नवीन लेखन...

दमा

दररोज श्वासावाटे लाखो अदृश्य कण आपल्या संपर्कात येत असतात. काही मंडळींना यांपैकी एक किंवा अनेक  गोष्टींची अ‍ॅलर्जी निर्माण होऊन खोकला येतो, छाती भरते, बंद खोलीत गुदमरायला होतं. मोकळय़ा जागेत, आवारात जरा बरं वाटतं. या परिस्थितीला ‘दम्याचा अ‍ॅटॅक’ असं म्हणता येईल. निदान, उपचार, उपकरण, फॉलो अप आणि वातावरण बदल या सगळय़ांवर सातत्याने प्रयत्न केले तर दम्यावर पूर्ण ताबा मिळवणे सहज प्रयत्नसाध्य आहे!
दमा हा शब्द ऐकताच अनेक रुग्ण जरा घाबरतातच. लहान मुलांचे आईवडील तर चिंतेतच पडतात. माझ्या वीसेक वर्षांच्या अनुभवात असे आढळून आले आहे की दमा हे निदान झाल्यावर त्याचा स्वीकार करण्यास रुग्ण नाखूश असतात. बरेचदा डॉक्टर्सही मग त्याला दमा न म्हणता ‘अ‍ॅलर्जीक आँगकायटीस’ या नावाचा ‘गोंडस पर्याय’ शोधतात. पण जर खरंच दमा असेल तर अचूक निदान शक्य आहे आणि त्यावर ताबा मिळवणे कष्टप्रद असले तरी प्रयत्न साध्य आहे. मात्र पूर्वअट अशी की निदान स्वीकारणे अपरिहार्य आहे. सर्वप्रथम हे समजून घेऊ की दमा म्हणजे नक्की काय?
दररोज श्वासावाटे लाखो अदृश्य कण आपल्या संपर्कात येत असतात. या कणांमध्ये परागकण, विविध प्राणी वा सूक्ष्म कीटकांच्या अंगाचे कण, वायू प्रदूषणाचे कण असे अनंत प्रकार असतात. काही मंडळींना यांपैकी एक किंवा अनेक  गोष्टींची अ‍ॅलर्जी निर्माण होते. या अ‍ॅलर्जीमुळे त्यांच्या श्वासनलिका एकाएकी अरुंद होतात आणि हवा आत तर येते पण बाहेर जायला अडथळा येतो. श्वास सुई सुई वाजतो. खोकला येतो. छाती भरते. उठून बसावंसं वाटतं. कपडे सैल करावेसे वाटतात. बंद खोलीत गुदमरायला होतं. मोकळय़ा जागेत, आवारात जरा बरं वाटतं. या परिस्थितीला ‘दम्याचा अ‍ॅटॅक’ असं म्हणता येईल.
असे झाले तर यावर तात्पुरता उपाय म्हणजे श्वासनलिका उघडतील असे औषध घेणे. अस्थालीन, लेव्हीलीन सारखी औषधे (इनहेलर्स) हे काम चटकन करतात आणि स्वस्त असल्यामुळे या औषधांचा रुग्णांमध्ये खूपदा अतिवापर केला जातो. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्वासनलिकांना प्रत्येक आकुंचनानंतर एक विशिष्ट अ‍ॅलर्जीक सूज येते आणि कालमानाने ही सूज वाढतच जाते. ज्यांना हंगामी (Seasonal) दमा असतो त्यांना त्या काळात (उदाहरणार्थ काँग्रेस गवताला फुलोरा आल्यानंतर) ही सूज खूपच तीव्र होते आणि मग अ‍ॅटॅक्स वारंवार आणि जास्त जोराचे येतात. साहजिकच आहे की तात्पुरत्या औषधांनी (वर उल्लेख केलेल्या) ते बरेही होत नाहीत.

