नवीन लेखन...

थक्क करणारा प्रवास – तृषार्त पथिक

  साहित्य वाचकाला प्रगलभ बनविते असे म्हणतात, अर्थात हे खरेच आहे. मात्र तृषार्त पथिक हे पुस्तक वाचकाला केवळ प्रगल्भच करते असे नाही तर एका थक्क करणार्‍या प्रवासाची सुस्पष्ट अनुभूती देते. हे पुस्तक वाचताना आपण लेखकांसमवेत प्रवास करीत असल्याची भावना निर्माण होते आणि न कळतच वाचकाच्या डोळ्यांच्या ओलावतात.

अध्यात्मिक ज्ञान मिळविण्याच्या सर्वोच्च ध्येयासाठी सर्वस्वाचा त्याग करणारा 19 वर्षीय अमेरिकन युवक भारत देशातील सर्वात श्रेष्ठ कृष्णभक्त होईल, असे भाकित चाळीस वर्षांपूर्वी एखाद्याने वर्तविले असते तर त्याला लोकांनी मुर्खात काढले असते. मात्र हे त्रिकालबाधित सत्य आपल्या महान देशात अवतरले आहे. नुसते अवतरलेच नाही तर जगातील 108 देशात कृष्णभावनेचा प्रचार-प्रसार करणार्‍या इस्कॉनचे महान प्रचारक या नात्याने मध्य अमेरिकेतील रिचर्ड स्लेविन हे राधानाथ स्वामी या पवित्र नावाने जगभरात कृष्णभक्तीची ज्योत तेवत ठेवण्याचे कार्य करीत आहेत.

त्यागाची असीम ओढ, विरक्तीची आसक्ती, मनातील तृष्णा आणि देवत्वाचे गुण अंगी बाणावे म्हणून असंख्य संकटांचा केलेला सामना याचा सुरेख संगम या पुस्तकात पहायला मिळतो. मनात कसली तरी लपलेली उर्मी अन त्या उर्मीसाठी हजारो मैल प्रदेश तुडविल्यानंतर आपल्या महान भारत देशात आल्यानंतर वीस वर्षीय पूर्वाश्रमीच्या रिचर्ड स्लेविन या तरुणाला गंगामाता हरिनामाचे गीत अर्पण करते आणि सुरू होते राधानाथ स्वामींचे अवतार कार्य. आपली माणसे, घरदार, सुख-सोयी, कपडे-लत्ते, सुगंधी द्रव्ये, उबदार शय्या, पैसा-अडका, संगी, चित्रपट, मनोरंजनाची अनेक साधने सोडून एका वस्त्रानिशी खांद्यावरच्या एका झाळीसह खिशात दमडीही नसताना एक ज्यू धर्मीय अमेरिकन युवक 1960 च्या दशकात अमरिकेत उदयाला आलेला चंगळवाद, सेक्स, ड्रग्ज, रॉक ऍण्ड रोल, संगीत, मद्य, चरस, गांजा यांच्या जोडीला सुंदर तरुण युवती अशा हिप्पी संस्कृतीच्या वातावरणात वाढलेला रिची अर्थात रिचर्ड आपल्या महान भारत देशात येऊन भारतमातेच्या कुशीत

भक्तीरसात लोळण घेतो. भारतीय संस्कती आणि अध्यात्म याचाच हा प्रभाव म्हणावा लागेल.

मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद श्यामानंद प्रभू आणि रघुपती प्रभू यांनी अतिशय सुुुंदर आणि सर्वांना समजेल अशा सोप्या शब्दांत केला आहे. 380 पृष्ठांचा प्रवास अत्यंत रोचक, विलक्षण, रोमांचकारी, थक्क करून सोडणारा, आश्चर्य वाटायला लावणारा, भारावून टाकणारा असा आहे. एखाद्या रहस्यमय कादंबरीला मागे टाकणार्‍या या पुस्तकाचे वाचन करताना ते कधीच खाली ठेवू नये, असे वाटते.

