटी ही पद्धत किती अचूक ठरेल यावरच तिचे भवितव्य अवलंबून आहे.क्रिकेटमध्ये विविध निर्णय देताना तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा की नाही यावर अनेकांमध्ये मतभिन्नता आढळते. पूर्वी मैदानावरील दोन पंच सर्व निर्णय देत असत. मानवी चुकांमुळे हे निर्णय प्रत्येक वेळी बरोबर असतीलच असे नाही. तेव्हापासूनच तंत्रज्ञानाच्या वापरावर विचार सुरू आहे. तिसर्‍या पंचाची संकल्पना अस्तित्वात येऊनही बराच काळ झाला आहे. परंतु आजही तिसरा पंच मैदानावरील पंचांच्या निर्णयात हस्तक्षेप करू शकत नाही. तसेच धावबाद, झेलबाद अशा ठरावीक निर्णयांव्यतिरिक्त तिसर्‍या पंचाला फारसे अधिकार नाहीत. आता युडीआरएस या पद्धतीबद्दल चर्चा सुरू आहे. क्रिकेटमध्ये व्यावसायिकता भिनल्यामुळे अधिकाधिक निर्णय अचूक असावेत अशी अनेकांची अपेक्षा आहे. तर अनेकांना अजूनही हा खेळ पारंपरिक पद्धतीनेच खेळला जायला हवा असे वाटते. अंपायर डिसिजन रिव्ह्यु सिस्टिम (युडीआरएस) या पद्धतीत मैदानावरील पंचाने निर्णय दिल्यावरही एखादा खेळाडू बाद आहे की नाही हे ठरवण्यासाठी तिसर्‍या पंचाची मदत घेतली जाऊ शकते. सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी या दोघांचाही या पद्धतीला विरोध आहे तर सेहवागला ही पद्धत विशेष आवडते. आयसीसी ही पद्धत राबवण्याचा विचार करत आहे. मैदानावरील पंचांच्या चुका कमी करण्यासाठी या पद्धतीला पर्याय नसल्याचे आयसीसीचे मत असले तरी तेंडुलकर आणि धोनीसारख्या महत्त्वाच्या खेळाडूंनी विरोध केल्यास त्याच
अंमलबजावणी लांबणीवर पडू शकते. भारताव्यतिरिक्त इतर अनेक देशांनी या पद्धतीला होकार दिला आहे.

बीसीसीआयच्या अधिकार्‍यांच्या मते ही पद्धत सर्वार्थाने अचूक नसून एखाद्या निर्णयाची खात्री करून घेण्यासाठी खेळाडूंवर

टाकले

जाणे ही यातील महत्त्वाची त्रुटी आहे. क्रिकेटमधील निर्णयांसाठी लागणारे तंत्रज्ञान पुरवणारे पुरवठादारही बीसीसीआयच्या या धोरणावर नाराज आहेत. या मुद्यावर तंत्रज्ञान पुरवठादार, आयसीसी आणि बीसीसीआय यांच्यात वादही झाले आहेत. भारत आणि न्यूझिलंड यांच्यादरम्यान नुकत्याच झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात केन विल्यम्सन, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि झहीर खान यांच्याबद्दलचे निर्णय पाहता युडीआरएस पद्धत आपल्यासाठी फलदायी ठरली असती. असे असूनही सचिन तेंडुलकरचा या पद्धतीला ठाम विरोध कायम आहे. वीरेंद्र सेहवाग आणि हरभजन सिंग यांचा या पद्धतीला पाठींबा आहे. भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांचाही या पद्धतीला विरोध नाही.

न्यूझिलंड दौंर्‍यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत युडीआरएसचा वापर व्हावा यासाठी दक्षिण आफ्रिका प्रयत्नशील आहे. परंतु, भारताने त्यास ठाम विरोध दर्शवला आहे. बीसीसीआयच्या एका अधिकार्‍याने तर आपण स्वत: इंजिनिअर असून असला ‘नॉनसेन्स’ खपवून घेऊ शकत नाही असेही म्हटले आहे. अर्थात, बीसीसीआयने युडीआरएसचा पूर्ण विचार केला असावा. काहीही झाले तरी क्रिकेट दौर्‍यांमध्ये ही पद्धत वापरली जाऊ नये अशी आपली ठाम भूमिका असल्याचे बीसीसआयने म्हटले आहे. या पद्धतीत अनेक त्रुटी आहेत. जगातील कोणत्याही दोन खेळपट्ट्यांमध्ये समान उंची (बाऊन्स), सारखा पृष्ठभाग (सरफेस), सारखे हवामान असणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत केवळ प्रत्येक सेकंदाला कॅमेरा फ्रेम्सची संख्या वाढवून किंवा व्हेक्टर ग्राफिक्स वापरून निर्णयाची अचूकता कशी वाढवता येईल असा बीसीसीआयचा सवाल आहे. यात पॅरलॅक्स आणि मॅपिंग त्रुटीही आहेत. याबरोबरच हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी येणारा खर्चही खूप आहे. हा खर्च करूनही अचूक निर्णयांचे प्रमाण खूप वाढते असे नाही. ते 92 टक्क्यांवरून 97 टक्क्यांपर्यंतच जाते. बीसीसीआयच्या आणखी एका अधिकार्‍याच्या मते प्रत्यक्ष मैदानावर खेळणार्‍या खेळाडूंसाठी ही पद्धत लॉटरीसारखीच असते. प्रत्येक अवघड निर्णय आपोआप तिसर्‍या पंचाकडे जाऊन मैदानावरील पंचांवर वचक ठेवायला नको का ? ही जबाबदारी खेळाडूंवर टाकून आणि प्रत्येक डावात केवळ दोनच निर्णयांवर अपील करण्याचा अधिकार का ? कर्णधार यष्टीरक्षक असेल तर त्याला सर्व निर्णय जवळून पाहता येतात. परंतु, तो दूरवर क्षेत्ररक्षण करत असेल तर पायचितसारख्या निर्णयावर अपील करावे की नाही हे तो कसे ठरवू शकेल. खेळाडूंना केवळ दोनच निर्णयांवर अपील करण्याची परवानगी असल्याने केवळ त्या दोन निर्णयांपुरतेच मैदा
ावरील पंचांचे निर्णय अधिक अचूक असू शकतील.

