नवीन लेखन...

भुलेश्वर मंदिर

    

पुण्यात आणि आसपास भटकंतीची बरीच ठिकाणे प्रसिद्ध आहेत. अशाच ठिकाणांपैकी थोडेसे अपरिचित असलेले ठिकाण म्हणजे भुलेश्वर. पुराणकालात देवी पार्वतीने इथे भगवान शंकरासाठी नृत्य केले आणि त्याची महादेवांना भुरळ पडली. त्यानंतर त्यांचा विवाह झाला, अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. महादेवाला पार्वतीच्या सौंदर्याने भूल पाडली, म्हणून हे ठिकाण भुलेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले.तेराव्या शतकात देवगिरीकर यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक हेमाडपंती मंदिरे निर्माण करण्यात आली. याच शतकाच्या मध्यास भुलेश्वर मंदिराचे बांधकाम झाले असावे. सिंहगडावरून निघालेल्या सह्याद्रीच्या रांगेत यवतच्या नैऋत्येस ७०० फूट मध्यास भुलेश्वर मंदिर आहे. या मंदिराची वास्तुशैली दक्षिणेकडील होयसळ मंदिराप्रमाणे आयताकृती व पाकळ्यासदृश्य आहे. इतर हेमाडपंती मंदिरांच्या तुलनेत या मंदिरातील शिल्परचना उच्च प्रतीची आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरांच्या बाहेरील प्राकाराची रचना उत्तरेतील जैन मंदिरांच्या धर्तीवर आहे. येथील शिवमंदिरास भुलेश्वर-महादेव किंवा यवतेश्वर म्हणतात. मंदिराची मूळ बांधणी १३ व्या शतकातील असून सभोवतालची भिंत, नगारखाना व शिखरे १८ व्या शतकातील मराठा शैलीतील आहेत. पूर्वी मूळ मंदिरास भव्य प्राकार होता व नंदीचा मंडप स्वतंत्र होता. १८ व्या शतकात झालेल्या जीर्णोद्धारानंतर हे मंदिर एकाच छताखाली आले.

या मंदिरात मोठ्या प्रमाणात मानवी व देवतांची शिल्पे आहेत. देवळाभोवती असलेल्या ओवर्यांमध्ये अनेक देवतांच्या मूर्ती असून काही ओवर्या रिकाम्या आहेत. मुख्य सभामंडपांच्या भोवती असलेल्या अर्ध भिंतींवर युद्धप्रसंग, सिंह, हत्ती इत्यादी प्राणी व रामायण-महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. महाभारतातील प्रसंग भारतातील इतर मंदिरांपेक्षा येथे जास्त ठसठशीत व रेखीव आहेत. द्रौपदी-स्वयंवर, शरपंजरी भीष्म, हत्तीला आकाशात फेकणारा भीम ही कथानकशिल्प अधिक जिवंत वाटतात. मातृकादेवी, गणपती, विष्णूंचे अवतार, योद्धे, पक्षी इत्यादी विविध प्रकारचे शिल्पांकन मंदिरात आढळते. कुंभ, कमळ कीर्तीमुख, मकर, पाने-फळे, वेलबुट्ट्या ही शुभचिन्हे मंदिराच्या सुशोभनात वापरलेली आहेत. येथील दर्पणधारी स्त्रीमूर्ती शिल्पकलेचा सुंदर नमुना आहे. दक्षिण दरवाज्यावर असलेल्या भरत-शत्रुघ्नाच्या डाव्या बाजूस दोन चौघडावाले उंट दाखवलेले आहेत. दक्षिणेकडील मंदिरात उंटाचे शिल्प क्वचितच आढळते. माळव्यात प्रचलित असलेल्या भूमिज उपशैलीचा प्रभाव येथील काही शिल्पांवर ठळकरित्या आढळतो. यादव साम्राज्याची इतिश्री झाल्यानंतर यवनांकडून महाराष्ट्रातील अनेक मंदिरांची, शिल्पांची नासधूस करण्यात आली. भुलेश्वर मंदिरातील शिल्पांचेही या काळात अतोनात नुकसान झाले. इतके असूनही या मंदिरातील शिल्लक राहिलेल्या शिल्पांमुळे येथील सौंदर्य अद्यापि टिकून आहे.