अध्यात्मिक ज्ञान प्राप्तीसाठी अनेक हाल अपेष्टा सहन करणार्‍या रिचर्ड या 19 वर्षी अमेरिकन युवकाला भारतात येण्यापूर्वी अनेक अग्निदिव्यातून जावे लागते. हॉलंडमध्ये एक पैसा खर्च न करता कसे जगायचे, याचे ज्ञान रिचर्ड आणि गॅरी दोघांनी प्राप्त करून घेतले. या दोघांपैकी रिचर्डला भारतात जा तर गॅरीला इस्त्रायलला जा असा एकाच वेळी अंतर्नाद ऐकू आला आणि त्यानुसार दोघा जिवश्च कंठश्च मित्रांनी आपापल्या ध्येयाकडे आगेकूच केेली. यापैकी रिचर्ड अर्थात सध्याचे राधानाथ स्वामी यांनी ध्येयप्राप्तीसाठी अनंत संकटे पार करीत भारतात येऊन पवित्र हरीनाम प्राप्त केले. तुर्कस्थानमधील कॉलर्‍याची साथ, तेथील गुडांच्या तावडीतून सहीसलामत सुटून उपासमारी, एका महिलेने केलेली अतिरेकी मागणी, सुंदर युवतीने सहजीवनाची प्रार्थना केलेली प्रार्थना हे सारे लाथाडून अध्यात्माचा शोध घेणारे राधानाथ स्वामी हे खरे वीर आहेत. कारण इंद्रिय संयम करून विविध प्रलोभनांचा मोठ्या निकराने प्रतिकार करुन भक्तीरसाची प्राप्ती करणे हे एका वीराचेच काम आहे. अनेक शारिरीक व्याधी सहन करीत इराण सोडून पाकिस्तानमध्ये आल्यानंतर भारतात प्रवेश नाकारला जाणे त्यानंतर दैवी कृपेने एका अधिकार्‍याच्या मनात दया उत्पन्न होऊन भारतात प्रवेश मिळणे आणि त्यानंतर हिमालयात जाऊन तपस्वींच्या सानिध्यात आपल्या ध्येयाचा शोध घेणे हे सारे थक्क करणारे आहे. शेवटी प्रेमवन अर्थात वृंदावनमध्ये आल्यानंतर असीम कृष्णदास बाबांच्या समवेत कृष्णभक्तीचे खरेखुरे दर्शन झाल्यानंतर कृष्णमय माणसे, कृष्णमय खाणे-पिणे अशा सर्वकाही कृष्णमय वृंदावनात रिचर्डची श्रील प्रभुपादांशी भेट होते आणि त्यांचा गुरु म्हणून स्विकार केल्यानंतर त्याला हरे कृष्ण हरे राम या हरीनामाच्या गीताचे सर्वकाही उलगडा झाला.

या पुस्तकात आढळणारे चिंतनरुपी संस्काराचे बोल, तत्वज्ञान भाष्य हा आगळा वेगळा प्रभावी विचार भाषा सरळ, प्रवाही आहे. वाचकाला खिळवून ठेवण्याची अनोखी ताकद या पुस्तकात आहे. अनेक परदेशी तत्वज्ञानी व्यक्तींनी भारतीय तत्वज्ञान, वेद, भगवद्‌गीतेत रुचि दाखविली आहे. त्यांची अनेक पुस्तके आहेत. परंतु, राधानाथ स्वामींचे तृषार्त पथिक हे पुस्तक स्वतःच्या अनुभवाचे दर्शन तर आहेच पण अध्यात्मिक उन्नतीचा साक्षात अविष्कार आहे. सदर पुस्तक वाचताना हे भाषांतर आहे की मूळ पुस्तक असा भ्रम पडतो.

— बाळासाहेब शेटे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..