थोडक्यात म्हणजे अ‍ॅलर्जीक सूज कमी करणे हा दम्यावर ताबा मिळवण्याचा खराखुरा उपचार आहे. स्टेरॉईडसच्या गोळय़ा किंवा इंजेक्शने हे काम उत्तम करतात. वाय सोलोन, डेक्सोना अशी औषधे वापरल्यास अ‍ॅटॅक चटकन आटोक्यात येतो. जीव वाचवण्यासाठी ही औषधे डॉक्टर्स ‘शॉर्ट कोर्स’ (काही दिवस उपचार) म्हणून रुग्णांना देतात. पण आपण जाणतो की पोटात जाणारी स्टेरॉईडची गोळी ही आयुष्यभर घेणे नक्कीच असुरक्षित किंवा धोकादायक आहे. पण मग असे औषध फक्त श्वासनलिकेत सोडले तर? दम्यावरील उपचारांमध्ये आज सर्वात महत्त्वाचे औषध म्हणजे श्वासावाटे जाणारे स्टेरॉईड. ज्याला इनहेल्ड स्टिरॉईड्स (Inhaled steroid) म्हणतात. मंडळी हे औषध शंभर टक्के सुरक्षित तर आहेच पण नियमित वापराने ते श्वासनलिकांची सूज कमी करते आणि अ‍ॅटॅक्स पूर्णपणे थांबवते. इनहेलर स्टेरॉईड आणि श्वासनलिका उघडून धरणारी अशी दुहेरी औषधे एकाच इनहेलर पंपामध्येही मिळतात आणि या औषधांचा योग्य आणि नियमित वापर ही दम्याच्या रुग्णाला नवसंजीवनीच आहे.

या वेळी प्रश्न असतो, कुठल्या रुग्णाला किती डोस द्यायचा? हे कसे ठरवायचे यासाठी आज मेडिकल तंत्रज्ञानाचा एक छोटेखानी चमत्कार उपलब्ध आहे. त्याला म्हणतात स्मायरोमेही अर्थात फुप्फुस क्षमता चाचणी. डॉक्टराच्या क्लिनिकवर वीस मिनिटांत आणि काही वेळा जोराने फुंकर मारून आपली फुप्फुस क्षमता आणि दम्याचा पक्का पुरावा मिळतो, तीव्रतेचा पूर्ण अंदाज येतो आणि श्वासावाटे घेतले जाणारे औषध श्वासनलिका उघडते की नाही (reversibility) यांचाही पूर्ण पडताळा मिळतो. जसे उच्च रक्तदाब किंवा मधुमेह मोजून उपचार करतात तसेच आधुनिक तंत्रज्ञान सहजपणे दमा मोजून उपचार करू शकते. त्याचप्रमाणे कालांतराने परिस्थिती सुधारली किंवा बिघडली तर पुन: पुन्हा मोजून डॉक्टरांना डोस अ‍ॅडजस्टही करण्याची सोय उपलब्ध होते.

या पलीकडे जाऊन श्वासावाटे घेण्याच्या औषधांचे कुठले उपकरण वापरावे याचे काही संकेत आहेत. सौम्य दमा असेल तर रोटाकॅप्स जरूर वापरता येतात. पण मध्यम ते तीव्र आजार, लहान मुले, म्हातारी माणसे यांना स्पेसर वाटे आणि एम.डी.आय. (पंप) असे औषधे देणे सोपे आणि योग्य आहे. खूपच छोटे बाळ असेल तर बेबी मास्क स्पेसर आणि एम.डी.आय. इनहेलरचा वापर करता येतो.  आपण जर दमेकरी असाल किंवा आपल्या बाळाला दमा असेल तर पुढील काळजी घ्या.

१) वातावरणातील बदल- घरामध्ये धूळ साठेल असे कारपेट्स ठेवू नका. घर सफाईच्या वेळी धूळ उडणार नाही अशा पद्धतीने साफसफाई करा.
२) कुठलाही धूर निर्माण करताना विचार करा. उदबत्ती, कासव छाप यांमुळेही दमा बळावू शकतो.
३) कुठलीही फवारणी पेस्ट कंट्रोल, बेगॉन स्प्रे अगदी सुगंधी परफ्युम्स वापरतानाही विचार करा. शक्यतो दमेकरी माणसाने त्यावेळी तिथून दूर असले पाहिजे.
४) रंगकाम-फर्निचर काम सुरू असताना दमेकऱ्यास दूर ठेवा.
५) अनेकदा आपल्याला बेड माईट्सची अ‍ॅलर्जी असू शकते. याचा संपर्क टाळण्यास गाद्या व उशांना प्लास्टिक कव्हर घाला. आपल्या चादरी व पांघरुणे सुती कपडय़ांचीच वापरा.
६) घरामध्ये कुत्रा, मांजर असेल तर त्याची अ‍ॅलर्जी निर्माण होऊ शकते. डॉक्टरांशी बोला व निर्णय घ्या.
७) सर्वात महत्त्वाचे दम्याच्या आजाराचे निदान होत असेल तर त्याला सामोरे जा.
८) फुप्फुस क्षमता चाचणीने निदान पक्के करा.
९) डॉक्टरांनी दिलेलेऔषध नियमित वापरा.
१०) उपकरण वापरण्याचे तंत्र समजून घ्या. डॉक्टरांना फॉलो अप देताना आपण औषध कसे वापरतो आहोत ते दाखवा.
११) कुठल्याही परिस्थितीत नियमित वापराचे औषध बंद करू नका. नेहमी परिस्थिती आणीबाणीची असल्यासारखे वागा.
१२) अनेकदा दम्याबरोबर अ‍ॅलर्जीक सर्दीसुद्धा सोबत असते. त्यासाठी नाकातील स्टेरॉईड स्प्रे डॉक्टर देऊ शकतात. याचाही वापर नियमित करा.