१६३४ मध्ये विजापूरचा सरदार मुरार जगदेव याने या डोंगरावर ‘दौलत मंगळ’ नावाचा किल्ला मांडला. (शिवचरित्र प्रदीप – १९२५) या किल्ल्याचा भग्न बुरूज अद्यापही देवळाकडे जाताना उजव्या बाजूस दृष्टीस पडतो. पहिले बाजीराव पेशवे व सातारचे शाहू छत्रपती यांचे गुरू ब्रह्मेंद्रस्वामी यांनी अनेक हेमाडपंथी मंदिरांचा जीर्णोद्धार केला. १७३७ मध्ये स्वामींनी एक लाख रुपये खर्चून तीन कमानींचा नगारखाना, सभामंडप व तीन चुनेगच्ची शिखरे बांधली. हे बांधकाम संभाजी व व्यंकोजी नाईक या गवंड्यांनी केले. देवळाच्या बांधकामात स्वामी जातीने लक्ष पुरवित असत. दमाजी गायकवाड या सरदाराने पवारांवर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ जीर्णोद्धारास पंचवीस हजार रुपये दिले. वसईच्या विजयानंतर चिमाजी अप्पांनी भुलेश्वरास मुकुटाकरिता १२५ रुपये व सव्वाशे सोन्याच्या पुतळ्या अर्पण केल्याची नोंद ऐतिहासिक साधनांमध्ये आहे. ब्रह्मेंद्रस्वामींनी माळशिरस व यवतमध्ये विहिरी व तळी बांधून दिली. येथील जीर्णोद्धारामुळे हे मंदिर हेमाडपंथी-मराठा समिश्र वास्तुशैलीचे झालेले आहे.

या मंदिराचे गर्भगृह खोल असून गर्भगृहासमोर उंचावर काळ्या दगडातील कोरीव काम केलेला नंदी आहे. नंदीच्या उजव्या बाजूस एक ओटा असून त्यावर कासवावर बसलेला नंदी असावा. हल्ली त्याचे फक्त डोके शिल्लक असल्यामुळे हा प्राणी निश्चित कोणता असावा हे कळत नाही. गर्भगृहातील शिवलिंगाच्या संगमरवरी बाणावर पितळी मुखवटा बसवलेला आहे. बाण काढल्यानंतर खाली आत तीन मुख्य लिंगे, तीन कोपर्यात उंचवट्याच्या स्वरूपात असून ती ब्रह्मा, विष्णू व महेश यांची प्रतिके आहेत. पिंडीच्या खाली असलेल्या खोलगट भागात नैसर्गिकरित्या पाणी पाझरत असते. अन्य शिवमंदिरापेक्षा येथे अनेक वैशिष्ट्ये आढळतात. कीर्तीमुख, उंबरठ्यांच्या मध्यभागी न काढता दोन्ही अंगास कोरलेली आहेत. गाभार्याच्या गणेशपट्टीवर गणपतीचे चित्र असले तरी देवळाभोवती असणार्या दक्षिणभिमुख पट्ट्यांवर गणेशाऐवजी भैरवाचे शिल्प कोरलेले आहे. ओवर्या व दगडात कोरलेल्या खिडक्या यांची एकाआड एक मांडणी केलेली आहे.

मंदिराच्या गाभार्‍याच्या बाहेरील बाजूस वर तीन सप्तमातृकांच्या समूहात गणेशाचे स्त्रीरुपी दुर्मिळ शिल्प आहे. वेरूळच्या कैलासलेण्यात या प्रकारचे शिल्प आढळते. प्राचीन वाङ् मयात व स्कंदपुराणाच्या काशिखंपात चौसष्ट योगिनींच्या यादीत या गणेशाचा ‘वैनायकी’ असा केलेला आढळतो. देवीसहस्त्रनामात या देवतेस ‘विनायकी, लंबोदरी, गणेश्वरी’ अशा विशेषणांनी संबोधले आहे. ‘शिल्परत्न’ या ग्रंथात वैनायकीचा उल्लेख ‘शक्तीगणपती’ असा केलेला आहे. गुप्तकाळात प्रथम सप्तमातृका शिल्पाचा उगम झाला. मध्ययुगात शक्तिपूजक संप्रदायात वैनायकी पूजनाचे महत्व वाढले. वैनायकी शिल्पे गजमुख, चतुर्भुज आणि गणपतीप्रमाणे आयुधे धारण केलेली आढळतात. भुलेश्वर येथील वैनायकी शिल्पे पद्मासनात बसलेली असून सालंकृत आहेत. खाली मूषक हे वाहन आहे. येथे वेरूळच्या लेण्याप्रमाणे पूर्ण शिल्पपट्टीका नसून तीन सप्तमातृकांच्या शिल्पपट्टीत वैनायकीची शिल्पे आहेत.

भूलेश्वर मंदिरातील शिल्पे, शिल्पसौंदर्याचा उत्तम आविष्कार आहेत. पुरातत्वखात्याने हे मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. भुलेश्वरला पोचण्यासाठी पुणे-सोलापूर महामार्गाद्वारे उरुळी कांचन, लोणी काळभोर मार्गे यवतजवळ यावे. यवतच्या अलीकडेच उजवीकडे भुलेश्वर आणि माळशिरसकडे जाणारा फाटा आहे. त्या रस्त्याने घाट चढून आठ किलोमीटर गेलात, की पठारावर सपाटीकडे जाणारा रस्ता सोडून उजवीकडे चढावर दूरध्वनी मनोर्‍याच्या शेजारीच भुलेश्वराचे मंदिर आहे.

सौजन्य : फेसबुक वरील एका वाचकाने लिहिलेली ही माहिती मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी शेअर करत आहोत.

— मराठीसृष्टी व्यवस्थापन

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..