याबरोबरच बीसीसीआयचे इतरही अनेक आक्षेप आहेत. परंतु, हॉकआय इनोव्हेशन्स या तंत्रज्ञान पुरवणार्‍या कंपनीच्या व्यवस्थापकिय संचालक पॉल हॉकिन्स यांच्या मते भारताच्या आक्षेपांमध्ये फारसे तथ्य नाही. ते म्हणतात, मी बीसीसीआय अधिकार्‍यांबरोबर बसून त्यांच्या सर्व शंका दूर करू शकतो. आयसीसीने आमची बैठक व्हावी यासाठी बरेच प्रयत्न केले. परंतु, भारताचा या तंत्रज्ञानावर विश्वास नाही. युडीआरएसला लोकांची मान्यता मिळाली तर बीसीसीआयला भरपूर पैसा कमवता येईल. सध्या क्रिकेटचे प्रसारण करणार्‍या कंपन्यांकडे हॉकआय तंत्रज्ञान आहे. त्यात युडीआरएसचा समावेश करण्यासाठी फारसा खर्च येणार नाही. युडीआरएसमध्ये चेंडूची दिशा आणि उंची ठरवण्यासाठी व्हेक्टर ग्राफिक्स वापरले जाते. हे तंत्रज्ञान संरक्षणदलांतर्फे वापरल्या जाणार्‍या मिसाईल ट्रॅकिंग तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्यामुळे खेळपट्टी कशी आहे हे फारसे महत्त्वाचे ठरत नाही. पायचितच्या निर्णयात चेंडू पॅडला लागल्यानंतर पुढे कसा जाऊ शकला असता हे ठरवावे लागते. त्यापूर्वी त्याचा टप्पा पडून त्याने उसळीही घेतलेली असते. शिवाय वार्‍याचा परिणामही व्हायचा तेवढा झालेला असतो. त्यामुळे खेळपट्टीवरचा आक्षेप महत्त्वाचा नसल्याचे पॉल हॉकिन्स यांचे मत आहे. पण, यावर अनेकांकडून होणारी टीका पूर्णत: अयोग्य नसून हे तंत्रज्ञान फिफाच्या अधिकार्‍यांनाही अजून पटले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते त्यांचे तंत्रज्ञान अचूक आहे आणि त्याने सर्वांचेच काम सोपे होते. पण,

हे सर्वांना पटवून देण्याची संधी

मिळायला हवी.

बीसीसीआयचा या तंत्रज्ञानाला असलेला विरोध पाहून आयसीसीने त्यासाठी प्रायोजकत्व मिळवण्याचाही प्रयत्न केला आहे. प्रायोजकत्व मिळाल्यावर कमी खर्च होऊन बीसीसीआय तयार होईल असे आयसीसीला वाटले असले तरी त्यामुळे बीसीसीआयवर उलटा परिणाम झाला आणि त्यांना या तंत्रज्ञानाबद्दल अधिकच संशय निर्माण झाला. एखाद्या कंपनीचे मार्केटिंग आपण का करावे असे बीसीसीआयचे म्हणणे आहे. याच कारणासाठी फिफानेही त्यांचे गोल-लाईन तंत्रज्ञान वापरले नाही. असे असले तरी आयसीसीने मात्र युडीआरएस वापरण्याचा जणू चंगच बांधला आहे. भारत आणि श्रीलंकेच्या 2008 मधील दौर्‍यात हे तंत्रज्ञान वापरण्यात आले होते. तरी अनेक निर्णय चुकल्याचे स्पष्टपणे दिसले. मग एवढा खर्च करून हे तंत्रज्ञान का अंगिकारायचे असा बीसीसीआयचा सरळ प्रश्न आहे. या प्रश्नाला उत्तर मिळत नाही तोपर्यंत तरी बीसीसीआयचा विरोध कायम राहणार असून आयसीसीला युडीआरएस सरसकट राबवणे शक्य होणार नाही.

(अद्वैत फीचर्स)

— मनोज मनोहर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..