दमेकऱ्यांसाठी सूचना-
*बदलत्या हवामानात, ढगाळ वातावरणात दमा बळावू शकतो. या काळात डॉक्टरांना भेटून डोस वाढवण्याची गरज लागू शकते.
* धूम्रपान आणि दमा म्हणजे आगीत तेल ओतणे आहे हे नक्कीच टाळा.

* अन्नपदार्थाची अ‍ॅलर्जी ही खूपच कमी वेळा दम्याशी संबंधित असते. आपल्याला जाणवल्यास हे डॉक्टरांशी बोला. विविध वातावरणात जर पुन:पुन्हा आणि तीव्र रिअ‍ॅक्शन आली तरच अन्नपदार्थाची अ‍ॅलर्जी आहे असे माना.

* आहारामध्ये विनाकारण बंधने घालू नका. लिंबू नाही, ताक नाही, दही नाही, फळे नाहीत असा नन्नाचा पाढा या गोष्टींची खरीखुरी अ‍ॅलर्जी नसताना आपल्या मुलांवर लादू नका.

*अन्नपदार्थाची अ‍ॅलर्जी लिस्ट- तशी मोठी आहे, पण ही अ‍ॅलर्जी दुर्मीळ असते. त्यामुळे मुद्दामच लिस्ट देत नाही. त्यातल्या त्यात विविध नट्स आणि समुद्री (sea food) खाद्यपदार्थ लक्षात ठेवायला हरकत नाही.

* बाल दमा आपोआप नाहीसा होईलच हे सत्य नाही. रुग्णाचा अ‍ॅलर्जीकारक वस्तूंशी संपर्क आणि त्याला मिळणाऱ्या औषधांचा प्रभाव यातून आजार कितपत ताब्यात येतो, यानुसार त्याचे भवितव्य ठरते.

* हंगामी दमा (seasonal asthma) हा ठरावीक कालावधीत (ऑगस्ट-सप्टेंबर) बळावू शकतो आणि उन्हाळय़ात रुग्ण एकदम नॉर्मल राहू शकतो.
* सर्वात महत्त्वाचे म्हणजे योग्य उपचार न मिळाल्याने दमा बळावतो, जुनाट होतो आणि हळूहळू श्वासनलिकांत कायमस्वरूपी बदल होऊ लागतात. मग हा आजार सा.ओ.पी.डी. या जास्त दुर्धर आजारात रुग्णांतरित होतो. ज्यामुळे आयुष्यमान कमी होण्याचा धोका वाढतो.
* व्यायामाचा योग्य उपयोग जरूर करावा काही व्यक्तींना exercise induced asthma म्हणजे व्यायामाने बळावणारा दमा असतो. या माणसांनीसुद्धा व्यायाम सोडणे योग्य नाही. योग्य उपचारांनंतर व्यायाम पूर्ववत करता येतो. फ्लोरेन्स ग्रिफिथ जॅकजॉयनर हिने पाच ऑलिंपिक मेडल्स जिंकली ती दमेकरी होती. यावरून सत्य लक्षात येईल.

* अ‍ॅस्थिरिन, ब्रुफेन यांसारख्या वेदनाशामक औषधांनी दमा बळावू शकतो. निदान, उपचार, उपकरण, फॉलो अप आणि वातावरण बदल या सगळय़ांवर सातत्याने प्रयत्न केले तर दम्यावर पूर्ण ताबा मिळवणे सहज प्रयत्नसाध्य आहे!

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
डॉ. नीतिन अभ्यंकर

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..